पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नुसतंच कविता लिहिणं

----------------
-परीक्षण - "नुसतचं कविता लिहिणं " -- सुषमा ठाकूर- भोपाळ !
----------------------
----श्री विश्वनाथ शिरढोणकर यांचे "नुसतचं कविता लिहिणं " या पुस्तकावर प्रस्तावना साठी - या काव्यसंग्रहाला दोन प्रस्तावना चे भाग्य लाभलेले आहे. पहिली प्रस्तावना मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाच्या पूर्व अध्यक्ष अनुराधाताई जामदार यांच्या साहित्यिक लेखणीतून उतरलेले आहे, अर्थातच कवितांचं यथायोग्य विवेचन त्यात लपलेला गूढ मतितार्थ, ती कविता लिहिण्यामागे असलेली कवीची भावना... या सर्वांचा सर्व बाजूंनी विचार करून लिहिलेली ही प्रस्तावना आहे. शिरढोणकर आणि जामदार ताई या दोघांतील आपुलकीचे संबंध या प्रस्तावनेत जागोजागी दृष्टिगोचर होतात. अशा संवेदनशील मनाच्या साहित्यिकेची प्रस्तावना लाभणे ही खरोखर खूप उच्च सामर्थ्य आणि क्षमतेची गोष्ट आहे.
----जामदार ताईंच्या हयातीत हा संग्रह प्रकाशित होऊ शकला नाही त्यामुळे दुसरी प्रस्तावना महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणेचे अध्यक्ष श्री वि. ग. सातपुते यांच्या लेखणीतून कागदावर उतरलेली आहे. एका सिद्धहस्त साहित्यिकाने लिहिलेली ही प्रस्तावना साहित्याच्या व्याख्या पासून सुरू होते." साहित्य ही सरस्वतीची साधना आहे ,तपश्चर्या आहे आणि श्रद्धेने केली तर साहित्यसंपदा जन्मते." अशी सुरुवात करून पुढे अत्यंत कवितांचेअभ्यासपूर्ण निरीक्षण करून लिहिलेली ही प्रस्तावना आहे. व या त्यांच्या लिहिण्यातून कवीची सात्विक व प्रामाणिक प्रवृत्ती दिसते याचे त्यांनी समर्थनच केले आहे. ----त्यांनी लिहिल्या प्रमाणे साहित्य हे खरोखर वैश्विक असतं व संवेदनेतून निर्माण झालेलं असतं व लेखन हे कधीच ठरवून होत नसतं. ते अंतरातून यावं लागतं व ज्याला विषयाचं बंधन नसतं . हे सत्य आहे. साहित्य, कला, व संस्कृती या गोष्टी मानवी जीवनातील संस्कारित आदर्श आहे असे मानून व कवीस शुभेच्छा देऊन ही प्रस्तावना संपली आहे.
--इतके साधक बाधक विचार करून व तोलून-मापून लिहिलेल्या प्रस्तावना वाचल्यावर कविता वाचण्यात अजून मजा आली व केवळ अर्थच नाही तर गर्भितार्थ समजण्यासही मदत झाली.
---- श्री शिरढोणकर यांच्या मनोगतात त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या आधीच्या आपल्या मनस्थितीचे वर्णन केले आहे .जेव्हा मन दोलायमान होते तेव्हा शब्दांची जुळवाजुळव तरी का करावी ? कोणासाठी लिहावे ? या लिहिण्याने काही साध्य होणार आहे का ? अशा विचारांनी मनाची थोडी हळवी स्थिती होत असतांनाच कागदावर शब्द उमटत गेले. आपल्याच मनातील विचारांच्या गोंधळामुळे आपल्याच आत्मविश्वासाला तडा जातो व ते स्वाभाविकच आहे असे वाटत असतानाच समाजात घडणाऱ्या त्या-त्या घटना, गुन्हे, स्वार्थी कपटी व्यवहार आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या... यांची जाणीव झाल्यावर आपण जे काही लिहीत आहोत ते अगदी वेगळे असून नवे व सृजनात्मक साहित्य आहे अशी खात्री पटल्यावर त्यांनी ही साहित्य निर्मिती केली.
-----माझ्या मते त्यांचा हा विचार अगदी बरोबर असून त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक कवितेचा वेगळा दृष्टिकोन, वेगळा विचार, वेगळी भावना मनांस जाणवली. व एका वेगळ्याच युगातून व सत्य व्यावहारिक परिस्थितीतून फेरफटका मारण्याचे समाधान मिळाले.
-----श्री विश्वनाथ शिरढोणकर यांचे "नुसतचं कविता लिहिणं" या पुस्तकातील कविता वाचनाला सुरुवात केली,तेव्हा लक्षात आलं की ह्या प्रत्येक कवितेतून सर्वांना काही ना काही संदेश मिळत आहे. वेदना, दुःख याला अलंकारिक भाषेत गुंफून एक एक काव्य निर्माण झालं आहे. प्रत्येक कवितेतून मानवी मन, भावना यांना महत्त्व दिलं गेलं आहे.
आता “रॉबोट” हीच कविता पहा ना.. विज्ञानाच्या ह्या आविष्काराने जगातील अनेक कामे सुलभ झाली असली तरीसुद्धा आपल्या वर येणारे संकट,दुःख स्वतः वर तो घेऊ शकत नाही. आपले सुख-दुःख वाटू शकत नाही. प्रेमळपणा किंवा भावनेचा ओलावा, आपुलकी या संवेदना त्यात मिळणार नाहीत.हे सांगून माणसांनी माणसांमधला हा संवाद आणि आपलेपणा वाढविला पाहिजे हे सांगणारी उत्तम कविता.
----“माणसाचे ढंग” ही कविता अशीच माणसाने निसर्ग नष्ट करून पर्यावरणाच्या केलेल्या हानी वर लिहिलेली आहे, तर “ सोबती” ही कविता सुद्धा मला आवडलेल्या काही कवितांपैकी एक आहे. गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जोडीने पार करून आता संन्यासाश्रमाच्या दारा जवळ उभ्या असताना कवीला आपल्या सहधर्मचारिणीची सुरुवातीपासून मिळालेली साथ डोळ्यापुढे येते. कुटुंबात सर्वजण असताना जे जाणवलेलं नसतं, ते आपल्याआपल्या वाटेने सर्व निघून गेल्यावर जाणवतं. तिच्याविषयी प्रेम, आपुलकी, माया कवितेच्या प्रत्येक ओळीतून दिसते व , जिथे आपल्या घरकुलाची वाट संपते, तिथे मोक्ष दिसायला लागतो असे सुंदर शब्द लिहून कवितेला एक उच्च स्तर कवीने प्राप्त करून दिला आहे.
----- “निवृत्ती” कवितेतही मुलाच्या हातात सर्व सोपवायची भाषा असेल तरीसुद्धा मुलाला एकच उपदेश केलेला आहे तो म्हणजे "काळजात असावी माऊली" हे मुलाचे कर्तव्य कवी मुलाला समजावून देताना दिसतो. “तसेच आईची आठवण “या कवितेत अगदी लहानपणीच जग सोडून गेलेली आई, त्यामुळे नकळत आलेला एकटेपणा व अशावेळी लिहिल्या गेलेल्या या ओळी "पोटी तुझ्या जन्म घेण्यासाठी परत एकदा ,मरण यावे" व्याकूळता निर्माण करणारी ही कविता, आणि “नुसतच कविता लिहिणे” या कवितेतील भावनाही अशीच मनाला भिडणारी. शब्दांना दिलेली विशेषणे सुद्धा खूप सुंदर आहेत जसे की शब्दवेड्या भावना, कल्पनेचा नाद, अलंकारांची फुलं, शृंगाराचे मोती, दुःखाचे पाढे, वेदनेची कथा, मेणाची तलवार अशा शब्दांनी ही कविता सजून गेली आहे आणि जगाला नकळत केलेला उपदेश ही आहे.
----“वैरीण आई” या कवितेत आईच्या अतिशय शिस्तबद्धतेला व त्यातून नकळत येणाऱ्या दुष्टपणाला जाब विचारणारी ही कविता आहे. अबोध बालकांशी क्रूरतेने वागू नये हे संवेदनशील कवी आपल्या कवितेत नमूद करत आहे. “सुख” या कवितेतही कवी सांगत आहे की जर देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीत आपण आनंद मानला, आनंद शोधला तर सुख नक्कीच आपल्याजवळ असतं. ते आपल्याला कळतं त्यासाठी समाधानी रहावं, आनंदी राहावं आणि सुखाची ओळख करून घ्यावी, असे कवी म्हणतो.
-----"माणसाचे ढंग " ह्या कवितेत तर मनुष्याने पर्यावरण, निसर्ग ह्याचे किती नुकसान केलेले आहे हे अगदी योग्य शब्दांत व्यक्त केले आहे.हे आजचे ही अजूनही सत्य आहे. पर्यावरणाचे नुकसान पर्यायाने आपले नुकसान हे माहित असूनही माणूस असे का करतो ? त्यानंतर " गरज " ह्या कवितेत पुन्हा तेच की खूप शहरीकरण सगळीकडे होत चालले आहे, त्याचे नुकसान किती होते व माणसाची किती ससेलहोलपट होते हे समर्थ शब्दांत दाखविले आहे.
------"पितृ स्मरण " ह्या कवितेतील भाव व्याकूळ करून जातात.व हे भाव जवळजवळ सर्वांच्या हृदयाला भिडणारे आहेत कवीला वडिलांची कशी पावलोपावली आठवण येते , कमी भासते ह्या भावना फारच सुंदर शब्दांत व्यक्त झाल्या आहेत.“मीच सूर्य” ही एकदम वेगळ्या ढंगाची कविता . माझ्या आकाशातील मीच सूर्य ... अगदी खरे आहे,आपल्या जीवनात स्वतः पेक्षा दुसरे काय महत्वाचे असते ! व प्रत्येक वेळा ह्या सूर्याची म्हणजे माझी मनस्थती वेगवेगळी असते . कधी वाट पाहत घुटमळणारे , कधी वादळात घाबरून लपलेले, कधी आतल्या आत जळणारे , असा अभिशप्त प्रारब्ध असलेला मी, मीच माझ्या आकाशातील सूर्य आहे . फार वेगळी कल्पना .
----त्यांच्या “आत्मा “ या कवितेत मृत्यूनंतर आत्मा कुठे भटकत राहील त्याला शांती मिळेल की नाही याची कल्पना करून लिहिलेले काव्य आहे .आणि ते वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभं राहतं की अत्यंत हलका असा हा आत्मा असाच कुठेतरी उडत, भरकटत, निळ्या आकाशात स्वर्गाच्या दारासमोर उभा असेल, खाली पृथ्वीवर माझ्या देहाची राख झालेली असेल आणि त्याच वेळी आत्मा परक्या देहात शिरत असेल अशी कल्पना करून केलेली ही कविता मनाला भिडून जाते, व्याकूळ करून जाते.
------अशा अनेक भावभावना व्यक्त करणारी व प्रत्येक कवितेतून काहीतरी सांगायचा, शिकवायचं मार्ग दाखवायचा प्रयत्न करणारी श्री शिरढोणकर यांच्या प्रत्येक कविता आणि तितकाच सुंदर हा कवितासंग्रह. श्री शिरढोणकर यांना पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.
----------
सुषमा ठाकूर.
30 May 2022.

----------------

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू