पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

साल २०२३ माझ्यासाठी

             साल २०२३ माझ्यासाठी

 

वर्ष सरता सरता आयुष्यही सरत असते. म्हणतात की भूतकाळात डोकावून पाहू नये आणि भविष्याचा विचार करू नये. वर्तमानात जगावे. बरोबर आहे. आपण वर्तमानातच जगत असतो. पण ते जगणे चालू असतना आपलं चंचल मन आपल्याला थोडचं स्वथ बसू देत? ते आपल्या बुद्धीला पटत नसलं तरी आपल्याला भूतकाळात मागे खेचत असतं. कारण भूतकाळाचे पडसाद भविष्यावर पडत असतात ना! माझ्या मनात भूतकाळातील बऱ्याच गोष्टी पिंगा घालत असतात. बघा ना, आज ३१ डिसेंबर म्हणलं की २०२३ सालचा हिशेब मनात सुरु झाला. हिशेब शब्द चुकलाच खरा! आयुष्यातील गमावलेल्या, मिळालेल्या संधीचे, समर्पणाचे क्षण याचं थोडचं गणित मांडता येत? बरोबर अनुभवाची शिदारी जमा होत गेली एवढचं मी म्हणेन.

 माझी २०२३ सालची सुरुवात तरी छान झाली. माझं शॉपीझन वर ‘दृष्टीकोन सकारात्मक विचारांचा’ हे सकारात्मक कथांच सदर दर बुधवारी सुरू झालं आणि ते जून अखेर संपवलं. त्याला भरभरून प्रतिसाद लाभला. माझ्या खुप साऱ्या सख्या दर बुधवारची वाट पहात असायच्या. सारखे प्रतिसादाचे फोन येत राहायचे. ही माणसांची संपत्ती खुप मिळाली. मला जर मुठभर मास जास्तच चढलं. पण सगळे दिवस सारखे नसतात. ह्यासाठी सुद्धा आपल्या मनाची तयारी हवी. मी सर्व कथा आपल्या शॉपीझनच्या मराठी विभाग प्रमुख ऋचा ताईना जूनच्या अठरा तारखेलाच सुपूर्द केल्या. ऋचा ताईचा कामाचा झपाटा जोरदार, त्यांनी त्याआधीच आपण ह्याचं पुस्तक प्रकाशित करू म्हणून मला सांगितलं. आणि ऋजुता देशमुख ताईनी सुद्धा लगेच एका दिवसात तातडीने प्रस्तावना लिहून दिली. आणि २१ जून २०२३ ला माझ ‘दृष्टीकोन सकारात्मक विचारांचा’ हे पुस्तक ऋचा कर्पे ताईंनी प्रकाशित सुद्धा केलं. त्या आधी १३ जूनला माझी ‘भुरळ’ ही कादंबरी शॉपीझन तर्फे प्रकाशित झाली होतीच.

 २१ जूनला माझ्या पोटात खुप दुखत होतं. मी झोपूनच ऋचा ताईंशी फोनवर बोलत राहिले. आदल्या दिवशी मला युरीनल इन्फेक्शनचा त्रास टेस्ट मध्ये दिसून आला होता. २२ जूनला मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. तेव्हा इन्फेक्शन पोटापर्यंत गेल्याचं पुढील टेस्ट मध्ये समजलं.  आणि त्यातून  Sevier  gastritis निष्पन्न झाला. मधुमेहाची आणि पोटाची पथ्ये पाळताना सात किलोने वजन कमी झालं. नंतर अशक्तपणाला तोंड द्यावं लागलं. त्यातून पुढे बी. पी. ने डोकं वर काढलं. पंधरा वीस दिवस रोज संध्याकाळी बी.पी. वाढून १९०च्या पुढे जायचं आणि त्याचा ताण मानेच्या आणि खांद्याच्या स्नायूवर येत गेला. त्यात शुगर सुद्धा साथ देत नव्हती. खांद्याचे आणि पाठीचे स्नायू विक झाल्यामुळे फ़िजिओथेरपि सुरु करावी लागली. ह्या सगळ्या त्रासातून जात असताना चार महिने एकदम मेंदूत एकप्रकारचा ब्लॉक निर्माण झाला. मला एकही कल्पना लेखनासाठी सुचत नव्हती. साध्या चारोळी सुद्धा सुचत नव्हत्या. ह्या सगळ्याच अतोनात दु:ख होत होतं. मी स्वत: डिप्रेशनमध्ये गेले. त्यात आजूबाजूच्या बऱ्याच नातेवाईकांनी माझ्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. असं वाटत होत, आपण आपल्या लेखनातून इतरांना सकारात्मक दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला. पण स्वत:ला सावरू शकत नव्हते. घरातले मला मनोरुग्ण तज्ञा कडे जाण्याचा सल्ला देऊ लागले. मी औषधांच्या बरोबरच रोज जप सुद्धा करत होते. श्रीरामाचे नाम घेत होते. त्याला मनातून म्हणत होते,

“बाबा रे तू विष्णूचा अवतार होतास म्हणून वनवास सहन केलास. पण आमच्या सारख्या सामान्य माणसांना पेलेल एवढंच दु:ख देत जा. फक्त मीच नाही तर इतर लोकांना सुद्धा जास्त दु:ख देत जाऊ नकोस.”  अशातच माझ्या एक परिचित जेष्ठ लेखिका मंदा ताई नाईक यांचा फोन आला. त्यांना नेहमी मी माझ पुस्तक प्रकाशित झालं की आवर्जून भेट देत असते. त्यांनी मला फोनवर सांगीतलं,

“जयू मी तुझ्या कथा आमच्या जेष्ठ नागरीक कट्ट्यावर वाचून दाखवत आहे. आणि सर्वांनी तुला कथा सुंदर असल्याचा अभिप्राय द्यायला सांगितला आहे. एवढंच नाही तर मी माझ्या एका अंथरुणाला खिळलेल्या मैत्रिणीला तुझ्या दृष्टीकोन सकारात्मक विचारांचा पुस्तकातील कथा फोनवर रोज वाचून दाखवत आहे. आणि तिला त्यामुळे बरे वाटत आहे. तुझ्या पुस्तकाची लोक मागणी करत आहेत. तर मला पाच कॉपी दे.”  मग मात्र माझ्या मनाने उचल घेतली. शरीर साथ देवो अथवा न देवो आपण मनाने खंबीर झालचं पाहिजे. आणि आपण स्वत:ला ह्या सर्वातून उभं केलं पाहिजे, आपले जे काही थोडेफार वाचक आहेत त्यांना आपल्या लेखनातून आनंद दिला पाहिजे असा मनाशी ठाम निश्चय केला. दसऱ्याच्या आसपास अमेरिकेतून आलेले माझे मुलगा, सून नातू परत जायला निघाले. मुलाला माझी खुप काळजी वाटत होती. पण मी निग्रहाने त्याला सांगितले,

“ तू बिनधास्त तुझ्या वाटेने जा. मी आता मनाने आणि शरीराने सुदृढ होत आहे. माझी काळजी करू नकोस. मला मिरजेच्या नवरत्न संस्थेचा जाहीर झालेला पुरस्कार घेण्यासाठी मी मिरजेला जाणार आहे. त्यानंतर कराडला सुद्धा मराठी साहित्य मंडळाचा पुरस्कार घेण्यासाठी जाणार आहे.” मी सर्वातून बाहेर पडत आहे हे पाहून सर्वांना बरे वाटत होते. मी मुलाला डोळ्यातून पाणी न काढता हसत हसत निरोप दिला. त्यानंतर मी दसऱ्याच्या दुसरे दिवशी २५ ऑक्टोबरला मिरजेला आणि २९ ऑक्टोबरला कराडला जाऊन आले. त्यानंतर मी हातात पेन घेतले आणि उत्साहाने “भित्याच्या पाठी...  ही कथा दोन दिवसात लिहून पूर्ण केली. मी माझा गेलेला आत्मविश्वास परत मिळवला. स्वत:च्या मनाला स्वत:च उभारी देत. त्यांनतर लेखन बंद असताना मी दोन लेखकांची  पुस्तके वाचली होती. त्याचं परीक्षण त्यांना लिहून दिले. मी लिहती झाले याचा आनंदोत्सव मीच दीपोत्सवा बरोबर साजरा केला. अजूनही माझी फ़िजिओथेरपि चालू आहेच. पाठीच्या दुखण्यातून बाहेर पडत आहे.

  ह्या सात आठ दिवसात आपल्या ऋचा ताईंचा रोज मेसेज येत होता. सरत्या सालाला निरोप देण्यासाठी एखादी कथा लिहा. मग म्हणलं आपलाच अनुभव कथन करावा. जून २०२३ ते डिसेंबर २०२३ सदोदित दुखणी पाठीमागे लागली आहेत. पण मी त्यांना पुरून उरण्याचा निर्णय घेतला आहे. सगळेच दिवस सारखे नसतात. आयुष्यात खडतर वळणांना तोंड द्यावच लागत. ह्या आधी पण मी खुप मानसिक आणि शारिरीक संकटांना सामोरी गेले आहे. पण का कुणास ठाऊक ह्या कालावधीत मनाने खुप खचले होते. बरोबर आपली माणसे असतात पण आपणच स्वत:ला सावरायचं असतं. मनात उमेद ठेवून आयुष्याचा लढा द्यायचा असतो हे मला नव्याने प्रत्ययाला आले.

 *****************************************

 

जयश्री देशकुलकर्णी

कोथरूड ,पुणे -३८

मो. ९४२३५६९१९९      

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू