पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कोजागिरी पौर्णिमा



मंदधुंद गारव्याचे दिवस. कोजागिरी ची वाट बघत चंद्र अजून खुलू लागलेला. मस्त काही तरी खाण्याचा बेत करावा आणि अंगणात चांदण्याखाली बसून मनसोक्त जेवावं. ताणतणाव विसरून जेवणावर ताव मारावा असं अगदी पोषक वातावरण. लाईट ची गरज नाही. चंद्रप्रकाश आणि त्याची शीतलता मन प्रफुल्लित करण्यासाठी पुरेशी. 


भुईमुगाच्या शेंगा शिजण्यासाठी उतावीळ आणि त्याहीपेक्षा कुकर कधी गार होतोय याची वाट पाहणारे अधीर चातक कधी नव्हे ते स्वयंपाकघरात घिरट्या घालीत होते. तरुण मंडळी  "खोया खोया चांद", "...भासते या मनी चांदणे" वगैरे कॅपशन शोधण्यात गुंग. म्हातारी माणसं अंगणात मस्त गोणपाट टाकून पहुडलेली. 


"श्या.... डोळे मिटायला लागले बॉ!"

"मजा नाही हो आज, नेमकं ग्रहण आलं"

"आज आणि काय ती सतत पेंगचं येतेय डोळ्यावर"

"नाही तर काय, एरवी १२ काय नी १ काय, आम्ही आपले जागे नी जग झोपेच्या तराण्यात व्यस्त!"

"होय हो, तेच झालंय"

"दुष्काळात तेरावा म्हणतात ते त्यातली परिस्थिती म्हणजे इंटरनेट सुद्धा नाहीये संध्याकाळपासून"

"शक्य नाही हो आज जागरण"

"झोपुया बॉ"

"मरुदे, त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे गरम नाही होते आता, नई?"

"होय म्हणून सुखाने बसलोय तरी इथे"

" खरं मसाला दूध चालायला हरकत नाही नई?"

" होय तर. तेवढीच मौज जरा"

"निदान त्यासाठी तरी जागं रहायलाच हवं"

"शेंगा तरी सोसतायत कुठे?

"अहो आपल्याला म्हणजे आता वेलचीचा थंडावा नी लवंगेची उष्णता असं झालेलं आहे."

"तरी भुईमूग खाल्ल्याशिवाय कोजागिरी पूर्ण नाही होत"

"हो भलेही उद्या पित्त झालं तरी चालेल"

"प्रश्नच नाही! आणि त्या स्वतः सोलून खायला हव्यात. तर त्यात मजा."


हळूहळू स्वयंपाकघरातून दूध आटवल्याचा सुगंध येऊ लागलेला. गाव सुद्धा शांत झालेलं. गजबजाट आता कमी होऊ लागलेला. अंगणात खाटेवर बसायची नी मसाला दूध प्यायची मजा औरच म्हणावी लागेल. कोपऱ्यातला प्राजक्त नेहमीप्रमाणे खुललेला. चंद्राच्या मंद छायेत आपली रंगसंगती खुलवत आल्हाद देत होता. झाडांच्या फांद्यांमागून हळूच डोकावत चंद्रमहाराज नैवेद्य घेण्यासाठी थोडा झुकला खरा. पण काही क्षणांपुरताच. नी लगेच ग्रहणाची चाहूल देऊन वर वर गेला. खोल आकाशात. 


"मसाला दूध एकदम लै भारी बरं का!"

"एरवी दूध नको वाटतं, आज मात्र प्यायल्याशिवाय कोजागिरी चा दिवस पूर्ण होत नाही."

"बदाम-पिस्ते- केशर-काजूगर शरीराला चांगलं असतं हो!"

जोरदार हशा!


चला. आता डोळे अजिबातच साथ देत नाही. बाहेर थंडावा असून जागं रहायचं नावही घेत नाहीत. चंद्राला हात जोडून हळूहळू अंथरुणाकडे वाटचाल सुरू झाली. मसाला दुधाची रेसिपी जमली नी अगदीच एका ग्लासात भागवणी न करता दुसरा ग्लास निःसंकोचपणे मिळाला, याची दाद द्यायला मग काव्यपंक्ती सुरू झाल्या,


 "चांद तू नभातला नी बावळा चकोर मी...हं हं हं.....

काय गं ते पुढे?"


"मला काय माहित? होता ना वेळ एवढा मगाचपासून तेव्हा जरा बघायचं होतं" 


हे वाक्य पूर्ण होतंय न होतंय तोवर,


"हं ...आठवलं आठवलं,

गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी......

तू चंचला तू कामिनी..... तू....हं हं हं.... काय ते पुढे?? पद्मिनी....तू रागिणी"


"पुरे! चला आता"


भुईमुगाच्या शेंगसारखे हास्य-लटकेराग फुटत, उड्या मारत, अर्ध्या मुर्ध्या ओळी गुणगुणत माणसं, म्हातारी-कोतारी घराकडे वळू लागली. अक्खा गाव झोपी गेला. आता चंद्राला सोबत पारिजातकाची.


बाकी,

"पुष्कळ तग धरलीत त्यामानाने",असं चंद्रही म्हणाला  असेल!



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू