पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळीची तयारी

"रितु तुझ्या कॉलेजला उद्या सुट्टी आहे ना मग आपण दिवाळीची 'शॉपिंग' करायला जाऊया का?"

"ओहो, आई त्यासाठी कुठे जायची काय गरज आहे. अजून वेळ आहे भरपूर, मी ऑनलाईनच 'ऑर्डर' करेन. बस, तुझे कार्ड दे मला."


रेवतीने मनांत विचार केला, कपडे ऑनलाईन घेता येतील पण बाकीचे सामान तर मलाच जाऊन आणावे लागेल. मार्केटला जाण्याची तयारी करता-करता रेवतीने विचारले, 

"बरं, मला सांग, मी रव्याचे लाडू करू की बेसनाचे?"


"आई कशाला उगाच इतके कष्ट करत बसतेस? आपण बाहेरूनच आणू या. तसही माझे 'डायट' असते तर मी गोड काही खाणारच नाहिये. चकली, शंकरपाळी असे करू या ऑर्डर."


"अग, एरवी ठीक आहे तुझं 'डायट' पण दिवाळीत चालतं खाल्लं तर. लाडू आणि करंज्या तरी करायचं मनात आहे माझ्या. "

"त्यासाठी सामान आणा, मेहनत करा ते नीट जमेल की नाही, त्याचं वेगळ 'टेन्शन' घ्या त्यापेक्षा तयार जिन्नस आणूया ना आपण."


"तसे असेल तर काही सामान आणायची गरजच नाहिये. आकाशकंदील, लाईटच्या माळा, तोरण वगैर आहे आधीचे, वर ठेवलेले तेच फक्त काढीन मी ऐनवेळी. आणि फटाके?..."


"आई, मी आता मोठी झालीये मी बाहेर जाऊन फटाके नाही उडवणारे आणि तसही इतकं pollution आहे बाहेर, अजून कशाला धूर सोडा आणि आवाजही किती होतो त्यांचा, फटाक्यांमध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा ते मला दे, पार्लरला जाईन मी."


हे एकून रेवती पुन्हा विचारात पडली, आजकाल दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही. मुलांनाही काही 'इंट्रेस्ट' नसतो. आमच्या लहानपणी किती उत्सुकता असायची आम्हाला सगळया सणवारांची, त्यात दिवाळी म्हणजे सर्वात मोठा सण. नवीन कपडे, फटाके घ्यायचे. आई मोठे डब्बे भरून फराळाचे पदार्थ करायची. मी आईला त्यात मदत करायची. शेजारच्यांना ताट भरून दिले जायचे आणि त्यांच्या कडुनही ताट यायचे, मज्जा असायची खाण्या पिण्याची. किती दिवस आधीपासून तयारी करावी लागायची. साफसफाई करा, फराळाचे बनवा, कपडालत्ता खरेदी करा. पाडव्याला नवीन वस्तू विकत घेत असू आम्ही, कारण चांगला मुहूर्त असतो पण आता सगळं बदलले आहे. केंव्हाही काहीही खरेदी केले जाते, कपडे, मिठाई असो की टीव्ही, फ्रीज सारखी मोठी वस्तू असो, त्यासाठी दिवाळीची वाट पहायची गरजच नसते. 


आता माझ्याच्याने होत नाही म्हणून मी साफसफाई मेडला पैसे देऊन करवून घेतली. फराळाचे पण बाहेरून मागवले तर मला काहीच काम नाही. एका दृष्टीने चांगलेच आहे म्हणा मला आराम होईल. मी एक घरी असते म्हणून पण नोकरी करणार्‍या महिलांना सगळी कामे करणे अवघडच जात असेल, त्यापेक्षा हा outsourcing चा पर्याय उत्तम आहे.


ह्या विचारा बरोबर एक हास्य तिच्या चेहर्‍यावर पसरले. काळाबरोबर चालताना न पटणार्‍या काही गोष्टींना आपण "कालाय तस्मै नमः" असे म्हणत स्विकारतो हेच खरे. पण त्याच क्षणी तिच्या मनात आले हे प्रत्येक गोष्टीत outsourcing जे वाढत चालले आहे ते कितपत बरोबर आहे? कष्टाची कामे होत नाहीत आणि वेळ नाही म्हणून आपण पैसे देऊन अशा अनेक सेवा घेत असतो. त्यात चूक की बरोबर हा प्रश्नच नाहिये, ती आजची गरज आहे. पण हे असेच वाढत गेल्याने आपला जगण्यातला 'इंट्रेस्ट' संपून तर जात नाहिये ना अशी शंका मनात येते. 


घरची साफसफाई करतांना आपल्याला घराबद्दल, घरातल्या वस्तूंच्याबद्दल एक प्रेम निर्माण होत असते, ते आपण 'मिस' करतोय का? तीच गत माणसांच्या आपापसातील प्रेमसंबंधच्या बद्दल होत आहे का? आपण भावना शून्य होत चाललो आहोत  का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. आजकाल घरातील वृद्धांना सांभाळायला दिवसभराच्या 'मेड' असतात, किंवा त्यांना आश्रमात ठेवले जाते तसेच लहानांना सांभाळायलाही 'मेड' असतात किंवा त्यांना क्रेचमध्ये ठेवले जाते. ही गोष्ट काळाची गरज म्हणून समजून घेऊन, घरातील प्रत्येकाने आनंदाने स्विकारली तर चांगलेच आहे, नाहीतर मनांत तेढ निर्माण होऊ शकते.


ह्याशिवाय अशा काही नवीन 'सर्विसेस' निघत आहेत ज्याबद्दल एकून चकित व्हायला होते आहे जसे की डेटिंग ॲप, चॅटिंग ॲप ह्यात आपल्यासोबत वेळ घालवण्यासाठी, एक तासासाठी आपण मित्र किंवा जोडीदार 'हायर' करू शकतो. तो आपले म्हणणे एकून घेईल, आपल्याला सोबत करेल, आपले मनोरंजन करेल इत्यादी. 


एकीकडे आपल्या नातेवाईकांना, मित्र मंडळीना भेटायला आपल्याला वेळ नाही, इच्छा नाही आणि दुसरीकडे आपण पैसे देऊन एखाद्याचा वेळ खरेदी करीत आहोत. मला तर वाटते, भविष्यात राग काढण्यासाठी पण आपण एखाद्याला 'हायर' करू कदाचित. कारण राग सगळ्यांच्या नाकावर बसलेला असतो पण कोणीच एकून घ्यायला तयार नसतो. आजकाल मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच रागवायचे नाही हा नियम आईवडिलांना व शिक्षकांना लागू असतो त्यामुळे त्यांना कोणी ओरडलेले, रागावलेले चालत नाही. हीच मुले मोठी झाल्यावर कुणाकडून कसे काही एकून घेतील. पण त्यांना राग तर येईलच मग काय पैसे देऊन कुणालातरी बोलवायचे किंवा फोनवर रागवायचे, ओरडायचे. ज्यायोगे राग शांत होईल व तो माणूसही पैश्यांसाठी एकून घेईल कदाचित, मजबुरीमध्ये. जसे घरातल्यांशी बोलायला वेळ नसणारे, बाहेर अनोळखी माणसाशी गप्पा मारायला जातात तसेच काहीसे "hang out" सारखे "get angry" ॲप सुरू होईल कदाचित भविष्यात. 


"आई, तू बाहेर जात असलीस तर माझ्यासाठी चिप्सचे 2-3 पॅकेट्स आणशील का प्लीज."


रितिकाच्या ह्या प्रश्नाने रेवती एकदम भानावर आली. तिची विचारांची तन्द्री तुटली आणि ती बाजारात जायला निघाली.


बाजार पूजेच्या व शोभेच्या वस्तूंनी भरला होता. ते पाहून तिची मरगळ एकदम दूर पळाली. काही घ्यायचे नाही दिवाळीसाठी असे ठरलेले असूनही, ती मातीच्या काही पणत्या आणि रांगोळीचे रंग घेऊनच घरी आली. 


ह्यावरून हे सणवार आपला मूड चांगला ठेवायला मदत करतात आणि  'सायकॉलॉजीची ट्रीटमेंट' देण्याची ही परंपरागत पद्धत आहे ह्यावर तिचा विश्वास अजून दृढ़ झाला. आजकाल वाढलेले मानसिक अस्वास्थ्य दूर करायचे असेल तर आपण उत्साहाने हे आपले सणवार, जमतील तसे का होईना साजरे करत रहायला हवे, हा तिचा विचार पक्का झाला. आता ती दिवाळीचे उत्साहाने स्वागत करायला मनाने सज्ज झाली होती. 


© राधिका गोडबोले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू