पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हरवलेलं गाव

*हरवलेलं गाव* 



 *ही वाट दूर* *जाते...स्वप्नामधील गावा* ...दूर कुठेतरी गीत ऐकू येतं पण आजकाल गायकाचा आवाज हुंदक्यांचा असल्यासारखा का भासतो बरं ?   गावाकडे जाणारी वाट हरवली  की  गावच हरवलं ? चांदण्यातल्या चाहुलीप्रमाणे गावाची चाहूल लागायची आधी ...आता मनाला ती लागेनाशी झाली ...का ?  स्वप्न पडेनाशी झाली की  गावच हरवलं  ?  सुखदुःखाच्या बहुरंगी गोधळीतली ती उब नेमकी गेली कुठे ? परकरात चिंचा खोचून मागच्या दाराने हळूच येणारी ती सुमी, " क्यो बेटा, बेर खाएगी क्या ? " म्हणत पिशवीतल्या लालकेशरी बोरांनी आमची ओंजळ आंबटगोड करणारे  रहमान चाचा...आईच्या चोरून आजीपाठोपाठ शेताकडे निघालेली पावलं...जातांना नदीत टाकलेल्या खड्यांनी उठलेले तरंग अजूनही मनात कसे बरं घर करून बसलेत..  तेव्हा धो - धो पावसात गळणारी झोपडीसुद्धा बोलकी होती आता पाऊसही मुका का भासतो ? ...जुन्या खाणाखुणांचा गराडा मनाभोवती तसाच असला तरी पावलं गावाकडे वळत नाही  कारण गाव तसं स्वप्नातलं रहालं नाही .


       शहरातलो आपण केवळ देह उरलेल्या माणसांच्या गर्दीत हरवत चाललो हे मान्य  पण गावातला तो साधा सरळ माणूस तरी कुठे जिवंत रहाला ?  आपापली दुकाने सांभाळत ती भोळी माणसं कधी राजकारणात शिरली तेच कळलं नाही ... उखाळ्या पाखाळ्यातलं ते ग्रामीण जीवन खेकड्यासारखं एकमेकांचे पाय ओढणारं होत गेलं अन् कुणी कुणावर भावनिक घाव केला हे आठवायची तसदी सुद्धा  कुणी घेतली नाही ....मन सांभाळणारी माणसं आता जीव सुद्धा सहज घ्यायला लागली....स्वप्नातल्या त्या गावातलं असं वास्तविक रुप बघून आत्मा गुदमरत गेला तर नवल ते काय ? ... शेकोटीभोवती जमलेला जमाव सगळ्यांच्याच दुःखाचा सारांश करून सुखाचा परिच्छेद वाढवत न्यायचा ...माणसांची ती अमूर्त  सार्वजनिक दुःखे एकमेकांशी  बोलून समूर्त होत जात अन् एकाच्या डोळ्यातल्या व्यथा अन्  वेदना समोरच्याच्या डोळ्यात उमटत....सार्वजनिक प्रेमाचं रुपांतर भक्तीत होतांना सहज   दिसायचं ...एखाद्याच्या  बोलण्यातली कटुताही पूर्ण  गाव समंजसपणे समजून घेत....जगण्याचं तथ्य शोधत बसण्यापेक्षा जगणं हेच तथ्य होतं ...इवल्या चिमण्यांनी जितका सहज दाणा टिपावा तितकं सहज क्षण टिपत जगणं सूरु असतांना मातीच्या भिंती दगडाच्या झाल्या आणि मनं सुद्धा दगडी होत गेली....घरं मोठी अन् कुटुंब छोटी झाली,  रस्ते रुंद झाले , दृष्टी अरुंद झाली....क्रुरता , फसवणुक , खोटेपणा बघून अन् ऐकून अंगावर एक एक ओरखडे पडत गेले...सामाजिक बांधिलकी हा शब्द फक्त पुस्तकात बंदिस्त होऊन राहू नये इतपत वातावरण गढूळ का व्हावं कळत नाही  पण धुळीतलं गाव  डोळ्यात विचारकण टाकून पाणी का आणतात हे सुद्धा कळत नाही ....


       "चल गड्या , तुला आपला गाव दाखवतो " असे म्हणणारे पठ्ठे अचानकच हरवल्यागत झाले...जिव्हाळ्याच्या माणसांपासून तुटून तो पठ्ठा सुद्धा सिमेंटच्या जंगलात स्वतःलाच गमावून बसल्यावर इतरांना काय गाव दाखवणार ?  काजव्यांची अंगाई अन् चांदण्याचं पांघरून असणाऱ्या कित्येक रात्री त्याला आठवत असतील ....कुठल्या प्रवासाला तो निघाला हेच त्याला कळत नसतांना तो वास्तवातील दुःख झालर लावून लपवत तर नाही  ना ? .....सुखाचा शोध म्हणजे  काहिसा एकटेपणाने सुरु झालेला जीवनप्रवास तर नसावा ? ....जीवनात सामसूम अन् मनातही ....


      जीवन म्हणजे ऊनसावली मग ऊन कोणती अन् सावली कोणती...नात्यांची कोवळी पालवी जी भर उन्हातही तेव्हा  मनाला उभारी द्यायची ती आता चौकोनी  कुटुंबात ए.सी. मध्ये का देत नाही ?... सार्वजनिक जगण्याचा तो आशय भव्य होता की भावनांचे लालनपालन ? ...तसं बघता आता ऊन लागतच नाही ...जिथेतिथे सावलीच सावली असतांना एकटेपणाचे चटके  का जाणवावे ?  ती चिंच घेऊन येणारी सुमी हरवली की घराचं मागचं दार हरवलं ?   रहमान चाचांना कुणी वेगळं पाडलं ? आजीला वृद्धाश्रमात कुणी ठेवलं ?....नदीतलं पाणी का आटलं ?  सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत गेलो तर आपणच आपले गुन्हेगार ठरू ....स्वप्न आचरायला सुद्धा तितकी कोवळी कुवत लागते ...आपण ती कुवतच गमावून बसलो ...मग गाव कसं नाही हरवणार ?....



           सौ. वर्षा मेंढे

             अमरावती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू