पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वाचन प्रेरणा दिन

*वाचन प्रेरणा दिन.* 

      आदिमानवांनी जे शब्द उच्चारले ते त्यांनी अर्थवाही बनविले; त्यातून त्यांची स्वतःची बोली तयार झाली. वेगवेगळ्या बोलींचा विकास होऊन भाषांची निर्मिती झाली. पुढे शब्दांना अक्षररूप मिळाले. इथेच साहित्य कलेचा उगम झाला आणि ग्रंथ निर्मितीला सुरुवात झाली. कालपरत्वे मुद्रण कला विकसित झाली आणि माणसांच्या हातात पुस्तके आली.

        एकविसाव्या शतकात मोबाईलचा शोध लागला नि वाचन संस्कृतीवर मोठा आघात झाला. माणसांच्या हातातील पुस्तक गळून पडले. पुस्तकाची जागा प्रचंड क्षमता असलेल्या मोबाईलने घेतली.

      वाचन संस्कृतीला आलेली ही मरगळ दूर करावी यासाठी मोबाईलच्या आहारी गेलेल्या माणसांना थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक पुन्हा हाती घ्यायला प्रवृत्त करावे 

हा वाचन प्रेरणा दिनाचा खराखुरा उद्देश; त्यासाठी एखाद्या थोर साहित्यिकाच्या पुस्तकातील एखादा उतारा किंवा वेचा अथवा एखादी कविता सादर करून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व वाचकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

      आरती प्रभु तथा चिं.त्र्यं.खानोलकर हे आपल्या धारदार शब्दांचे सामर्थ्य नि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ताकद पुरेपूर माहीत असलेले अतिशय मनस्वी परंतु प्रतिभेची प्रचंड झेप असणारे आत्ममग्न कवी. त्यांच्या नक्षत्रांचे देणे या काव्यसंग्रहातील 'कविता" याच नावाची कविता सादर करून मी, आजच्या या वाचक प्रेरणा दिनाच्या अभियानात सहभागी होत आहे.

.... *कविता* ....

या माझ्या अजाण कवितेचा अपमान कां करतां बाबांनो, कां?

प्रेम हवंय का या कवितेचं?

मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?

खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.

काय काय द्याल?

आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला?

पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा

तुमच्याच तळहातावर

एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,

पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला

चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.

कराल?

 

या माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,

दूर असतों.

भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे

पाणावल्यासारखे चमकतात.

डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.

ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.

या कवितेच्या मुलायम केसांवरून

सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.

वाटतं की ती आताच उभीच्या उभी

निसटून जाणार आहे

दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.

स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही

एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा.

 

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊं नका

कारण ती ज्या वाटा चालते आहे

त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.

मोडून पडाल!

तिच्या नावाचा जप करायचा असेल तर

त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे

रुद्राक्षमणी ओवून

जपमाळ करावी लागेल

आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;

पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म.

आहे तयारी?

जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;

तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,

मगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून.

ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना

तुम्हांला सोसायच्या नाहीत.

 

मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला

एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून..... 

*********************************

 

आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना मनोमन शुभेच्छा!!   

 *सर्जेराव कुइगडे* 

दि. 15.10.2023

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू