पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक हृद्य प्रवास

शाॅपिज़न ट्रेनकथा स्पर्धा


एक हृद्य प्रवास 


      दुपारी पावणेदोनची वेळ होती. आम्ही उभयता बंगलोरच्या यशवंतपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर उभे होतो. यशवंतपूर - निजामुद्दीन संपर्क क्रांति एक्सप्रेसचे फलाटावर कधी आगमन होते या प्रतीक्षेत आम्ही होतो. फलाटावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ, हमालांची लगबग, फेरीवाले, डबेवाले, वेगवेगळे आवाज यांची सरमिसळ झाली होती. त्यासोबत माझ्या मनातही बंगलोरमध्ये तीन - चार दिवस मुलासोबत व्यतित केलेल्या आठवणींची  क्षणचित्रे घोळत होती. मी माझ्या विचारांच्या तंद्रीत असताना संपर्क क्रांति एक्सप्रेस फलाट क्रमांक एकवर येत असल्याची घोषणा झाली. रेल्वे यशवंतपूरहूनच निघणार असल्यामुळे आणि आमचे आरक्षण असल्यामुळे काळजीचे कारण नव्हते. रेल्वे फलाटावर थांबताच आम्ही दोघे आमच्या आरक्षित डब्यात चढलो आणि आरक्षित जागेचा शोध घेत आमच्या जागेवर आलो. सीटखाली सामान ठेवून आम्ही स्थानापन्न झालो. मला खिडकीजवळची जागा मिळाली होती. घड्याळात बघितले तर दोन वाजले होते. रेल्वे निघायला अजून अर्धा तास बाकी होता. माझ्यासमोरच्या खिडकीजवळच्या जागेवर अजून कोणी सहप्रवासी आले नव्हते. आम्ही दोघे गप्पा करत असताना साधारण साठी - बासष्टीच्या वयातल्या एक महिला माझ्यासमोरच्या खिडकीजवळच्या जागेवर येऊन बसल्या. गौरवर्ण, तरतरीत  नाक-डोळे, मध्यम उंची व हसरा चेहरा असे त्यांचे व्यक्तित्व होते. त्यांच्यासोबत असलेल्या तरुणवयीन मुलीने त्यांचे सामान सीटखाली ठेवले. त्या दोघी एकमेकांशी मराठीत बोलत असल्याने त्या महाराष्ट्रीयन असल्याचे ध्यानात आले. त्या दोघीदेखील स्थानापन्न झाल्या.

       मी त्या बाईंकडे बघून स्मितहास्य केले आणि संभाषण सुरू करण्यासाठी त्यांना विचारले,” कुठे जाणार आहात? “

त्या उत्तरल्या,” पुण्याला निघाले आहे. “ तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या मुलीने विचारले,” आन्टी, तुम्ही कुठे उतरणार आहात? “

मी म्हणाले,” आम्ही दोघे पुण्यालाच उतरणार आहोत. “

माझे उत्तर ऐकून ती आनंदाने म्हणाली,” थँक गॉड, ही माझी आई. एकटीनेच पुण्यापर्यंत जाणार असल्याने मला थोडी काळजी वाटत होती. तुमची पुण्यापर्यंत तिला सोबत असल्याने आता माझी चिंता मिटली. “

मीही हसून आश्वासक स्वरात तिला म्हणाले, “तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत. “ यथावकाश बाकी उरलेले सहप्रवासीही आपापल्या जागी स्थानापन्न झाले. ती मुलगीही निश्चिंत मनाने आईचा निरोप घेऊन निघाली. तेवढ्यात संपर्क क्रांति एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेवर निघत असल्याची घोषणा झाली आणि बरोबर पाच मिनिटातच रेल्वेने फलाट क्रमांक एक सोडला.

      गाडीने हळूहळू वेग पकडला. काही सहप्रवासी मोबाईलमध्ये गर्क झाले. माझे यजमान आणि त्यांच्या शेजारी बसलेले गृहस्थ यांच्या आपसात गप्पा सुरू झाल्या. मीही मुलाला रेल्वे वेळेवर सुटल्याचा संदेश पाठवला. समोरच्या बाईंनाही कोणाचातरी फोन आला. संभाषणावरून त्यांच्या यजमानांचा फोन असावा असा अंदाज मी बांधला. मी खिडकीबाहेर दिसणारे दृश्य बघू लागले. तेवढ्यात त्या बाईंनी आपल्या जवळील छोट्या पिशवीतून विणकामाच्या सुया आणि लोकरीचा गुंडा बाहेर काढला आणि त्या विणकामात गढून गेल्या. माझा एक डोळा खिडकीबाहेर होता तर दुसरा डोळा त्यांच्या हालचाली टिपत होता. मलाही त्या काय विणत आहेत याची उत्सुकता होती. त्यांचे दोन्ही हात अतिशय कुशलतेने भराभर विणत होते. त्यांची विणण्याची गती आणि कौशल्य पाहून त्या विणकामात निष्णात असाव्यात असा आडाखा मी बांधला. त्यांचे विणकाम पाहून मला माझ्या आईची आठवण झाली.

     माझे खिडकीबाहेरचे लक्ष आता पूर्णपणे त्यांच्यावर केंद्रित झाले होते. त्या विणकामात इतक्या गर्क झाल्या होत्या की त्यांना आजूबाजूचा जणू विसर पडला होता. मला त्यांना प्रश्न विचारायची वारंवार उबळ येत होती. पण त्यांची विणकामातील तंद्री भंग करावीशी मला वाटत नव्हती. त्यामुळे त्यांचे विणकाम मी मंत्रमुग्ध होऊन पाहत होते.  त्यांची विणकामातील कौशल्य व एकाग्रताही वाखाणण्याजोगी होती. विणकाम जसे भराभर वाढत होते तसे त्या टोपी विणत होत्या हे माझ्या लक्षात आले. जवळपास पाऊण तास होऊन गेला होता. थोड्याच वेळात आगगाडीचा वेग मंदावला आणि आगगाडी तुमकुर रेल्वेस्थानकात येऊन थांबली. तुमकुर येईपर्यंत समोरच्या बाईंची टोपी पण विणून पूर्ण झाली होती. 

मी उत्स्फूर्तपणे म्हणाले, “ ताई, तुमचे विणकामातील कौशल्य व विणण्याचा वेग अफलातून आहे. तासाभरात तुमची टोपीदेखील विणून झाली.” 

      माझ्या या प्रतिक्रियेवर त्या मनापासून हसल्या आणि म्हणाल्या,” हो. मला विणकामाची खूप आवड आहे. त्यामुळे मी वेळ मिळेल तेव्हा विणत असते.”

मी पुढे विचारले,” तुम्ही विणकामाच्या ऑर्डर घेता का? “ मी गप्पा करायला उत्सुक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आपले विणकामाचे साहित्य पिशवीत ठेवले आणि त्या बोलू लागल्या,” हो. मी ऑर्डर घेते. मला लहान मुलांसाठी स्वेटर्स, टोप्या, पायमोजे इत्यादी विणायला मनापासून आवडते. अगदी लहान बाळापासून ते साधारण चार-पाच वर्षाच्या मुलामुलींचे लोकरीचे कपडे मी विणते.”

मी पुढे विचारले,” तुम्ही कधीपासून विणकाम करत आहात? तुमच्याविषयी जाणून घ्यायला मला आवडेल.” 

मग त्याही उत्साहाने सांगू लागल्या,” मी अनुपमा देसाई. मला अगदी शाळेत असल्यापासून विणकामाची आवड आहे. आमची मुलींची शाळा होती. त्यामुळे साहाजिकच शिवण हा विषय शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत होता. माझ्या आईला विणकामाची खूप आवड होती. फावल्या वेळात ती नेहमी विणकामात गर्क असायची.  तिच्याकडून ही आवड माझ्याकडे संक्रमित झाली. तिच्याकडूनच मी विणकामातील सर्व गोष्टी शाळेत असतानाच शिकले. शालेय शिक्षण व पुढे महाविद्यालयातील अभ्यास करतानाही मी ही आवड जपली. वाणिज्य शाखेत मी द्विपदवीधर झाल्यावर पुढे बँकेत नोकरी करू लागले. नोकरी करून वेळ मिळेल तेव्हाही मी विणकाम करतच राहिले. पुढे दोनाचे चार हात झाले. सांसारिक जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन यांना प्राधान्यक्रम असल्याने विणकाम थोडे मंदावले. हळूहळू मुले मोठी झाली. मुले नोकरी व पुढे संसाराला लागली. माझी मागे पडलेली आवड मी पुन्हा नव्या उत्साहाने जोपासू लागले. नात्यात, मित्रपरिवारात कोणा लहानग्याचे बारसे, बोरन्हाण, वर्षाचा वाढदिवस असेल तर मी माझ्या हाताने विणलेला स्वेटरचा सेट मुलांना भेट म्हणून देऊ लागले. परिचितांमध्ये मी स्वेटरवाली बाई म्हणून ओळखली जाते. मी विणलेल्या गोष्टी पसंतीस उतरल्यामुळे मला ओळखीतून लहान मुलांच्या स्वेटर्सच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. हळूहळू या ऑर्डर्सची संख्या वाढत गेली. नोकरी सांभाळून या ऑर्डर्स पूर्ण करताना माझी दमछाक होऊ लागली. त्यामुळे बरीच वर्षे नोकरी केल्यानंतर नोकरीतून आता सेवानिवृत्ती घ्यावी असे मला मनोमन वाटायला लागले. मुलाचे व मुलीचे लग्नकार्यही पार पडले होते. त्यामुळे सांसारिक जबाबदारी बर्‍याचअंशी कमी झाली होती. मी माझ्या मनातील विचार मिस्टर, मुलगा व सून यांना बोलून दाखवला. माझी विणकामाची आवड लक्षात घेता त्या सर्वांनी मला मनापासून पाठिंबा दिला. त्यामुळे मी माझ्या बँकेच्या नोकरीची दोन वर्षे शिल्लक असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली. ”

      आगगाडी पुढे धावत होती आणि त्यासोबत आमच्या गप्पाही पुढे पुढे सरकत होत्या.

 मी विचारले,” तुमच्या विणकामाच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात कसे झाले? “

अनुपमा ताई सांगू लागल्या,” सेवानिवृत्ती घेतल्यानंतर कोणतीच पक्की योजना माझ्या डोळ्यांसमोर नव्हती. पण चार-पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांसाठी स्वेटर विणायचे हे मात्र मी निश्चित केले होते, कारण मला लहान मुले खूप आवडतात. विणकामावरची इंग्रजी व मराठी भाषेतील बरीच पुस्तके मला वेळोवेळी माझ्या यजमानांनी, मुलाने व मुलीने भेट म्हणून दिली होती. त्यातील लहान मुलांच्या स्वेटरचे वेगवेगळे प्रकार मी विणायला सुरुवात केली. घरातील थोडीफार जबाबदारी पार पाडल्यानंतर माझ्याकडे वेळच वेळ असल्याने माझे सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत नेहमीच्या ऑर्डर्ससोबत जवळपास पंचवीस ते तीस स्वेटर्सचे सेट विणून पूर्ण झाले. प्रत्येक सेट वेगळा होता. घरातील सर्वांना हे सेट खूप आवडले. आमच्या सूनबाईंनी या स्वेटर्सच्या सेटचे प्रदर्शन भरविण्याची कल्पना सुचवली. तिची कल्पना मलाही खूप आवडली. त्यानुसार एका रविवारी आम्ही आमच्या घरी या स्वेटर्सच्या सेटचे प्रदर्शन भरवले. सूनबाई अनयाने दोन-तीन टेबलांवर आकर्षकरित्या स्वेटर्सच्या सेट्सची मांडणी केली. तिच्या ऑफिसमधील मैत्रिणींना आणि कॉलनीतील बायकांना तिने बोलावले. या प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला आणि दोन-तीन तासांतच सर्व सेट्स विकले गेले. उशिरा आलेल्यांची थोडी निराशा झाली. त्यांनी माझ्या जवळील सेट्सचे काढलेले फोटो बघून ऑर्डर्स दिल्या. त्यामुळे नेहमीच्या ऑर्डर्स सोबत आणखी काही ऑर्डर्सची नव्याने भर पडली. आपल्याला झेपेल एवढ्याच ऑर्डर्स महिन्याकाठी पूर्ण करायच्या हे मी कटाक्षाने ठरवले होते. काही जणांना ऑर्डर्स लगेचच पूर्ण करून हव्या असायच्या. घाईघाईत ऑर्डर पूर्ण करणे मला जमणार नाही, असे त्यांना सांगणे मला भाग पडायचे. त्यामुळे ग्राहक योग्य दिवसांची मुदत देऊन मला ऑर्डर्स देऊ लागले. मी विणलेल्या सेट्सचा वेगळेपणा, सुंदर विणकाम, आकर्षक रंगसंगती आणि माफक दर यामुळे ग्राहकांची माझ्याकडील सेट्सना मागणी असते.”

      अनुपमा ताईंनी त्यांच्या मोबाईलवर असलेले, त्यांनी विणकाम केलेल्या सेट्सचे फोटो मला उत्साहाने दाखवले. खरोखरच अगदी वैविध्यपूर्ण व आकर्षक असे लहान मुलांचे लोकरीचे सेट्स पाहून मी हरखून गेले. 

मी त्यांना म्हणाले,” तुमच्या सेट्सना मागणी वाढल्यावर तुम्ही मदतनीस बायका नक्कीच ठेवल्या असतील.” यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या,” नाही. मी माझी आंतरिक ओढ व माझा आनंद म्हणूनच विणकाम करते. माझ्या या छंदाचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक रूपांतर बायका कामाला ठेवून करता येणे मला सहज शक्य होते. आपण विणकामाचे मशीन घेऊयात म्हणून घरचे लोक पण खूप आग्रह करत होते. पण ही गोष्ट मी कटाक्षाने टाळली. मोठा व्यवसाय म्हणजे जबाबदाऱ्या पण त्यासोबत वाढतात. पैशांपेक्षा आपल्या आवडीच्या कामातून आनंद मिळवणे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी पूर्ण व्यावसायिक होणे टाळले. पण माझ्याकडे ज्या ओळखीच्या महिला आम्हाला विणकाम शिकवाल का? म्हणून अधून मधून येतात, त्यांना मी मोफत मार्गदर्शन करते. माझ्याकडे काम करणाऱ्या बाईच्या मुलीलाही मी विणकाम शिकवले. आज तीही छोट्या मोठ्या विणकामाच्या ऑर्डर्स घेते. या गोष्टीचे मला खूप समाधान वाटते.” 

     मी म्हणाले,” खूपच छान. तुमचे पैशांच्या मागे न धावता छंदातून आनंद मिळवण्याचे सूत्र मला खूप भावले. ” माझी प्रतिक्रिया ऐकून त्या उत्साहाने पुन्हा सांगू लागल्या,  “पहिल्या प्रदर्शनाला मिळालेल्या छान प्रतिसादामुळे मी उत्साहाने कामाला लागले. माझ्या सुनेने आणि मुलीनेही फेसबुक आणि व्हाट्सअप यासारख्या प्रसारमाध्यमातून माझ्या विणकामाचा प्रसार केला. त्यातून छोट्या-मोठ्या विणकामाच्या ऑर्डर्स मला मिळत गेल्या. म्हणता म्हणता माझ्या सेवानिवृत्तीला एक वर्ष पूर्ण झाले. माझा साठावा वाढदिवस नातेवाईक आणि स्नेहीजनांसोबत दणक्यात साजरा करण्याचा बेत घरची मंडळी आखू लागली. पण माझ्या डोक्यात त्यावेळी स्वतःचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची कल्पना घोळत होती. अनाथाश्रमातील बालकांना स्वेटर्स विणून देण्याचा माझा मनोदय मी माझ्या कुटुंबीयांना बोलून दाखवला. सर्वांना ही कल्पना खूप आवडली. त्यानुसार पुण्यातील एका प्रतिथयश अनाथालयात जाऊन तेथील संचालकांना भेटून मी माझा मनोदय सांगितला. त्यांनी आनंदाने अनुमती दिली. तेथील बालकांच्या संख्येचा अंदाज मी घेतला.

आवश्यक असलेली लोकर घाऊक बाजारातून आणून मी माझे काम सुरू केले. जवळपास वर्षभराचा अवधी माझ्या हातात होता. नेहमीच्या ऑर्डर्ससोबत हे काम मला पूर्ण करायचे होते. त्यावेळी आमच्या कामवाल्याबाईची मुलगी सुशीला आणि सून अनया यांनी खूप मदत केली. अनयाने या काळात घराची पूर्ण जबाबदारी घेतली. सुशीलाने मला काही टोप्या व पायमोजे विणायला मदत केली. स्वेटर्सना आकर्षक बटने व सॅटीनची झालर लावणे, टोप्या व पायमोज्यांसाठी लोकरीचे गोंडे तयार करणे अशी कामे तिने केली. त्या दोघींच्या मदतीशिवाय माझा हा संकल्प पूर्ण झाला नसता. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी स्वहस्ते विणलेले लोकरीचे कपडे अनाथालयातील बालकांना देताना झालेला अवर्णनीय आनंद मी कधीच विसरू शकत नाही. “

या आठवणीने अनुपमाताईंचे डोळे पाणावले.

        गप्पांच्या ओघात दोन अडीच तास कसे  निघून गेले हे कळलेच नाही. माझ्या मिस्टरांनी आम्हाला वेळेचे भान आणून दिले आणि आमच्यासाठी गरमागरम चहा मागवला. चहा पिता पिता ताईंनी मला विचारले, “ तुमचे बंगलोरला कोण असते? “

मी म्हणाले,” माझी मोठी बहीण बंगलोरला असते. तसेच अडीच तीन महिन्यांपूर्वी माझ्या मुलाला ध्रुवला बंगलोरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली. त्याला भेटण्यासाठी आम्ही दोघे बंगलोरला आलो होतो.” गप्पांच्या ओघात माझ्या लेखनाच्या छंदाविषयी मी त्यांना सांगितले. विविध लेखन स्पर्धांमधून मला मिळालेल्या पुरस्कारांविषयी आणि प्रकाशित झालेल्या पुस्तकांविषयी सांगितले. योगायोगाने माझ्याजवळ असलेली व मी लिहिलेली दोन पुस्तके बालकथासंग्रह व बालकवितासंग्रह त्यांच्या नातवंडांसाठी भेट म्हणून दिली. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यातील गोष्टी व कविता माझ्या नातीला नक्की वाचून दाखवेन असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी गाडी दावणगिरी रेल्वे स्थानकात आली. संध्याकाळ उलटून गेली होती. सात वाजले होते. बाहेर अंधार दाटला होता. एकमेकींशी बोलण्याच्या नादात काळोख कधी झाला हे कळले देखील नाही. पाचच मिनिटात गाडी दावणगिरी स्थानकातून निघाली. गाडीने वेग घेताच गाडीसोबत गप्पांनी पुन्हा वेग घेतला. 

मी विचारले,” तुमची मुलगी बंगलोरला असते ना? “ 

अनुपमा ताई म्हणाल्या,” हो माझी मुलगी अपर्णा आणि जावई दोघे आयटी सेक्टर मध्ये नोकरी करतात. तिचा कधीचा आग्रह होता. त्यामुळे तिच्याकडे महिनाभर मुक्काम केला. बंगलोरमध्ये तिच्या घरीही तिने मी विणलेल्या लोकरीच्या कपड्यांचे प्रदर्शन भरवले होते. दोन-चार स्वेटर्स उरले होते. पुण्याला जाताना सामान वाढवायला नको म्हणून तिच्याकडेच ठेवले. नाहीतर आत्ता तुम्हाला नक्की दाखवता आले असते.”

मी लगेचच म्हणाले,” हरकत नाही. तुमच्या विणकामाचे थेट प्रक्षेपण मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितले.” माझ्या या बोलण्यावर त्यांनी हसून मनापासून दाद दिली आणि म्हणाल्या, “ थेट प्रक्षेपणावरून मला आठवले की मागील वर्षी मी माझे ‘नीट विथ अनुपमा’ नावाचे युट्युब चॅनेल सुरू केले आहे. “

यावर मी म्हणाले,” अरे वा! काय काय करता तुम्ही! खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.” 

त्या लगेच हसून म्हणाल्या,” एवढं काही नाही आहे. माझ्या सुनेचा अनयाचा यासाठी खूप आग्रह होता. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तुमची कला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवू शकाल हे तिने मला सांगितले व पटवून दिले. सुरुवातीला मला हे जमेल का? म्हणून खूप धाकधूक वाटायची. पण अनयाने मला या संबंधित सर्व गोष्टी शिकवल्या. सुरुवातीला तीच व्हिडिओ चित्रण करायची आणि एडिटिंग करून व्हिडिओ युट्युबवर अपलोड करायची. हळूहळू या सर्व गोष्टी मी आत्मसात केल्या. आता मी स्वतः व्हिडिओ चित्रित करून यूट्यूबवर अपलोड करते. अगदी विणकामाच्या पायाभूत गोष्टींपासून सर्व काही या व्हिडिओमध्ये आहे. माझ्या चॅनलला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सदस्यांची संख्याही हळूहळू वाढत आहे. तुमच्या व्हिडीओचा विणकामातील बारकावे समजण्यासाठी खूप उपयोग होतो अशा प्रतिक्रिया वाचून खूप आनंद होतो व समाधान वाटते.”

      अनुपमा ताईंची उद्योगी व समाधानी वृत्ती, त्यांचे विणकामातील कौशल्य, स्वतःच्या कामाविषयीची आस्था यामुळे मी भारावून गेले. 

मी म्हणाले,” आज योगायोगाने आपली भेट झाली  आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या. तुमच्याविषयी जाणून घेता आले म्हणून खूप छान वाटले. प्रवास अगदी सुखकारक वाटला.” 

त्याही लगेच म्हणाल्या,” मलाही आज खूप छान वाटले आणि तुमच्यासारखी नवी मैत्रीण प्रवासाच्या निमित्ताने जोडली गेली.” त्याचवेळी माझ्या यजमानांनी रात्रीच्या जेवणाची आठवण करून दिली आणि आम्ही भानावर आलो. सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांचा आम्ही तिघांनी मिळून आस्वाद घेतला. तोपर्यंत रेल्वेने हुबळी सोडून धारवाडच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. रात्रीचे दहा वाजून गेले होते. आम्ही शुभरात्री म्हणून निद्रादेवीच्या अधीन झालो.

     दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चहा पीत असताना व आम्ही दोघी मोबाईलनंबरची देवाणघेवाण करताना अनुपमा ताईंच्या मुलीचा फोन आला. प्रवास अगदी छान झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. काल रात्री अपूर्ण राहिलेल्या गप्पांचा उरलेला कोटा आम्ही दोघी पूर्ण करू लागलो. आगगाडी धावत होती आणि सोबत गप्पाही. संभाषणादरम्यान अनुपमा यांना विणकामाच्या कलेसोबत पाककलाही उत्तम अवगत असल्याचे समजले. विणकामाच्या निमित्ताने त्यांना आलेले अनुभव आणि भेटलेली माणसे याविषयी त्या भरभरून बोलल्या. मला लेखन अविरतपणे करण्याचा प्रेमळ संदेश त्यांनी दिला. लिहित रहा, रस्ता आपोआप बनत राहतो. हा त्यांचा संदेश  मला खूप भावला. म्हणता म्हणता पुणे जवळ आले आणि सकाळी नऊच्या सुमारास संपर्क क्रांती एक्सप्रेस पुणे स्थानकावर थांबली. आम्ही अनुपमा ताईंसह फलाटावर उतरलो. त्यांचे यजमान येण्यास दहा मिनिटांचा अवधी होता. त्यामुळे त्यांची वाट बघत आम्ही ताईंसोबत गप्पा करू लागलो. श्रीयुत देसाई येताच ताईंनी त्यांची ओळख आमच्यासोबत करून दिली. परस्परांचा निरोप घेऊन व पुनर्भेटीचे आश्वासन देऊन आम्ही निघालो. स्टेशन बाहेर येताच आम्ही रिक्षात बसलो आणि बंगलोर ते पुणे प्रवासाच्या अतिशय हृद्य अशा आठवणी मनःचक्षूंसमोर आणत माझा घराच्या दिशेने प्रवास सुरू झाला.


●□●□●


लेखिका :- ऋजुता देशमुख 

पुणे :- ४११०१६

     

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू