पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उत्सवाचे सार !

          " हे काय? तू धनत्रयोदशीलाही सुट्टी घेणार नाहीस का? अगं, आपला एवढा मोठा सण आणि तुला एक दिवसही सुट्टी नाही, ह्याला काय अर्थ आहे?", माझ्या सासूबाईंनी आश्चर्यचकित स्वरात विचारलं.

"आई, फक्त दोन दिवसांचीच सुट्टी मिळते, त्यापेक्षा जास्त नाही. भाऊबीजेलाही ऑफिस असणार आहे. भरपूर कामं आणि मीटिंग्स पण असतील. त्यातल्यात्यात मी एवढंच करू शकत होते की माझ्या बॉसला ‘घरूनच काम करीन’ असे सांगून आली आहे. एवढं पुरेसं नाही आहे का?", मी ही जरा स्पष्ट शब्दात आणि मोठ्या आवाजात म्हणाले.

सासूबाईंचा हे सगळं ऐकून तसा चेहरा पडलाच होता, पण आता, माझ्या लग्नाच्या तिसऱ्या वर्षात त्यांनाही माझ्याशी वाद घालून काही साध्य होणार नाही ह्याची पुरेपूर कल्पना होतीच! थोडा वेळ माझ्यावर रागवून, काही न बोलता बसल्या होत्या; मग स्वतःच धनत्रयोदशी व दिवाळीच्या इतर तयारीला लागल्या. मी पण एक कप चहा बनवून, कप घेऊन माझ्या लॅपटॉप समोर बसले आणि त्यातच रमले.

          उद्या धनत्रयोदशी आहे. दिवाळी हा लहानपणापासूनच माझा सर्वात आवडता सण होता. लग्नापूर्वी, माझ्या माहेरी आम्ही सर्व कुटुंबीय खूप थाटामाटात हा दिवाळीचा उत्सव साजरा करायचो.

माझे आई-वडील आणि आम्ही तीन भावंडं, नवरात्र संपताच सर्व तयारीला लागायचो. घराची साफ-सफाई, चादरी, पडदे बदलणं, नवीन सजावटीच्या वस्तूंची खरेदी करणं, तोरणं बांधणं, रोजच्या नवीन रांगोळ्या काढणं, आईबरोबर पक्वान्न बनवणं, हे सर्वच मला खूप आवडायचं.

नातेवाईकांबरोबर व इतर शेजाऱ्यांबरोबर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची मजा वेगळीच असायची. पण आता ते बालपण राहिलंय कुठे? नोकरीला लागल्यापासूनच मी अशी व्यस्त झाले आहे की स्वतःसाठी वेळ काढणे ही अवघड वाटते. दिवाळीला माहेरच्या माणसांशी सर्वांच्या वेळा जुळवत फक्त एखादा विडिओ कॉल करणे शक्य होते. इथे सासरी आल्यापासून इथल्या लोकांमध्ये रमत सणवार साजरे करत आहेच; पण "आमच्या रीती अशा .... आमच्या पद्धती अशा" सतत हेच ऐकत तीन वर्ष काढली आहेत. म्हणून मला आता फारशी सणवर साजरे करायची आवड राहिली नाही, आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ तर अजिबात नाही.

मी साऊथ मुंबईला ऑफिस असलेल्या एका मल्टिनॅशनल कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. मला माझी कंपनी, नोकरी, माझे पद आणि काम अत्यंत आवडतं. खूप मेहनत करून मी ह्या पदावर पोचली आहे आणि एवढा पगार मिळवत आहे. मला स्वावलंबी असल्याचा अभिमानही आहेच, आणि तसाच अभिमान माझ्या सासरच्यांना माझ्या विषयी वाटावा असे मला नेहमीच वाटायचे. माझी नोकरीतील स्ट्रगल माझ्या नवऱ्याला व सासऱ्यांना नीट समजते, म्हणून कित्येकदा ते दोघे माझं कौतुक करतात, माझ्याशी ऑफिसच्या संदर्भात बोलतात, माझ्या कामाची चौकशी करतात. मी ही अगदी इंग्लिश मध्ये त्यांना सर्व काही समजावून सांगते.

पण माझ्या सासूबाई ! त्यांना ह्या सगळ्यातलं काहीच कळत नाही, आणि त्यांना ह्या बाबतीत काही रुची ही नाही. त्यांना कल्पनाच नाही की मी किती प्रयत्नांनी आपल्या कारकीर्दीत लढा देत, उच्च पदांवर जात आहे. त्यांनी कधी ही मला कामात होणाऱ्या घटनांविषयी, प्रॉब्लेम्स विषयी विचारले नाही, साधं औपचारिकता म्हणून ही नाही ! त्यांच्या आणि माझ्या संवादाचे विषय काही वेगळेच असतात - जेवण, कपडे, घरातली कामे, टिफिन, कामवाल्यांचे प्रॉब्लेम, इत्यादी. मी त्यांच्या सोबत मार्केट, देऊळ, शॉपिंग, चिटफंड सगळीकडे जावं अशी त्यांची इच्छा असते.

कित्येकदा त्यांना सांगितलं आहे मी, १२-१३ तास ऑफिस मध्ये काम करून आल्यावर, मुंबईचा ट्रॅफिक भेदत घरी पोचल्यावर मला ह्यातले काहीही करण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, अगदी वीकएंडला सुद्धा ! पण त्यांना नोकरीतले त्रास नाही समजणार! जी बाई आयुष्यभर केवळ एक गृहिणी म्हणून राहिली, तिला आता ह्या वयात हे सर्व समजणे कठीण आहे. म्हणूनच आता आमच्यात फारशे संवाद होत नाहीत. आम्ही दोघीही कामापुरतं बोलतो आणि आपल्याला हवं ते करतो.

          धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मी ऑफिस मधून जरा लवकर आले. मी फ्रेश होताच आम्ही चौघांनी घरात पूजा केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, माझे सासरे आणि नवरा, अमित, जरा वेळ बाहेर गेलेले असतानाच आमच्या कॉलनीतल्या, सासूबाईंच्या सर्व मैत्रिणी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी आल्या. सासूबाईंनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांच्या पुढे फराळाचे ताट आणून ठेवले. मी तिथेच डायनिंग टेबलवर माझा लॅपटॉप घेऊन माझं काम करत बसले होते.

दरवर्षी माझ्या सासूबाई स्वतः संपूर्ण फराळ बनवायच्या, पण ह्यावर्षी त्यांची प्रकृती जरा बरी नसल्याने, अमितने आधीच सांगितले होते, "काय हवंय ते मी बाहेरून आणीन. घरात काही करत बसू नकोस". म्हणून यंदा सगळा फराळ इथल्या प्रसिद्ध दुकानातून ऑर्डर देऊन आणला. पण हा फराळ बाहेरचा असल्याचे लगेच सगळ्यांच्या लक्षात आले.

संध्या काकींनी सासूबाईंना सहज विचारले, "काय गं पद्मा, ह्यावर्षी घरी फराळ केला नाहीस वाटतंय!".

सासूबाईंनी प्रकृतीबद्दल सांगितले. त्वरीतच मोहिनी आंटी म्हणाल्या, "त्यात काय एवढं; सूनबाईला सांगायचं ना बनव म्हणून ! अगं ह्या सुनांना दुसरी कामंच काय असतात ? केलं असतं की तेवढं !" हे ऐकताच आलेला पूर्ण ग्रुप मोठ्याने हसला, आणि माझ्या सासूबाईंचा चेहरा अगदी तसाच झाला होता, जसा दोन दिवस आधी माझ्या सुट्टीविषयी चर्चा करताना होता. पण त्या काही बोलल्या नाहीत, सहजच हसल्या. मला अंदाज आलाच होता, आता ह्या सर्व बायका मिळून माझी खूप टिंगल करणार आहेत. माझ्या सासूबाईंचा ही स्वभाव असा नाही की कधी बाहेरच्यांना उलट उत्तरं देतील. तशा त्या शांत स्वभावाच्या असल्यानेच ह्या सर्व स्त्रिया सतत त्यांना हसत-हसत टोमणे मारत असायच्या. त्यांना त्याचं ही काही वाटायचं नाही, तशी सवयच झाली होती सासूबाईंना. पण मला ही चर्चा सहन होत नव्हती. "आजकलच्या ह्या आळशी मुली" म्हणून मला आणि माझ्यासारख्यांना संबोधित केले जात होते. १० मिनिटे सगळ्यांच्या ह्याच विषयावर गप्पा रंगल्या होत्या, तेव्हाच मला सासूबाईंनी चहा करून आणायला इशाऱ्याने सांगितलं. बरंच झालं, मी ही तिथून उठून जायचा मार्गच शोधत होते.

मी किचन मध्ये असतानाही मला त्या सर्वांचे संभाषण स्पष्ट ऐकू येत होते, जणू मलाच ऐकवत होत्या. थोड्या वेळानंतर माझी सहनशक्ती संपली होती. गरमागरम चहाच्या सोबतीला मी आत्ता ह्या सर्व बायकांचा खरपूस समाचार घ्यायचे ठरवून बाहेर आले. पण तेवढयात ....

           माझ्या सासूबाई उभ्या राहिल्या आणि दीर्घ स्वरात म्हणाल्या, "पुरे करा आता हे सगळं! दिवाळीच्या शुभ दिवशी माझ्या घरी येऊन, आमच्याच घरचं गोड खाऊन, माझ्याच सुनबाईला इतकी कटू वाक्य सुनावताय! माझ्या इतक्या गुणवान सुनेला नको-नको ते बोलताय. तुम्हाला माहीत तरी आहे, का ती किती नामांकीत कंपनीमध्ये कित्ती मोठ्या पदावर आहे ते? तिला महिन्याला किती लाखांचा पगार मिळतो ते? रात्रंदिवस किती मेहनत करून स्वतःच्या नोकरीत प्रगती करत आहे माझी सून ! अशा माझ्या गुणी  गृहलक्ष्मीचा आज माझ्या घरात दिवाळीच्या दिवशी झालेला अपमान मी नाही सहन करणार. आता माझ्या सुनेला एकही टोमणा मारलात ना, तर मला आज सणाच्या दिवशी तुम्हाला इथून जायला सांगावं लागेल हं !"

मोहिनी आंटी आता जरा गंभीर होऊन म्हणाली, "अगं पद्मा, आम्ही अशीच गम्मत करत होतो. इतकी का चिडतेस? आणि आज तुला काय झालंय गं? तुला असं ओरडून बोलताना तर आम्ही कोणी कधीच ऐकलं नव्हतं !"

माझ्या सासूबाई पण जरा स्वतःचा स्वर सावरत म्हणाल्या, "काल मी माझ्या सुनेवर जरा नाराज होते; ही सणवार असले तरी सुट्टी घेत नाही, सतत आपला लॅपटॉप घेऊन काहीतरी करत बसते. पण आज तुमच्या ह्या चर्चा ऐकून मला जाणवलं, आपण फक्त फोटो मधल्या लक्ष्मीची पूजा करतो आणि आपल्या घरातील लक्ष्मीला काय वाट्टेल ते ऐकवतो. एवढंच नाही, कित्येक घरांमध्ये तर सुनांची कशा कशा प्रकारे निंदा-नालस्ती होत असेल, त्यांचा छळ होत असेल. अरे, सूनबाई मेहनत करतेय, काम करून पैसे कमावतेय ते माझ्याच कुटुंबासाठी ना... माझ्याच मुलाच्या, किंवा होणाऱ्या नातवंडांसाठी ना ? मग त्यात काय वाईट आहे? ह्यालाच तर खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी असणं म्हणतात ना?”

सगळ्याच हे ऐकून गप्प झाल्या, पण मी मात्र हुंदके देत रडायला लागले. माझ्या सासूबाईंनी .... नाही, माझ्या आईंनी माझ्या पाठीवर हात फिरवत मला शांत केलं. मी स्वतःचे डोळे पुसत म्हणाले, "आई, तुम्ही कधीच माझ्या नोकरीची, माझ्या कामाची विचारपूस केली नाही; मला नेहमीच ह्याची खंत वाटायची. असं वाटत राहिलं की तुम्हाला मी काय करते त्याची काहीच किंमत नाही. पण आज तुमच्या ह्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने मला जाणवून दिलं की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. कदाचित तुम्हाला एका घरगुती, पारंपरिक सुनेची अपेक्षा होती, आणि मी खरंच तशी नाही! पण आज मी तुम्हाला वचन देते, तुमच्या अपेक्षांवर खरी उतरण्याचा मी पण प्रयत्न करीन .... खऱ्या अर्थाने तुमच्या कुटुंबाची गृहलक्ष्मी बनून दाखवीन".

आमचं हे संभाषण ऐकून सर्व बायकांनाही खूप आनंद झाला. आपण केलेला अतिरेक त्यांच्याही लक्षात आल्याने त्या आईंवर रुसल्या नव्हत्या. मी सगळ्यांना चहा दिला आणि त्यांना प्रेमाने फराळाच्या बश्या भरून दिल्या. शेवटी सर्वच गोड झालं!

          जेव्हा सगळ्या बायका निघायला लागल्या, तेव्हा मी म्हणाले, "एक गुड न्यूज होती, जी मी सर्वप्रथम अमितलाच सांगणार होते, पण आता तुम्हाला सर्वांना सांगते. ह्यावर्षी मला कंपनीने 'बेस्ट परफॉर्मर' चा अवॉर्ड दिला आहे आणि त्याच बरोबरीने दिवाळी बोनस म्हणून १.५ लाख रुपये ही देण्याचे जाहीर केले आहेत".  हे ऐकताच सगळ्यांना अतिशय आनंद झाला. मी आईंना नमस्कार केला आणि त्यांनी माझं तोंड गोड केलं. संध्या काकी म्हणाल्या, "काय मग आम्हाला पार्टी कधी देणार?".

मी होकार देत म्हणाले, "नक्कीच देईन काकी, पण दिवाळी पार पडताच मी आईंना कुठेतरी परदेशात फिरायला घेऊन जाईन". सगळ्या आनंदाने आपापल्या घरी परतल्या.

ही दिवाळी माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय ठरली आणि मला खूप काही देऊन गेली. जुन्या नात्यांना नवीन परिभाषा मिळाली. शेवटी, सणावारांचा अर्थ आहेच काय? ‘कुटुंबासोबत प्रेमाने घालवलेले लाखमोलाचे क्षण’ ,  हेच तर आहे ना उत्सवाचे सार?

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू