पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ललिता पंचमी आणि कोल्हापूर ची त्र्यंबोली यात्रा

आज अश्विन नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी. आजच्या दिवशी करवीर निवासिनी, देवी अंबाबाई पालखीत बसून आणि मोठा लवाजमा घेऊन मिरवणुकीने कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील टेकडीवर विराजमान असलेल्या देवी त्र्यंबोली तथा टेंबलाबाईच्या भेटीला जात असते.
आमच्या लहानपणी अंबाबाईच्या या पालखीसोबत लवाजमा निघत असे. लवाजम्याच्या या मिरवणूकीत पोलीस बँड पथक त्या सोबत संचलन करणारे बंदूकधारी पोलीसांचे पथक, हत्ती, घोडे, ऊंट, घोडेस्वारांचे पथक, घोडागाड्या, तोफेची गाडी, कोल्हापुरातील वेगवेगळ्या तालीम मंडळांच्या तरुणांची दांडपट्टा, फरि-गदगा (लाठी नि ढाल हाती घेऊन लुटुपुटीच्या लढाईचा खेळ करणारी पथके), लेझिम पथके, तुतारीवादक, हलगी-ढोलकी, पिपाणी-डफडे, वाजविणारे वाजंत्री असत. मिरवणुकीच्या शेवटी पाळीव चित्ता असलेली गाडी व त्याच्या पाठीमागे सनई -चौघडा वादक बसलेली बैलगाडी असे. लवाजमा बघायला आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असत. आताही लवाजमा निघतो पण त्याची लांबी मात्र थोडी कमी झालेली आहे शिवाय चित्त्याची गाडी व हत्तीही नसतो.
ही मिरवणूक निघाली की, छबिना टेंबलाबाईला निघाला असे म्हटले जाई. सकाळी दहाच्या सुमारास ही पालखी निघे. आम्ही संध्या (उमा) टॉकीज जवळ या पालखीचे दर्शन घेऊन छबिन्यासोबत जत्रेला जात असू. छबिना टेकडीवर पोचल्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपतींच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मानाच्या कुमारिकेच्या हस्ते कवाळ फोडण्याचा कार्यक्रम होई. टेंबलाबाईची ही यात्रा म्हणजे शाही दसऱ्याअगोदरचा कोल्हापुरातला एक मोठा इव्हेंट असे. छबिन्यासोबत थोडा वेळ चालून आम्ही जत्रेची मजा घेण्यासाठी पुढे निघून जात असू.
कवाळ फोडण्याचा कार्यक्रमाच्या ठिकाणी एवढी गर्दी असे की, त्या गर्दीत आम्हा मुलांना घुसता येत नसे. अर्थातच आम्हाला विविध खेळ, मातीची व इतर खेळणी, मातीचे मावळे, रबरी चेंडू, फुगे, भोवरे, विक्रीस ठेवलेल्या विविध वस्तू, सिनेमातील नट- नट्यांचे छोट्या फिल्ममधील चेहरे मोठे करून झांजेच्या तालात दाखविणारे बॉक्स, (याला "और मजा" असे म्हटले जाई). चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, भेळ, भजी, गरम- गरम जिलेबी, गुळमाट शेव, रेवड्या, बेंड बत्तासे, साखरेच्या रंगीत पाण्यात बर्फ खिसून घालून तयार केलेली सरबते अशा सर्व खाद्य व पेय पदार्थांच्या गाड्या (त्या काळात फास्ट फूडचे पेव फुटलेले नव्हते.) आणि जत्रेतील पाळणे यामध्ये स्वारस्य असे. खेळण्यामध्ये अजून एक गंमत होती. विज्ञानाची जोड असलेली खेळणीदेखील विक्रीला ठेवलेली असत. उदाहरणच द्यायचे तर, सर्वसाधारणपणे एक ते दीड इंच लांबीचे चकचकीत लोखंडी पत्र्यापासून तयार केलेले नागमोडी आकाराचे काही साप व नालेच्या आकाराचा छोटा लोहचुंबक एका डबीत घालून विक्रीला ठेवलेले असत. हे साप जमीनीवर ठेवायचे आणि एक,दोन इंच उंचावरून तो चुंबक त्या सापावरून पुढेमागे फिरवला की, ते साप चुंबकीय परिणामाने खरोखरीच्या सापासारखे वळवळ करीत असत.
दरवर्षी त्र्यंबोली यात्रेची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू याचे खरे कारण मात्र वेगळेच असे. आमच्या लहानपणी पॉकेट मनी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. तरीही वर्षातून फक्त एकदाच आम्हाला जत्रेची मजा लुटण्यासाठी पॉकेट मनी मिळत असे. चार-आठ आणे इतका पॉकेट मनी मिळाला तरी आम्ही खूष होत असू. वर्षातून एकदा मिळणारे ते पैसे आम्हाला लाख मोलाचे वाटत असत. मिळालेले पैसे हरवू नयेत म्हणून ते चड्डीच्या खिशात ठेवून आम्ही खिशाला आतल्या बाजूने पक्क्या दोऱ्याची गाठ बांधत असू. गंमत म्हणजे खिशाला बांधलेली गाठ न सोडता मी दादा,आप्पा,अण्णा या माझ्या मोठ्या भावांच्या पैशावर मजा मारीत असे. मोठा दादा सोबत असेल तर मज्जाच मज्जा असे. मला मिळालेले पैसे मी पुढचे चार सहा महिने जपून ठेवीत असे.
सकाळी छबिन्यासोबत टेंबलाबाईच्या जत्रेत एकवार जाऊन नि भरपूर मौजमजा करून, देवी टेंबलाबाई व तिची धाकटी बहीण असलेली देवी मरगाबाई यांचे दर्शन घेऊन तसेच टेकडीवरील शिवछत्रपतींच्या अर्ध पुतळ्याला वंदन करून घरी परत आल्यावर देखील आमचे मन भरत नसे. संध्याकाळी वडिल कामावरून परत आल्यावर आम्ही सगळी भावंडे त्यांच्यासोबत पुन्हा एकदा टेंबलाबाईच्या जत्रेत जात असू. आबांसोबत खाण्यापिण्याची चंगळ होई. भरपूर चालल्याने घरी परत आल्यावर पाय हुळहुळत असत पण त्याचे आम्हाला बिलकुल दुःख वाटत नसे; त्या रात्री पुढच्या वर्षीच्या मौज मजेची स्वप्ने पाहत आम्ही आनंदाने झोपून जात असू.
*सर्जेराव कुइगडे*
दि. १९.१०.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू