पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जाणीवांच्या ज्योती

*जाणीवांच्या ज्योती* 



       "ए चल ,बाय हं...आज मी जरा लवकर  निघते , जातांना दिवे , माळा वगैरे घ्यायच्या  आहेत मला ." 


  " प्रणाली मॕडम , घरी दिवे लावण्यापेक्षा , जरा आॕफिसच्या कामात दिवे लावा !" 


 " कलमडले ! बाॕस मध्येच कलमडले ! आत्ता पुन्हा मोठ्ठ लेक्चर ऐकावं लागणार ,पुन्हा  वेळ जाणार !" 


      प्रणाली अवंतिकाच्या कानात कुजबुजली.


  " मिस अवंतिका , काही  म्हणाल्या  का प्रणाली मॕडम ?" 


" हो सर , आधी घरचे दिवे लावू मग आॕफिसमधले लावले तर चालतील का म्हणते ती  ?" 

  

    या वाक्यावर हसतच प्रणालीने हात समोर केला टाळी द्यायला पण अधिक्षकाच्या चेहऱ्यावरच्या आठ्या पाहून तिने हात मागे घेऊन चेहरा पुन्हा पूर्ववत केला.


" सर , मला जरा काम आहे...जाऊ का मी ." 


प्रणाली विनवणीच्या सुरात म्हणाली . मिस्टर पेंडसे काही  बोलले नाही . प्रणालीने बॕग उचलली व चालायला लागली....खामोशीमे हाॕ छुपी होती है ...या नियमानुसार ...


   रस्त्यावर दिवेच दिवे विकायला...कुणाकडून घ्यायचे , प्रणालीने एका ठिकाणी गाडी लावली. 


 कथ्थ्या कलरचे दिवे तिला आवडले.


" काय ताई , कसे दिले हे दिवे ?" 


" एकशे विस रुपये डझन ." 


" बापरे , एकशेविस रुपये खूप झाले हो ताई ...बरोबर भाव लावा , दोन डझन घेऊन जाते." 


   प्रणाली बोलत बाई सोबत होती पण तिचं लक्ष दिवे रंगवणा-या तिच्या  मुलीवर खिळलं होतं.  दिवे रंगवण्यात  तल्लीन झालेली ती अन् हवेच्या झुळूकेसरशी  तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या त्या कुरळ्या केसांच्या  बटा.. दोन्ही  हात रंगलेले असल्यामुळे मानेला छानसा नाजूक झटका देऊन तिचे ते केस मागे घेणे पाहून प्रणाली क्षणभर तिच्यातच गुंतली. सावळा पण तरतरीत  रंग , चिरेदार नाक , नाजूक जिवणी अन् अतिशय बोलके डोळे. 


" ताई , ही तुमची मुलगी आहे का?" 


" व्हय ताई, नव्वीत हाय , हभ्यासात लय हूशार हाय पण मदतीले एक हाथ पाह्यजे म्हणून शान तिले सोबत आणलं म्या . लई भारी भारी सपन बघते थे उघड्या डोयानं..माया डोयात नाही  मावत तिची भारी सपनं !" 


"अरे वा !  काय गं , काय बनायचं आहे तुला ?" 


प्रणालीच्या प्रश्नाने तिचे कामातले लक्ष विचलित झाले 


" ठरवलं नाही  अजून ...पण एक स्वप्न आहे , एक घर असावं , घरासमोर अंगण असावं अन् प्रत्येक  दिवाळीला त्या घरात ,अंगणात मला दिवे लावता यावे." 


तिच्या शुद्ध भाषेतलं ते स्वप्न ऐकून  प्रणालीला गंमत वाटली.


" अगं , इतके दिवे तर आहेत की ! आताही तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकते !" 


" दिवे आहेत मॕडम पण दिव्यात घालायला तेल कुठे आहे ? घर आणि  अंगण तरी कुठे आहे ?...आमच्या  आताच्या झोपडीत यातला एक दिवा पुरेसा आहे ." 


प्रणालीचा चेहरा कोमेजला. किती बेसिक गरजा असतात माणसांच्या , पण त्याही स्वप्नात बघाव्या लागतात . पूढे काय बोलावं ते तिला सुचेना...तिने तिनशे रुपये दिले दोन डझन दिव्यांचे.  


" हे घ्या ताई साठ रुपये ."


" अहो राहू द्या तुमच्या कडे . मी उगीच भाव करत बसली." 


" नाय ताई , असे जास्तीचे पैसे पचत नाय आमाले...जी किमत हाय तेच द्या ." 


प्रणालीला त्या प्रामाणिकपणाचंही कौतुक  वाटलं...झोपडीत एक दिवा लागत असेल पण तो घामाच्या तेलातला ...इकडून तिकडून लाटलेल्या पैशातून हजार दिवे लावण्यापेक्षा तो दिवा जरा जास्त लख्ख असतो का ?  मनात असंख्य  विचार घोळत ठेवून प्रणाली  घरी आली. मुलगी सोफ्यावर मोबाईल घेऊन लोळत पडलेली. टिव्ही सुरू , फॕन सूरु , घरातलं सामान अस्ताव्यस्त . ते बघून प्रणालीचा पारा चढला  तरी पण  ती शांत होती .


" ओ हो ...मम्मा , आज काय नविन शाॕपिंग वाटतं दिवाळीसाठी ? लेटस वाॕच युवर शाॕपिंग !" 


शरीराचा पसारा सावरत मुलगी हातातली बॕग धरते आहे हेच खूप झालं ,असं प्रणालीला वाटून गेलं .


" सो... ट्रॕडीशनल मम्मा ! अगं   आता किती  छान दिवे मिळतात इलेक्ट्रिकवरचे ...तू हे काय घेऊन आली !  मला सांगायचं होतं . मी आॕनलाईन मागवले असते ."


" मागवले असते पण त्यामुळे कुणाला मदत मिळाली असती ? कदाचित  पैसेवाल्याच्या घरी पुन्हा पैसा गेला असता. असे दिवे घेतले तर त्यांच्या  कुटुंबाला थोडा हातभार लागतो. " 


" यू मिन , इतक्या छान घरात तू हे दिवे लावशील ?" 


" हो , मी हेच दिवे लावणार , तसेही मला इलेक्ट्रिक दिवे नाही  आवडत. आपल्या  परंपरा आपणच जपाव्यात ! आणि  तुम्ही  आपल्या अभ्यासात दिवे लावा आता  , मोबाईल बघत बसण्यापेक्षा !" 


" मम्मा , झालं का सुरु तुझं लेक्चर ?"  


 सकाळचं आॕफिसमधलं  आपलं वाक्य आपल्याला पुन्हा  ऐकावं लागेल असं प्रणालीला वाटलं नाही...  पण क्षणभर तिला चिंता वाटली .कुठल्याच गरजा न उरलेली आपली मुलगी अन् मूलभूत गरजांची स्वप्न बघणारी झोपडीतली ती दिवे विकणारीची मुलगी ...किती  फरक आहे दोघीमध्ये. सुख या शब्दांचा अर्थही किती  बदलता असतो नं . व्यक्तीत्वाच्या माधुर्यातलं सौंदर्य जे मी त्या मुलीमध्ये अनुभवलं ते कदाचित माझ्या  मुलीमध्ये नसावं का? ...की तिच्या मूलभूत  सुखाच्या जाणीवाच बोथट आहेत ? ....पण त्या कायमच तशा असता कामा नये ...काही  तरी करायला हवं असा विचार करून प्रणाली कामाला लागली.


       प्रणालीने बाईकडून  फराळ तयार करून घेतला. त्याचं  पंधरा विस डब्यांमध्ये पॕकिंग करून घेतलं . ते एका पिशवीत भरलं. 


" मम्मा , हे काय , फराळाचा होलसेल ? इतका फराळ घेऊन कुठे निघालीस ? " 


" निघाली नाही  , आपण दोघी निघत आहोत ." 


" कुठे गं , तू काही  बोलली नाही  आधी ?" 


" दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला जायचं आहे ...चल निघूया ." 


"  यू मीन , तुझ्या  फ्रेन्ड्स कडे ! मी खूप बोअर होते गं तिथे !" 


" बोअर नाही उलट तुला नवं काही  तरी बघायला मिळेल. चल पटापट ." 


 दोघी मायलेकी दिवे विक्रेत्याच्या बोळीत आल्या  प्रणालीने तिच्या मुलीच्या हातून दिवे विकणा-या प्रत्येकाला  एक एक फराळाचा डबा दिला आणि  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आता दोघीही त्या दुकानाजवळ आल्या जिथून प्रणालीने दिवे घेतले होते. प्रणालीने फराळाचं पॕकींग तिच्या  मुलीला द्यायला लावलं.


" हॕप्पी दिवाली काकू !" 


"  व्हय व्हय...पण हे काय ? 


दिवे विकणारीने पॕकींग हातात घेत विचारलं.


" अहो ताई , हा फराळ आहे दिवाळीचा. सर्व विक्रत्यांना देऊन आलो आम्ही . तुम्ही  दिवसभर दिवे विकून आमची दिवाळी लख्खं करता पण तुम्हाला  फराळाचं   बनवायला वेळच नसेल मिळत नं म्हणून  म्हटलं चला सर्वांना फराळाचं पॕकींग देऊ या !" 


" तुमी काय आल्या व्हत्या नं इथं ? दोन डझन दिवे घेतले व्हते ." 


"  हो , आज माझ्या मुलीला सोबत आणलय , तुमच्या  मुलीची ओळख करून द्यायला !" 


" काय ताई,  लाजवता व्हय !  गरिबीची ती काय ओळख?  सपना नाव ठेवलं हिचं म्या !  म्हणून थे सपनंच पाह्यत रहाते  सारखी !"


    सपना तिच्या  आईच्या विनोदावर खूप गोड हसली. प्रणालीने तिच्या  मुलीकडे बघितलं तिची पण नजर स्वप्नावर खिळून होती. आज स्वप्ना देवीचे फोटो एका रेषेत लावत होती . 


" स्वप्ना , ही माझी मुलगी रिया , आणि  रिया ही यांची मुलगी स्वप्ना !" 


 मम्मा या मुलीशी माझी  ओळख का करून देत आहे ?  असे काहीसे भाव रियाच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि  स्वप्ना सुद्धा थोडी  गोंधळात पडली . 


" हॕलो रिया , कोणत्या  क्लाॕस मध्ये आहे तू ?" 


"हाय.. मी नाईन्थला आहे ."


" अरे व्वा ! आपण एकाच वर्गात आहोत की !" 


  " कोणत्या स्कूल मध्ये ? " रियानी लगेच त्या हस-या चेहऱ्याला दूसरा प्रश्न  विचारला . 


"  महात्मा गांधी हायस्कूल , आमच्या  घराकडेच आहे." 


" ताई सपना पयलाच नंबर आणते शाळेत. मागल्या वर्सि मले बलावलं होतं शाळेत हिच्या सतकाराले . म्या गेली व्हती. डोयात पाणी व्हतं पण थे पाणी सूखाचं व्हतं. " 


स्वप्नाबद्दल बोलतांना आताही त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी होतं. ते जास्त  वाहू नये म्हणून प्रणाली हसतच म्हणाली, 


" सपना आहेच गुणी , तिचं स्वप्न नक्की  पूर्ण  करणार बघा ती !  सपना रियाला तुझी मैत्रीण समज. तुला काहीही अडचण आली तर नक्की  सांग . हा नंबर ठेव तुझ्याजवळ. तुझं स्वप्न पूर्ण  करायला काही  अडचण आली तर हा नंबर तुझ्या  जवळ असू दे. " 


    प्रणालीने नंबर लिहिलेला   कागद स्वप्नाकडे दिला. 


स्वप्नाच्या डोळ्यात आश्चर्य  होतं , गोंधळ होता अन् आश्वासक हात मिळाल्याचा भावही होता. 


" मम्मा , कोणतं स्वप्न गं हिचं ?" 


" सांगते नंतर ." म्हणत प्रणालीने दोघींचा निरोप घेतला .घरी आल्यावर तिने स्वप्ना चां स्वप्नं रियाला सांगितलं . तिची आताची परिस्थिती सांगितली. 


" माय गाॕड मम्मा , त्यांच्या  कडे तेल पण नसतं दिवे लावायला ? 


 "  नाही  गं..खूप लोकं तर असे आहेत की जे उपाशी झोपतात. "


" स्वप्ना पण झोपत असेल का गं उपाशी ? किती  गोड आहे  ती !  तिच्या  डोळे स्पार्किंग आहेत अगदी. " 


" रिया म्हणून  मग आॕनलाईन खरेदी करण्यापेक्षा यांच्या  कडून खरेदी करावी.त्यांना दोन पैसे मिळतात. " 


" मम्मा , आपल्याला दोन डझन दिवे नाही  होणार...मी अजून दोन डझन दिवे घेऊन येते स्वप्नाच्या मम्मीकडून . चालेल न ?" 


 प्रणालीला खूप हायसं वाटलं. जाणीवांच्या ज्योती मनात तेवत रहाणं जास्त  महत्त्वाचं. दिवाळीला सुख , समाधान , समृद्धीच्या शुभेच्छा आपण देतो पण कुणाच्यातरी सुखाचं , समाधानाचं कारण आपण बनून गेलो तर....तर नक्कीच प्रत्येकाची  दिवाळी प्रकाशमय असेल...प्रणाली हसतच पुन्हा  कामाला लागली.



              सौ. वर्षा मेंढे

               अमरावती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू