पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ऐसी अक्षरे रसिके

*ऐसी अक्षरे रसिके*

 

माझा मराठीची बोल कौतुके

परी अमृतातेही पैजा जिंके

ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||

     आपले मराठीतील संत,प्रतिभावंत, प्रज्ञावंत,तत्वज्ञ,ज्ञानेश्वर यांनी मराठी ची थोरवी गाताना हे काव्य लिहिले.आपली मराठी ही इतकी रसात्मक आहे की,ती कानाने जरी ऐकत असलो तरी,जिव्हा देखील तिचा आस्वाद घेण्यास उत्सूक असते,नव्हे नव्हे तर नेत्र देखील शब्दब्रम्ह बघण्यास आतूर असतात.नासिका देखील मधुरम शब्दांचा सुगंध हुंगतात.पंचज्ञानेंद्रीय ही तिच्या श्रवणात विरघळतात.अशी आपली मराठी अमृतापेक्षाही मधूर आहे.

        आपली भगवद्गीता हा हिंदुंचा पथदर्शी ग्रंथ पण संस्कृतात असल्याने सामान्यांना तो कळत नव्हता.ज्ञानेश्वरांनी गीतेला तत्कालीन मराठी भाषेत लिहून समाजासाठी अमृतश्रवणाची संधी उपलब्ध करून दिली.ज्ञानेश्वरी हे ह्या ग्रंथाच नाव.ज्ञानेश्वरी वाचताना,अमृत सेवन केल्याचा, आत्मरूपाचा अनुभव येतो.

          अक्षरांत मोहिनी लपलेली असते.उगाचच नाही त्यांना,शब्दब्रम्ह म्हटलं जात.हळूहळू थेंबथेब पाऊस जमिनीत झिरपतो, तसलीच  ही अक्षरे मनाच्या तळाशी असलेल्या भावरंगातून , हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवला की,मम मानसिकतेत उचल खातात, आणि लेखन करण्यास बाध्य करतात.लेखन न केल्यास अस्वस्थता जाणवते.मनातून आलेल्या हृद्य भावनेचा उत्कट भाव रसिकांना भावतो.उदास झालेल्या मनात,ही अक्षरे चैतन्य पेरतात, आणि त्यांना जीवनानुगामी बनवतात.

       अक्षरांची किमया बघा,हिरव्या रानी,थेंबाचे नुपूर वाजवत येतात,पानापानांत गुणगुणतात, हिरवळीवर खेळतात. ह्याच हिरवळीवर पानापानांतून वाहणारा वारा,एक मधुरम संगीत तयार करतो,कधी कान्हाची बासरी वाजवतो,तर कधी त्यांच्यापर्यंत पोहचणा-या किरणांशी  लपंडाव खेळतो, त्यामुळे हिरवं रान हे एक निसर्गाचं,संगीतमय सप्तरंगी व्यासपीठ असल्यासारखं जाणवतं.कधी येथेच डहाळीवर बसून पाखरे गातात,पंख फडफडवतात,कधी मान उंचावून झाडपाला खाणारे जिराफ ,कधी सुंदर हरिणी हिरव्या कुरणात चरतात त्यांची ती नाजूक गोंडस पाडस बागडतात.सर्वाच्या हालचाली बघताना,मला हिरवं रान म्हणजे जिवंत जीवांच व्यासपीठच वाटायला लागतं.

           फुलाफळांचे गोडवे गायला,कोवळी अक्षरे धावत येतात माझ्यापाशी. ती रानफुले,गवतफुलाशी लळा लावणा-या इंदिरा संतही आठवात येऊन जातात.ती तळ्यातली कमळे,मला कुणाच्या तरी नेत्रकमलात घेऊन जातात.तेथेच कांहीं हितगुज घडतं नि मोहरलेल्या मनात,प्रितीला जाग येते.ते गुलाब शेवंती मला सुंदर वाटिकेत नेतात.निशीगंध रातराणी वातावरणात गंध भारून देतात.बकूल तर मला पुष्पवृष्टीचा अनुभव देतो मी धन्य होते.

          प्रीतीलतेचा मोहर लिहिताना,अक्षरें माझे प्रेयस होतात नि लेखनास प्रीत पुरवतात.

    *प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला*

    प्रेमात असलंत की सगळं जग,कसं सुंदर दिसू लागतं,चंद्र,सुर्य आपलेच वाटतात.सगळी गाणी जणू आपल्यासाठी लिहीली गेलीत की काय असं वाटू लागतं.

सिनेमा बघताना आपण हिरो हिरॉईन मधे स्वतः ला बघू लागतो.काव्य साहित्य वाचताना,ही आपल्याच प्रेमाची रूपे वाटतात.सगळं विश्व प्रेममय असल्याचा भास होतो, आणि एका मंतरलेल्या युगातच आपण वावरतो.

प्रेमाशिवाय जीवन म्हणजे रूक्ष वाळवंट,किंवा काष्ट झालेलं झाड असतं.

             अक्षरांनी मला लेखनातून मोठं केलंय, आणि 

सांगितलय की लेखन असं करावं,की जे शतकानुशतके वाचलं जाईल आणि त्याची किर्ती  दिगंतात होईल.लेखन करताना आत्मसाक्षात्कार, लिहीला,तरच ते लेखन रसिक मनाला भुरळ पाडतं.आणि लेखनाचं प्रयोजन सफल होतं.आशय तर सुंदर असावाच,पण काव्यात ताल नि लय असावी,माधुर्य असावं,म्हणजे रसिक जन डोक्यावर घेतात.अक्षरांचं  माझ्या लेखनात मोठं योगदान आहे.हे पुरस्कार,हे सन्मान सगळं  त्यांचंच देणं,

    *शब्दशारदे चरणी समर्पित* 

 

©स्वाती संजय देशपांडे नागपूर

  •      

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू