पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रीत

“हॅलो... हॅलो...”

   ट्रिंग... ट्रिंग... फोनची रिंग बराच वेळ वाजत राहिली. जीवने साहेब रात्रौ ड्युटी असल्याने डोळे चोळत त्रासिकपणे उठले होते.

   “च्या मायला, रात्रपण हा फोन गरजतो.... ह्या ड्युटीमुळे तर...! ऐ मदन्या झोपलास का? बघ ना कोणाचा फोन आहे तर....!”

   मदनलाही मस्त झोप आलेली. त्याला जीवने साहेबांच्या बोलण्याचा आवाजही गेला नव्हता. रिंग सारखी वाजत होती. जीवनेसाहेब त्रासिकपणे उठलेत.

   “अरेच्च्या! किती वादळ, पाऊस आणि लाईन पण गोल झालेली, आता कुणाचा असेल एवढ्या रात्री फोन?” जीवने साहेबांनी कानाला फोन लावत म्हटले.

   “हॅलो... हॅलो...” पलीकडून मात्र बोलण्याचा कुठलाही आवाज येत नव्हता.

   फोन सुरू असल्याची पुन:पुन्हा खात्री करून घेतली होती.

   “च्या मायला, आता उचलला तर आवाज पण येत नाही.” जीवने साहेबांनी फोन ठेवून दिला.

   तासाभरापूर्वीच साहेब मदनसह पेट्रोलिंग करून आले होते. एकाएकी पावसाचा जोर वाढला होता. पावसाच्या धारा धो-धो बरसत होत्या. विजांच्या कडकडडाट, लाईट गेलेली होती. ठाण्यातील बाकी पोलीस पाऊस असल्याने आज रात्रपाळीत ड्युटीवर नव्हती.

   जीवने साहेब पुन्हा खुर्चीवर बसले. डोळ्यावर झोपेचा त्राण होता. काल दिवसभर अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेली भटकंती, आता सलग रात्रपाळीने खरंतर जीवने साहेब थकून निजले होते.

   डोळा लागतो न लागतो तोच फोन आलेला. साहेब खुर्चीवर बसून विचार करीत राहिले. थोडं पाणी पिलं.

    “एवढ्या पावसात कोणाचा असेल फोन? कुणाला काही मदत हवी असेल काय की काही अनुचित घटना घडली असेल?” त्यांच्या डोक्यात अनंत विचार येऊ लागले.

   वादळाचा प्रचंड वेग वाढल्याने पुन्हा पावसाने जोर भरला होता. लाईट बंद पण विजेच्या कडकडाटाने एवढ्या वादळवाऱ्यात अंधाऱ्या रात्रीला बाहेर जाणं कठीणच होतं. त्यांनी घड्याळाकडे बघितले. बारा वाजून पंचावन मिनिट, मध्यरात्र सुरू झालेली. मनात पुन्हा विचार सुरू झालेले. त्यांनी मदनकडे बघितलं मदन गाढ झोपला होता. थोडं त्यांना हसू आलं. आपली ही अशी ड्युटी, आणि आपलं कार्य याचं त्यांना नवल वाटत होतं.

   पुन्हा खुर्चीवरून त्यांनी उठत आतमधल्या खोलीत प्रवेश करीत अंग सरळ करीत पडले होते. पंखा गरगर फिरत आवाज करीत होता. खिडकीतून विजा चमकत डोळ्यासमोर येत होत्या. पाच मिनिटे गेली असेल त्यांचे डोळे मिटले होते.

   “ट्रिंग... ट्रिंग....” पुन्हा रिंग वाजू लागली.

   “हे काय?” जीवने साहेबांची झोप उडाली होती. त्यांनी उठत पलीकडे खोलीतील बेंचवरील फोन झपाट्याने हातात घेत उचलला होता. मात्र पुन्हा आवाज येत नव्हता.

   “हं! कोण? बोला ना! मी ऐकतोय....”

   “माईन्स एरिया... प्लीज हेल्प....” काहीतरी तुटक आवाज... त्यांच्या कानी पडला होता.

   “कुठे? काय झाले? आपण कोण?.....” पलीकडून मात्र आवाज कट झालेला. फोन टुकटुक करीत राहिला.

   “ऐ मदन्या... चल उठ रे! काहीतरी घडलंय. चल माईन्सला...” साहेबांनी मदन पोलिसाला हाताने हलवत उठवले. अंगावर वर्दी चढवत हातात गाडीची चावी घेतली.

   “काय झालं साहेब? एवढ्या रात्री...” मदनने डोळे उघडताच म्हटले.

   “प्रश्न नको करू. चल लवकर....!”

    मदन गडबडीने उठला होता. हातरुमालाने तोंड पुसले आणि अंगावर वर्दी घालून जीवने साहेबांच्या मागे निघाला. त्यांनी दार लावून घेत चौकीदाराला सांगत बाहेर पडले होते. पावसात गाडीकडे बघत गाडी स्टार्ट केली. गाडीचा सायरन, धो-धो पाऊस, विजांचा कडकडाट आणि माईन्स एरियाचा चार-पाच किलोमीटरचा रस्ता. गाडी सुसाट वेगाने पळत होती. गाडीच्या काचावरील वायफर पाणी दूर सारत होतं. डोळ्यांवरील झोप थंड वाऱ्याने आता कुठच्या कुठे पळाली होती.

   आपण कुठे जाणार? कुठे शोधणार? हे सुद्धा जीवने साहेबांना काहीएक माहीत नव्हतं. तरीपण गाडी समोर जात होती.

   जीवने साहेबांनी स्वतःचा मोबाईल उघडला. बघतो तर काय? रेंज नसलेली...

   “शीट... च्या मायला, एवढ्या पावसात रेंज तरी कुठून असणार?”

   “साहेब काल ट्रेस करायला सांगा! जमेल तर...”  मदन गाडी चालवत असताना साहेबांना म्हणाला.

   “होय, तेच करतोय....” जीवने साहेबांची बोटे डायलपॅडवर फिरली. पलीकडे रिंगटोन जाऊ लागली. त्यांचे मन समाधानी झाले.

   “हॅलो, आवाज येतोय काय?”

   “होय, जी बोला...”

   “मी जीवने बोलतोय....”

   “हो, बोला ना साहेब... तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे.”

   “मी काय म्हणतो, आपल्या ठाण्यातील लँडलाईनवर नुकताच फोन आला होता. काहीतरी विपरीत घडले असावे. मात्र रेंज अभावी काहीएक कळत नाहीये. जरा ट्रेस करा त्या नंबरला. बघा काही लोकेशन मिळेल तर!”

   “जी साहेब. आता करतोय.”

   “होय, थोडं लवकर बघा. मी पेट्रोलिंगवर माईन्सला जातोय.”

   “ओके...” ट्रेसरने कॉल बंद केला.

   जीवने साहेबांना अगदी पावसातही चेहऱ्यावर घाम सुटलेला. त्यांनी रुमालाने घाम टिपला. तेवढ्यातच विजेचा कडकडाट झाला. जणू विज गाडीच्या समोर पडली काय असा तो भास होता. मदनने डोळे दिपताच गाडीचे करकचून ब्रेक दाबले. दोघेही एकमेकाकडे बघू लागले.

   “साहेब कसं ड्रायव्हिंग करणार? पाऊस, वीज आणि....”

   “चल रे! काही नाही होत. चल जवळच पोहोचलोय... बघू इकडे.... काही माहिती मिळते काय ते. मदनने पुन्हा गाडी दामटली होती. वळणे घेऊन ओसाड माईन्सच्या रस्त्याला गावाबाहेर सुसाट वेगाने गाडी पळत होती.

    “ऐ मदन, बघ. ते समोर कोण? थांबव... थांबव...” समोरच्या अंधारात गाडीच्या लाईटमध्ये कोणीतरी समोर उभे राहून गाडीला हात दाखवत होते.

    मदनने गाडीचा वेग मंद केला. जीवने साहेब एकटक बघत राहिले. कुणीतरी रस्त्यावर पडले होते आणि सोबत असलेले त्यांची गाडी बघून हात दाखवीत त्यांना थांबवीत होते. गाडी थांबवून जीवने साहेब खाली झटकन उतरले.

   “बघा ना साहेब ही तरुणी, अशा रात्री... मीच तुम्हाला कॉल केला होता. तिचा श्वासही बंद आहे.” तो युवक त्यांना म्हणाला होता.

   जीवने साहेब गाडीतून घाईघाईत उतरत सारेकाही नजरेने टिपत तरुणी जवळ जात बघितलं. हात हातात घेत नाडी तपासली. नाकाजवळ हात नेत श्वास बघितला.

   “कोण आहे आणि काय झाले? कोण तुम्ही?” जीवने साहेबांनी त्या तरुणीचे निरीक्षण करीतच जवळ उभे असणाऱ्याला म्हटलं.  

   “मला काही ठाऊक नाही, साहेब. आम्ही इथून परतताना ही रस्त्यावर पडलेली आढळली. तेव्हाच तुम्हाला कॉल केला. पण वादळ, पावसाने रेंज सापडत नव्हती. आता आम्ही तुम्हाला येऊन सांगणार होतो. मी गोपाल आणि ही माझी पत्नी सुषमा आहे. आम्ही गावावरून परतताना ही इथे आढळली.”

    “म्हणजे... तुम्ही हिला ओळखत नाही तर!”

   “जी नाही. हिला मदत करावी म्हणूनच थांबलो आम्ही. पण ही कायमची गेलेली आणि तुम्हाला कॉल केला.”

   “बरे, बरे! पण तुम्हाला याबाबत ठाण्यात यावं लागेल, माहिती पुरवायला.”

   “होय साहेब, नक्की येऊ. पण... आज बघा ना अशी परिस्थिती, वातावरण आहे. आम्ही लांबचा प्रवास करून थकलो आहोत. उद्या नक्की येऊ. हे घ्या माझे व्हिजिटिंग कार्ड.” गोपालने आपला ऍड्रेस त्यांना दिला होता.

   पावसाचा जोर थोडा ओसरायला लागला होता. जीवने साहेबांनी, मदनने तिला बघत फोनवरून संपर्क साधत दोन सहकाऱ्यांना बोलावून घेतलं होतं. गोपाल आणि त्यांची पत्नी मदत करून घराकडे परतली होती.  

   “स्कुटीवरून पडून मृत्यू, एवढंच त्यांच्या पंचनाम्यात निरीक्षणात लक्षात आलं होतं. कुठल्या एखाद्या वाहनाने ओव्हरटेक करताना डॅश मारली असल्याने किंवा या वादळ पावसात घरी परतताना डोक्यावर प्रकाश पडल्याने ती दुर्घटनाग्रस्त झाली होती.

   अद्यापही ती कोण? कुठली? हे लक्षात येणार नव्हते. तिचा देह पंचनामा करून हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्डम करीता पाठवण्यात आले होते. स्कुटीचा नंबर सर्च करून गाडी मालकाचे नाव लक्षात घेत ओळख पटविण्याचे काम सुरू झालेले.

    जीवने साहेब ठाण्यात परतले. अंगात थंडी भरली होती. त्यांना चहाची आठवण झाली पण अद्यापही रात्र असल्याने आता चहा मिळणं शक्य नव्हतं. साहेब खुर्चीवर थकून निजले होते.

   सकाळचा निरभ्र प्रकाश, मोकळी हवा, रात्र पाऊस येऊन गेल्याचे आता काहीएक कळत नव्हते. जीवने साहेब उठताच मदनला घेऊन ते हॉस्पिटलकडे निघाले. त्यांचे सहकारी यांनी काय तपास केला? पुढे काय झालं? ओळख पटली की नाही? हे त्यांनाही ठाऊक नव्हतं.

   रस्त्यावर चहा घेतला. सिगारेट ओढली. जीवने साहेब हॉस्पिटलला आले. पोस्टमार्टम दहा नंतरच होणार असल्याने परत तिला एकदा बघितलं. सहकारी पोलीस रात्रभर तिथेच होता.

   “काय झालं? कुणाची गाडी आहे? काही ओळख पटली का?”

   “हो ना साहेब! गाडी मालक तेवढा पत्ता मिळाला आहे, पण फोन नंबर वगैरे अपडेट नाही.”

   “दे जरा इकडे तो पत्ता....”

 जीवने साहेब सहकाऱ्यांना सूचना देत गडबडीतच बाहेर पडले होते. त्यांची गाडी सुसाट वेगाने घटनास्थळी पोहोचली होती. रात्रौ अंधारात काही योग्य प्रकारे निरीक्षण करता आले नव्हते. सकाळच्या प्रहरी निरीक्षण करणे, काही शंका कुशंका असल्याने त्या शोधणे त्यांना भाग होते.

   जीवने साहेब व मदन यांनी जागेचे निरीक्षण केले. त्या ठिकाणी पडलेल्या स्कुटीला बघितले. त्यांनी स्कुटी उचलून स्टार्ट केली. स्कुटी सुरु झाली. पण त्यात पेट्रोल नसल्याने ती घरघर करीत बंद पडली होती. त्यांनी स्कुटीचे मीटर बघितले. पेट्रोल ड्राय. त्यांना नवल वाटले. एवढ्या रात्री एक तरुणी घराबाहेर पडते आहे आणि पेट्रोल नाही. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पुन्हा त्यांनी गाडीचे निरीक्षण केले. गाडीचा उजवा इंडिकेटर तेवढा तुटलेला. ती पडली ती जागा बघितली. कुठेही रक्त पडले किंवा घासल्याचे दिसले नाही. एकंदरीत ती वेगानेही पडली नव्हती. गाडी जशीच्या तशीच होती. पावसाने रक्त पडले किंवा वाहून गेले ते मात्र तपासता येणार नव्हते. त्यांनी चौफेर निरीक्षण केलं. आजूबाजूला झाडे-झुडपे याशिवाय काहीही नव्हतं. एकदम निर्जन रस्ता, अंधाऱ्या मध्यरात्री या मार्गाने एखाद्या तरुणीने येणे म्हणजेच घातपाताचा संशय तेवढा...

   जीवनेसाहेबांनी गाडीत बसत पुन्हा मिळालेल्या गाडी मालकाच्या पत्त्याकडे गाडी वळविली होती. जवळपासचा पत्ताही नव्हता. लांब वरचाच तो पत्ता, केशवनगरला गाडी पोहोचताच त्यांनी सदर पत्त्याची चौकशी केली. अगदी समोरच एक छोटेसे घर होते. पत्ता विचारला.

   “कोण आहे रे तिकडे? बोलाव त्यांना.” साहेबांनी मदनला म्हटले.

   दारात पोलीस बघताच आतमधून येणारा युवक अचंबित झालेला.

   “काय झालं साहेब? आपण आणि इकडे...”

   “हा पत्ता आणि ही एम. एच. चाळीस.... गाडी आपलीच आहे ना!” जीवने साहेबांनी दरडावीतच विचारले.

    त्यांनी डोक्याला हात लावीत विचार करीत म्हटले, “होय साहेब, हा पत्ता माझाच आहे. पण ही गाडी नाही माझी.”

    “काय ही गाडी तुझी नाही?”

   “होय साहेब, आम्ही गरीब माणसं, कुठून गाडी घेणार? तेवढा पैसा तर हवा ना!”

   “अरे! पण पत्ता तुझा, नि गाडी कशी नाही?”

   “खरंच सांगतोय साहेब. ही गाडी माझी नाही. पण झाले तरी काय”?

   “खरं सांग. तुझ्या घरी कोण-कोण आहेत?”

   “साहेब नवरा-बायको दोघेच आहोत. एक मुलगा आहे तो पुण्याला राहतो. दहा-एक वर्षे झाली. तिथेच काम करतो.”

   “त्याने कधी घेतली का गाडी? नाही तर...!”

   “नाही साहेब. तो पण कसं काय घेणार गाडी. आम्हाला कळवलं असतं ना!”

   “बरं सांग. या तरुणीला ओळखतोस काय?” साहेबांनी तिचा मोबाईलमधील फोटो दाखवीत म्हटले.

   “नाही ना! साहेब, कधीपण बघितले नाही.”

   जीवने साहेबांचे डोकं चक्रावले होते. गाडी मालकाचे नाव, पत्ता असूनही ती त्यांची गाडी नव्हती.

   “बरं ठीक आहे! येऊ गरज पडली तर आम्ही, किंवा तुला बोलावले तर ठाण्यात येशील.” जीवने साहेबांनी त्याला दमानेच म्हटले.

 

   पुन्हा गाडीकडे परतताच ते ठाण्यात आले. साहेबांचे डोके चक्रावले होते. ती तरुणी कोण? कुठली? गाडी पण तिची नाही. गाडीत पेट्रोल पण नाही. आणि अंधाऱ्या रात्री मरून पडलेली ती तरुणी, सकाळचे अकरा वाजूनही अद्याप शहरातील कुठल्याही ठाण्यात रिपोर्ट दर्ज झाली नाही. कसे काय? जीवने साहेबांनी सगळीकडे तरुणीचा फोटो आणि त्यावरील तपशील सेंड केला होता. काहीतरी मार्ग निघेल हे त्यांना पक्के ठाऊक होते. मात्र त्यांना योग्य ती दिशा अद्याप मिळाली नव्हती.

   त्यांनी पुन्हा नंबर डायल केला होता.

   “काय रे? झालं का पी.एम.”

   “होय साहेब, आत्ताच आटोपले. पण रिपोर्ट उद्यालाच मिळणार ना!”

   “बरे ती लाश फ्रिजरमध्ये ठेवून तिथला पंचनामा घेऊन ये ठाण्यात.”

   “जी साहेब...” सहकाऱ्याने जीवन साहेबांशी संवाद साधला होता.

   एवढ्यातच पुन्हा फोनची रिंग वाजली. “पाचपावली ठाण्यात सदर तरुणीची मिसिंग रिपोर्ट.” पलीकडून ठाण्यातील हवालदाराने कळविले होतं.

   जीवने साहेब तातडीने उठले होते. त्यांनी पुन्हा सहकाऱ्यांना फोन लावीत पंचनामा घेऊन पाचपावलीला येण्याचे कळवीत मदनसह ते निघाले होते. गाडीचा वेग वाढला होता.

   “मी काय म्हणतो. त्यांना तिथेच थांबवा. आम्ही येतोय.” जीवने साहेबांनी पुन्हा ठाण्यात कल्पना दिली होती.

   अर्ध्या तासातच पाचपावलीला गाडी पोहोचली होती. तिथे आई आणि मुलगा रडत बसले होते.

   “या साहेब... आता रिपोर्ट यांनीच केली आहे.”

   “काय? ही तुमची मुलगी आहे?”

   “जी साहेब... काल दुपारपासून ती कॉलेजात गेली, ती परतलीच नाही. आम्ही खूप शोधलं. तिच्या मित्र-मैत्रिणींना विचारलं. पण काही कळलं नाही. आणि रात्रोचं वादळ, पाऊस. आज सकाळपासून चौकशी करतो आहोत. अखेर नाईलाज झालं. आणि आम्ही रिपोर्ट द्यायला आलो.”

   “काही पत्ता लागला का साहेब?” त्या मुलीची आई रडतच म्हणाली.

   “होय, पत्ता लागला.”

   “काय नाव होतं तिचं?”

   “सायली...”

   “सायली, आता तुम्हाला सोडून गेली आहे. काल रात्री माईन्स एरियात ती स्कुटीवरून पळून अपघाती गेली. चला आमचे ठाण्यात तिथे सविस्तर सांगतो. आणि हो आम्ही पोस्टमार्टम पण आटोपला आहे. आपण काही प्रोसिजर करून तिला घेऊन जाऊ शकता.”

   सायलीच्या आईने हंबरडा फोडला होता. मुलगाही रडत होता. सगळे गाडीत बसली होती. गाडी ठाण्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघाली होती.

   “तुझं नाव काय रे?”

   “जी... मी सुरज.”

   “तुझ्याकडे ती पांढऱ्या रंगाची स्कुटी आहे काय?”

   “होय जी साहेब. ती माझी स्कुटी आहे. केव्हा-केव्हा ती कॉलेजात घेऊन जायची. नाहीतर ती नेहमी सिटीबस वरूनच कॉलेजला जाते.”

   “तू काय करतोस”

   “साहेब, मी किराणा सप्लायर एजंट म्हणून कंपनीत काम करतो.”

   “बरं! ती गाडी कोणाच्या नावावर आहे?”

   “साहेब ती गाडी कोणाच्या नावावर आहे नाही माहित.”  

   “म्हणजे...”

   “साहेब आम्ही ती गाडी एका गॅरेजमधून अगदी स्वस्तात मालसप्लाय करायला घेतली होती. त्या गाडीचे कागदपत्रे आणि काहीही ठाऊक नाही.”

   “मग तू कशी काय ठेवलीस?”

   “साहेब, गरज होती. एवढ्या स्वस्तात गाडी मिळाली म्हणून...”

   “पण त्या गाडीचा मालक व पत्ताही चुकीचा आहे. हे ठाऊक आहे का तुला?”

   “नाही जी.”

   “बरं! तुला गाडी विकणाऱ्या दुकानदाराचे नाव सांगशील काय?”

   “जी साहेब... तो इथलाच आहे.”

   जीवने साहेबांचे डोके पुन्हा चक्रावले होते. बोलता-बोलतात ठाण्यात ते परतले. सारंकाही सोपस्कार पार पाडत त्यांच्या हवाली लाश दिली होती.

   दोन दिवस उलटले होते. पोस्टमार्टम रिपोर्ट आला होता. सायलीचा मृत्यू ‘डोक्यावर पडल्याने झाला होता.’ हे सिद्ध झाले होते पण घटनेच्या पाच तासापूर्वी तिचा मृत्यू झाला हे सुद्धा नमूद केल्या गेले जीवनी साहेब. आश्चर्यचकित झाले होते. म्हणजे सायली त्या रात्र स्कुटीवरून पडून नाही तर अगोदर सायंकाळी पाचच्या दरम्यान मरण पावली होती.

   गॅरेजची तपासणी केली. गॅरेज मालकांनी स्कुटी विकल्याचे कबूल केले. मात्र ती स्कुटी ज्या पत्त्यावरील होती त्या पत्त्यावर त्याच नावाचा दुसराही युवक राहत होता. मात्र त्याच्या वडिलांचे नाव वेगळे होते. हे उशिरा ध्यानात आले होते.

   जीवने साहेबांना आता सायलीचा खून झाला हे उघड झाले. पण कोणी व कशासाठी खून केला. हे लक्षात येत नव्हते. त्यांनी कॉलेज मित्रमंडळी सर्वांना बोलावून करून चौकशी केली होती. मात्र सायली साधीभोळी मुलगी एवढेच कळलं होतं. तिचं कुणावर प्रेम होतं की नाही किंवा एकतर्फी प्रेमातून तर तिचा खून झाला नसावा ना! असाही संशय बळावला होता. पण तिचे कोणाशी प्रेम नसल्याचे व तिला कोणीही त्रास देत नसल्याचेही कळले होते. जीवने साहेब फार विचार करू लागले होते.

   गाडीत पेट्रोल नाही, गाडीही तिच्याच भावाची, ती घरून कॉलेजला गेलेली आणि कॉलेजातून परतताना मृत्यू, पण कुठे? काय? नि केव्हा? मग ती रात्रो तिथे कशी?

   जीवने साहेबांनी सायलीचे घर गाठले होते. सायलीची आई, भाऊ दुःखी होते. तिला जाऊन दोनच दिवस उलटले होते. जीवने साहेबांनी अनेक प्रश्न त्यांना विचारले. त्यांचेही उत्तर समाधानकारक येत होती. मात्र सायलीला कोणी कशासाठी मारले? हा प्रश्न अनुत्तरीतच राहत होता. मात्र तिला कोणीतरी मारले होते एवढं नक्की झालं होतं.

   “तुम्हाला ठाऊक आहे काय? सायलीचा खून झाला आणि तोपण पाचच्या दरम्यान. आणि तिला रात्रौ तिथे नेऊन टाकण्यात आले.” सूरज हे ऐकताच जीवने साहेबांकडे एकटक बघत राहिला होता.

   “काय सांगताय? साहेब, आमच्या सायलीचा खून आणि हे कसे काय शक्य आहे.”

   “होय, पोस्टमार्टम रिपोर्ट तसे सांगते आहे.”

   पुन्हा आई आणि सुरज अश्रू गाळू लागले होते.

   “बरे! आम्ही करतोय चौकशी करतोय. घाबरू नका. कळेल काहीतरी. लवकरात लवकर मिळेल पुरावा. पाऊस असल्याने तिथे पुरावा मिळाला नाही.”

    जीवने साहेब दारातून बाहेर निघत असताना घराच्या उजव्या कोपऱ्यात इंडिकेटर लाईट पडलेला दिसला. त्यांनी ते लक्ष जाताच हातात उचलले. बघतात तर काय? त्या दिवशी गाडी पडल्याने अपघात झाला नव्हता मात्र देखावा म्हणून त्या ठिकाणी ती गाडी ठेवली होती. त्या गाडीचा इंडिकेटर घरी. त्यांनी त्याकडे एकटक बघितले. पुन्हा माघारी वळून त्यांनी सुरजला बोलविले.

   “गाडीचा इंडिकेटर केव्हा तुटलाय रे?”

   “जी साहेब, बरेच दिवस झाले. तुटला आहे.”

   त्यांच्या हातात इंडिकेटर बघत सुरजचा चेहरा काळवडला होता.

   “ऐ मदन घे रे याला ताब्यात. टाक बेड्या. साला, खोटं बोलतोय काय? सांग का मारलस तिला? तिचा खून हा इथेच घरी झालाय. बोलाव रे सगळ्या पोलिसांना. घराची संपूर्ण झडती घ्या.”

   “नाही साहेब, नाही, मी खरंच सांगतो आहे. या इंडिकेटर चा आणि खुनाचा काय संबंध?”

   “हो हाच सबळ पुरावा आहे. हे बघ रक्त. येथे असलेलं. सायलीच्या डोक्याची जखम, डोक्याला मार लागून मृत्यू, आणि रक्ताचे डाग... संशय म्हणजे सायली पाचच्या दरम्यान घरी आली असावी, तेव्हा तिचा खून तू किंवा....”

   “घ्या रे ताब्यात याला. बघू काय ते पुढे?”

   सुरज फार घाबरला होता. त्याची आईही घाबरली होती. आणि जीवनी साहेबांनी दम देत असताना तो पटापटा सांगू लागला.

   “होय साहेब, मी तिला मारलं. माझ्याच हाताने तिचा मृत्यू झाला. आमचं दोघांचं भांडण झालं. मी तिला ढकललं तेव्हा तिचं डोकं भिंतीला आपटून ती खाली पडली. आम्ही घाबरलो होतो. आणि रात्रो आमच्या अंगावर आळ येऊ नये म्हणून आई आणि मी तिला तिथे नेऊन ठेवलं.”

   “पण का? कशासाठी?”

   “साहेब आमची सायली खूप साधीभोळी होती. पण तिचं एका परजातीच्या युवकावर प्रेम होतं. ती त्याच्याशी लग्न करतो म्हणे. हे आम्हाला ठाऊक झालं. मात्र तिचं प्रेम ज्या युवकावर आहे ते कुणालाही ठावुक नव्हतं. फक्त आम्हालाच माहिती होते. आमचा या लग्नाला विरोध होता. यामुळे नेहमी घरी भांडण व्हायचे. आणि या भांडणातूनच त्यादिवशी बाचाबाची होऊन मी तिला रागाने ढकललं. मला तिला मारायचं नव्हतं. पण ती एकाएकी पडली. आणि ही घटना घडली. साहेब, मला माफ करा.” सुरजने कारण सांगितले. आणि  तिची आईही रडू लागली होती.

   गाडीत सुरज, आई बसून ठाण्याच्या दिशेने गाडी निघाली होती. जीवने साहेबांनी दीर्घ श्वास घेतला होता. आणि समोर सायलीचा चेहरा त्यांना आठवत होता.

   पेपरला बातमी...

   “परजातीच्या मुलासोबत प्रेमात पडल्याने घरच्यांच्या विरोधाला बळी पडली बिचारी सायली.”

 

कथा

संजय येरणे

नागभीड. जिल्हा चंद्रपूर.

मो. ९४२१७८३५२८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू