पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुस्तक परिचय अळवावरचं पाणी

पुस्तक परिचय 

  

अळवावरचं  पाणी 

निवेदन  सौ. उषा चौधरी

संपादन  सौ.राधिका भांडारकर 

प्रकाशिका  डाॅ.सौ.स्नेहलता कुलकर्णी

                 नीहारा प्रकाशन. 

प्रथम आवृत्ती:१६डीसेंबर २०२३

किंमत:२५०/—पृष्ठे १७२

  

अळवावरचं पाणी हे पुस्तक हातात आले.

मुखपृष्ठच इतके छान.हिरव्या पानावर मोत्यासारखे चमकणारे जलबिंदू.

   काय म्हणायचे असेल लेखिकेला?

आयूष्य म्हणजे अळवावरचे पाणी, ते घरंगळून जाते.

आयुष्यातल्या कटू आठवणी, कुणाबद्दलही कटुता मनात 

न ठेवता केलेला हा उषाताईंचा जीवनप्रवास.

त्यांनी जशा आठवतील तशा आठवणी राधिकाताईंना सांगितल्या.त्यांनी त्या टिपून घेतल्या आणि शब्दांकित करून या पुस्तकरूपाने आपल्यासमोर ठेवल्या.

 

एका कर्तृत्वावान स्त्रीची ही जीवनगाथा खूप प्रेरणादायी आहे.

राधिकाताईने या पुस्तकात उषाताईंच्या जीवनयात्रेचे 

विविध पैलू दाखविण्यासाठी ३१भाग केले आहेत.

कुठलेही पान उघडून कुठलेही पान वाचले तरी त्यातून एक मनस्विनी, कार्यरत, संवेदनाशील झुंजार व्यक्त्तिमत्वाचे दर्शन होते. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा राहतो.अंगावर सरसरून काटा येतो.

 

उषाताईंचे लहानपण अमळनेर येथे गेले.त्यांना सानेगुरुजींचा सहवास मिळाला.त्यांचे संस्कार बालवयातच घडले. राष्ट्रीय भावना ,सामाजिक बांधीलकी, धर्मसहिष्णुतेची रेघ मनावर कोरली गेली.

घरी हरिजनांची वेगळी पंगत गुरूजींनी बंद केली.

खेडेगावातील वसतिगृहातील मुलांना उषाताईंची आई 

घरी जेवण द्यायची. त्यामुळे माणुसकीचा धर्म मनावर 

लहानपणापासून बिंबला.

 

हा काळ होता १९४०ते१९७५ पर्यंतचा.

त्याकाळी मुला मुलींत आईवडील खूप भेदभाव करत.

मुलांना दूध तर मुलींना ताक. का तर सासरी दूध मिळाले नाही तर मुलीला सवय असावी.

मुलीला नहाण आले की तिच्या लग्नाची बोलणी सुरू. 

मुलींना सारखा नन्नाचा पाढा.हे करू नको,ते करू नको.

पाचवारी साडी नेण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागे.

हा संघर्ष करताना उषाताईंना जाणवले की त्या प्रतिकार करू शकतात.त्यांच्या संवेदना प्रखर आहेत.त्या इतरांहून वेगळ्या आहेत.

राधिकाताईंनी हे मनाचे हेलकावे सुंदर टिपले आहेत.

 

उषाताईंमधली कार्यकर्ती त्यांना स्वस्थ बसू देत नसे.

पुण्यातील कामगार महिलांना संघटित करुन त्यांना शिवणकाम शिकविले.महिलांना मोठ्या ऑर्डर मिळवून दिल्या.कांग्रेस भवन उद्योगाने भरले.महिलांना रोजगार मिळाला.मालाची ने आण उषाताई स्वतः करीत.

आबासाहेब खेडकरांनी वैयक्तिक अधिकारात परवानगी देऊन सुद्धा विरोधकांच्या पोटदुखीमुळे काँग्रेस भवन खाली करावे लागले.

 

असे खच्चीकरणाचे प्रसंग वेळोवेळी आले.

विरोधक त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न करत होते.त्यांची खिल्ली उडवीत होते.समाजातील हा कडवट अंतःप्रवाह त्यांची उमेद जाळत होते.

परंतु त्यांची जिद्द त्यामुळे वाढली.

 

सामाजिक कार्यासाठी त्यांनी त्यांचे कौटुंबिक जीवनही कसे पणाला लावले याचे वर्णन राधिकाताईंनी केले आहे.

मात्र त्यांचे कुटुंबीय भक्कमपणे त्यांच्या पाठीशी सदैव होते.

 

उषाताईंचे यजमान श्री.चौधरी त्यांना सांगत,

“समाजकार्य करायचे असेल तर भविष्यात पदरात दगड धोंडे पडतील.ते झेलण्याची तयारी ठेव.तू पक्की रहा.नंतर खचू नकोस.मी खंबीर आहे."

उषाताई वाईट चालीची बाई आहे,तिचे पदस्थांशी अनैतिक संबंध आहेत. इतक्या खालच्या पातळीवरची  चिखलफेक विरोधकांनी  केली. .परंतु तरीही त्यांचा संसार 

अबाधित राहिला.कारण श्री.चौधरी यांचे भक्कम कवच त्यांच्या पाठीशी होते.

सालस मुलगी अलका,हुषार मुलगा अजय,देवमाणसासारखा जावई सतीश, समंजस सून, सूनेचे आई वडील सर्वांचा त्यांना सदैव पाठिंबा मिळाला.



राजकारणात त्यांना जसे पाय मागे खेचणारे भेटले तसेच त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे करणारेही भेटले.मुख्यमंत्री वसंतराव नाईक, इंदिरा गांधी 

यांना कदर होती.त्यांच्या कार्याला स्वतःहून देणगी देणारे ही भेटले.

तरीही राजकारणातून त्यांचे मन उबगले.

करायची इच्छा असेल तर करता येण्यासारखे खूप असते..

उषाताई म्हणतात,

“मी दैववादी नव्हते.श्रमवादी होते.

काहीतरी सृजनशील करावे ही मनाची भूक.

समाजकार्याची तळमळ असेल तर त्यासाठी राजकीय पदाची आवश्यकता नाही.दुसरे माध्यम असू शकते.

राजकारणात कधी कधी तत्त्वांची गळचेपी होते.

जनतेचा फायदा व्हावा म्हणून मी झटले.परंतु त्यामुळे मी वैरभाव ओढवून घेतला.पक्षाच्या गणितात माझी वजाबाकी झाली.परंतु शेवटी महत्वाचे काय?

कामगारांचे कल्याण की माझे राजकीय स्थैर्य?

एखादे कार्य हाती घ्यावे.उदा.महिला उद्योजक संघाची स्थापना.बी पेरावे,अंकुर फुटावा,त्याने जोम धरावा 

आणि विरोधकांचे वादळ उठावे.हा अनुभव प्रत्येकवेळी आला. त्यामुळे सतत अडथळे ओलांडावे लागले.

त्यामुळे मी जीवन जगायला शिकले."

 

राधिकाताईंनी उषाताईंच्या आयूष्यातील प्रत्येक प्रसंग 

चित्तथरारक रितीने  शब्दांकन केला आहे की वाटतं की आपल्यावर असा प्रसंग ओढवला असता तर !

प्रत्येक प्रसंग जीवनाला कसे सकारात्मक सामोरे जायचे हे दर्शवितो.

उषाताईअंचे आयूष्य म्हणजे अर्धा पेला सुखाचा,

अर्धा पेला दुःखाचा.एक घोट गोड तर एक घोट कडू.

आज उषाताई हयात नाहीत.परंतु त्यांची कार्यप्रणाली 

चालू राहील.

आयूष्याच्या संध्याकाळी त्यांच्या मनात कुणाबद्दलही 

कडवटपणा नाही.आकस नाही.

अळवावरच्या पाण्यासारखा तो ही त्यांनी घरंगळून दिला.

 

निराधार,परित्यक्ता, असहाय्य,अगतिक स्त्रियांसाठी त्या शेवटपर्यंत झटल्या.त्यासाठी कुठले पद नको,हुद्दा नको,

त्यांच्याकडे होते समाजशील मन.

 

 या पुस्तकाबद्दल लिहावे तेवढे थोडेच.

भाषा अतिशय साधी,सरळ,सोपी पण काळजाचा ठाव घेणारी. अंतःकरण हेलावून टाकणारे हे चरित्र आहे.

 

शिवाय या पुस्तकासोबत उषाताईंच्या कुटुंबियांनीही त्यांच्याविषयीच्या आठवणी आत्मीयतेने आणि कृतज्ञ भावनेने लिहिल्या आहेत.सर्वार्थाने हे पुस्तक सुरेख आहे.

सर्वांनी जरूर वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

 

राधिकाताई उत्कृष्ट कथालेखिका आहेत.कवियङुत्री आहेत.

हा चरित्रात्मक प्रकारही त्यांनी अप्रतिमपणे मांडला आहे.

मी त्याना या पुस्तकासाठी व त्यांच्या पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा देते.

 

सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू