पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जेव्हा रावणाचा राम झाला..

रावण आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्यात युद्ध सुरु होते. जेव्हा विजयाचे मार्ग अपुरे भासू लागले तेव्हा रावणाला आपल्या भावाला, कुंभकर्णाला उठवण्याचा पर्याय श्रेयस्कर वाटू लागला. सहा मास निद्रावस्थेत काढणाऱ्या कुंभकर्णाला अनेक प्रयत्नानंतर जागं करण्यात रावणाच्या राक्षस सेनेला यश मिळालं. रावण त्वरेने कुंभकर्णाच्या प्रासादात आला. कुंभकर्ण रावणाला बघून म्हणाला,
'माझ्या बंधूराजावर, लंकाधिपती रावणावर असे कोणते संकट कोसळले, जे माझ्या प्रिय भावाने मला माझी निद्रा पूर्ण होण्याअगोदरच उठवले?'
'अरे कुंभकर्णा! अयोध्येचा राजपुत्र राम, त्याने लंकेवर आक्रमण केले आहे!'
'श्रीरामाने लंकेवर आक्रमण? नाही लंकेश, काही तरी गल्लत होते आहे. प्रिय भावा, मला सत्य वदन कर, तू श्रीरामाची काही आगळीक तर नाही काढलीस? अन्यथा श्रीराम कोणावर आक्रमण करणार, हे शक्य नाही.'
'मी त्याच्या पत्नीचे, सीतेचे साधुवेशात हरण केले.'
'रावणा, हे काय पातक करून बसलास? आणि सती स्त्री सीता? ती तुला बधली?'
'नाही कुंभकर्णा, ती तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही. तिच्यासमोर हा लंकेश आपली सारी संपत्ती आणि सोन्याची लंका ओवाळून करायला तयार आहे. स्वर्गलोक, मृत्युलोक, पाताळलोक कुठेही असा व्यक्ती नाही जो या रावणाला युद्धात पराजित करू शकेल. तरीही त्या निष्कासित राजपुत्रामध्ये असे काय बघते ती सीता, जे माझ्यात तिला सापडत नाही?'
'रावणा, तुझी मायावी विद्या वापरून तू तिचे हरण केले. त्याच विद्येचा वापर करून एकदा श्रीरामाचे रूप धारण कर. तिच्या डोळ्यांत रामासाठी काय भाव येतात, हे तुला कळेल.'
रावणाला कुंभकर्णाचे म्हणणे पटले. त्याने तातडीने श्रीरामाचे रूप धारण केले आणि अशोक वाटिकेकडे निघाला. कुंभकर्ण आपल्या प्रासादात तसाच त्याची वाट बघत बसला. काही वेळाने रावण आपल्या मूळ रूपात परतला. चेहऱ्यावर निराशा होती. कुंभकर्णाने विचारले,
'लंकाधिपती रावण पुन्हा कसल्या विवंचनेत? असे काय दिसले सीतेच्या डोळ्यांत?'
'कुंभकर्णा, राम खरंच आहे का रे मर्यादा पुरुषोत्तम? म्हणून का विभीषण त्याच्या शिबिरात गेला? त्याची मर्यादा माझ्या बळाच्या सुद्धा वरचढ असेल का, ज्या बळाच्या साहाय्याने मी देव, दानव, राक्षस, मनुष्य सगळ्यांना चुटकीसरशी नमवले?'
'काय झाले रावणा?'
'कुंभकर्णा, सीतेच्या डोळ्यांत बघण्याचे धारिष्ट मला झालेच नाही! रामाचे रूप धारण करताच परस्त्री सीतेमध्ये मला माता दिसू लागली. आणि त्या कारणाने माझे नेत्र केवळ तिच्या पावलांकडे बघू शकले. एक अंश सुद्धा माझे डोळे वर झाले नाही. मला वाटला तो माझ्या कृत्यांचा पश्चात्ताप आणि दिसली, ती केवळ आणि केवळ माझी मर्यादा!!'

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू