पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दानवांतील देव

नमस्कार

 मी सौ राधिका (माजगावकर) पंडित.

 

 कथेचं शीर्षक...दानवांतील देव..

 

प्रसंग माणसाला बरंच काही शिकवतात., आणि अनुभवानेचं माणूस शहाणा होतो. 1977 ते 80 साल असलेले ते दिवस होते. अजूनही आठवण झाली की अंगावर काटा येतो, प्रवासातील ती सत्य घटना आठवल्यावर मनांत येतं, कसा निभावला तो प्रसंग आपण ? बरोबर माझा लहान मुलगा चि.प्रसाद होता. पण त्याचाही आधार वाटला मला .   

लेडीज डबा सगळ्यात शेवटी, म्हणजे स्टेशन आलं तरी प्लॅटफॉर्म पासून दूर असा. त्यातून स्टेशन वरचे लाईट गेलेले, रेल्वे लेडीज डब्यात आम्ही फक्त चौघीजणीच बायका होतो .त्यात 16 वर्षाची तरुण मुलगी सरला., मुर्तीमंत भीतीचं प्रतिक असलेली ती मुलगी मला अगदी बिलगून बसली होती . मंडळी ऐकताय ना किस्सा? सगळं पहिल्यापासूनच सांगते. मुंबईहून भुसावळ कडे जाणाऱ्या चार वाजता सुटणाऱ्या पंजाब मेलमध्ये आम्ही चढलो होतो . प्रसादचे बाबा पुढच्या डब्याकडे धावले. डब्यात गर्दी नव्हती. आणि लेडीज डब्यातल्या आम्ही चौघी जणी, म्हणूनचं खुश होतो .आरामात बसायला मिळेल म्हणून, मिस्टरांनी मला व चि. प्रसादला लेडीज डब्यात बसवले होते.. ही गाडी म्हणजे, पंजाब मेल, भुसावळला रात्री एकला पोहोचणार होती. भरपूर मोकळी जागा म्हणून आम्ही बाकावर अक्षरशः लोळण फुगडी घेणार होतो . बाकावर गप्पा मारतांना गाडीतल्या बायकांना,आम्ही भुसावळला उतरणार असल्याचे मी सांगितले . पंधरा मिनिटांनी गाडी सुटणार इतक्यात, घाई घाईनें स्टेशन मास्तर,टीसी , हमाल, आणखी काहीजण,आणि डोळे सुजलेली खूप घाबरलेली एक मुलगी,असा लवाजमा,जेंव्हां माझ्या जवळ आला. तेंव्हा काय गडबड आहे, मला काहीच कळेना.अखेर स्टेशन मास्तरांनी पुढे येऊन सगळा खुलासा केला. त्याचं असं झालं ,मी भुसावळला जाणार आहे. हे बायकांना सांगताना एका हमालाने ऐकल होतं.तो पळतच स्टेशन मास्तरांकडे गेला , आणि स्टेशन मास्तरांसह माझ्यासमोर सगळी फलटण उभी राह्यली होती. सगळ्यांनी मला विनंती केली की," ह्या मुलीला तुम्ही भुसावळ पर्यंत सुखरूप घेऊन जा. गोंधळलेल्या माझ्या मनाला काय प्रकार आहे काहीच समजेना. स्टेशन मास्तरांच्या बोलण्यावरून खुलासा झाला , ती मुलगी म्हणजे सरला... राहणारी भुसावळची होती. तिचा भाऊ जळगावला रहात होता. भावाचा मुलगा आजारी असल्याने त्याला ऍडमिट केलं होत. मुलाजवळ बसायला कुणी नव्हतं, तरी पण भाऊ बहिणीला पोहॊचवायला स्टेशनवर आला. गाडी यायला वेळ होता.आजारी मुलगा एकटा म्हणून भावानी बहिणीला,'भुसावळची गाडी ह्या प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचं समजावून सांगून,कसं जायचं ते सांगितलं. जळगाव भुसावळ अर्ध्या तासाचाच प्रश्न आहे, अशा विचारांनी तिला स्टेशनवर सोडून अगदी नाईलाजाने घाईघाईने भाऊ परत गेला. दुसरीच गाडी आली.. अनांऊसमेंट न ऐकता भांबावलेली, भाच्याच्या आजारपणाच्या काळजीनें व्यग्र असलेली सरला, समोर आलेल्या डब्यात चढली. दोन तास झाले अजून भुसावळ कसं नाही आल ? ह्या विचाराने ती काळजीतून जागी झाली. घाबरत शेजारच्या माणसाला तिने विचारले, "काका भुसावळ कधी येणार ? तर त्यांनी" ही गाडी मुंबईकडे जाणारी आहे.भुसावळ तर मागे राहयले " असं सांगितल्यावर ती घाबरून रडायलाच लागली. त्या सदगृहस्थांनी टी. सी. ला बोलावून मुलगी चुकून दुसऱ्या गाडीत बसल्याचे सांगितले. ती गाडी होती गीतांजली. गाडी धाडधाड् पुढे धावत होती. विरुद्ध दिशेला धावणारी गाडी, ठराविकचं स्टेशनं घेत असल्याने भुसावळ पासून शेकडो मैल लांब चालली होती. मागचा रस्ता बंद आणि पुढचा रस्ता चुकीचा. टीसी पण आता काय करावं ? या गोंधळात पडले. मुलगी तरुण आणि खूप घाबरलेली सारखी रडत होती.त्यावेळी मोबाईलची सोय नव्हती. शिवाय तिच्या घरी फोन नव्हता. बहिण अर्ध्या तासात पोहोचली असणारच,म्हणून भाऊ त्याच्या आजारी मुलाच्या तैनातीत लागलेला. त्यातून घरी फोन नसल्याने त्याने वडिलांना पण बहिण येत असल्याचे कळवले नाही. इकडे सगळ्यांनी खूप विचार केला.अशा तरुण मुलीला कोणाच्याही ताब्यात न देता चांगल्या सज्जन माणसाची सोबत बघून भुसावळला परत पाठवण्याची जबाबदारी आता त्या लोकांवर होती. शेवटी तिला गाडीने मुंबईला आणण्याचे ठरले. टी.सी. लोकांना त्यांची ड्युटी होती. त्यांनी तिला मुंबईला आणून स्टेशन मास्तरांच्या ताब्यात दिले. चांगली सोबत बघून भुसावळला रवाना करण्याची विनंती केली. स्टेशन मास्तरही सज्जन होते. त्यांनी सरलाला शांत करून खायला प्यायला घालून आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचवण्याचा दिलासा दीला.. मी भुसावळला उतरणार आहे हे माझे बोलणे हमालाने ऐकले, आणि लगेच त्याने स्टेशन मास्तरांना वर्दी दिली. कारण आत्तापर्यंत वाट चुकलेल्या सरलाची बातमी सगळ्या प्लॅटफॉर्मवर पोहॊचून प्रत्येक कर्मचारी सरलाची आपलीच जबाबदारी असल्यासारखा वागत होता.आणि मग नंतर तिची जबाबदारी आपोआपच माझ्यावर येऊन पडली. अहो हो ना! मलाही सरलाची खूप दया आली. तिच्या जागी मला माझी मुलगी दिसायला लागली. हे बरोबर होते त्यामुळे अपरात्री भुसावळला गाडी पोहोचणार असली तरी,ह्यांच्या जीवावर मी ती जबाबदारी मान्य केली. आणि स्टेशन मास्तरांसकट सगळ्यांनी निश्वास सोssडला. सरला मला बिलगली. माझ्या आधारावर ती निर्धास्त झाली होती .पण मला काय माहित ? पुढे मलाच कुणाचा तरी आधार शोधावा लागणार आहे म्हणून. अहो काय सांगू ! पुढे रामायण काय महाभारतच घडलं.. गाडी पुढे धावत होती. रात्र वाढत होती.आम्ही कड्या लावून निर्धास्त पणे मोकळ्या बाकांवर लोळण फुगडी घेणार होतो. इतक्यात कुठेतरी आड मार्गावर जंगलात गाडी थांबली. बाहेर मिट्ट काळोख त्यातून आमचा तर शेवटचा डबा.. इतक्यात दरवाजा धाडधाड वाजला. गडबडीत आम्ही खिडकीची काच लावायची विसरलो होतो.बाहेर 25..30 उंच पुरे धटिंगण उभे होते. "दरवाजा खोलो नही तो गोली चलायेंगे" l त्यांच्या पठाणी आवाजातल्या धमकीने आमचे पेंगुळलेले डोळे खाडकन् उघडले.खिडकीतून हात घालून त्यांनी एका लहान मुलाचे मनगट पकडले होते.त्यांच्या हातातले पिस्तूल बघून बाळाच्या आईने आकांत मांडला.,"अहो माझ्या बाळाला वाचवा हो! तिचा आक्रोश ऐकवत नव्हता."दरवाजा उघडा नाहीतर ते माझ्या लेकराला मारतील.वाचवा हो माझ्या मुलाला "! तिचा आक्रोश ऐकून आमच्या मदतीला कुणीच येणार नव्हतं. कारण जंगलात उभी असलेली गाडी.,शेवटचा डबा.,सिक्युरिटी गायब,गार्डही घाबरलेला. अशा परिस्थितीत आम्ही दरवाजा उघडला. 25 30 लोक आत शिरले.रेल्वे लेडीज डबा गच्च भरला. मला त्या अंधारातही गार्ड दिसला.मी मदतीसाठी हाक मारली.गार्ड साहेब हात जोडून असहाय्य होऊन म्हणाले," क्षमा करा ताई.मी या जमावा पुढे एकटा काहीच नाही करू शकत.मी चिडले, " "अहो पण सिक्युरिटी कुठे आहेत? " पळता पळता गार्डनी उत्तर दिलं "इतर लोकांच्या मदतीला ते धावले आहेत. हा दोनशे लोकांचा जमाव आहे त्यांच्या गावच्या जत्रेहून ते परत आलेत. गाडीत जागा मिळावी म्हणून शंभर जणांनी रुळावर उभं राहून गाडी थांबवली. आणि जबरदस्तीने आत शिरलेत. कायदा गुंडाळून पिस्तूल ',भाल्यांच्या धाकाने त्यांनी पूर्ण गाडीचा ताबा घेतला आहे.सगळे लोक गाडीत चढल्याशिवाय गाडी सुरू करायची नाही.असा दम भरून, ड्रायव्हरला पकडून ठेवलय त्यांनी. या जमावा पुढे आमचा स्टाफ कितीसा पुरा पडणार" ? धापा टाकत गार्ड बोलत होते. पुरुषासारखे पुरुष जीवाच्या भीतीने हवाल दिल झाले होते, तर आमच्या बायकांची काय कथा ! धक्काबुक्कीत बाकावर बसलेल्या बायका चेंगरल्या गेल्या. भीतीने आणि भुकेनी मगाचं बाळ किंचाळून रडत होत. . आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळाला ती पदराआड पण घेऊ शकली नाही. कारण त्यातल्या काही मवाल्यांची नजर, बायकांकडे आणि तरुण सरला वरून फिरत होती. अश्लील हात वारे करून ते खिदळत होते. सरला थरथर कापायला लागली. आगीतून फुफाट्यात पडली होती बिचारी. सैतानांच्या तावडीत गाय सापडली होती.अखेर आमच्या चौघीतली एकजण पंजाबीण धिटाईने उभी राहिली.त्यातल्या त्यात बुजुर्ग,सभ्य वाटणाऱ्या लोकांना तिने हात जोडले. "भाईसाहेब रक्षाबंधन सणाचे महत्व तुम्ही जाणता, ही राखी मी तुम्हाला बांधते आमचं रक्षण करा.." असं म्हणून तिने ओढणीचा काठ फाडला आणि म्हणाली "आज राखी पौर्णिमा नाही, तरी पण मी तुम्हाला राखी बांधतीय.आमचे चौघींचे धर्माचे भाऊ व्हा.आणि आमचे रक्षण करा." असं म्हणून तिने ओढणी पसरून संरक्षण मागितलं.आणि काय सांगू! एका क्षणात चित्र पालटलं त्या वयस्कर सज्जनांनी असभ्य तरुणांना दम भरला. भुकेल्या बाळाची भूक भागवण्यासाठी असहाय्य आईला बाकावर बसवलं. थर थर कांपणाऱ्या सरलाच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले " बहेनजी हम लोग आपका कुछ नही बिगाडेंगे...माँ बहन बेटी को मिलने के लिए हम हमारे देश जा रहे थे.मगर रास्तेमेही हमे माँ बहेन बेटी मिल गई. हमारे होते हुए कोई माई का लाल आपका बाल भी बाकॅl नहीं करेगा "l आणि ते धर्माचे भाऊ शेवट्पर्यंत शब्दाला जागले. त्यांच्या शब्दात इतकी जरब होती की त्यांच्यातल्या गुंडानी माना खाली घातल्या नंतर 30 भावांच्या जीवावर आम्ही चौघी बहिणींनी निर्धास्तपणे पुढचा प्रवास केला. अबला स्त्रिया सबला झाल्या तरी, 25..30 पुरुषांपुढे त्या दुबळ्याच ठरल्या असत्या. तरण्या ताठ्या सरलाच्या बरोबर आमच्या तिघींच्या डोळ्यासमोर काहीही, अगदी काहीही अघटीत होऊ शकलं असतं. पण नाही.. त्या दानवांतले देव जागे झाले होते.खरंच जगात देव आहे. कुठलाही रूपाने तो आपल्या पाठीशी उभा राहतोच राहतो...

 रात्रीचे दोन वाजले. अखेर भुसावळ आलं लहानग्या माझ्या प्रसादला कडेवर घेऊन सरलाला सांवरत सामान सांभाळत आम्ही ब्रिज ओलांडला.कारण ब्रिजच्या अलीकडे आमचं क्वार्टर होतं. ब्रिजच्या पलीकडे असलेलं सरलाचं घर आम्ही गाठलं.अपरात्री अनोळखी माणसांच्या बरोबर आपल्या लेकीला बघून आई-वडील भांबावले.सरला आईकडे धावली. आईच्या कुशीत शिरल्यावर इतका वेळ आंवरून धरलेला सरलाचा अश्रूंचा बांध कोसळून वाहू लागला. गांगरलेल्या आई-वडिलांना शांत करून,आम्ही सारी हकीगत त्यांना सांगितली. तेंव्हा हात जोडून ते म्हणाले, " तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात.आणि माझ्या मुलीला इतक्या अपरात्री सुखरूप आणलंत तुमचे उपकार आम्ही कसे फेडू? आम्ही म्हणालो, " नाही हो! उपकार त्या देवांचे, देव माणसांचे माना त्यांच्यामुळेचं सरला, मी, माझा मुलगा आणि त्या दोन सहप्रवासिनी बचावल्या आहॊत....मित्र-मैत्रिणींनो संपली माझी रेल्वे प्रवासातील सत्यकथा. पण लिहीतांना मनांत आलं , तेव्हा मोबाईल नव्हते. फोन किंवा मोबाईल शाप की वरदान आहे ? हा

ऐरणींवरचा प्रश्न सोडवण्याची ती वेळ नव्हती.पण हेही तितकच खरं कीं जगात माणुसकी आहे. मुळात माणूस वाईट नसतोचं त्यावेळची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. जगात दानव आहेत, तसेच दयाळू पण आहेत. दानशूर ही आहेत आणि माणुसकी जपणारी देव माणसं पण आहेत. ह्याची प्रचिती या सत्य घटनेतूनच मला आली. 

 शेवटी हेच म्हणावसं वाटतं की स्त्रियांनी हिम्मत धरली पाहिजे पंजाबीणीच्या खंबिर प्रसंगावधानतेमुळेच अनर्थ टळला होता. आणि पुढचा प्रवास सुखाचा झाला होता.. तर मंडळी असा झाला तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रवास  

धन्यवाद 

 

 लेखिका..सौ राधिका माजगांवकर पंडित पुणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू