पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अव्यक्त भावनांचे पसारे

*अव्यक्त भावनांचे पसारे*

????????????????????????



 *संकोचाचे धुकेही किती* 

 *मनात गडद होत जाणारे* 

 *तृप्ततेचे किरणं दूर ठेवून* 

 *भावनांचे पसारे वाढवणारे* 



       काही नात्यांची अस्पष्ट  हाकही सुखाचा आकंठ अनुभव देणारी...कल्पकतेच्या अन् भावनेच्या समृद्ध मीलनातून जगण्याला कलाटणी देणारे हात आपल्याच अस्तित्वाची  एखादी खूण आपल्या निदर्शनास आणून देतात अन् आपण तिथे स्वतःच  स्वतःला सापडतो....त्या नात्याला नाव नसतं अन् गावही नसतं तरी मन त्याच नावाभोवती भिरभिरतं ,  त्याच गावाला पुन्हा पुन्हा  वळसा मारून येतं...जगण्याच्या आशयाचं सौंदर्य खुलवतांना तेच हात सतत सोबतीला असावे असंही वाटून जातं....आपल्या जगण्याच्या वाटेवर चांदणं शिंपीत जाणारं ते व्यक्तीमत्व अन्  त्या चांदण्यासह आपण लावलेले सुखाच्या भैरवीचे सूर....त्याच्या नम्रतेत पारिजातक होऊन संपूर्णपणे गळून जाणारं मन...ते बहरलेपणही त्या क्षणी वाटून घेता येत नाही  अशा त्या अव्यक्त भावना....


      आपल्या जगण्याला ते प्रकाशकर कसे हळूवार गोंजारतात....त्या गोंजारण्यात लालित्य असतं अन् तरलताही...काय प्रयोजन असेल अशा नात्याचं ?  ते नातं आयुष्यातलं विश्रांतीस्थान की खळखळती जीवनसरिता....?  बरेचदा भावस्पंदन गोठलेले वाटूनही त्या नात्याचा संदर्भशोध संपत नाही  ....सळसळत्या जीवनात ही नाजूकशी भाववेल कुठून कशी उगवली कळत नाही  पण क्षणभर मन  थांबतं....कुठल्या अपेक्षेने माहित नाही  पण जगण्यावर सुखाची शिंपण करून जाणाऱ्या  नात्याला काही  तरी सांगावसं वाटतं पण नक्की  काय सांगावं कळत नाही  अन् मनात सांचतो अव्यक्त भावनांचा पसारा...


      भावना असतात , शब्दही असतात पण शब्दांच्या कारागृहात आपणच बंदिस्त झालोत की काय असं काहिस वाटणारं ते नातं...मन बोलतं आपल्याशी आपल्याच प्रामाणिकपणाबद्दल..अरूप भावनांना सरूप द्यायला काय हरकत आहे असं काहिसं पुटपुटतं ते....पण जाणीवांनी संस्कारीत झालेल्या मनाला शब्द मात्र फुटत नाही  ....प्रत्यक्षापर्यत पोहोचण्याची वाट मोठी मोठी होत जाते अन् मनातलं मनात राहून जातं...


       रक्ताची नाती, मानलेली नाती, परंपरेनी चिकटलेली नाती यात हृदयापासून जुळलेल्या नात्याचा कुठे समावेश आहे ? ....खरंतर नात्याला सरहद्दी नसाव्यातच...भावनात्मक अन् विचारात्मक  पातळीवर जुळलेलं एक नातं सर्वसमाविष्ट करायला काही हरकत नाही ....आपल्याच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला जाणवून दिलेलं ते नातं असतं ...मग जगाच्या  दृष्टिकोनातून का बघावं लागतं अशा नात्याला ?....अंतरंगात उमलेल्या प्रतिक्रिया बरेचदा तिथेच विरून जातात अन् उरते अव्यक्त मनातली तळमळ ..न संपणारी...


      प्रत्येक  नात्याला देव्हा-यात ठेवायचं असं कुणी सांगितलं  ?  हृदयातल्या गाभाऱ्यातही काही  नाती प्रेमाचं  निरांजन तेवतं ठेवून जीवनभर प्रकाश देत जातात त्याचं मूल्य संस्काराच्या परिभाषेत कदाचित कमी असेलही  पण जाणीवांच्या कक्षेत खरं तर तेच जगणं असतं.... सामान्य माणसाचं सामान्यपण हेच की जाणीवपूर्वक जाणीवांना दूर ठेवणं अन् मनात भावनांचा पसारा वाढवणं...


       भावपातळीवर जगता जगता स्वप्नातले मनोरे रचत ठेवणं हा मानवी स्वभाव....अतृप्ततेतही तृप्ततेचा कलात्मक विस्तार करणारे आपण....जगतांनाही दुनियेचा विचार करणारे आपण ...संस्कार जपता जपता अधिक बंधनात साकळत जाणारे आपण....संकोचाच्या धुक्यापलीकडे जाऊ शकत नाही ....म्हणून तर हे भावनांचे पसारे ....वाढत जाणारे...


 *जाणीवांना पैलतीर* 

 *कसा तो मिळत नाही* 

 *भावनांच्या पसा-याचा* 

 *निचराही होत नाही* 



            सौ. वर्षा मेंढे

             अमरावती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू