पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बरं.

नानीचे एक बरं आहे ती कुणाच्या मध्ये बोलतच नाही. अद्यात मद्यात राहतच नाही. तिला पटलं नाही, खूप खटकलं तरी सुद्धा ती कसला विरोध दर्शवत नाही. "आमच्या वेळी हे असं काही नव्हतं बाबा! आम्ही असे वागलो असतो तर.." वगैरे अशी वयस्कर, परंपरा छाप वाक्यं ती कधीच मुखातून काढत नाही. अगदीच असह्य झालं तर ती तिच्या रूम मधल्या फ्रेंच विंडोपाशी जाऊन बसते आणि खिडकीतून दिसणाऱ्या मोकळ्या आभाळाकडे पहात राहते किंवा पोडियम वर जाऊन बागेतल्या एखाद्या बाकावर एकटीच बसते. तिथे मुली असतात, मुलगे असतात मुला-मुलींचे घोळके असतात, त्यांचं जरा जास्तच मोकळं वागणं, हसणं बागडणं असतं. ज्येष्ठ नागरिकही असतात. बागेचा एखादा कोपरा पुरुषांचा तर दुसरा बायकांचा. नानी मात्र एकटीच बाकावर बसून राहते. जगदाळे, पागे, येवलेकर झाल्यास तर त्या चंद्रपूरच्या तन्नीवार नानीला बोलावतात. जाते कधी कधी नानी त्यांच्यात. पण मग त्यांच्या गॉसीप्स ऐकून तिचे कान किटतात.

 

 कोणाची सून माहेरीच गेलेली असते, तर कुणाला बाईच्या हातच्या पोळ्याच आवडत नाहीत, कोणाचा मुलगा लग्नानंतर फारच बदललेला असतो, कोणी उशिरा उठतो, कुणी रात्रीचा लाईटच काढत नाही वेळेवर, एक ना अनेक. पण थोडक्यात सगळ्याच तक्रारी. खाण्यावरून, कपड्यांवरून, खर्चावरून, रितीभातींवरून, सण साजरे करण्यावरुन,बोलण्यावरून, हसण्यावरून. नाराजी —नाराजी— फक्त नाराजी.

 

 नानीला हे सारं नको असतं. तिला अशा माणसांच्या घोळक्यातून कुठेतरी दूर जाऊन फक्त हे बदललेलं जग जरा बघायचं असतं. अनुभवायचं असतं. कुठलंही मत तिला द्यायचं नसतं. तिची भूमिका एकच. फक्त वॉचमनची.

 

 पण म्हणूनच नानीचा कुणाला त्रास नाही. सुनेला, मुलाला, नातीला— कुणालाच नाही. म्हणजे ती त्यांच्यातच असते. नानी खरंतर त्यांच्या जगात पूर्ण सामावलेली असते.पण तरीही अलीप्त असते.

 

" नानी आज मला ऑफिसातून यायला उशीर होईल. माझं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर आम्हाला डिनर आहे. आणि रिमा मधुराकडे बर्थडे पार्टीला जाणार आहे. तिचं टीनेज संपल्याचं सेलिब्रेशन आहे बहुतेक आज. राघवचं माहित नाही. तो येईल कदाचित घरी. पण तुम्ही त्याच्यासाठी जेवायला थांबू नका. तुम्हाला जे आवडेल ते मालतीबाईंकडून करून घ्या."

 सुनेच्या या लांबलचक 'आजच्या अहवालावर' नानी अगदी मनापासून म्हणते,

" बरं!"

 हे "बरं" म्हणणं किती छान. वादच नाही. प्रत्येकाकडे घराच्या चाव्या असतातच. त्यामुळे दार उघडण्यासाठी वाट पाहत राहण्याची गरजही नसते. सारं किती सोप्पं! कुणाचा पाय कुणात अडकलेला नाही. नानींना चुकारपणे वाटूनही गेलेलं असतं," मग आज राघवच्या आवडीची गरमागरम कांद्याची छान तेल लावून खरपूस भाजलेली थालीपीठ आपणच का करू नये?"

 

 पण नकोच. सुनेचं शासन बिघडायला नको. तशी ती काही वाकड्यात नाहीच. नानीलाच उगा या वयात त्रास होऊ नये हीच तिची भावना असते. नानीला सगळं समजतं. नानी उगीच फाटे फोडत नाही.

 

 जग बदललं आहे हे खरंच आहे. खूपच बदललं. कुठच्या कुठे गेलं. वास्तविक नानी ही एका मध्यरेषेवर होती.जुन्या नव्याच्या,बदलत्या काळाच्या केंद्रबिंदुवर होती. जरी तिची जडणघडण एका मराठमोळ्या सुसंस्कृत कुटुंबात झाली होती तरी त्याही वेळेला तिच्या भोवतालचं वातावरण खूप बंधनकारक होतं असं नाहीच. स्वतंत्र, स्वैर जरी नव्हतं तरी स्वतःची ओळख, अस्तित्व उमलणं यासाठी तेव्हाही ते पोषक होतं. मात्र फारसे जाचक नसले तरी काही शिस्तीचे नियम हे आपोआपच मनावर रुजलेले होते. एक वेळापत्रक नक्कीच होतं. भिंतीवरच्या कॅलेंडरवर परंपरेची वर्तुळही आखलेली होती. मग त्यात शुभंकरोती होतं, परवचा होत्या, नित्य नेमाचा अभ्यास होता, खेळणं किती, फिरणं किती, भटकणं किती, घरातलं वास्तव्य, भावंडांच्या कामाच्या वाटण्या आणि आयुष्य म्हणजे चांगलं भविष्य आणि भविष्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मेहनत या सर्वांचा एक अदृश्य आराखडा मनाशी बाळगलेलाच होता. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यात इतकं काही जबरदस्त त्यावेळी बदललेलं नव्हतं. म्हणजे त्याही वेळेस वेगळे, वेगळ्या पातळीवरचे सामाजिक स्तर त्या त्या प्रमाणात होतेच पण नानीचं जीवन एका मधल्या धारेतलं होतं आणि याच आखलेल्या मार्गाने तिने तिच्या आयुष्याची इतकी मोठी वाटचाल केली होती. आणि आताही मागेपुढे पाहताना त्यावेळच्या काही नसण्यावर, नाहींवर, त्रुटींवर तिला अजिबात खेद नव्हता. नो रिग्रेट्स.

 

 त्याही वेळेला ती एका नामांकित संस्थेत मोठ्या हुद्द्यावर स्वतःची प्रतिष्ठा सांभाळत होतीच की. एकाच वेळी दोन्ही पद संतुलित पणे तिने सांभाळली. गृहिणी पद आणि संस्थेतलं जबाबदार पद. तसे दोन्ही आघाड्यांवरती यशस्वी होती ती. पण कुठेच तिने मर्यादा सोडल्या नाहीत.अतिरेक,अवाजवीपणाच्या वाटेला ती गेली नाही. सासुबाईंसाठी सणावारी डोक्यावर पदर घेतला, वडाची पूजा केली, श्रावणी शनिवार, सोमवार पाळले. पितरांना जेवू घातलं. परंपरेच्या गर्भातले वैज्ञानिक अर्थ समजूनही तिने सारे काही बिन बोभाट पार पाडून सर्वांची मने राखली. निदान तसा प्रयत्न नक्कीच केला. उगीच किडूक मिडुक वादात ती पडलीच नाही.

 

 ऐकूनही घेतलं. सासूबाई तरीही म्हणायच्या," तुला वेळच कुठे असतो? तू तुझ्या ऑफिसच्या कामात? घर तुला नंतरच."

 नानीला काय वाईट नसेल वाटलं? पण उगीच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत ती तेव्हाही पडलीच नाही. नानांनी सुद्धा सगळं काही स्वीकारलं नव्हतं. विरोध नव्हता म्हणजे संपूर्ण संमती असा अर्थ नसतो. नानांच्या कन्व्हेनशनल मनाला नानीच्या अनेक गोष्टी पटायच्या नाहीत. ज्या ज्या वेळी नानी काळाप्रमाणे बदलायचं ठरवत असे त्या त्या वेळी नानांना त्यांचा गतकाळ आठवायचा आणि त्या पुन्हा पुन्हा नानीची पावलं मागे खेचायचे. गैरसोयीच्या आयुष्याला उदात्तपणा आणण्याचा प्रयत्न करायचे. प्रेम होतच पण घर्षणंही खूप कचकचणारी होती. नानीने केलं सहन. स्थैर्यासाठी. शेवटी काय? पिढीतले अंतर, संस्कृतीतील बदल हे काळाच्या पावला बरोबर अव्याहत सरकतच असतात, नाही का? आज आणि काल यातलं अंतर कधी मिटूच शकत नाही. मग आज या मिडलाईन वर उभे असताना, बदललेलं जग बघताना इतकं भांबावून, बिथरून कां जायचं? कदाचित काल आणि आज मधलं अंतर जास्तच वाढलंय म्हणूनही असेल.

 

 नक्की काय बदललं याचा विचार करताना नानीला गंमतच वाटते. त्यादिवशी राघवचं आणि सुनेचं काहीतरी बिनसलं होतं. धुसफुस चालूच होती. कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं. पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले. 

" हे बघ राघव! तू तुझ्या मतांवर इतका ठाम असशील ना तर माझे काही म्हणॉणे नाही. तू तुझा स्वतंत्र, मी माझी. मला तुझी ही अरेरावी मुळीच चालणार नाही. लक्षात ठेव या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर माझा शंभर टक्के अधिकार आहे. मला माझी मतं आहेत आणि मी तुझ्यावर एक कपर्दीकही अवलंबून नाही.रिमाचा सांभाळ करायलाही मी तुझ्यापेक्षा जास्त समर्थ आहे."

 नानी आतल्या आत प्रचंड हादरली होती. आर्थिक स्वातंत्र्यांमधून मिळालेली ही आवाजाची धार तिला जाणवत होती. पण मग नानीने असा आवाज कधीच का नाही वापरला?

 अशा पार्श्वभूमीवर तिला तिची आणि नानांची ही भांडणे आठवत. जेव्हां ती खोदून खोदून आठवायची तेव्हा तिच्या मनात आलं सारं काही सोडून जाण्याचा विचार तिच्याही मनात नव्हता का कधी आला? पण राघव साठी ती मिटूनच राहिली. मनातलं ओठावरही आलं नाही. एक घाव दोन तुकडे हा विचार तर फारच दूर राहिला. 

 

 राघवचं आणि सुनेचं नक्की काय बिनसलं होतं याचा खोलवर जाऊन मागोवा घेण्याचा नानी प्रयत्न सुद्धा करत नाही. कोण चूक? कोण बरोबर ?कसं ठरवायचं आणि का ठरवायचं? मुलगा म्हणून राघवच बरोबर असही तिला वाटत नाही आणि सुनेने थोडं पडतं घ्यावं असंही वाटत नाही. पण यांचं नातं मात्र तुटू नये असं नक्कीच वाटतं. रिमाच्या भविष्याचं काय असंही वाटतं. 

    नानी गप्प बसली तरी नानीला दुःख होतं. कळून चुकतं इथेच सारं बदललंय. नाती कचकड्याची होत आहेत. संसाराच्या व्याख्या बदलत आहेत. जो तो आत्मकेंद्रित झालाय. ही आपली संस्कृती आहे का? हे लोण पलीकडचं आहे. 

 

पण तरीही नानीच्या मनात गोंधळ असतो. नाते टिकवणे म्हणजे नक्की काय? रडत खडत निभावणं याला नातं टिकवणं म्हणायचं का? की" मेरी झाँसी नही दूंगी" या प्रकारातला आवेश दाखवून दणादण कापाकापी करायची?

 

 राघवच्यात नानांचे काही गुण असणारच. तसं पाहिलं तर नानीचं अवंतीशी— सुनेशी— नातं चांगलं आहे. मोकळेपणाचे आहे. ती तिच्या ऑफिसमधल्या घटना सांगते. तिच्या मैत्रिणींबद्दलही बोलते. ऑफिसातल्या सहकाऱ्यांच्या नात्यांबद्दल बोलते आणि बिनदिक्कतपणे राघवच्याही तक्रारी करते.कधी कधी संगणक,मोबाईल बाबतीत नानीची शिकवणीही घेते. नानी तिचं हरवलेलं रूप अवंतीत पाहते आणि त्यावेळी नानीला एक स्त्री म्हणून सुनेची कणव येते आणि खूप बदललंय असं वाटत असतानाच नानीला वाटतं छे! सारं काही तसंच आहे अजून. समाज बदलतो, पण तो फक्त वरवर. त्याचा वेश बदलतो, खाद्य बदलते, जगण्याची तंत्रं बदलतात, पद्धत बदलते, वागणं बदलतं, प्रगतीच्या भुलभुलय्यात सारेच भरकटतात. पण या ऑर्बिट च्या फेऱ्यात सापडलेलं मन काही बदललेलं नाही. माणसातल्या माणूसपणातली प्रगती काही माणसाला या तंत्रज्ञानाने अजूनही साधता आलेली नाहीच. 

 

 रिमाचं आणि नानीचही एक सुंदर नातं आहे. आजी आणि नातीचं नातं! पण या नात्यातही खूप बदललेले कंगोरे आहेत. रिमाच्या हुशारीने, दिसण्याने, चातुर्याने नानीचा उर एकीकडे मायेने भरून जातो तर कधी तिच्यातला फटकळपणा, ताडताडपणा,भाषा, बदललेला पेहराव बघताना नानी मनातल्या मनात धास्तावते. तिसऱ्या नव्या पिढीचं प्रातिनिधिक स्वरूप तसं नानीच्या पचनी नाही अजून पडलेलं. 

 

 एक दिवस नानी रिमाला चुचकारत म्हणाली होती," रिमा बेटा! अंधार पडायच्या आत घरी येत जा ग! काळजी वाटते आणि हे बघ तू छानच दिसतेस पण इतका उघडेपणा कशाला हवा? झाकण्यातही अधिक सौंदर्य असतं."

 तेव्हां ती म्हणाली होती,

" आज्जी आजकालची फॅशन आहे ही! नाहीतर काकूबाईचं लेबल लागेल मला. आणि तुझी "सातच्या आत घरात" ही व्याख्या बदल बरं. खूप मोठी स्वप्नं आहेत माझी आणि ती पुरी करण्यासाठी मला या वेळा कशा सांभाळता येतील? आज्जी यु आर द बेस्ट आज्जी इन द वर्ल्ड. मी माझ्या मित्रांना, मैत्रिणींना नेहमी सांगते माझ्या आजीचे विचार खूप मॉड आहेत. सो प्लीज नाऊ डोन्ट बी आउट डेटेड हं!"

 

"आउटडेटेड" नक्की काय असतं याचा कधीकधी नानी विचार करते, पेपरात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या, आजूबाजूला चर्चेत असणाऱ्या अनेक अत्याचाराच्या, बलात्काराच्या, आत्महत्येच्या, नैराश्याच्या, एकतर्फी हिंसक प्रेमाच्या, अपहरणाच्या,जिहादच्या, खुनाच्या बातम्या नानीला नक्कीच अस्वस्थ करतात. कळीचं फुल बनत असलेल्या रिमाला बघताना उर धडकतोच. सोशल मीडियाचा वाढलेला राक्षस समाजाचा गळा दाबत आहे असंही नानीला वाटतं. या राक्षसाने चुकून आपल्या घराचं दार कधी ठोकलं तर? नानी घाबरते. विलक्षण थरकाप होतो तिचा. पण त्याचवेळी तिला हेही जाणवतं आपल्या आवाकाच्या बाहेर आहे हे सगळं आता. मग तिला धीर मिळतो तो घरातल्या देव्हाऱ्याचा. निदान तो तरी आहे अजून, तिला माहित आहे, ना नमस्कार करायला कुणाला वेळ ना दिवा लावायला सवड. कधीतरी आठवण आल्यासारखे हात जोडायचे. पण नानी मात्र त्या देवांशीच बोलते. दिवा उजळवून त्यांची आरती करते. त्याच्याशी तिचा मूक ,अश्वासक संवाद घडतो.सुखाय,रक्षणाय.सर्वांच्याच.

 

 अनेक चर्चा घडतात. घटनांचं मंथन होतं. मतांची देवाण-घेवाण होते आणि शेवटी एकच निष्कर्ष असतो "कालाय तस्मै नमः"

 

 सकाळी फिरताना नानीला डी बिल्डिंग मधले सरदेसाई ठराविक वेळेला भेटायचे. गेल्या कित्येक दिवसात ते दिसले नाहीत. बऱ्याच दिवसांनी नानीला त्यांची अनुपस्थिती जाणवली. नानींना त्यांच्याविषयी एवढेच माहीत होतं की त्यांचं स्वतःचं वाकडेवाडीत घर होतं. एकटेच राहत होते. पत्नीचे निधन काही वर्षांपूर्वी झालेले होते. पण एक दिवस उंबरठ्यावर पाय अडखळून ते पडले आणि मग त्यांच्या जीवनाचं तंत्रच बदललं. शेवटी मुलीने त्यांना तिच्या घरी आणले. तेव्हापासून सरदेसाई या कॉम्प्लेक्सचे सदस्य होते. पण काही दिवसापूर्वीच कळलं की आता ते कामशेतला वृद्धाश्रमात असतात. त्यावरूनही पोडियमवर चर्चा झाली.कारणमीमांसा झाली,बदलत्या कुटुंब संस्थेवर ओरखडे उमटले, आजकाल म्हाताऱ्या माणसांची जबाबदारी कोण घेतोय? वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं. पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. "काळाची गरज" या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.

 

 त्यादिवशी बाकावर पागेबाई एकट्याच बसल्या होत्या. नानीनं दुरूनच त्यांना पाहिलं. जरा उदासच वाटत होत्या. मग नानी त्यांच्या शेजारी जाऊन बसली. पागेबाईंनी लगेच त्यांचा हात धरला.

" काय झालं मायाताई ?"

"काही नाही हो! नेहमीचच."

 नानीने थोडा वेळ जाऊ दिला. फारसे काही प्रश्न विचारले नाहीत. मग त्याच सांगू लागल्या,

" किती वर्ष मी या दोघांना सांगत होते मला नातवाची पावलं दाखवा रे! आठ वर्षे झाली यांच्या लग्नाला. विषयच काढू द्यायचे नाहीत. मुल जन्माला घालण्यापूर्वीचं यांचं बजेट ठरलेलं असतं म्हणे! ते गाठेपर्यंत थांबायचं. अरे पण तुमच्या वयाचं काय रे? ते थांबणार आहे का? मूल जन्माला येणं महत्त्वाचं नाही का? ते वाढेलच की आपोआप. त्यासाठी बजेट कशाला हवं? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याची किंमत आता मोजावी लागते. तारुण्य सरलं आता ivf च्या पाठी लागलेत. काय म्हणाव यांना? मोठ्यांचे सल्ले यांना पटत नाहीत. त्यांच्या अनुभवांशी यांचं काही देणंघेणं नसतं. यांचा विश्वास प्रगत विज्ञानावरच. फक्त विज्ञान हाच त्यांचा आधार हो! बाकी निसर्ग तत्वांशी यांचं नातच नाही. मान्य आहे रे बाबांनो तुम्ही सारे खूप प्रगत आहात, खूप पुढे गेली आहेत तुमची तंत्र. पण तंत्र, यंत्र आणि निसर्ग यांचा काही ताळमेळ आहे की नाही? सगळी नैसर्गिक मजाच हरवून बसतात जीवनातली. नाही का हो?"

 नानी एकदम भानावर आली मायाताईंच्या प्रश्नाने. मायाताईंच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर नैराश्य होतं. सगळे पेशन्स संपले होते.

 नानी मात्र एवढेच म्हणाली, "नका इतके गुंतून घेऊ स्वतःला. काळ बदलतो, जीवन बदलतं. त्यांचं आयुष्य त्यांचे निर्णय. जगू दे त्यांना त्यांच्या पद्धतीने. आपण फक्त प्रार्थना करायची. ठेच लागली तर आधार द्यायचा. तोही त्यांना हवा असेल तर?"

" काय बोलताय तुम्ही? असं कुठे असतं का?"

 असं म्हणत पागेबाई उठून गेल्या. त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे नानी पहात बसली. क्षणभर तिला वाटलं "हे कालचक्र फिरताना प्रत्येक मागच्या पिढीचं या पागे बाई सारखंच होतं का?" 

 

नानीचीही पंच्याहत्तरी उलटली होती. नाना जाऊन वीसेक वर्ष झाली असतील.नानी निवृत्त झाल्यावर राघव म्हणाला, "नानी तू आता एकटी राहू नकोस."

 

 तसा हा निर्णय खूप मोठाच होता आणि नानीच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला पलटी देणारा होता. नानीला एकटं राहण्याची सवयी झाली होती. शिवाय दोघात तिसरा नकोच हाही एक विचार होताच. तशी नानी आर्थिक दृष्ट्या अवलंबूनही नव्हती. तिचे भरभक्कम पेन्शन होते. स्वतःची सेविंग्ज होती. नानांची थोडीफार पुंजी होती. पण त्याला तिने कधीही हात लावला नाही. फक्त नियोजन केलं आणि राघव साठीच राखून ठेवलं.

 

 अनेक कडू गोड आठवणींना मागे ठेवून घराचा उंबरठा कायमचा ओलांडणं नानीला जड गेलं होतं. पण राघव बरोबर राहताना दोघांच्याही आयुष्यात होणाऱ्या बदलांचं काय करायचं याचं एक निश्चित धोरण तिनं आखलेलं होतं आणि म्हणूनच असेल राघव, राघवची बायको आणि रिमा यांच्या आयुष्यातलं तिचं होणार आगमन त्या वेळेपासून कुणालाही त्रासदायक वाटलंच नाही. 

 

 नानी खूप वेळा विचार करते की कुठलाही बदल ही समस्या कशी होऊ शकते? बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खरी समस्या असते. नानी सतत एक सकारात्मक दृष्टिकोन जपत आली. तिचं एकच उत्तर असतं सगळ्यांवर,

" बरं." 

या "बरं" मध्ये खूप काही व्यक्त, अव्यक्त साठलेलं असतं. पण याचा अर्थ ती नव्या पिढीच्या ताब्यात गेली आहे असं मुळीच नाही. तिच्या अस्तित्वावर फक्त तिचाच हक्क आहे. त्यावर कुणीही कुरघोडी करू शकलेलं नाही. फक्त दोन वेगळ्या विश्वातली एक अस्पष्ट रेषा तिने जाणीवपूर्वक सांभाळलेली आहे. ती सांभाळताना होणारी उरातली धडधड, उदासीनता, चीड, तुलना या साऱ्या भावनांवर तिने मात नसेल केली पण त्यांना नीट हाताळले आहे. हे नक्की.

 या साऱ्यांसोबत नानीबरोबर तिची आई, आजी यांच्या आयुष्याची ही आठवण असते. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक रिकाम्या जागा नानी भरून काढण्याचा प्रयत्न करत असते.

 

 रात्र खूप झाली आहे. राघव दिल्लीला गेलाय. अवंती काही दिवसांसाठी ऑफिसच्या प्रोजेक्ट निमित्त सिंगापूरला गेली आहे. रिमा अजूनही घरी आलेली नाही. तिचाही कोणी मित्र आहेच. सकाळी निघताना तिने आजीला सांगितले होते की, ती त्याच्याबरोबर आज एका लाईव्ह कन्सर्टला जाणार आहे. मालतीबाईंचीही सुट्टी होती. नानीच्या मनात पुष्कळदा येतं रिमाला एकदा विचारावं," तुझं आणि त्याचं नक्की नातं काय आहे?"

पण नानीला खात्री आहे ती म्हणेल "अग आज्जी आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आत्ता तरी."

" आत्ता तरी" याचा नक्की अर्थ काय? अवंती जवळ सहजच बोलता बोलता नानीने विचारलं होतं,

" त्यांच्यात काही ठरतंय का?"

 तेव्हां ती म्हणाली होती,

 "नानी आज-काल मुलं काय मुली काय पटकन लग्नाच्या बंधनात पडत नाहीत. त्यांना सहवासातून एकमेकांची खरी ओळख करून घ्यायची असते. लग्न हा त्यांच्यासाठी फार पुढचा विचार असतो. नानीला प्रश्न तर पडलेच होते पण न विचारण्याचं धोरण तिने याही वेळेला राखलंच. फक्त अवंतीला म्हटलं मात्र, "तुम्हाला चालतय का हे सारं?म्हणजे तुला आणि राघवला?"

 अवंती नुसतीच हसली.

" अहो नानी आमच्या चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? आजकाल मुलांना फारसं विचारलेलंही आवडत नाही. विचारत राहिलं की संवाद तुटायला लागतो आणि त्यांच्या जीवनाचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहेत. 

 नानीला एवढंच जाणवलं हळूहळू सूनही मागच्या बाकावर येत चालली आहे. नानीला गंमत वाटली.

 

 आकाशात भुरकट ढगांच्या पदरातून चंद्र संथपणे सरकत होता. कुणाच्याही सुखदुःखाची त्याला जाणीव नव्हती.अथांग आभाळात तो मुक्तपणे भटकत होता. आजचा चंद्र ही नानीला वेगळाच भासला. तिच्या अंतरातून जणू काही नकळतच स्वर आले," अरे बाबा! या मानवाने तुला तरी कुठे सोडले? विश्वाच्या मनातल्या तुझा गोजिरवाण्या रूपाची चिरफाडच झाली ना?"

 

 मग नानी बेडरूम मध्ये आली. थोडा वेळ तिने टीव्हीवरची एक मालिका लावली. तिथेही हेच सारं होतं. ती कुणी एक इशा, अरुंधतीला म्हणजे तिच्या आईला जोरजोरात तिचं म्हणणं पटवत होती. ताड ताड तिच्या बाबतीत घडलेल्या सगळ्या गोष्टींबाबत तिला दोष देत होती. बिनदिकतपणे ती बोलतच होती. शेवटी नानीने टीव्ही बंद केला.

 

 मोबाईलवर मेसेजची ट्युन वाजली. मेसेज रिमाचा होता.

" आज्जी प्रोग्रॅम नंतर आम्ही सगळे विक्रमच्या फार्मवर जाणार आहोत. खूप जण आहोत आम्ही. काळजी करू नकोस. सकाळी ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघू. गुड नाईट! टेक केअर!

 नानीने मेसेजला उत्तर दिलं.

" बरं."

 

 त्याही वेळेला तिच्या मनात एकच विचार आला निदान रिमाने कळवले तरी.

 

 राधिका भांडारकर पुणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू