पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अवधपुरी

अवधपुरी 

 

मी ....मी‌..ना...अयोध्या....अवधपुरी....माझ्याच मातीत खेळली बरं का रामरायाची स्वारी. तो इवलासा राम लुटूलुटू धावायचा नि त्याच्या कमरेची साखळी खुळूखुळू वाजायची,तेव्हा हृदय अगदी गहीवरून यायचं माझं आणि स्व धूलिकणां सहीत त्यांना कुशीत घ्यावं असंही वाटायचं, अगदी कौसल्या मातेसारखं.  ही चारही भावंड जेव्हा खेळायचीत ना, त्यांच्या पळापळीत माझं मन सुद्धा पळतसे.बरं,काही पडू नयेत, त्यांना लागू नये,म्हणून मी खूप जपत असे बरं.

खूप आदरणीय धर्मपरायण महाराज ‌ दशरथप्रजेवर अगदी पुत्रवत प्रेम करायचेत. माझं अवंतिका रूप प्रजेला हवं तेवढं दाणापाणी, फल देऊन तृप्त ठेवत असे.सर्व प्रजाजन खाऊन पिऊन सुखी होते.अरे हो, शरयू माझी जल संजीवनी ह्या नगरीस जल जीवन देऊन तृप्त ठेवत असे .सांजवेळी आरत्या पदे,श्लोक सह भक्तीगीत गाऊन प्रजा ईश्वरास आळवत असे. चित्रकार, गायनकला इतर अन्य कलेचा‌ समृद्ध वारसा सांगणारे हात या इथेच होते.अहो काय सांगू भांडण तंटा तर औषधालाही नव्हता.भांडतील तरी कशासाठी ना!सर्वांकडे सर्वकाही अपेक्षित सुख असल्याने मने तृप्त होती.आपापला धर्म निष्ठेने पाळणारी प्रजा सर्वांगाने सुखात नहात होती.राजा दशरथ म्हणजे आमचे महाराज.पुत्रजन्माने खूप सुखी झाले होते.त्यामुळे प्रजाजनही आनंदात होते.

 

    त्या दिवशी बाळांचं मौंजीबंधन होतं.सर्व प्रजाजन आणि रघुकूल भोजनानंदात नहात होतं.पण कौसल्या मातेच्या डोळ्यात मात्र पापणीखाली पाणी होतं.मी चटकन जाणले बरं. अगंबाई, आता शिक्षणासाठी मुलं गुरुकुलात जातील ना! त्यांचाच विरह सहन होत नसेल कौसल्या मातेला. 

गुरुगृही घरच्यासारखी खाण्याची झोपण्याची व्यवस्था नसेल ना, याचाच त्रास होत असेल त्यांना. पण इश्वाकू कुलातील बालकांना धर्मराज्य रक्षणासाठी..वेदशास्त्र सह शस्त्रविद्या पारंगत असणं आवश्यकच आहे ना.गुरुगृही म्हणे मुलांना स्वयंपाकासाठी जंगलातून‌ जळण्यायोग्य वाळकी लाकडं आणावी लागतात.    तसंच पाणी भरावं लागतं.राजघराण्यात लाडाकोडात वाढलेली मुले ,यांना हे सगळं जमेल का म्हणून चिंता वाटली असेल.

 

     राम,लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चौघे भाऊ गुरुकुलातून वेदशास्त्र,शस्त्रविद्या पारंगत होऊन आले राजवाड्यात आणि अवधपुरीचा अणुरेणू  आनंदात नांदत होता.एक दिवस एक नविनच समस्या उभी ठाकली.गुरु विश्वामित्रांना म्हणे,त्यांच्या  यज्ञात असूर विघ्न आणतात, म्हणून यज्ञ रक्षण्यास्तव राम नि लक्ष्मण‌ हवे होते.अगबाई काळीज चर्र झालं बरं, कौसल्यामातेचं नि महाराज दशरथांचं सुद्धा.विश्वामित्रांना ते म्हणाले,गुरूदेव मला सांगा ना मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो.पण ती कोवळी बालकं आणि ते दुष्ट क्रूर राक्षस. ह्या बालकांचा काय टिकाव लागणार.माझे हृदय कि प्राण आहेत ही ,तेवढी मागू नका.विश्वामित्र रागावून उठलेच होते. पुनःश्च दशरथ महाराजांनी त्यांना थांबवलं.तेव्हा गुरूदेव म्हणाले, अरे राजन तुझ्या मुलांची शक्ती तुलाच माहीत नाही.बघ लवकरच पडताळा येईल.अतिशय प्रेमाने पाठ थोपटत गुरूदेव राम लक्ष्मणाला घेऊन निघून गेले.कौसल्यामातेना तर आपल्या हृदयाचा तुकडाच कुणीतरी तोडून नेत आहे कि काय इतकं दु:ख झालं.महाराजांनी त्यांना समजावलं मुलांना त्यांच्या कर्तव्यासाठी जाताना आपण आपले मायेचे पाश जरा हलके करावे. हो तर मला नाही जमत बाई असलं म्हणत कौसल्यामाता आपल्या महालात निघून गेल्या.थोड्याच अवधीत रामाने त्राटीका राक्षसिणीचा वध केल्याचे कळले आणि कौसल्यामाता नि मी या वार्तेने सुखावलो.आणि अन्य अनेक राक्षसांना ठार मारून विश्वामित्रांचे यज्ञकार्य सफल झाल्याचे कळले.

 

      आता तर एक नवीन बातमी धडकलीये बरं का…  अयोध्येत राजा जनका कडील जानकीचं स्वयंवर म्हणे रामानं जिंकलंय.अय्यो कित्ती कित्ती आनंदाची बातमी ना. मला तर नाचावं,उडावं नि काय काय करावंसं वाटत होतं. आनंदाच्या उर्मी ना  काळजातून उत्स्फूर्तपणे ओसंडून वाहाताहेत...शरयू तर उधाण आल्यासारखी धावतेय.जरा वेळ गेल्यावर मला माझंच हसू आलं. 

अगंबाई,ही कमरेला साखळ्या वाजवत धावणारीही इवली टिवली मुलं लग्न करण्या इतपत मोठी झालीत.....खरचंच  काळ हा मोठा जादूगर असतो.एक दिवस उजाडला बाई, आणि ना ही चारही बाळं माझ्या चार स्नुषा घेऊन घरी आली.आणि अहाहा ती कोमलांगी जनक कन्या. तिचे ठाव घेणारे नेत्र,तलम वस्त्रांची सळसळ,त्याबरोबर मधूर चुड्याची किणकीण,ती पायातली पैंजणे,तिचा  तारुण्यतेज असलेला वावर हृदयास सुखावून जात होता.उर्मिला,मांडवी आणि श्रुतकिर्ती ह्या गोड मुलींचं हसणं आणि असणंही रघुकूलात एक प्रसन्न वातावरण सजलं होतं.आता महाराज दशरथ लवकरच जेष्ठ पुत्र रामाला राज्याभिषेक करणार होते.संपूर्ण प्रजाजन आनंदात विहरत होते.मी नि कौसल्यामाता तर अत्युच्च आनंदाच्या शिखरावर होतो.उजाडला तो दिवस ज्या दिवशी आमचा लाडका राम राजा होणार होता.समस्त अवधपुरी सडासंमार्जन करून दारी रांगोळ्या घालून सजली होती.राजवाड्यातही मंगल वाद्यासह मंगल स्नान होत होतं.रामाला आता राजवस्त्र घालून सजविण्यात येत होतं.सप्तनद्यांच जल आणून गुरु वशिष्ठ तयारी करत होते.

 

    मात्र नियतीने एक काळं कुट्ट वस्त्र विणायला घेतलं होतं आणि त्यात तीने महाराणी कैकयी आणि तिची दासी मंथरा यांना ह्या कामात हाताशी घेतलं होतं.मंथरा कैकयीच्या माहेराहून आणलेली दासी होती.रामाला राज्याभिषेक होईल नि तुझ्या भरताला मात्र आजोळी पाठवण्यात आलेलं आहे यात काहीतरी काळंबेरं लपलेलं आहे. असे विकृत विचार मंथरेने कैकयीच्या बुद्धीत ठसविले.त्यामुळे कैकयीने दशरथ महराजांना त्यांनी तिला  दिलेले दोन वर रामाला वनवास नि भरताला राज्याभिषेक असेमागितले.पितृआज्ञा शिरसावंद्य म्हणून राम तात्काळ वनवासाला जायला तयार झाला.लक्ष्मणाला हे सगळं अजिबात पटलं नाही.  त्याने शस्त्र हातात घेतलं, पण रामाने त्याला समजावलं.जाण्यापूर्वी मातेचा निरोप घेण्यास राम गेले. कौसल्यामाता तर हे ऐकून बेशुद्ध च झाल्या.एवढा मोठा मानसिक धक्का त्यांना सहन झालानाही.कसेबसे त्या शुद्धीवर आल्या रामाने आपल्या परीने खूप समजाविलं पण त्यांचा आक्रोश थांबला नाही.सीतेचा निरोप घ्यावयास राम गेले तर पती जवळ राहून त्यांची सेवा करणे हाच माझा धर्म असल्याने आपण जेथे जाणार तेथे तेथे मी येणारच.  वनवास खूप कष्टदायक असतो हे सांगितल्यावर सुद्धा सीता ऐकेचना. नाइलाजाने राम सीतेला न्यायला तयार झाले.लक्ष्मणाने मात्र मातेला भावाच्या सुरक्षेसाठी माझं जाणं आवश्यक असल्याचं पटवून दिलंं आणि उर्मिलेला तू कौसल्या मातेची सेवा कर,असे सांगून तो वनवासाला निघाला.राम लक्ष्मण नि सीता रथात बसून वनवासाला निघाले.खूप खूप दु:ख झालं हो अवधपुरीतील प्रजाजनांना.सगळेजण रामाच्या रथामागे रडत रडत चालत होते.सुमंता नको नेऊ रे रामाला अगदी काकुळतीने म्हणत होते. सुमंताच्या डोळ्यात अश्रुपूर साठला होता.त्याला पुढचे काही दिसत नव्हते.रथाचे घोडे,त्यांचेही डोळे अश्रुविना नव्हतेच.त्या दिवशी अवधपुरीत कुणाकडेही चूल पेटली नाही. दु:खाचे कढ गिळत ही अवधपुरी निस्तेज झाली होती.लोकं  रस्त्यावर येऊन कैकयीच्या कपट कारस्थानाची चर्चा करत होते.

काही काळानंतर महाराज दशरथांचे प्राणोत्क्रमण झाल्याची बातमी . अयायी गं काळजात आता दु:ख मावेनासंं झालं होतं. फळ झाडावरच फुटल्यानंतर त्यातून गर बाहेर पडावा,अगदी तसेच तीन्ही राण्यांचे झाले होते.उर फुटून त्यांचा आक्रोश चालला होता.भरतास आजोळाहून बोलाविण्यात आले होते.रथ अवधपुरीत शिरताच आपल्याकडे नगरीतील लोकं तुच्छतेने बघताहेत,आपल्याला पाहून पाठ फिरवीत आहेत,हे लक्षात यायला भरताला वेळ लागला नाही.कांहीतरी निश्चितच आगळं वेगळं घडलंय हे जाणवलं.राजवाड्यात आल्यावर जेव्हा सगळं सत्य गुरू वशिष्ठांनी सांगितलं  तेव्हा त्याला आपल्या जन्मदात्रीचा प्रचंड राग आला आणि कौसल्या मातेचं सांत्वन करायला तो निघून गेला.गुरू वशिष्ठांच्या आदेशानुसार वडीलांची उत्तरक्रिया केल्यानंतर भरत,रामाला परत येण्यासाठी विनंती करायला गेला.पितृआज्ञेने बांधल्या गेलेले रामचंद्र परत येण्यास तयार झाले नाहीत.भरताने रामाला आपल्या पादुका द्या,अशी विनवणी केली ती मात्र रामचंद्र नाकारू शकले नाहीत.श्री रामचंद्रांच्या पादुकांना राजसिंहासनावर ठेवून भरताने राज्यशकट हाकले.हा हाच माझ्या अवधपुरीतील ऐतिहासिक क्षण. खूप सुंदर त्यागमय क्षण आणि हे इथेच असे घडू शकते. मी धन्य होते,नतमस्तक होते.धन्य तो भारत देश जेथे असे निस्वार्थी राजे जन्मले.एरवी बापाला मारून राजगादी हडपणारे असुर सम्राट आणि त्यांचा तो नीच्चतम पातळीतला स्वार्थ पाहीला कि हे मनुष्यत्व कि पशुत्व असा प्रश्न पडतो.

 

        रावणाने सीतेला पळवून नेलं,मग राम रावण युद्ध झालं. रावणाचा वध झाला,असल्या बातम्या नगरीत ऐकू आल्या.आज मात्र खूप आनंदाचा दिवस उगवला.आज आमचे श्रीरामचंद्र सीतामाई नि लक्ष्मण चौदा वर्षे वनवास संपवून परत येणार आहेत.आज मी खूप आनंदात आहे.

अवघी अवधपूरी सजलीये .सगळीकडे गृहीणी प्रसन्न वदनाने सडा रांगोळी घालीत आहेत.पुरूष गुढ्या तोरणे उभारीत आहेत.स्वयंपाकगृहातून सर्वत्र पक्वान्नांचा सुगंध दरवळत आहे.आले आले बरं का आमचे रामराजे,सर्वत्र सनई चौघडा वाजे.रामराज्यात जळी स्थळी सर्वत्र सूख समाधान नांदे.पशु पक्षी सारे फिरती स्वानंदे.खूप आनंदी आनंद नांदत होता.मी खूप आनंदाने समाधानाचा श्वास घेत होते.अलिकडेच जानकी आई होणार असल्याचं कळलं होतं.कौसल्यामाता ना तर जानकीला कुठे ठेवू अन् कुठे नको असे झाले होते. सर्वत्र आनंदी आनंद होता.

 

      संथ वाहणा-या पाण्यात खडा टाकायला हिला खूप आवडतं. ती ही नियती दबा धरून बसली  होती. राज्यातील गुप्तहेर सतत कानाकोप-यातून बातम्या आणत असत,नि रामराजेंना सांगत असत.सांगताना एक गुप्तहेर कांही तरी लपवतोय असे रामाच्या लक्षात आले.त्यांनी त्याला अभय देऊन सर्व माहिती काढून घेतली, नि माझा राम खूप दु:खी झाला.त्याच्या चेह-यावरचं मधुस्मित कुठल्याकुठे पळालं.चाणाक्ष पत्नीच्या नजरेतून मात्र हे सुटले नाही. तिने रामाला विचारले पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आपल्या दासी कडून तिने सत्य जाणून घेतले.रघुकूलास दोष लागत असेल तर मी या कुलापासून दूर निघून जाईन असे वचन तिने रामाला रघुकुलातील श्रेष्ठ पितृतुल्य व्यक्तिंसमोर दिले.

       सकाळीच पहाटे लक्ष्मण रथावर आरूढ होऊन सीतेला वाल्मिकी आश्रमात सोडून आला.झाली ना माझ्या सीता नि रामाची ताटातूट.काय काय ह्या मुलीच्या आयुष्यात लिहिलंय नं कळे. तिची आठवण आली ना की मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटतं.

    हल्ली सीतेची दोन मुलं रामायण कथा गात असल्याचं कळलं.मी पण लक्ष देऊन ऐकलं.  किती गोड गातात ना ते दोन कुमार. श्रवणीय संगीत आणि त्यात गुंफलेली रामकथा. मन पार चैतन्यात डोलतं.पण ना ह्या कथेसह एक दुर्दैवी बातमी कळली माझ्या जानकीने स्वतःला धरणी मातेच्या स्वाधीन केले आणि मी खूप उदास झाले.

             आज मी खूप खूष आहे बरं का अनेक आक्रमणं झाली पण माझ्या रामाची कथा चिरंजीव आहे.आता बघा केवढी भव्य वास्तू तयार होते आहे माझ्या रामरायाची.अवघ्या विश्वात त्याची किर्ती वाढेल.सज्जनहो मनात राम साक्षी ठेवून कोणतंही कार्य करा विजयश्री,यशश्री तुमच्याच पदरात असेल नक्की.

 

स्वाती संजय देशपांडे नागपूर

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू