पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

झोका

  झोका


    ताईंनी वाचता वाचता पुस्तक मिटलं अन्  घड्याळ पाहिलं.  मग एकेक पाय हलकेच उचलून त्या बेड वरून उतरल्या.  उभं राहिल्यावर थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं पण मग काही क्षण गेल्यावर ठीक वाटलं. हळूहळू त्या हॉलमध्ये आल्या आणि सोफ्यावर बसल्या.

 बापू फोनवर कोणाशी तरी बोलत होते. शेवटच वाक्य त्यांनी ऐकलं .”हो हो, आजच, आत्ता साडेआठ वाजता. नाही नाही. त्या फोनवर नाही येऊ शकत. त्यांची तब्येत बरी नाही “एवढंच. मग बापूंनी फोन ठेउन दिला. 

 ताईच्या मनात आलंही,” बापूंचं असंच आहे कुणालाही परस्पर कटवायचं.  फोन कोणाचा कुणाला बोलायचं होतं ते काही नाही.  पुन्हा विचारायची सोय नाही.  विचारलं तर म्हणतील,” लोकांचं काय जातं? बसतात गप्पा मारत. नंतर तुला त्रास होतो.आणि पर्यायाने मलाही.”

 जाऊ दे! आता वाद नको. उगीच वातावरण बिघडायला नको.  निदान पुढचा एक तास तरी.


 आज टीव्हीवर त्यांचा मुलाखत वजा कार्यक्रम व्हायचा आहे.रेकॉर्डिंग आधीच झालेलं आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी.


केवढा तो प्रचंड प्रकार! दूरदर्शनचं मोठं युनिट, सर्व तांत्रिक सामुग्रीसह बंगल्यावर आलं होतं. मग घरात, गार्डनमध्ये, पुढच्या भागात, मागच्या भागात, हिरवळीवर, या समोरच्या मोठ्या शिशिरवृक्षाखाली शूटींग होत होतं.

“ ताई तुम्ही आता हा प्रोफाइल द्या हे वाक्य बोलताना. कॅमेरा तुमचा क्लोजअत टिपेल. हं फारच छान!”

 बापू होते ही बरोबर. मधून मधून ते युनिट मधल्या माणसांना विचारत,” अहो किती वेळ चालणार आहे? तिच्या औषधांची वेळ झाली आहे .”

बापूंना कोणी दुरुत्तर करत नव्हतं पण ताईंना उगीच वाटलं कुठेतरी बापूंकडे दुर्लक्ष होत आहे. या मुलाखतीत बापूंचाही समावेश हवा.

“ चालेल की! आपण असं करूया बापू तुम्ही त्यांची औषधं घेऊन या. त्यांना द्या. हा शॉट असाच होईल.  शिवाय एकंदर कार्यक्रमाला सहजतेचा टच पण मिळेल.”

मग पुढचं काही घडायच्या आत ताईच म्हणाल्या, तेही ताबडतोब, पटकन.

“ नको नको असं नको. ते बरोबर दिसणार नाही.” शिवाय बापू आत मध्ये निघून गेले होते. बरीच रात्र झाली होती.चित्रीकरण करायलाच कितीतरी वेळ लागला होता. कॉफी, बिस्किट्स घेऊन सारे परतले. ताई शांतपणे रूम मध्ये आल्या तेव्हा साईड टेबलवर पाण्याचा ग्लास, आणि गोळ्या ठेवलेल्या होत्या. बापू केव्हा झोपले होते.


 आज दूरदर्शन वरून त्याच मुलाखतीचे प्रसारण होतं. बापूंनी राजुला आठवणीचा फोन मगाशीच केला होता.

“ राजू आठवण आहे ना? आज रात्री साडेआठ वाजता ताईची मुलाखत आहे ते विसरू नकोस. राकेश आणि जुईलाही  जवळ घेऊन बसा. त्यांनाही कळते पाहिजे आपली आजी कोण होती ते ?”

बापूंनी टीव्ही ऑन केला आणि ते ताई जवळ येऊन बसले.पुन्हा थोड्या वेळाने उठले  आणि ताईंची शाल घेऊन आले.” तू कंफर्टेबल आहेस ना?”

“ हो मी ठीक आहे.”

 समोरच्या टेबलावर ताईंना लागणार सगळं सामान व्यवस्थित होतं. गरम पाण्याचा थर्मास, ग्लास, स्प्रे, औषधं चमचा सारं काही. 

व्ही.सी. आर.मध्ये  कॅसेट. प्रोग्रॅम रेकॉर्डिंग करून टेप करायचा आणि सुरेखा ला पाठवायचा. मग डेट्रॉईटला सुरेखा— सतीश, त्यांची असंख्य मित्र मंडळी ,सारे प्रोग्राम बघू शकणार. अभिप्राय कळवणार.

 ताई सुखावले.


“…. आणि आता थोड्याच वेळात पाहूया “रंग जीवनाचे”हा कार्यक्रम. आयुष्याची अनेक वर्ष उपेक्षित महिलांसाठी तळमळीने जीवन वेचणार्‍या एका महान स्त्रीला नुकताच शासनाकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला. आमच्या दर्शकांसाठी आज त्यांच्या मुलाखतीचा खास कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. तेव्हां श्रीमती देविका राणी.” ..

ताईंनी ऑफ व्हाईट कलरची, ऑरेंज किनारीची सुरेख तसर सिल्क साडी  घातली होती. गळ्यात मोत्याची माळ. गोरा पान चेहरा, वयाच्या खुणा बाळगूनही टवटवीत ताजा चमकदार.  काहीसे घारे काहीसे तपकिरी मोठे भावपूर्ण डोळे.

 त्या बोलत होत्या,” आनंद तर झालाच पुरस्काराने पण मी फार मोठं काही केलंय असं मला वाटत नाही. शिवाय हा पुरस्कार माझा एकटीचा नाही. यात अनेक वाटेकरी आहेत. खरं म्हणजे हा त्यांचा गौरव आहे.”

“ काम कुठे पूर्ण होतं का? खूप करायचं राहून गेलं आहे. बदलत्या परिस्थितीच्या बदलत्या मागण्या आहेत. आजच्या स्त्रीच्या समस्या वेगळ्या आहेत.”

 मुलाखत पुढे पुढे सरकत होती. रंगत होती. चेहऱ्यावरचे भाव भावना टिपले जात होते. एकातून एक प्रश्न निर्माण होत होते. उत्तरानं वातावरण प्रसन्न हसरे तर काही वेळा करुणही  होत होतं.बघता बघता मध्येच ताईंनी बापूंकडे पाहिलं. ते गढलेले होते, स्तब्धपणे पाहत होते, ऐकत होते. क्षणभर मनात येऊन गेलं,”

 “बापूंशी आपण लग्न का केलं?”

 अवघं अठरा एकोणीस  वर्षांचे वय. तसा आता लांबलचक काळ उलटून गेला. त्यावेळेसचं आता काही तसंच राहिलं नाही. अवतीभवतीची परिस्थिती बदलली.  खरं म्हणजे सारच बदललं. सामाजिक स्तरावरही आणि भावनिक स्तरावरही.  तेव्हाच आता नाही आणि आताच तेव्हा नव्हतं. पण अजूनही खूप वेळा कळत नकळत मनात रेंगाळत असलेला तो काळ झटकन जसाच्या तसा अवतरतो. तो काळ लपेटून घेतो मनाला.

 ताईंना वाटलं, तशी सारी जडणघडणच आपली वेगळी झाली. वडिलांच्या घरात येणारे जाणारे, त्यांचे संवाद, त्यांची भाषा, त्या अनुषंगाने घरात घडणारी शाब्दिक वादळं, भारावून गेलेले ते चेहरे, नव्हे त्यांचे सारे देहच स्फुरण चढल्यासारखे वाटणारे आणि हे अनुभवत असताना आपल्याही चिमुकल्या देहात कळत नकळत बाळगलेली एक ठिणगी.

 बापू असेच याच वाटेवर कार्य करणारे. युवकांचा तो समुदाय, त्यांची जीवन जगण्याची पद्धतीच वेगळी होती. एक सामुदायिक संघटित आणि संपूर्णपणे स्वावलंबी जीवन. खरं म्हणजे ताईंच्या घरात गांधीवादी धोरण, साने गुरुजींच्या शिकवणीचे संस्कार. त्यामानाने या संघटनेतले युवक खूपच वेगळे. ध्येय तेच पण बाणे निराळे. ताई अभावीतपणे  त्यात ओढल्या गेल्या असंच काही नाही पण या वाटेवर बापू भेटले.  त्यांचा उंच, बळकट देह, त्यांच्या राकटपणात जाणवणारी प्रचंड शक्ती आणि ध्येय गाठण्याचा अपार आत्मविश्वास यांनी ताईंना प्रभावित केले. मग त्यांच्याच कार्याचा एक घटक त्याही कधी  बनल्या हे त्यांचे त्यांनाच कळलं नाही. आज त्या दिवसांची केवळ आठवणही  शरीरात एक लहर जाणवूनन देते. त्या ताठ मानेने केलेल्या घोषणा, चेहऱ्यावरचा काहीसा रापट तेज:पुंज  ठिणग्या उडवणारे भाव! दणकट भावनेतून केलेली ती रस्ता आंदोलने, उकडून तिकडून गुप्तपणे नेलेली असंख्य अवजारे, साहित्य कधी प्रकटपणे तर कधी छुपेपणाने. कधी कधी तर दिवसेंदिवस बापूंचा ठाव ठिकाणा  नसायचा. त्यांच्या संघटनेने ठरवलेली काम मात्र होत असायची. बापूंच्या अनुपस्थितीत मन तळमळायचं. काही झालं तर नसेल ना त्यांना? अटक, गोळीबार, अत्याचार आणि त्याही पुढे जाऊन त्यांचं अस्तित्वच जर मिटून गेलं तर ?उरलेल्या संपूर्ण आयुष्याचं काय करायचं? या प्रश्नानं ताईंचं मन खळबळायचं आणि मग अशाच एका भुरभुरणाऱ्या क्षणी बापू धाडकन समोर उभे  ठाकायचे. तसेच राकट, दणकट आणि तरीही कुठेतरी हळुवार भावनेचा ओलावा शिंपडणारे, आधारस्तंभासारखे, आश्वासक.

 पण पुढे काय झाले? तो एक यज्ञ, तो एक होमन., त्या आभाळाला भिडणार्‍या ज्वाला कुणीतरी जणू खाऊनच टाकल्या का? 

 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक राजकीय पार्श्वभूमीच  बदलली. स्वतंत्र भारताची जपलेली अपार आकांक्षा, स्वप्न, मांडलेले आराखडे, एका सुंदर रंगात रेखाटलेलंं स्वच्छ, पवित्र चित्र आणि या मूठभर क्रांतिवीरांची मनं, त्यांची तत्वं, वैचारिक बैठक यांची अपार फारकत झाली. त्यातले काही सामावलेही. पण बापूंसारखे काही पार फेकले गेले. मग त्यांच्यासमोर उभं राहिलं ते एक निरांच वादळ. वेगळीच अस्थिरता. बेचैनी आणि मानसिक तडफड. जणू त्यांच्यासाठी काही उरलच नाही या नव्या जगात, या नव्या वातावरणात. ते बनवून राहिले फक्त एक इतिहासाचा भाग. दूर कोपऱ्यात. आणि हळूहळू तेही पुसत गेलं. वर्तमान हा होता.. एक बायको, दोन लहान मुले, त्यांचे रक्षण त्यांचे भविष्य. उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवण्याची गरज.  बापू त्यात ओढत गेले. कधी अगतिकपणे,कधी तणतणत. वास्तवाच्या भोवऱ्यात झालेली त्यांची गुंतागुंत, कोंडी त्यातूनच ताईला झालेला तो पोटदुखीचाचा चिवट आजार, किरकिरणारी भुकेली मुलं, औषधांचा आवाच्यासवा खर्च.  बापूंची घालमेल पाहून ताई आतून पोखरायच्या. अश्रूंनी मन भिजून जायचं. काहीच  बरोबर नाही, हे सारं अकल्पित आहे, हे आपल्यासाठी नाही, कुठेतरी भरकटतोय, ही वाट आपली नाही.

 गॅलरीत उभं राहिलं की, समोरची झोपडपट्टी दिसायची.  चुलीच्या धुराचे, तर कधी भाजलेल्या भाकरीचे खमंग वास यायचे. उघडी नागडी शेंबडी मुलं, त्यांना कडेवर घेऊन मोडक्या तोडक्या संसाराला सावरणाऱ्या त्या काहीच भविष्य नसलेल्या नव्हे भविष्याचा काही विचार करू न शकणाऱ्या बाया, त्यांचे नवरे, अडाणी  पण रुबाब करणारे, फक्त हक्क जाणणारे, ते बजावणारे, कर्तव्यशून्य असून नुसता जुलुम अत्याचार करणारे. रोज बघायच्या ताई, रोज निरखायच्या आणि मग एक दिवस अचानक त्यांना काहीतरी सापडल्यासारखं वाटलं.

 त्या दिवशी रात्री त्या बापूंना म्हणाल्या,” मी अशी बरी होणार नाही. माझं दुखणं देहाचं नाही, मनाचं आहे. मला माहित आहे, मी स्त्री आहे. संसार, मुलं बाळं, घर हे माझं पहिलं क्षेत्र असायला हवं. पण मी नाही यात रमू शकत आणि आपली जडणघडण वेगळीच आहे ना? आपण काय फक्त यासाठी जन्मलो का? हे तर सारेच करतात. पण हेच जीवन नाही. आनंदच वाटत नाही. काहीतरी वेगळंच मला आतून अनेक धक्के देतय् . उठ म्हणतय्. माझं दुखणं तेच आहे.अशानं मी नाही बरी होणार. मी संपेन,  मिटून जाईन.मला करू दे काहीतरी. माझ्यात काहीतरी आहे ते उमलवू दे मला.”

 बापू काहीच बोलले नाहीत. त्यांनी संमती दिली नाही विरोधही  केला नाही. ते मूक राहिले, शांत राहिले. ताईंचे घारे, काहीसे तपकरी  डोळे नुसतेच वाहत होते. त्यांचे वाहणारे अश्रु  त्यांनी पुसले नाहीत. ते फक्त आत गेले.मुलं भुकेने किरकिरत होती. भांड्यात खिचडी खदखदत होती. बापूंनी पाट मांडले, ताटं लावली आणि त्यांना जेवू घालून शांत केलं.

 भूमिका बदलल्या. इथूनच किनारे बदलले. काहीतरी एकमेकांना बांधून ठेवणारं विरत गेलं कळत नकळत.


 कुठे होतो आपण? एकदम कुणीतरी हलवल्यासारख्या त्या बाहेर आल्या. समोर लांबलचक  हिरवळ पसरली होती. ताई कुठेतरी एकट्याच दूर पाठमोर्‍या उभ्या होत्या. हळुहळु त्या वळल्या. सावकाश शिशीराच्याच्या पारावर बसल्या. विचार मग्न, पण जागृत. 

मुलाखतकार प्रश्न विचारत होता. 

 हे सारं करत असताना तुम्हाला फार मोठी किंमत द्यावी लागली. संघर्षाला, विरोधकांना तोंड द्यावे लागले. हो ना?”

“ हो संघर्ष होतेच, विरोधक तर खूपच होते आणि काय असतं जेव्हा एखादं कार्य आपण सुबकपणे बांधतो ना आणि त्यातून काहीतरी उभं राहतं ना तेव्हा एकीकडे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद तर असतोच पण विरोधकांचा एक लोंढा आपल्या मागे अभावितपणे असतो. कुणीतरी विनाकारण आपल्यापुढे जातंय, आपलं नाव मागे लोटलं जातंय्  ही सामाजिक पोटदुखी असते. मला याचा अनुभव आला आणि समर्थपणे तोंडही द्यावं लागलं.।

 ताई या क्षणी तरी हसून बोलत होत्या.

 मुलाखतकाराच्या चेहऱ्यावरचे आदरयुक्ता कुतुहल मिश्रित, हसरे भाव चमकत होते.काहीशा गंभीर वातावरणातून मुलाखत थोडी बाहेर पडत होती. पण ताईंना मात्र वेगळंच जाणवत होतं. जणू त्या सारं काही पुन्हा अनुभवत होत्या.


 एका मोठ्या मिलच्या कामगारांचे गणवेश शिवण्याचं काम ताईंच्या महिला संघटनेला मिळालं होतं. तशा या साऱ्या महिला काहीशा नव्या, अनुभवाने कमी होत्या पण प्रयत्न  कष्टाने, चिकाटीने जर केलं तर या त्यांचा आर्थिक लाभ किती मोठा आहे हे ताईंनी त्यांना पटवून दिल्यावर त्याही तयार झाल्या. त्यांच्यातला आत्मविश्वास बळावला. कसोटी होतीच .मील मालकाच्या अटी होत्या. त्यांनी दिलेल्या मुदतीत काम संपवायचं होतं नाहीतर पुढची ऑर्डर मिळाली नसती. पण साऱ्यांनी एकजुटीने मनापासून रात्रंदिवस मेहनत करून काम पूर्ण केलं. एक आघाडी तर पार केली पण काहीतरी चुकलंच. अपुरा अनुभव, त्रुटीयुक्त नियोजन, तांत्रिक कौशल्याचा अभाव यामुळे सारे गणवेश दुसऱ्या दिवशी परत आले. काही अरुंद, काही घट्ट, काही सैल तर काही वर खाली. वरून संताप ,चीड शब्दांचा भडीमार. साऱ्या बायका रडू रडू झाल्या. त्यांचं मनोबल  पार कोसळून गेलं, नाहीसच झालं. प्रयत्नपूर्वक, जेमतेम जगवलेलं रोपटं जळून जायला लागलं तेव्हा ताई सर्व  शक्तींनीशी पुढे सरसावल्या. त्या स्वतः मिल मालकांना भेटल्या, त्यांची विनवणी केली, करुणा भाकली.एक संधी मागितली.

 ताईंचा तो बाणा, तळमळ पाहून असेल कदाचित त्यांना वाटलं,”द्यावी यांना एक संधी.”

 नव्या उत्साहाने बाया कामाला लागल्या. झालेल्या चुकांचा नीट अभ्यास केला, सखोलपणे, काटेकोरपणे, पारखून, निरखून, जीव ओतून कामाला सुरुवात झाली आणि यावेळी मात्र यशाने पाठ नाही फिरवली. एखादं युद्धच जिंकल्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवला. पैसे तर मिळालेच पण त्याहीपेक्षा मोलाची कमाई होती ती गमावलेला आत्मविश्वास परत मिळाल्याची. आपणही खूप काहीतरी करू शकतो याची प्रखर जाणीव झाली, खरी कमाई ती होती.

 यातूनच ताई पुढे पुढे चालल्या होत्या.

 ताईंचे कार्यक्षेत्र रुंदावत होते. पसरत होते. अनेक ओळखी वाढत होत्या, संबंध तुटत होते, जुळत हो,ते देणगीदारांचे हात हातात होते आणि विरोधकांचा पाठीवर चाबूक होता. “बाई पक्षाची जागा वापरतात संघटनेच्या नावाखाली तिथे गैरव्यवहार करतात, बाईंना  निवडणूक लढवायची आहे. मतांसाठी त्या हे  करतात,देणगीदारांच्या पैशावर मजा करतात .एक ना अनेक.  या विरोधकांमुळे परवड खूप झाली. अनेक वेळा आमच्या कामाला खीळ बसली, बसलेलो नीट घडी, मांडलेलं बस्तान मोडावं लागायचं. एक सारखी स्थलांतर झाल्यामुळे कार्याची गती मोडायची पण त्यातून मार्गही निघायचे. परत परत मोडलेलं उभं राहायचं. मात्र हे सारं होत असताना घडत असताना ताईंच्या हातून एक किनारा निसटत होता. जाणून बुजून नाही.  नकळत, फक्त नकळत मुद्दाम दुर्लक्ष नव्हतं करायचं त्यांना. त्यांची गरज इथे होते, बाहेरही होती पण या गरजेची वाटणी करताना काहीतरी गणित चुकत होतं. मुद्दाम नाही, नकळत. यासाठी त्या कधी तळमळल्याच नाहीत असे नाही.खूप बेचैनी,ओढाताण त्यांनी यासाठी सोसली होती.


 आठवत होती त्यांना ती धुवाधार पावसाळी संध्याकाळ. पक्षाची महत्त्वाची मीटिंग. निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या होत्या. ताई तशा दूर एका भिंतीपाशी बसल्या होत्या. पाऊस कोसळत होता, ढग गडगडत होते, विजा कडकडत होत्या आणि अचानक समोरच्या खिडकीतून विजेचा एक प्रचंड लोळ तुटलेला ताईंनी पाहिला. त्या अस्वस्थ झाल्या.  त्यांना सभेत काय चाललंय ते ऐकू येईना. त्या सभा सोडून बाहेर आल्या. धडधड जिना उतरत रस्त्यावर आल्या. रिक्षा थांबवली आणि थेट घरी पोहोचल्या. रिक्षावाल्याकडून उरलेले पैसेही घेतले नाहीत. घराचा दरवाजा नुसताच लोटलेला होता. त्यांनी तो धाडकन उघडला. समोरच्या सोफ्यावर लहानसे  राजू आणि सुरेखा बापूंना बिलगून बसले होते. पार भेदरलेले, घाबरलेले अगदी असहाय. या तिघांनी ताईकडे पाहिले पण का कोणी जाणे त्यांच्या नजरेत ताईंना जाणवला तो फक्त परकेपणा. चीड, राग नसेल कदाचित पण निर्विकारपणातही जाणवलं  ते तुटलेपण.ताई पार कळवळल्या.काहीतरी हरवल्याची चाहूल त्यांना चिरून गेली. एक जखम मागे ठेवून. कधीही न भरण्यासाठी.

 त्याही रात्री मुलं झोपल्यावर बापू जवळ आले. म्हणाले, “चल जेऊया.” 

पण ताईंना भूकच नव्हती. खरं म्हणजे आज जिथे ताई होत्या तिथे बापू असायला हवे होते. त्यांची ती क्षमता होती, पात्रता होती. प्रचंड संघटना कौशल्य त्यांच्याजवळ होतं. नेतृत्वाचे अनमोल गुण त्यांच्या अंगी होते. पण का कोण जाणे त्यांची सत्वशीलता प्रामाणिकपणा यांची बदलत्या राजकीय परिस्थितीशी कुठे सांगड घालू शकली नाही. राजकारण आणि समाजकारण यांचा झालेला चिखल त्यांना भावलाच नाही. कुठलाही मध्यम मार्ग त्यांना परवडला नाही. एकतर फार झोकून देणे नाहीतर अलीप्त. यांच्या मधली भूमिका त्यांना पटलीच नाही. पण असं असलं तरीही काही वेळा  ताईंना बापूंची गंमत वाटायची.


ताईंनाही खूप वेळा उद्विग्नता जाणवायची. बाहेरच्या जगात त्यांचं संवेदनाशील मन अनेक वेळा कोंडीत सापडायचं.  कौन्सिलर म्हणून त्या जेव्हा निवडून आल्या तेव्हा नगरपालिकेच्या पहिल्या सभेतच त्यांचा साथीदाराशी वाद झाला होता. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्या पक्षाने जो जाहीरनामा काढला होता त्यात मुख्यत्वाने कामगारांच्या वेतन वाढीचा मुद्दा होता पण आता अधिकाऱ्यांची भाषा बदललेली होती.  वेतन वाढीचा मुद्दा निघाला तेव्हा या साऱ्यांना नगर विकासाच्या कामात येणारा तो अडथळा वाटला.  नगरपालिकेवर आर्थिक बोजा  वाढून परिणामी विकासाच्या गतीला खेळ बसेल असा सूर लागू लागला, तेव्हा मात्र ताई खवळल्या. त्यांच्यामध्ये ती केवळ कामगारांची केलेली दिशाभूल होती, फसवणूक, वचनबभंग होता. मग वेतन आयोगाच्या विरोधात आणि बाजूने जेव्हा सहा सात मतं पडत होती त्यावेळी त्यांनी त्यांच्या एका मताचा उपयोग न्यायासाठी तत्त्वासाठी केला. त्या कुणाच्याही मनधरणीला बळी पडल्या नाहीत.कोणतंही प्रलोभन त्यांना मागे ठेवूच शकलं नाही. परिणामी कामगार वेतन वाढ मंजूर करण्यात आली. कामगारांच्या हक्कांचा विजय झाला. नगरपालिकेच्या मुख्य द्वारापाशी कामगारांचा प्रचंड जमाव आनंदात नाहून निघाला. विजयाचा जल्लोष झाला. त्या गर्दीच्या लोंढ्यात कुठेतरी एका कोपऱ्यातून ताम पाहत होत्या. कामगारांनी अक्षरश: नगराध्यक्षांना डोक्यावर घेतले होते. हार, तुरे, गुलाल यांची उधळण चालली होती.  काही मिनिटापूर्वीच जे अध्यक्ष या आयोगाच्या विरोधात उसळून बोलत होते तेच त्यांच्या स्तुती सुमनांचा वर्षाव मोठ्या शहाजोगपणे अंगावर मिरवत होते. सत्कारार्थी खरं तर ताईच होत्या. ठीक आहे त्याचेही आकर्षण ताईंना नव्हतं पण त्यांना चीड आली ती या अधिकाऱ्यांच्या ढोंगीपणाची. हे मुखवटे ओरबाडून काढावे असे वाटले. त्या संतापल्या,  फणफणल्या तेव्हा मग बापूंनीच त्यांना शांत केलं


“हे बघ! या वरवरच्या  प्रवाहात तू स्वतःला वाहून घेऊच नकोस ना. तुला जे करायचं होतं ते तू केलंस, मिळवलस. आपलं कार्य नेहमी समाजशील आणि धोरणात्मक असावं. जर तू प्रसिद्धीत अडकलीस तर इतरांच्यात आणि तुझ्यात फरक तो काय?”


 बापूंच्या या मोजक्याच बोलण्याने ताईंना किती गारवा मिळाला! त्या थोड्याशा स्तंभितही झाल्या. कुठेतरी बापू आपल्या बाजूने आहेत, आपल्या पाठीशी आहेत, अगदीच विभक्त नाहीत याचा आविष्कार त्यांना मनोमन फुलवून गेला.

 मागे एकदा त्या जेव्हा जेलमध्ये असलेल्या, महिला कायद्यांच्या ॲडव्हायझरी बोर्डावर अध्यक्ष असताना आणि त्यांच्यासाठी काही रचनात्मक कार्यक्रम राबवत असताना त्यांचा भैय्यासाहेब राणे या व्यक्तीशी परिचय झाला. एक दिलदार, व्यक्तिमत्व. एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखं त्यांचं हसणं,  बोलणं सारं दिलखुलास, अगदी मन मोकळं, मनापासून. ताईंना त्यांनी त्यांच्या कार्यात खूप मदत केली. तेथील महिला कैद्यांचा केस रिपोर्ट स्टडी करताना ताईंनी एका गोष्टीची नोंद केली होती. कैदेतल्या   काही महिला या केवळ समाज व्यवस्थेच्या आणि विकृत समाज मनाच्या बळी आहेत. कायद्यान्वये संरक्षण मिळण्यासाठी पुरावे गोळा करता आले नाहीत  म्हणून त्या इथे अडकल्यात. यांच्यासाठी काही केलं पाहिजे. माणूसकीच्या, अनुकंपेच्या मार्गाने यांना न्याय मिळायला हवा. शिवाय त्या दृष्टीने यांच्यासाठी प्रयत्न करणारे कोणी नाही हे कळल्यावर ताईंनी या सर्व केसेस पुन्हा एकदा नीट एकत्रित केल्या. त्यांचा एक रिपोर्ट तयार करून एक मर्सीपिटीशन त्यांनी राज्यपालांकडे सादर केलं.  हे सर्व काम बरेच विस्तृत आणि वेळ खाऊ होतं पण भैया साहेबांनी ताईंना या कामात सुरुवातीपासून मदत केली. एकदा तर ते म्हणाले होते,” तुझे काम इतकं प्रशंसनीय आहे आणि त्याबद्दलची तुझी  तळमळ पाहून तुला मी एक सांगतो, यासाठी तू जे जे मागशील ते मी तुला भाऊबीज म्हणून देईन.”

 आणि खरोखरच भैय्यासाहेबांनी त्यांच्या गरजेची सर्व साहित्य सामुग्री तर उपलब्ध करून दिलीच पण त्या व्यतिरिक्त स्वतःचं खाजगी वाहन, जागाही बिनदिक्कत वापरायला दिल्या. कधीही पाठ फिरवली नाही. पण जसं जसं कार्य अकारू लागले तस तस एक धुरकट वलय जे नकळत त्यांच्या भोवती पसरू लागलं होतं त्यामुळे मात्र ताईंना पार हादरवून सोडलं. खरं म्हणजे चांगल्या बरोबर वाईट, गोड आणि कडू, आनंद आणि तितकंच दुःखही ताईंनी वारंवार अनुभवलं होतं. यातून मिळालेला आनंद मोठा की वेदना मोठी हे ठरवणं सुद्धा कठीण व्हावं असे अनेक प्रसंग ताईनी अनुभवले होते पण भैय्या साहेबांसारख्या सच्चा दिलाच्या माणसाशी झालेल्या मैत्रीमुळे जेव्हा त्यांच्या चारित्र्यावरच चिखल फेक होऊ लागली तेव्हा त्यांना त्यांच्या पायाखालची जमीनच कोणी ओढून घेत आहे असं वाटलं. पण त्याही वेळेस बापू खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

“ हे बघ प्रथम तू एक स्त्री आहेस. त्यातून रूपवान, चतुरही आहेस. मग तुझे विरोधक तुझ्यावर धुळवड करणारच. पण माझा तुझ्यावर विश्वास आहे.”

 पाठीवर मायेचा, विश्वासाचा हात, काजळलेल्या वाटेवर सापडलेला प्रकाश सुखद होता.

 मग हेच बापू असे कधी कधी वेगळे का वाटायचे ?प्रश्न पडावा, संभ्रम निर्माण व्हावा इतका बदल, इतकं त्यांचं रूप का पालटावं?

 कळत होतं त्यांना बापूंवरही फार तणाव आहे, दडपण आहे .खूप वेळा त्यांना वाटायचं त्या मात्र एका विशाल जनसमुदायाचा मुकुटमणी झालेत तेवढेच बापू विजनवासी होत चाललेत पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे ते तडफडत आहेत त्यांचं शांत बसणं, शांत वाटणं हे खरं नाही. आत मध्ये ज्वालामुखी खदखदतोय. तो कधी बाहेर यायचा अगदी वेडा वाकडा विकृत स्वरूपात.

 मग त्यांचं बोलणं ताईनं फक्त बरळणं वाटायचं. ते म्हणायचे ,”हो ग बाई आज जे काही दोन पैसे कमावतोय ना  ती तुझीच कृपा हो! तुझ्या सौजन्यानेच माझा उद्योग चाललाय बाई .माझं स्वतःचा काही आहे का? जे काही आहे ते सारंचच तुझं. तुझ्यामुळे. अगं मला काही निराळे अस्तित्व आहे का? “यशस्वी कर्तृत्ववान स्त्रीचा भाग्यवान नवरा—” काय छान शीर्षक आहे ना माझ्या माथ्यावर? ताईंना बापूंचे बोलणं इतकं ओंगळ वाटायचं! बुरसटलेलं, अहंकाराने बरबटलेलं, कुत्सित गलिच्छ.   ज्याच्यावर  आपण प्रेम केलं तो हा नाहीच. हा कुणीतरी वेगळाच. तो राकट, दणकट अश्वासक होता. आज बापूंच्या मागे अहंकाराच्या प्रवाहातून वाहत वाहत येणारी लाचारपणाची काहीशी  अपमानित भावना त्यांच्या मनातल्या बापूंच्या प्रतिमेला विरघळवून टाकत होती नव्हे त्या अस्तित्वालाच नाहीसं करत होती. एकेकाळचे ते धडाडीचे अंगार ओकणारे आणि गारवाही देणारे भावपूर्ण डोळे कसे मावळून गेलेत! त्या क्षणी ताईंना खूप वेदना झाल्या. त्यांना वाटते की बापूंना समजवावं अहो हे यश अखेर तुमचंच आहे, तुमच्या प्रेरणेचे आहे. हे बघा हे सारं सगळंच्या सगळं मी तुम्हाला बहाल करते.”

 पण नाही. किनारे आता दूर सरकले होते. तो एक असा क्षण होता. ती एक अशी वेळ होती की मागे वळणं आता कुणालाच शक्य नव्हतं.  एकेकाच्या प्रतिमा घट्ट झालेल्या होत्या ,त्या प्रतीमेच्या साच्यामध्ये खूप काही सुंदर कोमल, निरागस, जपलेलं प्रेम काव्य, दोघांनी मिळून बांधायचं मोठं आभाळच गुदमरुन गेलं होतं.इथून परतीची वाट नव्हती. घटना घडत होत्या. अविरत. काही आनंदाच्या तर काही धक्का देणार्‍या. 


 लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली पण त्यातही राजकारणाचा निराळाच रंग त्यांना अनुभवायला मिळाला. वास्तविक ताईंना भरभक्कम प्रशंसनीय कामगिरीची लांबलचक पार्श्वभूमी होती पण उमेदवारी देताना त्यांना त्यांच्या मतदारसंघातून दूर काढलेलं होतं. तिथं दुसरीच व्यक्ती होती आणि संपूर्णपणे नव्या मतदारसंघातून ताईंना निवडणूक लढावी लागणार होती. तशी ताईंची महिला आघाडी बळकट होती. त्यांनी निवडणूक प्रचारात ताईला भरपूर मदत केली. कसलीही कसर ठेवली नाही. पण राजकारणातली गणितच वेगळी असतात. तिथले हिशोब निराळे जातीयता धार्मिकता या साऱ्यांच्या चौकटीवर उभे राहिलेली ही एक फसवी यंत्रणा आहे हे ताईंच्या चांगलेच लक्षात आलेलं होतं.  वेळोवेळी त्यांनी याचा अनुभव घेतला होता. या निवडणुकीत ताईंचा पराभव होणार हे ठरलेलं होतं. 

त्यानंतर मात्र त्यांनी एक निर्णय घेतलाच. त्यांच्या नावावर अनेक महिला संस्थांचा कारभार चालू होता. खरं म्हणजे त्याच या संस्थांचा आधारवड होत्या. कणा होत्या. पण आता त्यांनी निवृत्त व्हायचं ठरवलं. प्राथमिक स्वरूपाचं जे जे काही कार्य होतं ते त्यांनी त्यांच्यासाठी केलेलेच होतं पण आता संस्थांना त्यांची गरज नव्हती. नव्या दमाचे, नव्या विचारांचे कार्यकर्ते तयार होत होते ते नव्हे ते व्हायलाच हवे होते. ताईंनी त्यांची निवृत्ती जाहीर केली तेव्हा विरोध झालाच नाही असे नाही पण विरोधाला धार नव्हती याची त्यांना जाणीव झाली. त्याचेही त्यांना काही वाटलं नाही. निरोप समारंभाच्या वेळी मात्र त्या आवर्जून म्हणाल्या 

“या संस्था म्हणजे माझ्या कन्या आहेत. या प्रसुती वेदना मी कधीही विसरू शकणार नाही.  पण आता या कन्या मोठ्या झाल्यात. सबळ झाल्यात, स्वयंपूर्ण झाल्यात. आता मला फक्त त्यांच्या मागे उभे राहायचे आहे. फक्त मनाने संवेदनेने त्यांच्या पाठीवर माझा सदैव आशीर्वादाचाच हात राहील.”


 त्या भारावलेल्या वातावरणात ताई काहीशा बधीर  तरी हलक्या मोकळ्या निराकार अवस्थेत घरी परतल्या. घराचे दार उघडून त्या घरात शिरल्या आणि त्यांना त्या क्षणी जाणवलं ते ही वेगळच.

“ हे घरही  आता किती मोठे झाले? कसं नवीन, वेगळं परक वाटत आहे. आपण बांधायला घेतलेलं घर आणि आपल्या पाशु असलेले घर किती निराळे, वेगळळे, परके! अरेच्चा या घरालाही आता आपली गरज उरलेली नाही. तिथली मोठी गडबडणारी किर किरणारी पावले आता दमदार झाली आहेत. स्वयंपूर्ण, समर्थ. आता कोणीच आपल्यासाठी इथे थांबलेलं नाही, कोणीच नाही आपली वाट पाहत बसलेलं. मग ताईंनी घरभर फिरून साऱ्या भिंतींना स्पर्श केला. थंडगार जमिनीवर त्यांनी त्यांचे ओठ टेकले. मुसमुसुन एक लोंढा वाहत होता. त्या गोंधळलेल्या मनस्थितीतही एक ओळखीचा स्पर्श जाणवला.

         बापू होते ते. 

त्यांनी त्यांच्या राकट हातात ताईंना लपेटून घेतलं. एवढेच म्हणाले ,”चल आत. थकली आहेस तू.”


मुलाखत शेवटच्या टप्प्यावर होती.

“ आता फक्त एकच प्रश्न. थोडासा वैयक्तिक. विचारू का?”

“ हो विचारा णाना?”

“ताई ज्या नावाने तुम्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहात त्याच नावाने संबोधतो आता.  चालेल ना?”

“ हो चालेल की.”

“ ताई! खरोखरच तुमचे कार्य भारी आहे. थोर आहे.  पण मग साहजिकच प्रश्न येतोच की हे एवढं सगळं करत असताना तुमचं वैवाहिक जीवन पणालाच लागलं असेल नाही का ?”

ताई हसल्या. त्यांचा वृद्ध, काहीसा  सुरकुतलेला पण तरीही ताजा कमळासारखा चेहरा किंचित डुलला. मग लगेच त्या म्हणाल्या,” तुम्हाला मी सांगते ,स्त्री कितीही मोठी होऊ दे पण घर हे तिचं पहिलं प्राधान्य असतं. तिचं कार्यच  घरापासून सुरु होतं.मला सांगायला अभिमान वाटतो की मी दोन्ही आघाड्या ताकदीने सांभाळू शकले .अर्थात यात माझ्या जोडीदाराचाही सक्रिय सहभाग आहेच हे मी कदापिही नाकारत नाही.”

 मुलाखत ऐकत असताना ताईंनी मात्र त्या क्षणी बापूंकडे  पाहण्याचं  प्रयत्नपूर्वक टाळलं. पण कोणी काही म्हणो, ताईंनी निर्धाराने यातही संदिग्धपणे बापूंचा अहंकार जपण्याचा प्रयत्न केला.  त्याचा अर्थ कोणी काही लावू दे.ताई मात्र स्थिर होत्या. त्यांना जाणवत होतं, मुलाखतीत आलं ते सारं काही उघड्या पुस्तकातलं नव्हतं. मिटलेली अनेक पा त्यांनी मनातल्या मनात तशीच मिटवून ठेवलेली होती.  

  “आता हा समारोपाचा प्रश्न. आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? विशेषतः आज सारच समाजकारण बरबटलेलं असताना, गढुळलेलं असताना?”

“काय देऊ संदेश?”

 या ठिकाणी ताई सुरेख हसल्या.

“ एवढेच म्हणेन, भोवतालची परिस्थिती चिंताजनक नक्कीच आहे. काय होणार याची परिणिती? ही मोठी समस्या आहेच तरी वाटतं प्रत्येकाजवळ एक समाजशील मन असावं. संवेदना असावी. आणि त्याचा कल हा धोरणात्मक, रचनात्मक, स्वायत्त, निरपेक्ष काम करण्याकडे असावा. म्हणजे  खूप काही बदलू शकेल. शेवटी जीवन म्हणजे काय अळवा वरचं पाणी. सारे क्षण घरंगळत  असतात.   त्यातला एखाद्या तरी क्रियाशीलतेने आपण पकडून ठेवू शकलो तर खूप काही मिळवलं नाही का?”


“ताई प्रकृती अस्वास्थ्य असतानाही आमच्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात,छान मार्गदर्शन केलेत …खूप खूप धन्यवाद. आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो!” 

“ धन्यवाद” 

मग पुढचा सारा औपचारीकपणा सांभाळत कार्यक्रम संपला. त्याचा इम्पॅक्ट ही जाणवला. रिमोट हातात असतानाही बापूंनी टीव्ही जवळ जाऊन तो बंद केला या वयात, या क्षणी, या मानसिकतेतही ताईंनी बापूंच्या या विनोदाची नोंद घेतली. बापू पुन्हा ताई जवळ येऊन बसले आणि म्हणाले.

“ चांगली झाली मुलाखत. लोकांना नक्कीच आवडेल.

 तेवढ्यात फोन वाजला फोन राजूचाच होता. तो नुसता उसळूनन बोलत होता.

“ ग्रेट! वंडरफुल. बाकी ताई तू म्हणजे ग्रेटच आहेस!काय सुरेख बोलत होतीस! आणि किती देखणी दिसतेस ग! अभिनंदन! पुन्हा पुन्हा अभिनंदन!

 ताई आनंदल्य.

एवढ्यात राजू काहीसा गंभीरपणे म्हणाला,” ताई आज मला तुझा हिरमोड नाही ग करायचा. पण एक बोलू का? राहवत नाही म्हणून. तू रागावणार नाहीस ना?”

“ नाही रे! बोल. बोल तुला काय बोलायचं ते?”

“ ताई तू आहेसच ग्रेट. नाही कुठे म्हणतोय आम्ही पण या क्षणी मला एवढंच वाटतंय कृतज्ञता व्यक्त करायचीच असेल तर ती बापूं जवळ. तू आमच्यापासून दूरच राहिलीस. नेहमीच. आम्हाला मात्र तू आपली कधीच नाही वाटलीस. आमच्या जवळ असायचे ते बापूच. बाहेरच्यांची तू माय होतीस ग पण आमची नाही. आमची ‘माय” बापूच.”

 राजूने फोन ठेवूनच दिला.

“ अरे मला नाही रे वाईट वाटलं .राग पण नाही आला. खरं म्हणजे मलाही हेच म्हणायचंय्. अगदी आतून ,मनातून.”

 मागे एकदा सुरेखाने हाच प्रश्न टाकला होता.

“ तू आमच्यासाठी काय केलंस गं ?कित्येक गोंधळलेल्या,हुरहुरीच्या क्षणी, नाजूक कोमल क्षणी, जेव्हा आई म्हणून तुझी गरज वाटायची तेव्हा तू कधीच नसायचीस. पण बापूंचा खूप आधार वाटायचा. काय कामाचं तुझे मोठेपण? तुझ्या या मोठेपणापायी आम्ही काय काय सोसले आहे ठाऊक आहे  तुला?

 खरंच ताई हे अंतर कधीतरी पार करू शकणार होत्या का? त्यांनी चष्मा उतरवला डोळे शिणले होते. स्वतःचाच हात त्यांनी हलकेच डोळ्यावर फिरवला.  ग्लासातलं घोटभर पाणी प्यायल्या.अस्पष्टपणे बोलल्या,

 “बापू ?”

“काही हवय का तुला ?”

“नको पण तुम्ही कुठे निघालात?”

“ अगं माझ्या अंदाजाप्रमाणे तुला फोन तर एकापाठोपाठ  एक येतीलच पण प्रत्यक्ष भेटायला सुद्धा बरेच येतील. लोकांचा तसा काही भरोसा नसतो. एक भावना वेग असतो. मी काहीतरी घेऊन येतो. आईस्क्रीम, वेफर्स आणखी काही फराळाचं वगैरे.”

 मग ताई निर्धाराने म्हणाल्या,

“ तो फोन काढून ठेवा आणि तुम्ही कुठे जाऊ नका. इथेच बसा माझ्याजवळ. कोणीही नको यायला आता. या लोकांपासून दूर, निराळे, फक्त तुमच्याजवळ.  खूप काही सांगायचं राहून गेलय्. खूप काही बोलायचय्.”

 शब्दांची फुंकर घालण्याआधी क्षणात पाखरू उडून गेलं. ओंजळभर वेचल्या फुलातला गंध इथेच राहून गेला. वडाखाली पारंब्यावर एक झोका बांधायचा राहून गेलाय् बापू…


 राधिका भांडारकर पुणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू