पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भित्या पाठी ......

             भित्या पाठी ........

 

“ बाळा तालुक्याच्या गावाला चालला आहेस. इथे जसा नीट अभ्यास करत होतास तसाच तिथे पण कर आपल्या घराण्याच नाव काढ.”

“ हो आई, तू अजिबात काळजी करू नकोस. इथं जसा दहावीला शाळेत पहिला आलो तसाच तिथे पण येऊन दाखवीन. तू माझ्यासाठी एवढं अण्णांच्या मनाविरूद्ध जाऊन मला तालुक्याला शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतलास, तेव्हा तुझ्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणारं.”

निर्मला ताईंनी सोमनाथच्या गालावरून प्रेमाने हात फिरविला. आणि हाताची बोटे मोडीत म्हणाल्या, “बघ कशी बोटे कडाकड मोडली. आईचं प्रेम कळायचं नाही बाबा तुला. रोज सकाळच्या एस. टी. बरोबर जेवणाचा डबा पाठवत जाईन. वेळच्या वेळी जेवत जा आणि अभ्यास करीत जा. पदवी घेऊन नोकरीला लागलास की सारं भरून पावलं बघ मला. आणि कुठल्याही गोष्टीला किंवा माणसांना घाबरत जाऊ नकोस. घाबरट माणसांचा लोक फायदा घेतात.”

घरच्या गरीब परिस्थितीने सोमनाथला अकाली प्रौढ बनवलं होतं. सोमनाथ हुशार होता तरी अण्णा म्हणजे त्याचे वडील त्याला शिक्षणासाठी तालुक्याला पाठवायला तयार नव्हते. त्याने घरच्या शेतीत लक्ष घालावे, आपल्याला मदत करत इथेच रहावे असे त्यांना वाटत होते. आणि मनात चिंता पण होती. पोरगं घाबरट आहे. त्यामुळे कसा निभाव लागेल असं वाटत होतं. पण निर्मला ताईंनी मुलाला पुढे शिकवण्याचा हट्ट धरला. त्यापुढे अण्णांचे काही चालले नाही.

   सोमनाथला एस. टी. ला सोडायला अण्णा, निर्मला ताई, सोमनाथची धाकटी बहिण समिधा सगळे आले होते. निर्मला ताईंचे डोळे भरून आले होते. एस.टी. सुटली तरी किती तरी वेळ ती दिसेनाशी होई पर्यंत त्या पहात राहिल्या.

  सोमनाथने कॉलेजमध्ये सायन्स साईडला प्रवेश घेतला. कॉलेज सुरू होऊन महिना झाला होता. पण सोमनाथचे कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याचे नक्की होत नव्हते. शेवटी अण्णा हो म्हणेपर्यंत बराच वेळ गेला. त्यामुळे त्याचा एक महिना वाया गेला. कॉलेजचे हॉस्टेल सुद्धा फुल झाले होते. त्याला तिथं रहावयास जागा मिळाली नाही. कॉलेजचा प्यून हणमंताने सोमनाथला एका पडक्या वाड्यातली जागा दाखवली. तिथे एक आजीबाई एकट्याच रहात होत्या. वाड्यात माडीवर दोन खोल्या मोकळ्या होत्या. त्यातली एक खोली आजीबाईनी सोमनाथला दिली. “ “पोरा गरीब परिस्थिती आहे ना तुझी, तेव्हा भाडं देऊ नकोस. तसाच रहा मला पण सोबत होईल” असं आजी म्हणाल्या. सोमनाथला आनंदच झाला.

 सकाळपासूनचा प्रवास, नंतर कॉलेज प्रवेशाची घाई गडबड, कॉलेजचा अभ्यास या सगळ्यामुळे थकून गेलेल्या सोमनाथला रात्री वळकटी वर पाठ टेकल्या टेकल्या झोप लागली. रात्री साडेबाराच्या सुमारास त्याला जाग आली तेव्हा त्याच्या अंथरुणा शेजारी कोणीतरी बसून त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत आहे असं दिसलं. खिडकीतून चंद्राची किरणे खोलीत डोकावत होती. त्याच्या प्रकाशात त्याला दिसत होते. तो एक पांढरेशुभ्र धोतर नेसलेला, डोक्याला शेंडी राखलेला, अंगात पांढरी बंडी परिधान केलेला, कपाळावर मोसंबीच्या फोडी सारखं गंध रेखलेला ब्राह्मण वाटत होता. त्याला पाहून दचकून सोमनाथ अंथरुणावर उठून बसला. त्याने विचारलं,

“ काका तुम्ही कोण? इथं कसे आलात? आणि हे काय करत आहात?” तेव्हा त्या ब्राह्मणाने उत्तर दिले,

“ मी तर इथेच राहतो. माझे नाव गोपीचंद! घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. पण माझी एक अट आहे. इथं व्यवस्थित रहायचं असेल तर मी तुला रोज वेद शास्त्र, पुराण, स्तोत्र सारं शिकवेन ते मुकाट्‍याने शिकायचं. नाही तर मी तुला इथे राहू देणार नाही.” त्यावर सोमनाथ म्हणाला,

“काका कॉलेजचा अभ्यास करून हे सर्व मला कसे झेपणार? आणि वेळ केव्हा मिळणार?”

“ मी तुला रोज रात्री बारा ते दोन पर्यंत शिकवत जाईन. नंतर तू गाढ झोपत जा.” सोमनाथ म्हणाला,

“ काका रोज रात्री बारा ते दोन कसं शक्य आहे? मी अभ्यास करून रात्री अकरा वाजता झोपणार, सकाळी सातला उठून माझे आवरणार. तेव्हा सगळं अवघड वाटतं. आणि जे माझं ध्येय नाही, ते शिकून काय उपयोग?”

“तुला शिकावं लागेल. पुढे तुला त्याचा उपयोग होईल. तुझा कॉलेजचा अभ्यास सुद्धा मी सोपा करून देईन. फक्त कुणापाशी काही बोलायचं नाही. कुठे वाच्यता करशील तर प्राणाला मुकशील. नाही तर माझ्या प्रेमाच्या सावलीत शांत जगशील.”

 सोमनाथला तिथं राहण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता. त्याने सगळं मुकाट्‍याने मान्य केलं. गोपीचंद काकांची परवानगी घेऊन त्याने डोक्यावरून पांघरूण ओढून घेतलं आणि शांत झोपी गेला. सकाळी उठल्यावर पाहिलं तर गोपीचंद काका तिथं नव्हते. त्याला गडबड होती. त्याने विचार केला संध्याकाळी भेट झाल्यावर त्यांच्याशी निवांत बोलू. त्याने त्याचे काम आवरले आणि आजीबाईंचा निरोप घेऊन बाहेर पडला.

सोमनाथ दुपारी चार वाजता वाड्यात परत येत होता. तो खोलीवर जाणार तेवढ्यात आजीबाईंनी त्याला हटकलं.

“ का रे सोमनाथ जेवणाचा डबा गावाहून येतो का?” सोमनाथने मान हलवली.

“ अरे मी म्हणते, मी माझ्यासाठी स्वयंपाक करतच असते. त्याबरोबर तुझा पण करेन. माझ्या इथेच जेवत जा. तू मला तुला परवडतील एवढे पैसे देत जा. मलाही एका विद्यार्थ्याला जेवू घालण्याचे पुण्य मिळेल.”

सोमनाथच्या मनात संकोच होता. नाही हो करत तो शेवटी आजीबाईंच्या कडे जेवावयास तयार झाला. त्याला त्याच्यावर प्रेम करणारी त्याची आजी आठवली आणि आजीबाईंना नाही म्हणवलं नाही. आणि अशारितीने  सोमनाथची राहण्याची आणि जेवणा खाणाची छान व्यवस्था झाली. पण! गोपीचंद  काकाचं काय करायचं ते त्याला समजत नव्हते. तो एक प्रश्न त्याला सतावत होता.

  रात्रीचं जेवण आणि कॉलेजचा अभ्यास उरकून साडेदहा वाजता सोमनाथ झोपी गेला. बरोबर रात्री साडेबाराच्या सुमारास गोपीचंद काकांनी त्याला जागे केले. म्हणाले,

“ चल आज पासून तुझी शिकवणी सुरू. मी प्रथम तुला सर्व स्तोत्रे शिकवीन.”

“ काका पण मी कॉलेजमध्ये उशीरा प्रवेश घेतल्यामुळे माझा बुडलेला अभ्यास मला भरून काढायचा आहे. मी इतरांच्या वह्या आणून नोट्स काढत आहे. ते सर्व पूर्ण झाल्यावर आपण वेदांचा अभ्यास सुरू केला तर!” गोपीचंद काकांनी त्याच्या कडे रागाने पाहिले. म्हणाले,

“ माझ्याजवळ वेळ कमी आहे. मी तुझे काम केले आहे. तुझ्या वह्या तपास, त्यात नोट्स काढून ठेवल्या आहेत. मी तुझी एवढी काळजी घेत आहे म्हणल्यावर मला उलट प्रश्न करायचे नाहीत. वेळ येईल तेव्हा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. त्यामुळे आता तू एकपाठी झाला आहेस. तुझा कॉलेजचा अभ्यास आणि वेदांचा अभ्यास बरोबर साधला जाईल. जास्त कोड्यात पडू नकोस. निर्धास्तपणे इथे रहा.”

सोमनाथने उलट प्रश्न केला नाही. पण मनातून थोडं घाबरतच त्याने त्या दिवशी अथर्वशीर्ष शिकायला प्रारंभ केला. पाठ झाल्यावर त्या रात्री दोन वाजता तो झोपला. छान शांत झोप लागली. दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे त्याला सकाळी जाग  आली. तो स्वत:च आवरून कॉलेजला गेला. त्याच्या वह्या मध्ये आत्ता पर्यंत कॉलेज मध्ये जे काही शिकवले गेले त्याच्या व्यवस्थित मुद्देसुद नोट्स तयार होत्या. अभ्यासामध्ये तो आता कॉलेजच्या इतर मुलांच्या बरोबर होता. त्याच्या ग्रहण क्षमतेची आणि स्मरणशक्तीची कॉलेजमधील प्राध्यापक वाहवा करत होते. वाड्याच्या आजीबाईंच्या मुळे त्याला रोज ताजे, गरम, सुग्रास भोजन मिळत होते. त्याची तब्येत पण आता सुधारत होती. कॉलेजची पहिली सेमिस्टर झाली. त्यात सोमनाथ वर्गात पहिला आला. हणमंताने उगाच आपली फुशारकी मारली. मीच सोमनाथच सगळं मार्गी लावून दिलं म्हणून तो अभ्यास करू शकला.

  दिवाळीच्या सुट्टीला गोपीचंद काकांची परवानगी घेऊन फक्त चार दिवसांच्या साठी तो गावी जाऊन आला. सोमनाथच सगळं व्यवस्थित चालेल पाहून निर्मला ताईंना आणि अण्णांना बरं वाटलं. ह्यावेळी दिवाळीत सोमनाथने घरच्या देवांची साग्रसंगीत पूजा केली. तेव्हा अण्णांनी आश्चर्याने सोमनाथला विचारले,

“ हे तू कुठे शिकलास?” तेव्हा तो एवढंच बोलला,

“ आहेत एक शात्री आजींच्या कडे येतात, त्यांनी सर्व शिकवलं मला “ अण्णा म्हणाले, “ अरे वा! म्हणजे निर्मलाचा तुला तालुक्याला पाठवण्याचा निर्णय योग्य ठरला तर!” निर्मला ताईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकत होतं. निर्मला ताईंनी सोमनाथ बरोबर आजीबाईंच्या साठी सुद्धा थोडं फराळाचं पाठवून दिलं.

सोमनाथची गोपीचंद काका आणि आजीबाई वाट पहातच होते. त्या सर्वांचं नित्याच रुटीन सुरू झालं. बघता बघता सोमनाथची अकरावी, बारावी कॉलेजची दोन वर्ष पार पडली. बारावीच्या सुट्टीत सोमनाथने कंप्युटरचा कोर्स पूर्ण केला. तोपर्यंत सोमनाथचा  वेदाभ्यास सुद्धा पूर्ण झाला. म्हणजे गोपीचंद काकांनी करवून घेतला. बारावीचा निकाल लागला. त्यातही सोमनाथ तालुक्यात पहिला आला. त्याने कॉलेज मधून रिझल्ट घेतला. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा हा प्रश्न त्याला होताच! आजीबाईंनी सोमनाथची पाठवणी करण्यासाठी गोडा धोडाचा स्वयंपाक केला. सोमनाथच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला,

“ मी ना तुमच्या नात्याचा ना गोत्याचा पण माझ्यासाठी तुम्ही खुप मोठा आधार बनला!” त्याचवेळी गोपीचंद काका पण तिथे हजर झाले. म्हणाले,

“ आता आमची कथा सांगतो, ही आजीबाई, लक्ष्मी म्हणजे माझी पत्नी! आम्ही दोघ ह्या वाड्यात सुखाने नांदत होतो. वाड्यात दोन बिर्‍हाडं होती. आमची थोडी शेती होती. आणि मी भिक्षुकी करत होतो. गावातल्या मुलांना काही स्तोत्र, पूजा पाठ शिकवत होतो. पण तुझ्यासारखा कुणीच माझ्या हाताखाली वेदशास्त्र संपन्न झाला नाही. कुणाला तरी पूर्ण ज्ञान देण्याची माझी इच्छा अपुरीच राहिली. पंढरीच्या वारीला गेलो असताना कॉलरा झाला, आणि त्यात माझा मृत्यू झाला. मी हा असा ब्रह्मसंमध होऊन बसलो. माझा वावर वाड्यात होत राहिला. पण मी कुणाला त्रास देत नव्हतो. मी सगळं शिकवण्यासाठी शिष्य शोधत होतो. लक्ष्मीला पण माहित होतं. वाड्यात माझ्या वावराचा अनुभव घेऊन कोणी बिर्‍हाडं टिकत नव्हते. तुझी आजीबाई माझ्यानंतर सुद्धा २५ वर्षे झाली तग धरून आहे. तू भेटलास आणि मी माझी इच्छा पुरी करू शकणार होतो.” सोमनाथ म्हणाला,

“ काका मी खरं तर तुम्हांला पाहून प्रथम खुप घाबरलो होतो. मला मुळात या योनीची खुप भीती वाटते. पण तुम्ही पहिल्या रात्रीच माझ्याशी मैत्रीचा हात पुढे केला. मी पण ओळखलं होत, तुम्ही कुणीतरी अतृप्त आत्म्यां पैकी कुणी तरी असणार, पण शिक्षण न घेता मी परत जाऊ शकत नव्हतो. दुसरीकडे कुठे रूम घेणं मला परवडणार नव्हतं. म्हणून मनाचा हिय्या करून मी राहिलो. पण तुम्ही तर माझ्याशी खुप प्रेमळपणे वागलात!” आजीबाई सोमनाथच बोलणं तोडत म्हणाल्या,

“ ह्यांना मुक्ती मिळवून देण माझ काम होतं. आम्हांला संतान नव्हतं. आम्ही तुलाच आमचं मानलं. हे तुला शिकवतात हे मला माहित होतं. त्यांच्या मुक्तीसाठी ते गरजेचं होतं. म्हणून मी सुद्धा तुला प्रेमानं जेवायला घालायला सुरुवात केली. आता ह्यांच्या मुक्तीच द्वार खुलं झालं आहे. आणि नंतर माझ्या सुद्धा होईल.” आजीबाईंनी फडताळात ठेवलेली काही कागद पत्र गोपीनाथच्या हवाली केली. म्हणाली,

“ ही ह्या वाड्याची कागदपत्र आहेत तो मी तुझ्या नावे लिहून ठेवला आहे. माझ्या नंतर हा पाडून नवी जागा बांध. त्यासाठी लागणारा खर्च माझे हे दागिने विकून कर. तेपण मी तुझ्या नावे लिहून ठेवले आहेत.” गोपीचंद काका म्हणाले,

“ मी सांगतो तसे माझे श्राद्धाचे संस्कार कर. मला मुक्ती मिळेल. मी ह्यापुढे कुणाला त्रास देणार नाही. आधी सुद्धा देत नव्हतो. पुढे आयुष्यात तुला कधी तुझ्या आसपास वावरताना काळ्या सावल्या दिसल्या तर मी शिकवलेला मंत्र म्हणत जा. तुझ अरिष्ट टळेलं.  पांढऱ्या सावल्या दिसल्या तर घाबरू नकोस. ते  माझ्यासारख्या सात्विक पुरुषांचे आत्मे असतील. त्यांना त्यांची इच्छा विचारून घेत जा. छोट्या इच्छेसाठी अतृप्त राहिलेले असतात. त्यांना मुक्ती मिळेल. तुझे ह्या पुढचे शिक्षण सुद्धा व्यवस्थित पार पडेल. तू इंजिनिअर होशील. माझी काही साधना मी तुझ्यासाठी खर्चत आहे.”

 सोमनाथला त्याची आर्थिक परिस्थिती पाहून कॉलेजच्या काही प्राध्यापकांनी मदतीचा हात पुढे केला. हणमंतला तो म्हणाला,

“तुमचा कावा मला इथून पळवण्याचा होता, पण माझं कल्याणच साधलं त्यासाठी तुम्हांला धन्यवाद! मी त्या वाड्याचा आता मालक आहे.” हणमंताने खजील होऊन मान खाली घातली. सोमनाथ  पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला गेला. जाताना आई वडीलांना म्हणाला,

“ माझी काळजी करू नका. भित्याच्या पाठीशी ब्रह्मसमंध सुद्धा असू शकतो.”

*********************समाप्त ***************

 

जयश्री देशकुलकर्णी

Flat नं.१०१ , K -बिल्डींग,

हिल व्ह्यू रेसिडन्सी, डुक्कर खिंड जवळ

कोथरूड पुणे -३८

मोबाईल – ९४२३५६९१९९            

 

      

      

 

       

   

              

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू