पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुभद्राची दिवाळी

दोन दिवसच तर उरलेत आता दिवाळीला, आणि अजून काहीच केले नाही. सुभद्रा ओठताच पुटपुटत होती...


महिना भरून आज दहा दिवस झाले होते पण मालकाने अजून मजुरीचे पैसे दिले नव्हते. दिवाळी तोंडावर येऊन पोचली तरी मालक काहीच बोलत नव्हते. 


गेल्या चार वर्षांपासून ती आमचे शेजारी देसाई त्यांच्याकडे घर काम करत होती. पण असा पैश्याला वेळ कधी झाला नव्हता. पण यावर्षी ऐन दिवाळीत तिला पैश्याची चणचण असतानाच देसाईंनी तिला पगार दिला नव्हता.


तिलाही देसाईंकडे पैसे मागणे जमले नाही. आज देतील उद्या देतील म्हणून ती वाटच बघत होती. पण देसाई काही पैशाचे नाव काढत नव्हते. 


आज धनतेरस चा दिवस पण तरीही देसाई काहीच बोलत नव्हते. सुभद्रा ला काय करावे काहीच उमजत नव्हते. आज सायंकाळी तर पैसे मागायचेच असे ठरवून ती आपले दिवसभर काम करत राहिली. मनातून मात्र फारच अस्वस्थ होत होती.


दिवाळी असल्याने मुलांना आईचीच आस होती. त्यांना वाटत होते . यंदा आईने आपल्याला नवीन कपडे घेऊन द्यावे. चार दोन फटाके फोडता यावे. लाडू चिवडा गुलाबजाम काही तरी आपल्या आईने घरी बनवून आपल्याला मनसोक्त खाऊ घालावे. 


सगळे जसे उत्साहात आनंदात दिवाळी साजरी करतात , तशी आपणही साजरी करावी. पण आई काही बोलतच नव्हती. ती शांत शांत आपल्याच विचारात होती. तिला विचारले तर ती वेगळे काहीतरी काम सांगून उत्तर टाळत होती.


सुभद्रालाही आपल्या मुलांच्या भावना कळत होत्या पण तिचाही नाईलाज होता. देसाईंनी पगार न दिल्याने काहीच करता येत नव्हते. 


देसाईंनी पगार दिल्यावर काय काय करायचे तिने मनात सगळा प्लान पक्का केला होता. मुलाला नवा सदरा आणि पँट, मुलीला सलवार कुर्ता, नावर्याला जमलेच तर सदरा, थोडी मिठाई, थोडे फटाके , बारा पंधराशे रुपयात सगळे व्हायला हवे असे तिला वाटत होते. तिने आपली साडी होणार नाही म्हणून मनातून काढून टाकले होते. ती स्वतःशीच म्हणत होती, मला काय करायची नवीन साडी, बाई साहेबांनी मागच्याच सालि त्यांच्या जुन्या दोन साड्या तिला दिल्या होत्या, त्या अजूनही तशाच ठेवून होत्या, त्यातलीच एक काढून घेईल , म्हणजे माझे पण होऊन जाईल.


यंदा मुलांना नाराज करायचे नाही असे तिने नक्की करून ठेवले होते. पण देसाईं कडे कोणीच काही बोलत नव्हते. याच विचारात सायंकाळ कशी झाली ते कळलेच नाही.


तिची घरी परत जाण्याची वेळ झाली तरी पैश्याची गोष्ट काही निघत नव्हती. शेवटी खूप नर्वस होऊन ती घरी जाण्यास निघाली. बाई साहेब आणि देसाई साहेब ही तयार होऊन कुठे बाहेर जाणार असे वाटत होते. 


तिने हळूच आवाजात आवाज दिला बाईसाहब येते हो मी. मन खूप नर्व्हस झाले होते. तोंडातून शब्दही निघत नव्हते. पण सांगून जाणे आवश्यक होते. असेच न सांगता जाणे तिला पटत नव्हते. ती तिची नेहमीची सवयच होती.  


उदास मनाने ती बाहेर निघाली. तसा बाईसाहेबानी तिला आवाज दिला. सुभद्रा अग थोडी थांब जरा. मी आलीच ग. 


तशी सुभद्रा थबकली. तिला वाटले बाईसाहेब पैसे द्यायलाच थांबवत आहेत. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख, काळजी  जाऊन एक आशेचे किरण झळकायला लागले होते.


बाईसाहेब आणि देसाई बाहेर आले आणि चला म्हणत तेही तिच्या सोबत जिना उतरू लागले. 

सुभद्रा परत नर्व्हस झाली. तिघेही खाली आले तसे देसाई आपली कार काढण्यास पुढे गेले. 


तोवर बाईसाहेब सुभद्राला म्हणाल्या तुझी मुलं काय म्हणतात ग, आज त्यांनाच इकडे बोलवून घेतले असते तर बरे झाले असते. सुभद्राला काहीच कळले नाही. ती बाई साहेबांकडे फक्त बघत राहिली. 


देसाई कार घेऊन आले. आत बाई साहेब बसल्या. त्यांनी सुभद्राला पण आत बसवून घेतले. गाडी आता तिच्या घराच्या दिशेनेच निघाली होती.


बाई साहेबांनी तिच्या मुलांना तिच्या घरुन घेतले. आणि सगळे एका मॉल मधे पोचले. मुलं ही शांत शांत होती. त्यांनाही काहीच कळत नव्हते. मॉल मधे पोचल्यावर त्यांचे चेहरे चकाकले. आनंद दिसायला लागला. पण परत क्षण भरात तो ओसरला. ते परत एकमेकांकडे बघत पुढे निघाले.


देसाई मुलांच्या कपड्यांच्या सेक्शन कडे वळले.

आणि म्हणाले बघारे मुलांनो तुम्हाला काही आवडतय का ते. आवडल तर सांगा. ट्रायल करता येईल आपल्याला. काढा पटापट तू शर्ट पँट काढ. आणि तुला काय हव ग, सलवार कुर्ता की, दुसर काही, जे आवडेल ते काढ म्हणत देसाई बाजूला उभे राहिले. 


मुलं अचानक मिळालेल्या ऑफर ने भांबावली. तशा बाई साहेब बोलल्या सुभद्रा बघ ग जरा मुलांना काय आवडत ते. तू मदत कर त्यांना.


सुभद्रा च्या डोळ्यात आसवे जमा झाली. ते न दाखवता ती पुढे झाली आणि तिने , मुलांच्या मापाचे एक एक ड्रेस बाहेर काढला. त्यांना लावून तिने माप बघितले.  तेव्हा देसाई परत बोलले. एक एक नको, दोन तर हवेच. परत दुसरे काही वेगळे एक एक काढा.  मुलांनी परत एक एक ड्रेस काढला.


आता मंडळी साडीच्या सेक्शन मधे वळली. सुभद्राला बाई साहेबांनीच दोन साड्या काढून दिल्या. त्या सुभद्रा वर खूपच शोभून दिसत होत्या. मग तिच्या नावर्यासाठी देसाईंनी शर्ट आणि पँट काढला.


मग सगळे मिठाई च्या स्टँड कडे गेले. तिथून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दोन तीन मिठाया आणि नमकिन पॅक करून घेतले. 


मॉल च्या बाहेरच्या बाजूला फटाक्यांचा स्टॉल लागला होता. तिथून त्यांनी काही हलके फुलके फटाके पॅक करून घेतले. 


सगळे अगदी खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. 

सुभद्रा आणि तिच्या मुलांना देसाईंनी तिच्या घराजवळ ड्रॉप केले. निघता निघता बाई साहेबांनी सुभद्राच्या हातात तिचा महिन्याचा पगार आणि वरून बोनस म्हणून दोन हजार रुपये तिच्या हातात दिले. दिवाळीच्या शुभेच्छा देऊन देसाई फॅमिली पुढे निघून गेली.


सुभद्रा बराच वेळ तिथेच उभी राहून देसाईंच्या गाडीकडे बघत राहिली. गाडी दिसत नसतानाही ती एकटक तिकडेच बघत होती.


शेवटी मुलांनीच तिला ओढत घरात नेले.

मुलांचा आनंद तर गगनातही मावत नव्हता......






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू