पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

19.11.23 माझा अनुभव

मी क्रिकेटची फॅन नाही. मला फारसे क्रिकेटमधले समजतही नाही. सध्याचा IPL प्रकार तर मला अजिबात पटला नाही, खेळाचे बाजारीकरण आहे नुसते. मी त्या मॅचेस पहात नाही कारण कुणाच्या बाजूने पहायचे, कुणाला चिअर्स करायचे हेच मला त्यात समजत नाही. पण एक भारतीय म्हणून माझा पूर्ण सपोर्ट भारतीय क्रिकेट टीमला असतो. मी ह्याआधी देखील फक्त इंडिया खेळायचा तेंव्हाच आणि फक्त वनडे मॅचेसच पहायची. जेव्हापासून "मॅच फिक्सिंग"बद्दल समजले तेंव्हापासून माझे मॅच पहाणे बंदच झाले होते. तरीही 2011 वर्ल्डकपची फाइनल मॅच मी पाहिली होती. 


रोज न चुकता न्यूज पहाण्याच्या सवयीमुळे ह्यावेळेला सगळया मॅचेस पाहिल्या नसल्यातरी सगळी माहिती होती. सकाळपासून लोकांनी सुरू केलेली तयारी पाहून मला मजा वाटली. कोणी ढोल वाजवून, कोणी पूजा, हवन करून टीमला  शुभेछा देत होते. काही सोसायटीमधून बाहेर मोठी स्क्रीन लावून त्यावर सर्वांनी मिळून मॅच पाहण्याचे ठरवले. काही मित्रांनी एकत्र येऊन फायनलला मज्जा करूया असे ठरवले. मिठाया, फटाके ह्यांची तयारी करून ठेवली होती कारण सर्वांना खात्री होती की मॅच आपणच जिंकणार. आपल्या टीमने एकही मॅच न हारता फायनलपर्यंत मारलेली मजल ह्यामुळे क्रिकेट प्रेमी, रसिक व माझ्या सारख्या देशप्रेमीला जिंकण्याची खूप आशा वाटत होती. मॅच साठीची excitement खूप काही सांगून जात होती. त्यात ही महत्वाची मॅच जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच अनेक दिग्गज, सीने कलाकार मंडळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. "न भूतो न भविष्यती" म्हणतात तसा काहीसा भारावलेला दिवस उजाडला होता कालचा. 


दरवर्षीप्रमाणे दिवाळी नंतरच्या रविवार आमच्या मंदिरात दिवाळी स्नेह संमेलनाचे आयोजन केलेले होते पण जेमतेम तास-दीडतास गेम खेळून सर्वांनी 1:30 वाजता जेवणे उरकून लवकरच घरी जायचे  ठरवले कारण सगळ्यांना घरी जाऊन मॅच पहायची होती.


मी देखील कालची मॅच उत्साहाने पहायला सुरू केली होती खरंतर पण पहिल्या 3 विकेट गेल्या आणि मला टेन्शन आले मग मी आधीच ठरलेले होते त्याप्रमाणे मुलींना घेऊन बाहेर फिरायला गेले. मार्केटमधली किरकोळ पण आवश्यक जसे की लेकीचा विंटर-यूनीफॉर्म खरेदी केला आणि मग दिल्लीतील "मजनू का टीला" नामक प्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली. गेल्या 21 वर्षांपासून दिल्लीत राहूनही पहिल्यांदा मी ते ठिकाण पाहिले कारण आता मुलगी मोठी झाली. तिच्या बरोबर, तिला आवडते म्हणून कोरियन रेस्टॉरंटमध्ये गेलो, एकूणच तिथे खूप मज्जा केली. नवीन देशात/जगात गेल्यासारखे काहीसे वाटले मला. रामेन आणि अजून विचित्र नावाचे काहीतरी (नाव आठवत नाही) खाऊन मग दुकाने फिरून "बबल-टी" प्यायलो व मेट्रोने परत आलो. लेकीची सुट्टी मस्त एंजॉय केली. ती तिच्या मित्र-मैत्रिणींच्या सोबत तिथे एकदा जाऊन आली होती पण ती जागा तिला आईला व लहान बहिणीला दाखवायची होती म्हणून तिनेच आम्हाला नेऊन, फिरवले. लहान असताना पालक मुलांना नवीन जागी फिरायला नेतात, तसे मुले मोठी झाल्यावर पालकांना फिरायला घेऊन जातात हा अनुभव माझ्यासाठी नवीन व खास होता. 


आम्ही जाताना आपल्या 3 विकेट गेलेल्या होत्या आणि परत आलो तेंव्हा त्यांच्या 3 विकेट गेलेल्या होत्या. सासुबाई मॅच पाहात बसल्या होत्या. मी विचारताच त्या वैतागून म्हणाल्या किती वेळा पासून विकेट जातच नाहिये त्यांची आणि आपल्या एका मागून, एक विकेट पडत गेल्या,  हारणार बहुतेक आपण आज. त्यांचा नाराजीचा सूर एकून मला परत कसेतरीच झाले. मी काही मिनिटे मॅच पाहिली, स्टेडियम मधील शांतता खूप काही सांगून जात  होती.  प्रेक्षकांमध्ये सकाळचा उत्साह अजिबात नव्हता. सगळ्यांचे चेहरे उतरले होते. मी बेडरूममध्ये जाऊन माझे वाचन करीत बसले. आपण जिंकावे असे मनोमन वाटत असताना, आपली हार होताना पाहणे मलातरी शक्यच नव्हते. त्या सर्व खेळाडूंना ह्यासाठी मी सॅल्युट करू इच्छिते की निकाल लक्षात येऊनही ते हिम्मत करून शेवटपर्यन्त मॅच खेळत राहतात. त्यांच्याकडे आपल्यासारखा ऑप्शन नसतो. ऑप्शन असूनही, काहीतरी जादू होईल, विकेट पडेल ह्या आशेवर अनेक क्रिकेटप्रेमी देखील शेवटच्या क्षणापर्यंत मॅच पहात होते त्यांचे पण मला कौतुक वाटले.  


काल जे झाले ते झाले. मॅच फिक्स केलेली असेल तर मी नाही पाहिली ते बरच झालं पण  इतक्या मेहनतीने फायनलला पोहोचल्यावर फिक्सिंग करून हरायला कोणता खेळाडू तयार होईल का? आज सकाळी न्यूज चॅनल वर आणि सोशल मीडियावर लोकांच्या काही प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले. चांगले खेळले, जिंकले तर हीच लोक अक्षरशः डोक्यावर घेतात आणि हरले तर वाटेल ते बोलतात. काहीजणांनी तर ह्यातही राजकारण केलेले पाहून रागच आला मला. चंद्रयान 3 साठी क्रेडिट देताना मोदींचा त्यात काय वाटा, साइंटिस्ट्सना क्रेडिट जाते असे म्हणणारे आज मात्र मॅच हरण्यासाठी मोदींना जबाबदार धरत होते, त्यांना 'पनौती/badlucky' म्हणत होते. हे किती विचित्र आहे म्हणजे जर मॅच  जिंकली तर खेळाडूंचे कौतुक आणि मॅच हारली तर खेळाडूंच्या चुका, असफलता न पाहता सरळ मोदीजीना बदनाम करायचे ही कसली मानसिकता आहे. खरा देशप्रेमी म्हणून मॅच हरण्याचे दुःख मलाही झाले व क्रिकेट पेक्षा देशावरील प्रेमापोटी मॅच पाहणार्‍या प्रत्येकाला झाले, जे अगदी नैसर्गिक आहे. पण जे झाले ते मोठ्या मनाने स्वीकारणे आणि त्यातून धडा घेऊन भविष्यात सुधारणा करणे हेच आपल्या हातात आहे ते करायचे सोडून नसते काहीतरी व्यक्त होणे पाहून आज मलाही व्यक्त व्हावेसे वाटले. 


खरा खेळाडू किंवा रसिक चाहता असणार्‍यांनी खिलाडी वृत्तीने स्वतःचे दुःख बाजूला ठेवून आपल्या खेळाडूंचे फायनलपर्यंत जाण्यासाठी व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे फायनल जिंकण्यासाठी कौतुक केले, जे वाखाणण्यासारखे आहे. 


पूर्वी सचिन आऊट झाला की मॅच बंद करणारे आता विराट आऊट झाला की मॅच पहाणे बंद करतात कारण आता आपण हरणार असेच प्रेक्षकांना वाटत असते. माझ्यामते क्रिकेट हा 11 खेळाडूंच्या संघाचा खेळ आहे कुणा एकाच्या जीवावर तो जिंकता किंवा हारता येत नसतो. ह्या भावनेची आपल्या संघात व प्रेक्षकात कमी आहे असे मला वाटते. विराट आऊट झाल्यावरसुद्धा बाकीचे खेळाडू जिद्दीने चांगले खेळून स्कोअर करू शकतात, ह्या भावनेची प्रत्येकाच्या मनांत रुजतात व्हायला हवी. त्यासाठी जिंकल्यावर कुणा एकाला डोक्यावर घेणे आधी बंद करून संपूर्ण संघाला डोक्यावर घ्यायला हवे तरच प्रत्येकजण जबाबदारीने खेळेल. सरते शेवटी माझे हे निरीक्षण न रहावून मांडते आहे. बघा पटते आहे का, नाही पटले तर सोडून द्या. धन्यवाद ????


© राधिका गोडबोले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू