पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असहाय्य

असहाय्य

 

आयुष्यात काही गोष्टी, काही घटना अशा असतात, ज्या आपण कधीच विसरू शकत नाही. आपण कुठेही गेलो किंवा काहीही करत असलो , तरी त्या आठवणी आपल्या मनात कायम रेंगाळत राहतात. काही दिवसांच्या काळ्या सावल्या आपल्या आयुष्याला निरंतर झाकोळून टाकतात आणि आपले आयुष्यच बदलून जाते. 

ही अशीच एक घटना होती जी इतक्या वर्षांतही मनावरून पुसली गेली नाही.

 

 

तारीख होती १६ जुलै, १९८८. आम्ही पुण्याजवळील एका छोट्याशा शांत गावात राहत होतो. आमचे गाव म्हणजे एक आल्हाददायक हिरवागार परिसर होता, चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आणि शहराच्या बाहेर वाहणा-या शांत नदीचे सान्निध्य लाभलेला. आमच्या आजूबाजूचे हिरवेगार पर्वत सुद्धा घनदाट जंगल आणि काही जंगली प्राण्यांनी व्यापलेले होते.

या भागातील बहुतेक रहिवासी हे निम्न मध्यमवर्गीय, तुटपुंजे उत्पन्न कमावणारी कुटुंबे होती. जेमतेम काही किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या पुण्यात काही कुटुंबांतील तरुण नोकऱ्या करत होते. ह्याच छोट्याशा गावाच्या कोपऱ्यात, जवळजवळ डोंगराच्या पायथ्याशी, आमची छोटी रो-हाऊसची वसाहत होती.

या वसाहतीत राहणे सुरक्षित होते. क्वचितच कधीतरी काही शेजाऱ्यांच्या लॉनमधून फावडे किंवा पक्कड यांसारख्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार कानावर यायची, किंवा कधीतरी कोणाच्या स्कूटरचे आरसे किंवा सीट कव्हर काढून घेतल्याची बातमी कानावर पडायची! पण बस्स; तेवढेच! अशा घटनांव्यतिरिक्त, शेजारी इतके भयानक काहीतरी घडेल हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचे होते.

 

 

आमच्या सोसायटीत विशीच्या आसपास वयाचे दीपक आणि सुवर्णा हे नवविवाहित जोडपे दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे मे महिन्यात, सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावातून राहायला आले होते. दीपकला चिंचवडला एका कारखान्यात नोकरी लागली होती आणि त्यामुळे या जोडप्याने आमच्या कॉलनीत एक रो-हाऊस भाड्याने घेतले होते. दीपकला त्याच्या सहकाऱ्यांसह फॅक्टरी क्वार्टरमध्ये राहण्याची परवानगी होती, परंतु सुवर्णा त्याच्यासोबत गावाहून आली असल्याने त्याने नकार दिला आणि आमच्या गावापासून त्याच्या कारखान्यापर्यंत दररोज तासभर प्रवास करण्याचा पर्याय निवडला. रोज रात्री तो उशिरा घरी परतायचा आणि पुन्हा सकाळी लवकर कामासाठी निघायचा.

सुवर्णा ही अतिशय देखणी आणि मनमोहक तरुणी होती. तिच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला परतपरत तिच्याकडे पाहण्याचा मोह नक्कीच व्हायचा. ती सावळ्या रंगाची, पण नाकीडोळी उठावदार, तरतरीत तरुणी होती. नवविवाहित असल्याने ती गळ्यात लांबलचक, वजनदार सोन्याचे मंगळसूत्र, कपाळावर सुंदर लाल बिंदी, पायात पैंजणे आणि हातात वर्खाच्या हिरव्या बांगड्या सतत घालत असे. बहुतेक वेळा ती साड्याच नेसत होती , त्यामुळे तिची कमनीय कंबर उठून दिसायची. तिची शरीरयष्टी आणि एकूणच दिसणं अगदी ठसठशीत होतं. गावाकडच्या रांगड्या सौंदर्याचा ती एक अप्रतिम नमुना होती.

ज्या दिवशी दीपक आणि सुवर्णा सोसायटीत राहायला आले, त्यादिवशी आसपासच्या लोकांमध्ये कुजबुज सुरू होती. प्रत्येकजण उत्सुकतेने त्या जोडप्याकडे एक नजर टाकण्यासाठी खिडकीतून डोकावत होता. बरोबर आणलेले सामान उतरवून नवे रहिवासी स्थिरस्थावर झाले, तेव्हा त्यांच्या शेजारीच राहणा-या श्रीमती उषा म्हात्रे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे सरसावल्या. त्यांना त्या दिवशी स्वतःच्या घरचे जेवण आणून देऊन आपलेसे केले. त्यांची सुवर्णाशी पटकन मैत्री झाली. त्यानंतर म्हात्रे काकींनी आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांशी त्यांची ओळख करून दिली. प्रत्येकाला नवीन कुटुंबाची साधारण माहिती मिळाली; विशेषतः दीपकच्या नोकरी व दिनचर्येबद्दल तपशील समजला.

सुवर्णा तिचे गाव सोडून, कुटुंबापासून एवढ्या लांब येण्याची ही पहिलीच वेळ होती. सुवर्णा जास्त बोलायची नाही; पण ती एक मृदू, सभ्य, लाजाळू आणि लाघवी मुलगी म्हणून सर्वांनाच आवडायला लागली. सर्व महिलांनी सुवर्णाचे प्रेमाने स्वागत केले आणि त्या जोडप्याला "काहीही मदतीची आवश्यकता वाटली, तर हक्काने सांगा" असा आपलेपणाचा सल्ला दिला. 

 

 

नव्या जागेत आणि नव्या संसारात ते जोडपे रमले होते आणि दिवस भरभर चालले होते. 

 

 

१६ जुलै, शनिवारी रात्री पावसाचा वेग वाढला होता. दीपक नेहमीप्रमाणे त्याच्या कारखान्यातून रात्री दहाच्या सुमारास परतायला हवा होता; पण बराच उशीर झाला, तरी तो आला नव्हता. जोरदार पाऊस पडत होता आणि सुवर्णा घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा ठेवून, साडेदहापर्यंत धीराने त्याची वाट पाहात थांबली होती. पण त्या वादळी पावसात आणि भयाण काळोखात ती अस्वस्थ झाली. तिला दीपकच्या सुरक्षित परतण्याची काळजी वाटू लागली. आता ती जास्त वेळ थांबू शकत नव्हती. ती छत्री उघडून म्हात्रे काकींच्या घराकडे धावली आणि तिच्या मनातली भीती व्यक्त केली. काकींनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण तिची घाबरलेली अवस्था पाहून तिच्या मदतीला सज्ज झाल्या. 

त्या काळात वसाहतीमध्ये रामानंद पाटील यांच्याशिवाय जवळपास कोणाच्याही घरी लँडलाईन फोन नव्हता. ते एक बडे कारखानदार असल्याने त्यांच्या घरात फोनचे कनेक्शन होते. म्हात्रे काकींसोबत सुवर्णा त्यांच्या घरी गेली आणि दीपकच्या कारखान्यात फोन लावला. पावसामुळे लाईनमध्ये खूपच खडखड ऐकू येत होती, पण फोनवर पतीचा आवाज ऐकून सुवर्णाची भीती जरा कमी झाली.

त्याने तिला पटापट सांगितले की गावाकडे परतणाऱ्या महामार्गावर सततच्या मुसळधार पावसामुळे खूप पाणी साचले आहे. तो घरी परतण्याचा प्रयत्न करत होता, पण ते शक्य झाले नाही. शेवटी, तासभर ट्रॅफिकमध्ये अडकलेली सार्वजनिक बस सोडली आणि कमरेपर्यंत साचलेल्या गढूळ पाण्यातून वाट काढत, तो त्याच्या कारखान्याकडे परत गेला. पाणी कमी होईपर्यंत तो मित्राच्या क्वार्टरमध्ये थांबून उद्या सकाळी घरी परत येईल. त्याने सुवर्णाला शांत राहण्याचा, जेवण करून झोपण्याचा सल्ला दिला. सकाळी पाणी ओसरताच लवकरात लवकर घरी पोहोचण्याचे आश्वासन दिले. आजूबाजूला म्हात्रे काकी आणि श्री.पाटील असल्यामुळे सुवर्णा जास्त बोलू शकली नाही, पण हळूवारपणे तिने नवऱ्याला "काळजी घ्या" असे सांगून रिसीव्हर खाली ठेवला. सुवर्णा आता निश्चिंत झाली होती. 

पावसाने आता परत वेग घेतला होता. म्हात्रे काकी सुवर्णाच्या सोबत तिच्या घरी परतल्या. त्यांनी सुवर्णाला रात्रभर त्यांच्या घरी येऊन राहावे असा आग्रह केला, पण सुवर्णाने नकार दिला. तिला स्वतः जेवून त्यानंतरची बरीच आवराआवर करायची होती. तिने सांगितले की तिला स्वतःच्या घरात सुरक्षित आणि सुखरूप वाटते आहे. "काळजी करू नका, मी ठीक आहे", तिने काकींना पटवून दिले. रात्री ११च्या सुमारास तिला घरी सोडून काकी परतल्यावर सुवर्णाने घराचा मुख्य दरवाजा बंद केला. 

 

 

दुसऱ्या दिवशी १७ जुलै रविवार होता. रात्रभर पाऊस एक सेकंदही थांबला नव्हता आणि अजूनही कोसळत होता. कॉलनीतील नालाही आता तुंबून वाहू लागला होता.प्रत्येकजण आपापल्या घरात अडकून पडले होते. सुट्टीचा दिवस असल्याने लोक फारसे घराबाहेर पडलेच नाहीत.

 

 

दुपारी ४ वाजता पाटील यांच्या लँडलाईनवर फोन आला. दीपकने फोनवरून सांगितले की आम्ही अजूनही कारखान्यात अडकलो आहोत. "काका, मला सुवर्णाशी बोलायचे आहे. तिला इथे बोलवून घ्याल का? मी परत दहा मिनिटांनी फोन करीन." पाटील काका घमेंडखोर आणि फारसे कोणाच्या अध्यातमध्यात नसलेली बडी असामी होते. पण दीपकच्या आवाजातील आर्जव त्यांना झिडकारता आले नाही. भर पावसात ते छत्री घेऊन दीपकच्या घरी गेले. मुख्य दरवाजाला कडीकुलूप नाही; तो अर्धवट उघडा आहे, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी सुवर्णाला हाक मारली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दोन-तीन वेळा हाक मारूनही आतून काहीच हालचाल दिसेना. तेव्हा त्यांनी स्वतः आत न जाता, सुवर्णाची चौकशी करायला म्हात्रे काकींना आवाज दिला. 

म्हात्रे काकींनी लगबगीने घरात प्रवेश केला आणि समोरचे दृश्य पाहून त्या हादरल्याच! मुख्य हॉल आणि किचनच्या मधल्या भागातील जमिनीवर सुवर्णा जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. तिच्या अवतीभवती सर्वत्र रक्त सांडलेले होते. तिचे कपडे अगदी अस्तव्यस्त आणि तिची साडी कमरेच्यावर फेकली गेल्याने पाय उघडे पडले होते तिच्या डझनभर काचेच्या हिरव्या बांगड्या तुटूनफुटून सभोवताली पडल्या होत्या, त्यामुळे तिची घुसखोराशी चांगलीच झटापट झाल्याचे जाणवत होते. तिच्यावर निर्दयीपणे कोणी वार करून गेले होते. रक्ताने माखलेली ती जागा पाहून पाटील काकी भांबावल्या आणि किंचाळत घराबाहेर धावल्या आणि त्यांना भोवळ आली. पाटीलकाकांनी आत डोकावले आणि ते अवाक् झाले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच, अचानक काय झाले हे पाहण्यासाठी सर्व शेजारी पावसातही दीपकच्या घराकडे धावले. 

"शांत व्हा, घाबरू नका, मला रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलवू द्या!", सोसायटीचे एक सक्रिय कार्यकर्ते सुरेश देशमुख सर्वांना म्हणाले. पाटील काकांना दीपकचा परत फोन येणार असल्याचे आठवले आणि त्यांनी दीपकला ही बातमी कळवायला घराकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत सुरेश, लोकेश, आनंद वगैरे सोसायटीतील काही कार्यकर्त्यांचा एक गटही पोलीसला कळवण्यासाठी गेला.

 

 

पोलीस आणि रुग्णवाहिका येताच घर रिकामे केले गेले. पोलिसांनी घटनास्थळाची छायाचित्रे घेतली आणि पीडितेची सर्वांकडे चौकशी सुरू केली. "पीडित व्यक्तीला शेवटचे कोणी पाहिले होते?", अधिकाऱ्याने विचारले. आता थोड्याफार सावरलेल्या म्हात्रे काकी पुढे आल्या आणि काल रात्री घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी एक विशेष तपशील सांगितला, “मला आता आठवतं, आम्ही पाटील साहेबांच्या घरून परत आलो, तेव्हा मला तिच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसल्याचं आठवतं. तीही दाराकडे बघत थोडावेळ घुटमळली, पण मला वाटलं की ती माझ्या घरी घाबरून, धावतपळत आल्याने चुकून दार उघडेच राहिले असेल. तिला सुखरूप आत जाताना पाहिल्यावरच मी तिथून निघाले", पाटील काकी बोलता बोलता रडू लागल्या.

“पण तिचे ओरडणे, किंचाळी तुमच्यापैकी कोणी ऐकली नाही का? तिला इतक्या क्रूरपणे भोसकले आहे!", त्याने पुन्हा विचारले. काकी म्हणाल्या, “मला आत्ता आठवतंय. मी परत येऊन झोपले होते. पण एक तासानंतर, बाराच्या सुमारास, मला एक हलकीशी किंकाळी ऐकू आली. पण पाऊस एवढा मुसळधार पडत होता, आणि ढगांचा गडगडाट, मधूनच चमकणा-या विजेच्या आवाजात इतर काही आवाज जाणवतच नव्हते. मी काय ऐकते आहे याची मलाच खात्री नव्हती. पण काल ​​रात्री मी स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला होता.” सुवर्णाच्या पलीकडच्या शेजा-याने ह्या तपशिलात भर घातली, “हो! त्याच वेळी मलाही किंकाळी ऐकू आली, पण आम्ही सर्व गाढ झोपेत होतो. मला वाटले की मला एक वाईट स्वप्न पडले आहे. त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार केला नाही.”

आजूबाजूच्या महिलांकडून आणखी एक तपशील समोर आला, सुवर्णा एक महिन्यापूर्वी रात्री तिच्या बेडरूमच्या खिडकीतून कोणीतरी डोकावल्याबद्दल बोलली होती. तिने त्या व्यक्तीला हटकण्याचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती तेवढ्यात पळून गेली होती.

 

 

तब्बल तीन तासांनंतर दीपक अत्यंत दु:खात घरी परतला. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नव्हते. "सुवर्णा..." त्याने सुवर्णाच्या नावाने जोरात हंबरडा फोडला आणि दुःखाने तो जवळजवळ जमिनीवर कोसळला. पोलीस आता त्याला शुद्धीवर आल्यावर, पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची आणि चौकशी सुरू करण्याची वाट पाहात होते. तो सावरल्यावरचा पहिला प्रश्न हाच होता, “दीपक, काल रात्री हे सगळं घडलं तेव्हा तू कुठे होतास?” दीपकने सर्व घटनाक्रम नीट सांगून रात्री सुवर्णाशी फोनवर बोलल्याचेही सांगितले. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत, पण पोलिसांचा त्याच्यावर संशय वाढत होता. “तू खरंच कारखान्यात होतास का? सुवर्णा तुझ्याशी खरंच बोलली का? की काल रात्री येणार नाही सांगून, गुपचूप तिला मारण्यासाठी घरी परत आला होतास ? कदाचित स्वतः घरी न येता, तिला मारण्यासाठी कोणालातरी सुपारी दिली असशील आणि रात्री मुद्दाम घरापासून दूर राहिला असशील!”

दीपक हे सर्व आरोप जितक्या कळकळीने फेटाळत होता, तितकेच पोलीस त्याच्याकडून काहीतरी काढून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. "तिचं कुणाबरोबर अफेयर होतं का? आजूबाजूचे लोक म्हणतात की ती खूपच सेक्सी होती!" दु:खाच्या भरातही दीपकचा राग अनावर झाला होता, पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. "असे तर नाही की, तुम्ही तिला एखाद्या पुरुषासोबत पाहिले आणि रागाच्या भरात तिची हत्या केली?" आता दीपकला त्या अधिकाऱ्याचे थोबाड फोडायची इच्छा झाली होती, पण लोकेश आणि आनंदने त्याला मागे खेचले. लोकेशने दीपकला शांत केले आणि अधिकाऱ्याशी बोलला, “सर, तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे ते कृपया मला विचारा. तो आधीच खूप त्रस्त आहे. त्याला आणखी त्रास देऊ नका."

दीपकने त्याचे सुवर्णावर खूप प्रेम असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “आमचा संसार खूप सुखाचा चालला होता. सुवर्णा खूप गोड, प्रेमळ मुलगी होती आणि आम्ही एकमेकांना खूप आवडायचो. तिच्या मरण्याची साधी कल्पनाही मी करू शकत नाही. माझी चौकशी करण्यात तुमचा वेळ वाया घालवण्याऐवजी तुम्ही तिच्या खुन्याला लवकर शोधण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मला वाटते. तुम्ही त्याला शहरातून पळून जाण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याची संधी देत ​​आहात सर! मी तुम्हाला विनंती करतो. कृपा करून माझ्यावर विश्वास ठेवा आणि सुवर्णाचा खरा मारेकरी शोधा."

 

 

त्यानंतर अधिकाऱ्यांनी दीपकने सांगितलेल्या मजकुराचा सुगावा थोडक्यात तपासला. तो रात्रभर खरोखरच फॅक्टरी क्वार्टर्समध्ये उपस्थित असल्याची पुष्टी केली गेली. त्याच्या वर्तनाचे, स्वभावाचे पुरावे गोळा करण्यात आले. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या बाजूने साक्ष दिली.

 

 

त्यानंतर पोलीस अधिकारी सुरक्षा रक्षकांकडे वळले.

घरे डोंगराजवळ आहेत; कोणीही चोर लुटारू घरात शिरून, त्यासाठी खून करू शकतो, असे सर्वांना वाटले. पण म्हात्रे काकींनी सांगितल्याप्रमाणे सुवर्णाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेलेले नाही, तिचे कानातील झुमके शाबूत आहेत, त्यामुळे चोरीची शक्यता वाटत नाही. दीपकनेही घरातील कोणतीही वस्तू हलवल्याचे किंवा चोरीला गेल्याचे दिसत नाही याची पुष्टी केली. त्या अधिकाऱ्याने सोसायटीतील लोकांना विचारले, “तुमच्या रो-हाऊसच्या कॉलनीत एकही सुरक्षा रक्षक का नाही?” यावर लोकांनी उत्तर दिले, “आमची वसाहत खूप सुरक्षित आहे. आमच्या इथे चोरीच्या किरकोळ घटना घडल्या आहेत, पण यासारखे गंभीर गुन्हे कधीच झालेले नाहीत." लोकेश म्हणाला, “मी सुरक्षेचे काही प्रशिक्षण घेतलेले आहे. मी आमचाच स्वयंसेवी रक्षकांचा एक गट तयार केला आहे. आम्ही कोणतेही शुल्क न घेता, समाजसेवा म्हणून सोसायटीत हे काम नियमितपणे करतो.” इतरांनी त्याला दुजोरा दिला. "काल रात्री सुरेशची पहारा देण्याची पाळी होती, पण तो पावसात भिजल्याने आजारी होता आणि गेल्या तीन दिवसांपासून त्याची फेरी चुकली होती, त्यामुळे जागेवर पहारा देण्यासाठी कोणीही नव्हते.

"किती बेजबाबदार!", अधिकारी उद्गारला. पण लोकेशने त्याच्या मित्राला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, “सर, आजूबाजूला काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्यापैकी कोणीतरी नेहमी जागरूक असतो. पण कालच्या मुसळधार पावसामुळे कोणीही बाहेर पडले नाही. असे काही होईल ह्याची काय कल्पना!” 

 

 

जवळपास साठ शेजाऱ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. सुवर्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता, पण अहवाल यायला काही महिने लागणार होते. तोपर्यंत, पोलिसांनी शहराच्या आजूबाजूच्या सर्व क्षुल्लक गुन्हेगार आणि चोरांची चौकशी केली, परंतु त्यांना कोणतेही मजबूत पुरावे मिळाले नाहीत. 

दीपकने जड अंतःकरणाने आणि उध्वस्त मनाने तीन दिवसांनी म्हणजे २० तारखेला सुवर्णाचा अंत्यसंस्कार केला. तिचे कुटुंबीय आणि सासरची मंडळीही बातमी कळताच येऊन पोहोचले होते. आजूबाजूच्या लोकांसह सर्वजण दु:खी होऊन अंत्यसंस्काराला उपस्थित होते. एका अल्पवयीन मुलीचा असा अकाली मृत्यू झाल्याचे पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत होते.दीपकच्या मनावर ह्या सगळ्याचा खूप आघात झाला होता. तो काही आठवड्यांसाठी त्याच्या गावी गेला; नंतर त्याच्या नोकरीवर परतला, परंतु त्याने फॅक्टरी क्वार्टरमध्ये राहणे पसंत केले. प्रिय पत्नी सुवर्णासोबत जिथे इतके आनंदाचे क्षण उपभोगले, त्या घरात तो परत प्रवेश करू शकणार नाही, असे सांगून दीपकने ते घर सोडले. 

या प्रकरणातील संशयितांच्या यादीतून दीपकचे नाव कधीच काढून टाकण्यात आले नाही, पण पुढे कोणताही सुगावा न लागल्याने ते प्रकरण थंडावले.

 

 

********

 

 

तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला होता आणि दिवाळीचा सण आला होता. शेजारच्या घरातील दु:खाचे पडसाद कमी करून सोसायटीत पुन्हा चैतन्य आणण्यासाठी, काही उत्साही सदस्यांनी क्लब हाऊसमध्ये एक छोटी पार्टी आयोजित केली होती. दीपक तिथे नसल्यामुळे लोकांचे काही गट अजूनही खुनाबद्दल बोलत होते, पण इतरत्र जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते. जेवण सर्व महिलांनी तयार केले होते आणि त्या सर्वांना प्लेट्स भरून देत होत्या. लोकेश पुरुषांच्या बसण्याच्या जागेत प्लेट्स देत होता. सोसायटीच्या महिलांमध्ये एक कॉन्स्टेबल मालती होती, ती महिलांच्या सर्व्हिंग काउंटरवर उभी राहून सर्वांशी हसतखेळत बोलत होती. रिंकू या बारा वर्षांच्या मुलीला भरलेल्या प्लेट्स पुरुषांना देण्यास सांगण्यात आले. “जा, ही प्लेट लोकेश काकांना दे”, रिंकूची आई तिला म्हणाली. रिंकू पुटपुटली, “मी नाही जाणार, लोकेश काका प्रत्येक वेळी मी त्यांना प्लेट दिली की माझ्या हाताला स्पर्श करतात”. रिंकूच्या आईने कामाच्या धांदलीत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण आत्ताच ऐकलेल्या गोष्टीकडे मालतीचे लक्ष वेधले गेले . एका पोलिसाच्या भूमिकेतून तिला रिंकूने नुकतेच काय सांगितले ते दुरून पाहण्यास प्रवृत्त केले. लोकेशने रिंकूच्या हातून प्लेट घेताना खरोखरच तिच्या दंडाला स्पर्श करत दाबला, ज्याची काहीच आवश्यकता नव्हती. मालती लगेच काही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही, पण दुसऱ्या दिवशी तिने कामावर राणेंशी ह्याची चर्चा केली.

 

 

वरिष्ठ गुन्हे अन्वेषण अधिकारी आशिष राणे यांना नुकतेच सुवर्णाच्या केसवर काम करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून या निर्घृण हत्येला हाताळण्यात स्थानिक पोलिसांची अक्षमता स्पष्ट झाली होती. राणे पुणे शहरातून ह्या कामावर खास आले होते . त्यांच्याकडे अशा गाढल्या गेलेल्या केसेस वर काम करण्याचा मोठा अनुभव होता. राणेंनी सर्व साक्षीदारांचे स्टेटमेंट्स, उपस्थितीचे पुरावे , गुन्ह्याच्या दृश्यांचे फोटो आणि जवळपासच्या बहुतेक लोकांच्या वैयक्तिक इतिहासाचाही बारकाईने अभ्यास केला होता आणि सुवर्णाला न्याय मिळवून देण्यासाठी ते काही नवीन दृष्टीकोन शोधत होते.

“काय सांगतेस मालती? लोकेश फाळके हे गावातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि शेजा-यांना ते खूप आवडतात,” राणे म्हणाले.

“सर, त्याने रिंकूला ज्या प्रकारे स्पर्श केला त्याचा हत्येशी काही संबंध आहे असे मी म्हणत नाही, पण मला त्याचे वागणे योग्य वाटले नाही. आणि एक सजग हवालदार म्हणून, आमच्या नजरेला आलेल्या कोणत्याही छोट्या गोष्टीची सुद्धा माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटले”, मालती कडक आवाजात बोलली.

राणेंनी तिचे कौतुक केले, “धन्यवाद मालती. ही उपयोगाची माहिती आहे. मी त्यामध्ये लक्ष घालीन! "

 

 

दोन दिवसांनी लोकेशला अनौपचारिकपणे ठाण्यावर बोलावण्यात आले. राणेंनी त्याला चहा दिला आणि सुवर्णाच्या केसचा विषय काढला. “फाळके, चार महिने झाले, काही तर सुगावा लागायला हवा. तुम्ही सोसायटीमधले प्रतिष्ठित सदस्य! तुम्हाला त्याची काही कल्पना नाही का? गावातले लोक चर्चा करतात! कृपया काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या मदतीची अपेक्षा करतोय!"

लोकेशने उत्तर दिले, “सर, माझी क्षमता असती, तर आज मी मारेकऱ्याला तुमच्या ठाण्यात खेचले असते. पण मी काय करू शकतो?"

रिंकूचा विषय काढून, लोकेशचा विश्वास गमावणे हे राणेंना त्या क्षणी योग्य वाटले नाही .

 

 

लोकेशला दोन दिवसांनी पुन्हा ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी राणेंनी काही योजना आखल्या होत्या. त्यांनी थेट लोकेशला "मारेकरी कोण हे माहीत आहे का", असा सवाल केला. लोकेशने नकारार्थी उत्तर दिले.

राणे लोकेशच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, “फाळके, आमच्याकडे काहीतरी पुरावा आहे, ज्याचा मारेकऱ्याशी संबंध आहे. आम्हाला तो पुरावा सुवर्णाच्या मृतदेहाजवळ सापडला होता. तेव्हा तो चाचणीसाठी पाठवण्यात आला होता आणि आता चाचणीचे निकाल आले आहेत....”

राणे काही बोलायच्या आधीच लोकेश एकदम म्हणाला, “काय? काय? काय आहे पुरावा? मला सांगा?"

“आरामात फाळके! मी तुम्हाला सर्व काही सांगेन. पण सध्या तुम्हाला काय माहीत आहे, हे मला माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला काही माहिती आहे का?", राणे यांनी प्रश्न केला, "तुम्ही असे काही ऐकले आहे का , जे आम्हाला सांगायलाच हवे? आपण एखाद्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहात का? विचार करा! आणि हे मला आधी कळवा.”

“मला काहीच माहीत नाही सर; पण तुम्हाला काय कळलं ते मला कळायला हवं!”, लोकेशने हवालदिल अवस्थेत आग्रह केला.

“जे काही सापडले आहे, ते पुन्हा सुवर्णाच्या घरी, त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्याच्यासह मारेकऱ्याला पकडण्याचा आमचा प्रयत्न आहे. असो, आवश्यक असल्यास आम्ही तुम्हाला पुन्हा कॉल करू. तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद!", राणेंनी लोकेशची फसवणूक केली होती आणि पुराव्यांबद्दल ऐकून त्याची कशी घाबरगुंडी उडते, तेच राणेंना बघायचे होते. याआधीही त्यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये काम केले असून, बारीकसारीक चौकशीत ते निष्णात होते . लोकेशच्या चेहऱ्यावर दिसलेली घबराट राणेंना नवीन नव्हती. त्यांनी ओळखले की त्यांना त्यांचा माणूस मिळाला आहे! पण पुराव्याविना शंका केससाठी पुरेशा नव्हत्या. पुढील दोन दिवस, गुप्त पोलिस सुवर्णाच्या घराबाहेर लपून बसले होते आणि सर्व जाणेयेणे करणाऱ्यांवर नजर ठेवून होते. त्यांना दिसले की लोकेश भयभीत होऊन सतत त्या घराकडे पाहत आहे; कधी गेट जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहे, तर कधी खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करीत आहे. तेथून चालत जाणाऱ्या महिलांनी "काय पाहताय?" असे विचारले असता, त्याने आपले कर्तव्य म्हणून घरावर लक्ष ठेवत असल्याचे उत्तर दिले. पण त्याची वागणूक संशयास्पद होती.

 

 

सुमारे आठवडाभरानंतर लोकेशला राणेंनी पुन्हा बोलवून घेतले. 

“फाळके, मारेकरी कोण आहे हे आम्हाला समजले आहे”, त्याला राणे म्हणाले, “आणि तुम्ही आजच त्याचे नाव आम्हाला सांगावे अशी आमची इच्छा आहे”. लोकेश आपली नकाराची विधाने पुन्हा पुन्हा सांगत राहिला. शेवटी राणे म्हणाले, “तुम्ही लाय-डिटेक्टर चाचणी देताना हे बोलू शकता का?”, पण लोकेशनी त्यालाही ठामपणे नकार दिला.

“तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात? मी न केलेल्या गोष्टीची कबुली द्यावी अशी तुमची इच्छा आहे का? तुम्हाला दोषी ठरवायला दुसरे कोणी मिळाले नाही, म्हणून तुम्ही माझ्यावर हे सर्व आरोप करत आहात तर! . खुनाच्या दिवसापासून मी पोलिसांना एवढी मदत केली आणि या बदल्यात मला काय मिळाले ? ही बदनामी? मी ह्यापुढे कोणतीही मदत करणार नाही, आणि तुमच्या मूर्ख प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ह्यापुढे मी इथे येण्याची अपेक्षा करू नका.”

राणेंच्या शंका दिवसेंदिवस दृढ होत होत्या. तथापि, ते आणि त्यांची टीम लोकेशला फक्त कबुली देण्यासाठी गुंतवत नव्हते, तर ते लोकेशबद्दल काही ठोस सुगावा गोळा करण्याच्या मार्गावर होते.

“मी आता निघू शकतो का?”, लोकेशने गुर्मीने विचारले, त्यावर राणेंनी शांतपणे उत्तर दिले, “हो प्लीज!”.

पण लोकेश जितका चिंतेत होता तितकाच तो बाहेर पडताना जोरात बडबडत राहिला, “मसणात गेली ती रांड सुवर्णा. माझा तिच्याशी काही संबंध नाही. नवरा घरी नसताना ती कुलटा पुरुषांना भुलवून तिच्या घरात कशी गोळा करायची, हे तुम्हाला माहीत आहे का? त्या सैल चारित्र्याच्या बाईच्या मृत्यूसाठी तू मला दोष देतोस...."

लोकेश आता एकेरीवर येऊन पोहोचला आणि स्वतःवरचा संयम हरवून आरडाओरडा करू लागला . त्याच्या बोलण्याचा राणेंवर आणखी प्रभाव पडला. “मृतात्म्याचा इतका द्वेष!”, त्याने स्वतःशीच विचार केला.

 

 

लोकेश कॉलनीत परत येताच त्याने लगेच सगळ्यांना बागेत बोलावले, “सावधान!”, तो पालकासारखा, नेत्यासारखा सर्वांना म्हणाला, “पोलीस आता आपल्या मागे लागले आहेत. आज ते मला खुनात अडकवण्याचा प्रयत्न करत होते. उद्या ते तुमच्या मागे येतील. आपण वर्षानुवर्षे या सोसायटीत एकत्र राहत आहोत! अचानक हे जोडपे आले आणि आपल्या शांत आणि सुरक्षित वसाहतीच्या शांततेत भंग झाला. या विरोधात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.” सर्व शेजाऱ्यांनी लोकेशला पाठिंबा दर्शवला, “फाळकेसाहेब, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत”, ते सर्व ओरडले.

 

 

दुसऱ्या दिवशी अकल्पनीय घडले. हा प्रसंग संपूर्ण सोसायटीसाठी धक्कादायक होता. लोकेशला सुवर्णा खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी म्हणून अधिकृतपणे चिन्हांकित केले गेले. अधिकारी राणे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी लोकेशला घराबाहेर काढले आणि ठाण्यात नेले. पोलिसांच्या जीपभोवती सर्व लोकांनी निदर्शने केली, मात्र पोलिसांनी आपला मार्ग धरला. लोकेश स्वतःचा बचाव करत होता आणि खरा मारेकरी शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने माझ्यावर आरोप करत आहेत, असा प्रचार करत होता. ते ठाण्यात पोहोचताच लोकेशला कोठडीत बंद करण्यात आले. सर्व शेजाऱ्यांनी घोषणाबाजी करत ठाण्याचे प्रवेशद्वार जाम केले होते आणि ठाण्यावर दगडफेक करत होते. ते लोकेशच्या सुटकेसाठी मागणी करत होते. काही वेळाने लोकेशची चौकशी सुरू झाली, “लोकेश फाळके, खरे बोलण्याची ही शेवटची संधी आहे; यानंतर, तुम्हाला तुमच्या खोटे बोलण्याबद्दल पश्चाताप होईल."

लोकेश अजूनही अभिमानाने आपले निर्दोषत्व जाहीर करत होता. राणेंनी मग भांडे फोडले, “फाळके, सुवर्णाच्या हॉलमध्ये बाहेरच्या बागेकडे जाण्याच्या रस्त्यावर रक्ताळलेल्या पायाचे ठसे होते. संततधार पावसामुळे दारापलीकडे अंगणातील ठसे पुसले गेले होते, पण पोलिसांनी १७ जुलै रोजीच पावलांच्या ठशांचे मोजमाप आणि छायाचित्रे घेतलेली होती. आम्ही ते तुमच्या ठशांशी आधीच जुळवले असते, तर आम्ही या केसमध्ये खूप पुढे जाऊ शकलो असतो. पण तुमच्यासारख्या भल्या माणसावर कोणी संशय घेतला नाही! आता मात्र गेल्या आठवड्यापासून आम्ही तुमचा पाठलाग करत आहोत. तुम्ही तुमच्या बागेत अनवाणी चालताना तुमच्या पावलांचे ठसे अंगणातील चिखलात उमटलेले आहेत. आमच्या टीमने तुमच्या पावलांचे ठसे आता सुवर्णाच्या हॉलमध्ये आढळलेल्या ठशांबरोबर जुळवले आहेत. ते पूर्णपणे जुळत आहेत! आता तू त्या रात्री तिच्या घरी होतास हे नाकारण्याची हिम्मत केलीस, तर तुझी हाडे शाबूत राहणार नाहीत."

 

 

या मोठ्या खुलाशानंतर राणेंना खात्री होती की लोकेश काही तरी कबूल करेल, पण तो सर्व काही नाकारत राहिला. राणे आता ह्या निगरगट्टपणाला कंटाळले होते आणि त्यांनी सहका-यांना लोकेशला बेदम मारहाण करण्याचे आदेश दिले. पाच मिनिटांच्या जालिम मारहाणीनंतर अचानक लोकेशने तोंड उघडले. 

"कृपया थांबा, थांबा! मी तुम्हाला खरं काय घडलं, ते सांगतो. मी सुवर्णाला मारलेले नाही, मी शपथ घेतो. त्या रात्री मी तिच्या घरी गेलो होतो. तिचा मुख्य दरवाजा उघडा होता. मी पहारा देत होतो, तेव्हा पाहिलं आणि माझं कर्तव्य म्हणून मी त्यांना ते बंद करायला सांगण्यासाठी आत गेलो. मी घरात प्रवेश करताच, हॉलच्या शेवटी, स्वयंपाकघराकडे जाणाऱ्या वाटेवर, सुवर्णा रक्ताने माखलेली दिसली. मी तिच्यापासून खूप दूर होतो, पण तिचे रक्त माझ्या दिशेने वाहत होते आणि त्याने माझे पाय भिजत होते. रक्त बघून मी खूपच घाबरलो आणि तिथून पळत सुटलो, सरळ माझ्या घरी परतलो. माझ्यावर विश्वास ठेवा! ह्याच कारणानी माझ्या पायाचे ठसे तिथल्या जमिनीवर उमटले.”

राणे आता शांतपणे बोलले, “ठीक आहे फाळके, मग तुम्ही लगेच पोलिसांना फोन का केला नाही?”

“मला भीती वाटत होती सर, मला वाटलं की तुम्ही माझ्यावरच शंका घ्याल आणि आता तेच झालंय!", लोकेश जवळजवळ रडतच म्हणाला.

राणेंनी पुन्हा चौकशी केली, “सांगा फाळके, तुम्ही सुवर्णाच्या शरीरापासून किती दूर होता आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी दिसल्या? कृपया शांत व्हा आणि प्रत्येक तपशील आठवण्याचा प्रयत्न करा. आम्हाला केस सोडवायला तुम्हीच मदत करा."

“मी जवळजवळ मुख्य दरवाजाजवळ होतो; मी घरात फारसा शिरलो नव्हतोच! होय, पण रक्ताव्यतिरिक्त, मला आठवते की तिचा गळा चिरला होता, म्हणून मला कळले की ती आधीच मेली आहे. त्यामुळे मी घाबरलो आणि पळत सुटलो."

राणेंनी लोकेशच्या डोळ्यात टक लावून पाहिलं; एक हुंकारभरे स्मितहास्य करत फक्त "ठीक आहे!" म्हटलं आणि चौकशी थांबवली.

 

आपण सर्व काही सत्य बोललोय ह्यावर विश्वास ठेवून आता आपली सुटका होणार, ह्या विचारात लोकेश तिथून निघून जाण्याची तयारी करत होता, पण ही तर फक्त सुरुवात होती.

 

राणेंनी त्या रात्री लोकेशविरुद्धचे आरोपपत्र आत्मविश्वासाने तयार केले. लोकेशला लॉकअपमध्ये डांबून ठेवले होते. जमाव आता पांगला होता; पण सगळीकडे गप्पांची नवी लाट पसरली होती. “पोलिसांना फाळकेंविरुद्ध काय सापडलं? तो खरोखरच मारेकरी आहे का?" काही जण म्हणाले, "आम्हाला तो कधीच आवडत नव्हता, तो नेहमी संशयास्पद वाटायचा, पहारा देण्याच्या बहाण्याने लोकांच्या खिडकीतून डोकावतो". काही स्त्रिया म्हणाल्या, "मी काही वेळा त्याला माझ्या स्तनांकडे हावरटपणे पाहत असल्याचे पाहिले आहे, पण त्याबद्दल उघडपणे कधी बोलले नाही". ह्या सर्व गप्पा रंगत असूनही, कॉलनीतील बहुतेक पुरुषांनी त्याला निर्दोष घोषित केले. त्यांनी लोकेशवर विश्वास ठेवला आणि 'अशा जघन्य गुन्ह्यासाठी खोटा आरोप लावणे हे सुवर्णासोबत घडलेल्या घटनेपेक्षा वाईट आहे' असे सांगितले.

 ही बातमी सगळीकडेच पसरली होती. अनेक महिने स्थानिक वृत्तपत्रांना हेडलाईन्स आणि मालमसाला पुरला होता. लोकेश नोकरी करत असलेल्या सुरक्षा एजन्सीनेही त्याच्या निर्दोषत्वाचा दावा केला होता. त्याच्या मुलांना सोसायटीत जगणे कठीण झाले होते. कधी-कधी त्यांना इतर मुलांकडून त्रास व्हायचा.

 

तीन महिने कोठडीत राहिल्यानंतर आणि त्याला जामीन न मिळाल्याने लोकेशला त्याच्या खटल्याला सामोरे जावे लागले. लोकेशसाठी बचाव पक्षाच्या वकीलाची नियुक्ती करण्यासाठी, सोसायटीतील लोकांनी देणगी गोळा केली होती.वकिलालाही त्याच्या निर्दोषतेवर विश्वास होता आणि त्याने केससाठी कमी फी आकारण्याचे मान्य केले होते. कॉन्स्टेबल मालती आणि लहान रिंकू यांच्यासह विविध साक्षीदारांनी त्यांना काय माहित होते याची साक्ष दिली. बचाव पक्षाने काही साक्षीदार सादर केले, ज्यांनी सुवर्णाच्या पुरुषांबद्दल असभ्य वृत्तीची साक्ष दिली. लोकेश अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम होता," त्याने सुवर्णाचा मृतदेह पाहिला आणि तो घाबरून पळून गेला. राणे आणि फॉरेन्सिक डॉक्टरांना त्यांच्या जबाबासाठी बोलावण्यात आले.

 

राणे यांनी काही आश्चर्यकारक तपशीलांचा उल्लेख केला, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. ते म्हणाले, “फाळके यांना सुवर्णाच्या मृतदेहाविषयी अनौपचारिकपणे तपशील विचारण्यात आला. तिचे हात, पाय, कपडे यांची स्थिती काय होती; आणि त्याने त्या सर्वांना बरोबर उत्तर दिले. जर तो 5 सेकंदांपेक्षा जास्त काळ घरात नसल्याचा दावा करत असेल, तर त्याला हे सर्व कसे कळले? सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुवर्णाचा गळा कापल्याचा फॉरेन्सिक अहवाल आम्ही कोणालाच उघड केला नव्हता. लोकेश आणि मृत शरीरातील अंतर, तिच्या गळ्यातील संपूर्ण रक्ताचे प्रमाण आणि तिची साडी ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने फेकली गेली होती, ते लक्षात घेता लोकेशला चिरलेल्या गळ्याबद्दल माहिती मिळणे अशक्य आहे. तो दावा करत आहे, त्यापेक्षा त्या रात्री लोकेश सुवर्णाच्या नक्कीच जवळ होता.

          शवविच्छेदनादरम्यान बरेच घट्ट रक्त साफ केल्यानंतर फॉरेन्सिक डॉक्टरांनाही तिच्या घशावर कापलेले दिसले होते. आमची एकंदर तपासणी सांगते...... ‘मुख्य दरवाजा उघडा ठेवून सुवर्णा श्रीमती म्हात्रे यांना भेटायला धावली. फाळके नेहमीप्रमाणे सुवर्णाच्या घराभोवती फिरत होते. त्यांनी दोघींना पाटील यांच्या घरी जाताना पाहिले आणि पटकन सुवर्णाच्या उघड्या दारातून घरात प्रवेश केला. थोडावेळ तो तिथे लपला. सुवर्णा परत आल्यावर, त्याने दिपकच्या रात्रीच्या अनुपस्थितीबद्दल महिलांचे म्हणणे ऐकले असेल आणि त्याकडे वाईट कृत्य करण्याची एक उत्तम संधी म्हणून पाहिले असेल. सुवर्णा आत आली आणि आतून दरवाजा बंद केला. रात्री बाराच्या सुमारास सुवर्णाच्या किंकाळ्या ऐकू आल्या म्हणजे त्या सुमारास बलात्काराचे दुष्कृत्य घडले असावे. सुवर्णाने आरडाओरडा केला. त्याने तिला धमकावले, तिच्यावर वार केले, त्यानंतर १२.४०च्या सुमारास तिचा गळा कापला. रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. तिच्या रक्ताने माखलेले पायाचे ठसे जमिनीवर सोडून फाळके तिथून पळून गेला.

     सुवर्णा ही एक सभ्य, चांगल्या चारित्र्याची स्त्री होती; फाळके वगळता, आम्ही तिच्या शेजारच्या पुरुषांकडून प्रलोभन किंवा फूस लावल्याबद्दल ऐकले नाही, महिलांचीही तशी तक्रार नाही. दुर्दैवाने ती अशा धोकादायक शिकारीला बळी पडली.

परंतु खेदाची गोष्ट म्हणजे, मी हे देखील कबूल करतो की घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक पोलिसांकडून गुन्हे स्थळ सील करण्यासाठी विलंब झाला. पोलिस येण्यापूर्वी अनेक शेजारी रक्ताळलेल्या शरीरावर एक नजर टाकण्यासाठी, मुख्य दरवाजाला स्पर्श करत होते. त्यामुळे आम्हाला मुख्य दरवाजावर सापडलेल्या कोणत्याही मूळ बोटांच्या ठशांशी छेडछाड केली गेली. तसेच, आमच्याकडे सुवर्णाच्या शरीरातील काही नमुने आहेत, परंतु फॉरेन्सिक टीम ते कोणत्याही गुन्हेगाराशी मॅच करू शकले नाहीत. आम्ही सध्या या तंत्रज्ञानात खूपच कमकुवत आहोत. शिवाय, केवळ दीपकवर संशय घेऊन पोलिसांनी वाया घालवलेले सुरुवातीचे ३-४ दिवस, गुन्हेगाराने वापरलेले खुनाचे हत्यार कधीही सापडलेले नाही, त्याचे कपडे किंवा त्याच्याशी जोडणारे इतर कोणतेही पुरावे वगैरे नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. तरीही माझी सगळी तपासणी याच एका माणसाकडे आहे,” राणेंनी सरळ लोकेशकडे बोट दाखवलं.

 

राणेंनी आपले विधान संपवताच, खरा गुन्हेगार न शोधतायेण्यासाठी लोक त्यांना पक्षपाती, लाचखोर अधिकारी वगैरे म्हणत, त्यांचा धिक्कार करू लागले. आपण आपली भूमिका चोख बजावली हे जाणून राणे सन्मानाने बाजूला झाले.

 

संपूर्ण चाचणीला सुमारे ८ महिने लागले. लोकेशला 'अंडरट्रायल' ह्या दर्जाखाली तुरुंगात ठेवले होते. आता जवळपास वर्षभर तो तुरुंगात राहिला होता. आणि मग निर्णयाचा दिवस आला होता!

त्या दिवशी लोकेशच्या भवितव्याचा निर्णय होणार होता. बर्‍याच तारखांनंतर, दीपक आणि सुवर्णाचे कुटुंबीयही या सत्रात सहभागी झाले होते. दीपकचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता, पण न्यायमूर्तींनी लोकेश फाळके यांच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. "लोकेशला दंड ठोठावण्यासाठी पुरावे आणि युक्तिवाद पुरेसे नाहीत" हे ठरले. हा निकाल ‘नॉट गिल्टी’ असा होता. कोर्टात टाळ्या आणि जल्लोष झाला. बाहेर वाट पाहणारे समाजातील सदस्यही तितकेच आनंदी होते. त्यांनी मिठाई वाटून सन्मानाने लोकेशला घरी विकत घेतले. ज्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि प्रेम केले त्या सर्वांना त्याने कोर्टाबाहेर कृतज्ञतेचे एक छोटेसे भाषणही दिले.

 

त्यामुळे सुवर्णा हिची केस अनुत्तरित राहिली.

*********

 

त्याला ३५ वर्षे झाली.ती घटना आजही सर्वांना आठवते. कोणालाही सत्य माहिती नाही, परंतु त्या रात्री आणि नंतरच्या महिन्यांत काय घडले याचे वर्णन प्रत्येकजण रंगवून सांगत असतो. 

 

माझ्याकडेही ह्या कथेचा एक वृत्तांत आहे. पोलिस, प्रसारमाध्यमे आणि शेजाऱ्यांकडून अनेकवेळा चौकशी करण्यात आल्याने मी लोकेशचे निर्दोषत्व कायम ठेवले आहे.

मी, श्रीमती राधा लोकेश फाळके, लोकेशची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांची आई, जी १९८८ मध्ये खूप लहान होती! आज माझी कथा सांगते आहे.

 

 

त्या रात्री लोकेश १२.५०च्या सुमारास घरी परतला. तो बराच वेळ घरात नसल्याने मी जागी राहून हॉलमध्ये त्याची वाट पाहत होते.

त्याच्या पायाला रक्त लागले होते; परंतु केवळ त्याच्या पायावरच नाही, तर त्याच्या पांढर्‍या शर्टवर, हातांवर आणि चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे थेंब होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या हातात रक्ताने माखलेला हॅकसॉ होता जो आमच्या गॅरेजचा होता. त्याच्याकडे आ वासून पाहणा-या मला त्याने माझे तोंड बंद करण्यास सांगितले आणि मला बाथरूममध्ये घेऊन गेला, जिथे तो स्वत:चे शरीर साफ करू लागला.

तो अस्वस्थ होता, जोरदार श्वास घेत होता आणि मग त्याने मला माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्टी सांगितल्या! रात्रीचे जेवण झाल्यावर सुरेशचा पर्याय म्हणून हिंडण्यासाठी आणि सुवर्णाच्या घरात डोकावून तिची झलक पाहण्याचा प्रयत्न करत तो रात्रीच्या जेवणानंतर बाहेर पडला होता. ती राहायला आल्यापासून गेल्या २ महिन्यांचा त्याचा हा नित्यक्रम होता. सुवर्णाला दार उघडून म्हात्रे काकींसोबत जाताना त्याने दिपकच्या अनुपस्थितीबद्दल ऐकले होते. तिच्या जवळ येण्याची ही त्याची योग्य संधी होती. तिला धमकावण्यासाठी त्याने त्याचा हॅकसॉ उचलला आणि सोफ्याच्या मागे लपून तिच्या हॉलमध्ये घुसला. दीपक रात्री घरी येत नसल्याचे त्याला समजले आणि परत येताच सुवर्णाने आत येऊन, दरवाजा आतून लॉक केला.

 

सुवर्णावर बलात्कार करून त्याची हत्या केल्याचे त्याने कबूल केले, पण त्याचे त्याला दु:ख झाले नव्हते . त्याला फक्त ते करायचं होतं, असं तो म्हणाला. “तिच्या हॉट लुक्स आणि मोहक शरीराने ती मला रोज मारायची. मला फक्त ती हवी होती, पण तिने गप्प बसावे अशी माझी इच्छा होती.

 

आणि मला तुझ्याकडून पण तेच हवे आहे”, तो चाकू माझ्याकडे दाखवत बोलला. रक्ताच्या थारोळ्यात तो तहानलेल्या सैतानासारखा दिसत होता. माझा नवरा असे काम करण्यास सक्षम आहे हे मला कधीच माहीत नव्हते आणि मला धमकावण्याची हिंमतही त्याच्यात होती.

मी रोज वाचलेल्या धार्मिक पुस्तकावर त्याने मला शपथ द्यायला लावली की माझ्या आयुष्यात कधीही त्याचे रहस्य कोणाला सांगणार नाही. त्याने मला आधी आमच्या मुलांचा विचार करायला सांगितले, जे वरच्या मजल्यावर शांतपणे झोपले होते; हे सर्व त्यांचे आयुष्य, त्यांचे भविष्य कसे उद्ध्वस्त करेल! त्याने मला विचार करायला सांगितले की तो आमच्या कुटुंबाला किती आर्थिक मदत करतो आणि त्याच्याशिवाय मला कसे त्रास होईल. “जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा एक रात्र घरी नसतो तेव्हा तिचे काय होते ते पहा. मी तुरुंगात गेल्यावर तुम्हाला हेच नशीब हवे आहे का?” त्याने मला विचारले. त्याच्या स्वतःच्या बायकोबद्दलच्या विचारांनी मी थक्क झालो. हत्येनंतर काही दिवसांपर्यंत मी काहीही बोलू शकलो नाही. मी त्याला त्याचे कपडे फाडण्यास आणि जाळण्यास आणि हॅकसॉ साफ करण्यास मदत केली. मी वेळोवेळी शेजाऱ्यांना त्याचे निर्दोषत्व पटवून दिले. मी वारंवार खोटे बोललो की मी रात्रभर झोपलो होतो आणि मला काहीच माहित नाही.

 

बिचार्‍या सुवर्णाने तिचे नशीब स्वीकारले आणि मी माझे नशीब स्वीकारले.

 

मी गप्प बसले! मी कायम गप्प बसले!

*********

 

जुलै २०२३ मध्ये तब्बल ३५ वर्षांनी सुवर्णाला न्याय मिळाला! अधिकारी राणे यांना सेवानिवृत्त होण्याआधी फक्त एक महिना बाकी असल्याने त्यांनी सुवर्णा खून प्रकरण पुन्हा उघडले आणि प्रगत डीएनए तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी सुवर्णाच्या गुप्तांगातून सापडलेल्या डीएनए नमुन्यांची लोकेशशी तुलना केली आणि ते परिपूर्ण जुळले असल्याचे घोषित केले. “डीएनए तपास खोटे बोलत नाहीत, मिसेस फाळके”, त्यांनी सरळ माझ्या डोळ्यात बघत मला सांगितले, मी पुन्हा एकदा माझ्या पतीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला . “त्याला अटक करा”, त्याने आपल्या कनिष्ठांना आज्ञा केली, “आणि त्या महिलेलाही अटक करा. मला नेहमीच खात्री होती की तिला सर्व काही माहिती आहे आणि ती तिच्या दुष्ट, मारेकरी पतीचे रक्षण करत आहे.” त्यांनी मला आणि लोकेशला ओढत घराबाहेर काढले, कारण माझी मुले माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती.

 

आज, ३१ ऑगस्ट रोजी, जलदगती न्यायालयाने लोकेशला जन्मठेपेसह सक्तमजुरीसह 'दोषी' म्हणून घोषित केले; आणि माझ्यासाठी, पुन्हा पुन्हा खोटी साक्ष दिल्याबद्दल आणि त्याच्या वाईट गुन्ह्यांचा सहकारी असल्याबद्दल पॅरोलच्या कोणत्याही शक्यतेपूर्वी किमान ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

 

मी काय? लोकेशच्या गुन्ह्यात साथीदार की केवळ एक असहाय्य पत्नी?

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू