पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गाडी बुला रही है

*गाडी बुला रही है ...* 

 

 

" अगं आई , तू आधी चढ , मी आणते सामान, एक तर तुला पायाचा त्रास , त्यात तू ही बॕग घेऊन कशी चढशील ? 

 

    शामलच्या  नाजूक हातात दोन मोठ्या बॕग्ज . एक बॕग घेऊन बाबा चढले , पाठोपाठ लंगडत लंगडत आई पण चढली . दोन जड बॕग्ज घेउन शामल दोनच पावलं पूढे जाऊ शकली . ती बॕग खाली ठेवणारच इतक्यात एका मजबूत हाताने एक बॕग स्वतःच्या हातात घेतली...

 

" डोन्ट वरी , मै हू ना !" 

 

शामलने त्याच्याकडे बघितलं आणि पहिल्याच नजरेत  अथांग स्वप्नाशय उसळून यावा असं काही  तरी तिला  झालं .

उंचपूरा , स्मार्ट अन् हसरा तरूण तिची बॕग घेऊन रेल्वेमध्ये धावतच चढला आणि  चढल्यावर तिची दुसरी बॕग घ्यायला त्याने हात पुढे केला तेव्हा  शामलने बॕग न देता स्वतःचा हात हातात दिला..

 

" हो ओ...मैने बॕग मांगी थी , आपने हाथ थमा दिया ." 

 

     हसत हसत तिला त्याने वर ओढलं आणि दुसरी बॕगही लगेच दुसऱ्या हातात घेतली.

 

    शामलला खूप अवघडल्यासारखं झालं ..." किती  मूर्ख नं आपण , लगेच हात हातात दिला " ती मनातल्या मनात स्वतःला कोसत होती.

 

" क्या सीट नंबर है आपके ?" 

 

      जितेशच्या आवाजाने ती भानावर आली. गाडी खच्चून भरलेली होती. हा रिझव्हेशनचा डबा आहे की जनरल हेच कळत नव्हतं. 

 

" अरे भाई ,ये हमारी सिट्स है...ये देखो हमारी तिकिट ." 

 

 बाबा कुणावर तरी ओरडत होते. 

 

  " बाबा काय झालं ? आपलं  रिझव्हेशन कन्फर्म होतं नं ? मग हे कसे बसले आपल्या  सिट्सवर ? 

 

" अरे टी.सी. ला पैसे दिले म्हणतात यांनी...त्यांनीच जागा दिली म्हणत आहे." 

 

" अंकल मै देखता हू , आपकी टिकीट दिखावो ? 

 

 तरूणाने पोलिसांचा धाक दाखवून सिट्स खाली करून घेतल्या. बॕग्ज खाली लावून दिल्या आणि  तिघांना व्यवस्थित  जागा करून दिली. 

 

" अच्छा अंकल मै बाजू के डबे मे हू , कुछ  प्राॕब्लेम हो तो बताना ." 

 

 " बेटा , तुझं नाव काय आहे ? 

 

" जी मेरा नाम जितेश है, मै गुजरात जा रहा हू एक काम के सिलसिले मे. "

 

 जाता जाता  हसतच एक कटाक्ष त्याने शामलकडे टाकला आणि  शामलला जाणवलं ते हृदयाचं संगीत..."लव्ह अॕट फस्ट्र साईट ...खरच असतं का  असं ? इतक्या वर्षात असं  संगीत या हृदयात वाजलच नाही , जे आज वाजत आहे ."

 

     शामल हरवली स्वतःतच...आजुबाजूला बंगाली तरूणांची गर्दी , काळे घामेजलेले चेहरे , कुणी बनियन वर तर कुणी हाफ पॕन्ट घालून , कसलातरी कुबट वास वातावरणात पसरलेला , वर बर्थवर बसलेल्या काळपट तरूणांची नजर शामलवर खिळलेली...शामलने वर बघितलं आणि  पुन्हा तिकडे बघायची तिची हिंमतच झाली नाही ...."अठरा तास कसे काढायचे या गाडीमध्ये ? एक विचार मनात  आला आणि  लगेच दुसरा विचार आला  जितेश आहे की  बाजुला....एका क्षणात किती  जवळचा वाटायला लागला हा ! ...खरच काही  तरी आहे आमच्यात जे ओढत आहे एकमेकांकडे...त्याला पण तेच वाटत असेल का ? जे मला वाटतय ...जातांनाची त्याची नजर तर तशीच होती ." 

 

      शामलच्या मनातले विचार काही  केल्या थांबेना...बाबांची मात्र त्याच मुलांबरोबर   दोस्ती झाली होती ज्यांच्यावर ते ओरडले होते... त्यांच्या  गप्पा सूरु होत्या . आई पण त्या गप्पात सहभागी झालेली. शामलला त्या गप्पात जरासाही रस वाटेना...एरव्ही ती पण अशीच मिसळायची नविन लोकांमध्ये...पण आज नेमकं काय बिघडलं तिचं तिलाच कळेना. मनातल्या तरंगाचं हे उसळनं तिच्या प्रसन्नतेला मारक तर ठरणार नाही  असही तिला वाटून गेलं.

 

      अकोला स्टेशन आल्यावर गाडी थांबली. खिडकीतून दोन चहाचे कप  जितेशने बाबांच्या हातात दिले...

 

" अंकलजी ये लिजिये गरमागरम चाय ." 

 

" अरे वा ! याची गरज होतीच बेटा . थॕक यू ." 

 

   जितेश फक्त हसला आणि  गाडी सुरु व्हायच्या अगोदर शामलच्या शेजारी येऊन बसला .

 

" ये लिजिये  आपकी काॕफी."

 

शामल त्याच्याकडे बघतच रहाली . याला कसं कळलं मला काॕफी आवडते म्हणून ...काॕफीचा कप हातात घेतांना त्याच्या बोटांचा निमुळता  स्पर्श  तिला सुखावून गेला. 

 

" आपको कैसे पता मुझे काॕफी पसंद है ?" 

 

शामलच्या प्रश्नावर तो गूढ हसला . त्या हास्याचा नेमका अर्थ लावता येईना. 

 

" चलो , मै आपनी सिट पर जाकर बैठ जाता हू l  कुछ चाहिए तो मुझे आवाज दिजियेगा l " 

 

 पुन्हा जातांना त्याचं ते बघणं शामलला घायाळ करून गेलं. त्याचे बोलके डोळे की त्याचा भारदस्तपणा , त्याचं लाघवी बोलणं की त्याच्या वागण्यातला गोडवा ...नेमकं काय असेल जे मला त्याच्या कडे ओढत आहे ?...शामल पुन्हा  त्याच्यात हरवली . 

 

 अकोल्यावरून  पुन्हा गर्दी वाढली. आईला वाॕशरुमला जायचं होतं. शामलने आईचा हात धरला आणि  तिला हळूहळू नेत असतांना वर बसलेले ते तरूणही खाली उतरले आणि शामलच्या मागे चालायला लागले. शामलला वाटलं जितेशला आवाज द्यावा , पण हे फक्त  वाटणं होतं .प्रत्यक्षात  तिने तसं काही  केलं नाही . तिने आईला  वाॕशरुमचं दार उघडून दिलं आणि  ती दाराजवळ उभी होती तसे ते दोघे तरूण तिच्या जवळ येऊन उभे रहाले. क्षणभर तिला कळेना काय होत आहे ते...ती मनातून घाबरली होती पण तसं तिने दाखवलं नाही . ती त्यांना बोलणारच तितक्यात जितेश तिथे आला...

 

" कुछ प्राॕब्लेम है ? जरा घबराई हुई लग रही है आप ?" 

 

जितेशने त्या दोघांकडे बघत बघत  शर्ट च्या बाह्या वर केल्या तसे त्याचे दणकट बाहू बघून ते दोघं तिथून सटकले.

शामल पुन्हा त्या दणकट बाहूवर भाळली. आई बाहेर आल्यावर तिला पण वाॕशरुमला जायचं होतं पण ती तिथेच घुटमळली . ही बाब जितेश च्या लक्षात आली तसा तो आईला म्हणाला , " चलिये आंण्टीजी , मै आपको लेके जाता हू l 

 

 आईने शामल कडे बघितले . तिने नजरेनेच वाॕशरुमला जात आहे असा इशारा करताच ती जितेशसोबत निघाली. 

 

शामल वाॕशरुममधून बाहेर आली तेव्हा  जितेश उभाच होता. शामलला पुढे करून तो पाठोपाठ चालायला लागला . तेव्हढ्यात  एक छोटा मुलगा बर्थ वरून नेमका त्याच वेळी खाली आला आणि  शामलला धडकला. शामलला जितेशने पकडले म्हणून  ती पडता पडता वाचली पण त्या रांगड्या स्पर्शाने ती मोहरली. जितेश तिचे दोन्ही हात धरून होता...आणि त्याच्या  धडधडत्या छातीवर शामलचा  चेहरा आला तसा तो तिने बाजूला हटवला ...तिने वर बघितलं तर जितेशचे डोळे तिच्यावर खिळलेले...हात अजूनही त्याने पकडलेले . शामलचे गाल आरक्त झाले . ती लाजली तसे त्याने हात अजूनच घट्ट केले...शामलला वाटलं तो क्षण तसाच थांबून जावा...

 

" साॕरी ताई " 

 

मुलाच्या आईच्या  आवाजाने  शामल अवघडली तसा जितेशच बोलला , " इसमे साॕरी की क्या बात है...बच्चा है , ऐसी उछलकुद करेगा ही."  

 

शामल तिच्या  सिट वर आली पण आता ती तिची रहालीच नव्हती...जितेशच्या स्पर्शाने मोहरलेली ती त्या झुळूकेला पुन्हा पुन्हा अनुभवत होती. अंग अंग साद घालत होतं जितेशला . तो आतला आवाज त्याने ऐकला असावा कारण जितेश पुन्हा  तिच्याजवळ येऊन बसला. अगदी जवळ ...कारण जागाच नव्हती तरी तो तिच्या शेजारी थोड्या जागेत बसला . शामलच्या आईने फराळ काढला. चौघांनी मिळून फराळ खाल्ला . कुणाच्या  लक्षात येणार नाही  या बेताने शामलचा उष्टा लाडू त्याने तोंडात टाकताच शामल फारच लाजली. गप्पा करता करता जेवनाची वेळ झाली. जितेश तिथेच डबा घेऊन आला...गप्पा आणि  जेवन सोबतच सुरु होतं आणि  ओझरते स्पर्श पण...या सगळ्यात शामलचं खाणं कमी मोहरणं जास्त होत गेलं...जितेशने बर्थ टाकून दिले ... आई बाबा खालच्या बर्थवर आणि  शामल सर्वात  वरच्या बर्थवर झोपायला गेली. जितेशने सर्वांना गूड नाईट केलं आणि  तो पण झोपायला गेला. 

 

" शामलजी आपको आज निंद नही आयेगी ." 

 

बाजूच्या वरच्या बर्थवरून जितेशच्या हळूवार आवाजाने शामल दचकली. 

 

" क्यो नही आयेगी निंद ? 

 

" खूद सोचिए ....मै बस बता रहा हू !" 

 

दोघांच्या मध्ये फक्त  एक लोखंडी जाळी... किती  जवळ आलो आपण ...हे विचारही शामलच्या गालावरून मोरपीस फिरवणारेच .

 

" देखा..मैने कहा था नं...निंद नही आऐगी !" 

 

" आप सो जाइये,  तभी  मुझे निंद आयेगी l"

 

 शामलनी लडिवाडपणे उच्चारलेल्या वाक्यावर तो हसला . 

 

" शामलजी , अपना  कल तक का सफर कल ही खत्म होगा की जिंदगीभर चलेगा ?" 

 

" मतलब ?"  शामलला काही  सुचेना 

 

"  मतलब ,ऐसा लग रहा है की ये सफर कभी खत्म न हो  और ये दुरी भी न रहे जितनी अभी है l " 

 

    शामल लाजली...उठून बसली...जितेशने हात जाळीवर ठेवला तसा शामलने त्याच्या हातावर हात ठेवला....मध्ये लोखंडी जाळी...

 

" थोडा नजदिक आइये ..."

 

शामलनी चेहरा जाळीजवळ नेताच जितेशने ओठ जाळीवर ठेवले....स्पर्श न करता दोघंही केवळ संवेदनांनी  तादात्म्य पावले .

 

         दूस-या दिवशी दोन वाजता गाडी अहमदाबादला पोहोचणार होती. वेळ थांबून जावी असे दोघांना वाटत असतांनाच स्टेशन आलं ...दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि  जड अंतःकरणाने निरोप घेत वेगवेगळ्या वाटेने निघाले. पण त्यांच्या  वाटा जुळणारच होत्या . दुसऱ्याच दिवशी मोबाईलवर बोलणं सुरु झालं. आवडी निवडी विचारणं सूरु झालं. प्रेमात आकंठ बुडालेले हे प्रेमी आईबाबांच्या नजरेतून कसे सुटणार ?... बाबांनी शामलला विचारपूस करून जितेशला बोलावून घेतले . त्याच्या आईबाबांना बोलवायला सांगितले पण त्याचे आईबाबा आलेच नाही . जितेशने त्यांची तब्येत  बरी नाही  हे कारण सांगून स्वतःच लग्नाची बोलणी केली आणि याच शहरात व्यवसाय करणार म्हणून वचनही दिलं. जितेशचा लाघवी स्वभाव व याच शहरात राहणार म्हणून  आईबाबांनी लग्नाला होकार दिला. धुमधडाक्यात लग्न पार पडलं आणि राजाराणीचा संसार सूरु झाला. शामलनी महिनाभर सुट्या घेतल्या होत्या त्या संपल्या. महिनाभराने ती शाळेत जायला निघाली .

 

" रुको मै छोड देता हू l " 

 

" क्यो , मै स्कूटी से चली जाऊंगी l "

 

शामलच्या जवळ येत जितेश म्हणाला , 

" आजसे तुम्हे स्कूल मे छोडना और लाना मेरा काम है l " 

 

   शामलसाठी हा धक्काच होता पण ती काही  बोलली नाही . जितेश तिच्या शाळेत आला .  सर्वांनी हसत हसत त्याचं स्वागत केलं पण हा कुणाशीच नीट बोलला नाही . दिवसभर आॕफिसमध्ये बसून होता. शाळा सुटल्यावर  शामलला घरी घेऊन गेला. दुसऱ्या  दिवशी पुन्हा तिला शाळेत  सोडायला तयार होता , तशी शामल म्हणाली. 

 

" मै चली जाऊंगी , तुम मत आओ ." 

 

" क्यो , तुम्हे क्या गप्पे लडाने है वहाॕ जाकर ,जो मै आने से नही हो पायेंगे ?" 

 

   शामलला बसलेला हा दुसरा झटका . तरी थोड्या मोठ्या आवाजात ती बोलली 

 

" तो तूम  दिनभर वहाॕ  बैठकर मुझपर निगाह रखोगे ?"

 

" आवाज निचे...मुझे औरतोकी बडी आवाज पसंद नही l "

 

शामल कोसळली . हाच का तो जितेश जो आपल्या  आवाजावर फिदा होता . तिला कळतच नव्हतं की हा अचानक बदल कसा झाला , की मुळातच हा असा आहे .                             

 

     जितेशने शामलचं इतर शिक्षकांसोबतचं संभाषण बंद केलं. तिचा मोबाईल पण तो जवळ बाळगू लागला. मुख्याध्यापकाचा फोन आला तरी हाच बोलायचा. आई बाबाकडे स्वतः सोडून द्यायचा आणि एका तासात घ्यायला जायचा. शामल लवकर  निघाली नाही  तर शिव्या देत भांडण करायचा. शामलचा जीव काची पडायला लागला. ती जितेशला घाबरू लागली . नोकरी असूनही आपण हा त्रास का सहन करतो हेच तिला कळेनासं झालं . जितेशवर जिवापाड प्रेम केलं पण आता प्रेमाचं रुपांतर भीतीमध्ये होत गेलं. काय करावं या विचारात असतांना शामलला बाळाची चाहूल लागली. आईबाबा म्हणाले , बाळ झाल्यावर होईल सगळं नीट पण जितेश अजूनच चिडका अन् संशयी होत चालला होता . दोन तीन वर्षे पुन्हा  त्याचा त्रास सहन करण्यात गेले आणि  परत दुसऱ्या  बाळाची चाहूल लागली. शामल पुन्हा  या अवघड संसारात अडकून पडली. आई म्हणायची, सोडुन दे त्याला. पण तिला भीती ही होती की त्याला सोडुनही तिची सुटका होणार नाही  कारण जितेश तसा बोलून दाखवायचा , तिला मारण्याची धमकी द्यायचा. असा हा अवघडलेला संसार सतरा वर्षे चालला . मुलांसाठी ती सर्व सहन करत होती . एक दिवस शामलचा मुलगा तिच्या पर्स मधले पैसे चोरून पळाला . सर्वांनी त्याला  शोधून आणलं .घरच्या वातावरणामुळे तो बिघडायला लागला होता.तो घरी रहायला तयार नव्हता. शेवटी आजीआजोबा त्याला त्यांच्याकडे  घेऊन गेले. मुलगी शिकायला पुण्याला गेली. शामल एकटी पडली. ज्या मुलांसाठी तिने संसारांची घडी विस्कटू दिली नाही, त्याच मुलांनी तिच्या  आयुष्याची घडी मोडायला सुरवात केली होती.  आता मात्र  ती पूरती ढासळली . आईबाबा व शाळेतल्या सर्वांनी समजावलं की घटस्फोट घेऊन टाक . सोपं नव्हतं ते पण अशक्यही नव्हतं. कुठेतरी स्वतःचा विचार करणं भाग होतं.  संसारात गुदमरलेली शामल मोकळा श्वास घेऊ बघत होती. 

 

      औरंगाबादला शाळेची सहल जाणार होती . हिंमत करून शामलने जितेशला न सांगता जाण्याची  तयारी केली .जितेश घरी आला  अन्   बॕग भरलेली दिसताच म्हणाला , 

 

" कहाॕ भागने की तयारी की जा रही है ?" 

 

" स्कूल की ट्रीप जा रही है औरंगाबाद  l 

 

" तूम नही जा रही हो , मैने कहा तो बात फायनल हो गयी l "  

 

    शामल शांतच होती , सायंकाळी 5.30 ची ट्रेन  होती. सर्व विद्यार्थी घेऊन शिक्षक शिक्षिका तिथेच जमणार होते.  पाच वाजायला काहीच मिनिट बाकी होते. आता निघायला हवं म्हणून  शामलने बॕग उचलली आणि बाहेर पडली . आॕटो उभा होताच . ती त्यात बसली आणि  आॕटो सूरु झाला. " अर्धाच  तास बाकी आहे भाऊ , जरा लवकर  चला ".  तिने जितेशकडे बघत म्हटले. जितेश तिला बघतच राहिला. गाडी प्लॕटफाॕर्मवर येऊन तयार होती . दादरा चढेपर्यत शामलला वेळ झालाच होता.  ती धावत निघाली , दोन्ही हातात बॕग सावरून धावणं कठीण होतं .एक मदतीचा हात आला तिची बॕग पकडायला पण तिने नकार देत म्हटले , 

 

" माझं ओझं मलाच वाहायचं आहे. आय विल डू इट." 

 

मैत्रीणींनी गाडीतूनच हात दिला तो ही तिने घेतला नाही .   शामल बॕग घेऊन स्वतः चढली ...कुणाच्याही आधाराशिवाय. खिडकीजवळ बसली आणि  गाडी सूरु झाली . गार हवा आत येत होती आणि  शामल   त्या गारव्यात मोकळा श्वास घेत  होती...

 

   याच गाडीत आपला प्रेमाचा प्रवास सूरु झाला होता  आता त्याला थांबवून मोकळा श्वास घेण्याचा निर्णयही याच गाडीत घेतला तर .....शामल स्वतःशीच हसली. 

 

 

           सौ. वर्षा मेंढे

            अमरावती

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू