पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सांगून ठेवते

*सांगून ठेवते*



गेला संपूर्ण आठवडा मी दादीला जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते नीटसं जमत नाही मला. जे काही सांगायचे ते माझ्या एकट्यासाठीच नसून ते आमच्या कुटुंबाच्या वतीने तिला सांगायचं आहे. हे सारे दिवस मी माझ्या मनाशी वाक्यं जुळवत आहे, शब्द शोधत आहे. कुटुंबातली जबाबदार व्यक्ती म्हणून ही कामगिरी नकळतच माझ्यावर येऊन ठेपली आहे. पण आता समजतं आहे की हे काम सोपं नाही. मी जे तिला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर दादीची नेमकी प्रतिक्रिया काय होईल याचा अंदाज  मला नीटसा घेता येत नाही. कधी वाटतं तिला दुःख होईल, तिला आमच्या विषयी काय वाटेल? ती तळमळेल, कदाचित भांडेल, त्रागा करेल पण तरीही वाटतं तशी दादी समंजस आहे. मी जे तिला सांगेन ते ती शांतपणे नक्की स्वीकारेल.


 एक दिवस दादी मला म्हणाली,” का रे बाबा! तुझा चेहरा का असा उतरलेला? कसली काळजी करतो आहेस? माझ्या आजारपणाची ?अरे मी औषधे वेळेवर घेते आहे ना? आणि हे बघ मला इतक्यात तर काहीच होणार नाही. मी खूप जगणार आहे. मला खूप जग  बघायचं आहे. तुम्हा सगळ्यांचं सगळं मी माझ्या हातानं माझ्या मनासारखं करणार आहे. सांगून ठेवते..”

 मग मी काय बोलणार? काय सांगणार तिला ?


दादीचा गोरापान, तांबूस  कांतीचा चेहरा,ठसठशीत बांधा, देखणे अवयव, त्यावरचे खुलून दिसणारे गोठ, पाटल्या, एकदाणी आणि चापून चोपून नेसलेले स्वच्छ काठ पदरी लुगडे, आणि साऱ्या घरभर तिचे ते अविरत तुरुतुरु चालणे.


 आमच्या कुटुंबावरच दादीचा केवढा मोठा प्रभाव आहे! खरं म्हणजे ती आहे म्हणूनच हे कुटुंब टिकले. आम्ही सारे भाऊ, आमच्या बायका, त्यांच्या विविध आवडीनिवडी, वेगवेगळे स्वभाव, इच्छा आकांक्षा, लग्न होऊन दूर गेलेल्या बहिणींचे माहेरी येणे जाणे, त्यांची मुलं आमची मुलं या सर्वांचा एक सुसूत्र समेट दादीमुळेच जुळून आलाय. तिच्या व्यक्तिमत्त्वातच असा काही चमत्कार आहे की सहसा तिच्यापुढे कुणीच जात नाही. या कुटुंबाची वीण तिने जुळवली आहे. त्यात तिच्या प्रेमाचे धागे अडकले आहेत.ती कुणाला बोलली, तिने कुणाला दुखावलं तर तेही हृदयात प्रेमाचा डोह साठवून.  आमच्या कुटुंबाचा दादी म्हणजे  एक मजबूत कणाच आहे. घरात भांडणं झाली, मतभेद झाले तर दादी गुपचूप ओट्यावर येऊन बसते नाहीतर गंगीच्या गोठ्यात जाऊन गंगीच्या पाठीवर हात फिरवत बसते. जणू तिला सांगते,” उगीच भांडतायेत हे. काही कळत नाही बरं त्यांना. तुला सांगून ठेवते.”

 हं! फारच झालं तर निंबोणीच्या पारावर जाऊन वाती वळत बसते. पण कुणाचेही भांडण मिटवायचा प्रयत्न ती करत नाही. काही वेळ जातो, काही दिवस जातात पुन्हा कुटुंबाचा सुसूत्रपणा टिकून राहतो. दादी उगीच कुठेही ढवळाढवळ करत बसत नाही. कुणाची बाजू घेत नाही आणि कुणाला खडसावतही नाही. मात्र कधीतरी माझ्या बायकोला किंवा धाकट्या भावाच्या बायकोला म्हणेल,

“ का ग! आज गंगाफळाची भाजी केली आहेस ना मग बाबू काय जेवेल? त्याला आवडत नाही ती भाजी. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी कर हो .आण तो लसूण मी सोलून देते. लसुण, कांदा घालून केलेला लाल मिरचीचा ठेचा त्याच्यासाठी करून ठेव. सांगून ठेवते ..”

धाकट्या भावाच्या बायकोच्या पाठीवर हात फिरवून म्हणेल,” अगं !आपल्या नवऱ्याची काळजी आपणच घ्यावी. त्याला काय आवडतं काय नाही हे आपणच लक्षात ठेवावं. कंटाळा करू नये ग! असेल हो तुमची स्त्री मुक्ती नाहीतर नारी स्वातंत्र्य आणि ते काय समान हक्क. आता तुम्ही शिकल्या सवरल्या, पैसे मिळवता म्हणून तुम्हाला हे कळतं. तसच  वाटतं. पण खरं सांगू गंगा यमुना आटतील पण स्त्रीचे मन नाही बदलणार. ते असंच पिंगा घालेल बरं तिच्या घराभोवती तुला सांगून ठेवते.”


 हे खरं की खोटं, योग्य की अयोग्य, जुनं की नवं हा संघर्ष नंतरचा. पण दादी जे बोलते ते तिला तसंच वाटतं म्हणून ती बोलते. तुम्हाला ते पटवून घेतलं पाहिजे असं नाही. तिची गुंतवणूक आणि तिचा अलिप्तपणा याचा संगम इतका सुरेख आहे की म्हणूनच आमच्या कुटुंबावर तिचा जबरदस्त पगडा आहे. एका अनामिक शक्तीने तिने हा डोलारा  सांभाळला . पाठीच्या कण्यासारखा .कदाचित ती आमच्यातून गेली.. ती नसली तर?

 आणि मग जेव्हा जेव्हा माझ्या मनात आज तिला हे सांगायचं ,आता लवकरच हा निर्णय घ्यावाच लागेल असा विचार आला की वाटतं पण दादीला हे असं व्हावं का? दादी इतकी निर्मळ, निष्पाप, सेवाभावी, इतकी स्वच्छ टापटीपीची. ती आजारी झाली, तिचं दुखलं खुपलं  म्हणून ती कधीही निजून राहायची नाही. तिच्या कुठल्या कामात कसूर नाही. मग बाळाची आंघोळ असू दे, नातीची रिक्षा आली नाही तर घेईल दप्तर धरेल तिचं बोट आणि चालेल तुरुतुरु “चल ग बाई! घरात मीच रिकामी आहे, तुझी शाळा नको बुडायला. येताना रामाच्या मंदिरातही जाऊन येईन. नातही खुशच असते आजी बरोबर शाळेत जायला.


 आणि वयाच्या या उतरणीवर अण्णांचं काही कमी करावे लागतं का तिला? त्यांचं गरम पाणी, दूध, नाश्ता अजून ती त्यांच्या बाबतीत सुनांना सांगत नाही. मोलकरणीच्या हातून धुतलेले धोतर त्यांना आवडत नाही म्हणून दादी त्यांचं धोतर स्वतःच्या हाताने धुते. किनारी सारख्या करून, काठाला काठ जुळवून अगदी परीटघडी सारखं त्यांच्या हातात ठेवते.

 गेल्या वर्षीच अण्णांना एक सौम्यसा हृदयाचा झटका येऊन गेला. अण्णांना तिनं एखाद्या फुलासारखं जपलं. तिचा तो मूकपणा! कामाची लय! सेवेची तन्मयता अजोड होती. किती उपास धरले, किती नवस केले, किती पोथ्यांची पारायणं केली. दिवस-रात्र अण्णाजवळ बसून राहायची. औषधांच्या वेळा सांभाळायची. ते झोपले तर ती झोपायची. ते जेवले तर ती जेवायची. कधी अण्णांनी रडावं, धीर सोडावा, निर्वाणीची भाषा बोलावी मग कठोरपणे तिनेच त्यांना दटवावं.

“ अहो आम्ही तुमची इतकी सेवा करतोय तर तो ईश्वर काही डोळे झाकून ठेवेल का?”

 त्या दिवसात मी तिला म्हणायचोही “अग! दादी जरा स्वतःकडेही बघ. कशी दशा झाली आहे तुझी आणि घरात करणारे आहोत ना आम्ही?  उद्या तुलाच काही झालं तर?”

 मग दादी चष्मा काढायची, पदराच्या टोकांनी  शिणलेले डोळे पुसायची आणि माझ्याकडे नुसती बघायची. तिच्या नजरेतील भाषाच जगातल्या सर्व भाव-भावांना छेदून जाते असंच मला वाटायचं .


अण्णा बरे झाले, हिंडू फिरू लागले मग दादीचं मन  निवारलं. ती हसू लागली, बोलू लागली, सुनांना हाका मारू लागली. 


आज मला वाटतं— जग कितीही पुढे जाऊ दे, कुठलंही युग येऊ दे, सुधारणांचं, नवमतवादाचं पण व्यक्ती व्यक्तीच्या मनात जे पाप-पुण्याचे संकेत टिकून आहेत ते तसेच अचल राहणार. जेव्हा डॉक्टरने म्हणाले,” दादीला हे असं व्हावं याचं मलाही आश्चर्य वाटतं. पण त्याला आता इलाज नाही. शिवाय आता वैद्यकीय शास्त्र पुढे गेलय्. औषधही खूप आहेत आणि लेप्रसी  हा रोग तसा असाध्य नाही. तो संपूर्ण बरा होऊ शकतो. फक्त अवधी फार लागतो. कदाचित तीन—चार— पाच वर्षेही लागू शकतात. घरातील लहान मुले आणि इतरांचा विचार करता दादीला तुम्ही…”

 डॉक्टर जसजसे बोलत होते तस तसे माझ्या नसानसात ठोके घणघणत होते. मी पार ढेपाळून गेलोय्  असं वाटत होतं.  एखादा जुना वृक्ष कडकडून कोसळतोय, नाहीतर दूरच्या त्या पर्वताचा कडाच तुटून घरंगळत खाली येतोय असं भासत होतं.

 डॉक्टरांनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता,” मी तुझी मानसिक स्थिती समजू शकतो. समाजात या रोगाबद्दल अजून खूप गैरसमज आहेत. तो अनुवंशिक आहे,  संसर्गजन्य आहे वगैरे वगैरे.”

 पण मी दादीला घरी घेऊन आलो तेव्हा अगदी विचित्र मनस्थितीत होतो.  आमच्या कुटुंबावर आलेलं हे एक धर्म संकटच वाटलं मला.  मी याच समाजाचा एक घटक होतो आणि त्या अनुषंगानं माझ्याही मनात एक अनामिक भय दाटलं होतं.  एकीकडे दादीवरचं अपार प्रेम तर, दुसरीकडे स्वतःचच हित, स्वतःच स्वास्थ, प्रतिष्ठा वगैरे.  खरोखरच काय बरोबर, काय योग्य, काहीच सुचत नव्हतं. आमच्या कुटुंबाचा कणाच डळमळीत झाला होता.


 दादीची मात्र गडबड चालूच होती.

“ काय म्हणाले डॉक्टर ?इतका का तुझा चेहरा उतरलाय? आणली आहेस नाही औषधं? मी घेईन हो ती वेळेवर, जरा सुद्धा टाळणार नाही बघ.”

“ दादी ही औषधं तुला बरीच वर्ष घ्यावी लागतील. घेशील ना?”

 एवढेच मी कसंबसं म्हणालो.

“ काय झाले  आहे मला?तो  कॅन्सर झालाय का? मरणार आहे का मी?”

 मग मात्र दादीला मी कडकडून मिठी मारली.” नाही ग दादी तसं काहीच झालेलं नाही तुला. तू मरणार नाहीस. पण  “

 पुढे माझे ओठ उघडलेच नाहीत. मग तिनेच माझ्या केसातून मायेने  हात फिरवला. दादीचा तो मायेचा स्पर्श अजून मला माझं लहानपण आठवून देतो.

“ तू असाच रे बाबा! हळवा लहानपणापासून. पायात बोचलेला काटा हि कुणाला काढू द्यायचा नाहीस. कसा रे तू? चांगली आहे मी. बरीच होईल मी. मला काय झालंय?”

 

पण त्या दिवशी दुपारभर ती झोपून होती. पोटाशी पाय दुमडून. आज ती खरंच थकलेली वाटत होती त्या सर्व वैद्यकीय चाचण्यांमुळे., कुठे कुठे टोचलेल्या सुयांनी ती बेजार झाली होती. तिच्या अंगावर शाल पांघरली तेव्हा वाटलं दादीने काही पाप केले का? या जन्मी नाही तर मागच्या जन्मी? पाप पुण्याचे हे भोग बिचारीला अशा रीतीने चुकते करावे लागणार आहेत का?

 नोकरा चाकरांना आठवणीने कामाच्या पसाऱ्यातही पटकन न्याहारी देणारी, कुणाला जास्त काम पडतंय असं वाटलं की पटकन पुढे जाऊन हातभार लावणारी दादी म्हणजे सगळ्यांचा आधार.

मंदाकाकी वारली तेव्हा तिच्या लहान लहान मुलांना रात्रभर धरून बसली. त्यांच्याबरोबर रडली पण आणि त्यांना समजावलं पण.

 एक मात्र होतं दादी तशी कंजूष  फार! कुणी पैसे मागितले तर पटकन देणार नाही.  फारच कोणी पाठ धरली तर हळूहळू कनवटी  सोडून एखादं  नाणं अगदी जीवावर आल्यासारखं हातावर ठेवेल.  भाजी बाजारात गेली तर घासाघीस करून भाजी  घेईल आणि प्रवासाला निघाली तर हमाल करणार नाही. जमेल तिथे पायी पायीच  जाईल, नातवंडांवर प्रेम करेल खूप पण कुणी कधी शेंगदाणे घेण्याचे म्हटलं तर म्हणेल ,”अरे !या पावसा पाण्याचे शेंगदाणे खाऊ नये. नरम असतात. पोट दुखेल.”

 पण हा काय तिचा इतका मोठा अवगुण होता का की त्याची ईश्वराने तिला एवढी मोठी शिक्षा द्यावी. माझ्या मनाला आता एक चाळा लागलाय— दादी बद्दल चुकीचे, काही अयोग्य, काही दूर्वर्तनाचे शोधून काढायचा.


 बऱ्याच वेळा दादी म्हणायची,” रुक्मिणी वहिनीवर फार अन्याय झाला रे आपल्या कुटुंबात. तिचा नवरा मेला.  पण तिचा हक्क होता ना इस्टेटीवर. तिला काही मिळू दिले नाही रे कोणी. कुणीच काही तिच्यासाठी करू शकलं नाही. अगदी मी पण नाही. शेवटी संपत्ती म्हटली की जो तो स्वार्थीस बनतो रे !सांगून ठेवते..”

 पण त्या रुक्मिणी वहिनींचे शाप, तळतळाट एकट्या दादीलाच लागावेत का?

 मग जो जो माझ्या मनात विचार येतात तो तो वाटतं की दादी वाईट नाहीच. कधी कुणाशी भांडत नाही, कुणाचा हेवा मत्सर करत नाही, कुणावर रागा करत नाही, नाही पटलं तर दूर होते, उगीच कलकल करत नाही, कुणाला वाईट शिकवत ही नाही.


 समोरच्या माई आमच्याकडे नेहमी येतात. आल्या की त्यांच्या सुनेबद्दल सांगत बसतात. ही अशी ना ही तशी. “कधी नव्हे तर बेबी माहेरपणाला  आली पण ही स्वतःच माहेरी निघून गेली. शोभतं का हे? कधी तिच्या पोरांना हात लावणार नाही, त्यांच्यासाठी काही चांगलं चुंगलं बनवणार नाही. आपणच उठाव आणि आपणच करावं अशा वेळी.”


 दादी मात्र  चटकन म्हणते,” बस कर ग! तुझंच चुकतंय. हे बघ मुली परक्या असतात  सुनाच आपल्या असतात. त्यांनाच पुढे आपलं करावं लागणार असतं. आणि  चांगली तर आहे तुझी सून. सगळं तर करते की नीटनेटकं.  गेली असेल एखादे वेळेस माहेरी. त्यांनाही मन असतं सांगून ठेवते..”

 दादीच्या बोलण्यावर माई संतापतात, जाता जाता म्हणतात,” तुझं बरं आहे ग बाई. नक्षत्रासारख्या सुना आहेत तुझ्या. तुझी उत्तम बडदास्त ठेवतात, काळजी घेतात.”

 मग माईंच्या डुलत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत दादी किंचित हसते.  हसताना तिचे ओठ विलग होतात. भुवयांच्या मध्ये एक बारीक लाट उमटते.  तिच्या अशा चेहऱ्याकडे पाहिलं की मला असंच वाटतं की जगातल्या साऱ्या भाव-भावनांना छेदून जाणार  तिचं  हे कणखर  मुकेपण आहे. 


भावना, व्यवहार आणि वास्तववादाच्या वेगवान झोक्यावर माझं मन हिंदकळत आहे. आपण करतोय ते बरोबर आहे का ?आपण स्वार्थी तर नाही? तिने आम्हाला लहानच मोठं केलं. आमच्या सुखदुःखाशी ती तन्मयतेने एकरूप झाली. ज्या कुटुंबासाठी तिचं अंत:करण तिळतिळ तुटलं त्यातून तिला निराळं करणं, अगदी तांदळातल्या खड्यासारखं वेचून बाजूला करणं हे माणुसकीच तरी आहे का? हेच आमच्या बाबतीत कुणाला झालं असतं तर ती अशी वागली असती का? देह, मन एक करून ती आमच्या पाठीशी उभी राहिली असती. तिच्यात प्रचंड सामर्थ्य होतं, मग आपण एवढे थिटे का? आपल्या मनात हे भय का? केवळ स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या सुखासाठी! असेच नव्हे का? आपली भक्ती, श्रद्धा, इतकी लुळी आहे की दादीच्या सहवासात राहण्याचं सामर्थ्य आपल्यात असू नये? आपण दादीची पाठवणी करायला निघालो, तिला दूर ठेवायला तयार झालो.


 पण मग मन पुन्हा वास्तवतेचा किनारा गाठतो. यात अयोग्य काहीच नाही आणि हे काही कायमस्वरूपाचं नाही. ही योजना फक्त काही वर्षांसाठीच आहे आणि ती दादीला नक्कीच मान्य होईल  कारण आम्हा सर्वांवर तिचं अपरंपार प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ती सारं काही समजून घेईल, निराश होणार नाही.


 आज ना उद्या तिला सांगावच लागेल आता उशीर नको. परवाच बायको म्हणाली, दादींना कसं सांगावं समजत नाही. त्या स्वयंपाक घरात येतातच. म्हणतात इतकी काही मी आजारी नाही. एवढे जपू नका मला. आण ती कणीक.मळून  देते.”

 “आम्ही काही बोललो तर दादींना वाईट वाटेल. दुःख तर सर्वांनाच होतं आहे. हे असं नकोच  होतं व्हायला. पण आता लवकरच तुम्ही…”


 मला बायकोचं बोलणं फारसं आवडलं नाही.  तीव्र वेदना जाणवली पण मग वाटलं तिचं तरी काय चुकलं?

 मी खिडकीतून बाहेर पाहिलं. दादी गंगीच्या गोठ्यात होती. गंगीला  हिरवा चारा भरवत होती, गंगीच्या फुगलेल्या पोटावर ती हात फिरवत होती, तिला गोंजारत होती. दादी गोठ्यातून बाहेर येऊन निंबोणीच्या पारावर बसली. आणि मी तिच्याजवळ गेलो. संध्याकाळची शांत वेळ होती. कोण कुठे कोण कुठे होतं. आजूबाजूला सारीच शांतता. हालचाल नव्हती. कसली वर्दळ नव्हती. आसपास कोणीच नव्हतं. इतके दिवस मी तिला जे सांगायचं ठरवत होतो ते आताच सांगूया. हीच योग्य वेळ आहे असं मनाशी ठरवून मी तिच्या जवळ गेलो.

“ दादी..”

 पण आताही दादीच म्हणाली,” बाबू! या गंगीची मला काळजी वाटते रे! या खेपेस तिला फार जड जाईल असं वाटतेय्.  एखादा चांगला डॉक्टर बोलाव. हातीपायी  नीट सुटका झाली पाहिजे रे तिची. जनावरांनाही दुखतं  बरं..

 सांगून ठेवते.”

दादीला सगळ्यांची काळजी.घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून ते गाई गुरांपर्यँत ती अशी प्रेमाने बांधलेली आहे.ती आमचा खांब आहे.

 मी उठलो, घरात आलो आणि मला तीव्रतेने जाणवलं की मला जे दादीला सांगायचं ते मी कधीही सांगू शकणार नाही. ते धाडस माझ्यात नाही. ती शक्ती माझ्यात नाही. पण असं काही होईल का की दादीचं दादीलाच समजेल. तिची तीच माझ्याजवळ येईल आणि म्हणेल,” एवढी काय काळजी करतोस बाबू ?चल ही बघ मी तयार आहे. केव्हा निघायचं ?आणि बरी झाल्यावर परत येणारच आहे की मी. असं समज  मी इतके दिवस कुठेतरी तीर्थयात्रेला गेले आहे त्यात काय एवढं ?”

असं झालं तर किती बरं होईल? साराच प्रश्न चुटकीसरशी सुटेल. सारं काही हसत खेळत सामंजस्यांनी होईल. कुठेही किल्मिष उरणार नाही. गढूळपणा असणार नाही.


 धाकट्या भावाचा बाळ आज फार रडतोय. तसा संध्याकाळी तो किरकिर करतोच पण आज जरा जास्तच रडतोय, कळवळतोय. दूध घेत नाही, पाणी पीत नाही. काहीतरी दुखत असेल त्याचं. जोरजोरात हमसून हमसून रडतोय. त्याचं ते रडणं आणि आकाशात पसरणारे गडद नारंगी लाल रंग! विशाल आकाशात चमकणारा एकच तारा कसा भकास एकाकी वाटतोय! असा एकुलता एकतारा दिसला की मनातली इच्छा बोलून दाखवावी ती पुरी होते म्हणे.पण आज मनातल्या साऱ्या इच्छा अशा कोळपूनच गेल्या आहेत. मन निमूट बंद झाले आहे. सारे प्रवाह थंड झालेत, गोठलेत.

 दादी घरात आली आणि तिने पटकन रडणाऱ्या बाळाला जवळ घेतलं, कुरवाळलं, त्याच्या हाता, पायावरून पोटावरून, गोंजारलं, त्याच्या गालाचे खारट पापे घेतले, त्याला छातीशी धरलं मग एक पाय दुमडून तिनं  त्याला मांडीवर उपडं ठेवलं,थोपटलं .बाळ हळूहळू शांत झाला. झोपी गेला.

  •  दादीची आणि बाळाची ती जवळीक पाहून माझ्या छातीत चर्र झालं! एक भीती दाटून आली. तीच भीती.. त्याच आकाराची, त्याच रंगाची.

 थोड्या वेळाने मला माझ्या डोळ्यासमोर काही दिसेना. पांढऱ्या पांढऱ्या लाटा, काळे काळे ठिपके, त्यावर हळूहळू पसरत जाणारा अष्टवक्री एक जीव भयाण, भेसूर.

 दादी नसेल तर या घराचे या परिवाराचे काय होईल?दादी आमच्या कणाकणात सामावलेली आहे.


 सकाळ झाली. हळूहळू घर जागं झालं. व्यवहार सुरू झाले, नेहमीचेच. अण्णाही उठले होते, आज बंब अण्णांनीच तापवला. दादी अजून उठली नव्हती. हल्ली तिला सकाळी झोप लागते. आम्हीही तिला उठवत नाही. परवाच म्हणाली,” अरे या गोळ्यांनी मला कशी गुंगी येते रे! बधिर वाटतं, जीव घाबरतो माझा, झोपावसं वाटतं.”

 आज गंगीही खूप हंबरत होती. तिचेही दिवस भरलेत. कालच दादी म्हणाली त्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरला आणावं लागेल.


 माझ्या टेबलवर श्री देशपांडे यांचं पत्र पडलेलं होतं. जिथे दादीला पाठवायचं होतं त्या संस्थेच्या संचालकाच पत्र होतं ते. मी ते पत्र हातात घेतलं, उलट सुलट केलं आणि मला काय वाटलं कोण जाणे मी ते फाडून टाकलं. तुकडे तुकडे केले आणि कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले. दादी  कुठेही जाणार नव्हती. दादी कुठेही जाऊन चालणार नव्हतं. दादी शिवाय आम्ही जगूच शकणार नाही.


 हा आवाज माझ्या मुलीचाच होता. आजी शिवाय तिला करमतच नाही. जोरजोरात ती आजीला उठवत होती. “आजी उठ ना ग! त्या बदामाच्या झाडावर बघ एक वेगळाच पक्षी आलाय. तुर्रेवाला. आणि त्याचे पंख तरी बघ किती रंगाचे.. पिवळे निळे लाल ,.इतका छान गातोय.. आजी उठ ना, चल ना तो पक्षी बघायला. लवकर उठ ना आजी. नाहीतर तो उडून जाईल. आजीss आजीss “


मग आम्ही सारेच आजीच्या खोलीत गेलो.ँंंं

 ‘दादी’.

 तिची गोरी पान तांबूस चर्या. ठसठशीत बांधा. त्यावर उठून दिसणारे तिचे गोठ, पाटल्या, एकदाणी.

शांत  झोपली होती ती. तिचे ओठ किंचित काळसर होऊन विलग झाले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला पुन्हा एकदा वाटले जगातील साऱ्या भावभावनांना छेदून जाणारी तिची ही शांत मुखचर्या!  जणू बंद ओठातून ती म्हणतेय् “ अरे बाबू! केव्हांच ओळखलं होतं रे मी सारं. मिटवली ना मी तुझी काळजी? सोडवला ना मी तुझा प्रश्न? सुखी राहा रे बाबांनो! सांगून ठेवते..”

 माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी आले. भोवती साराच कल्लोळ! दादीss दादीss दादीss

दादी आमच्यातून निघून गेली. अशी सहज, शांतपणे. तिचं प्रेम, वात्सल्य, अपरंपार अजोड, उपमा नसलेलं. तिच्या सामंजस्याला कुठे तोडच नाही. मी तिचे ताठरलेले पाय धरले,

“ नाही ग दादी! तू आम्हाला हवी होतीस. सगळ्यांना खूप खूप हवी होतीस,सतत, सदैव आमच्याच सोबत. तू तर आमच्या जीवनाचा कणा होतीस.”

 गोठ्यात गंगी हंबरत होती. बदामाच्या झाडावर पक्षी अजून गात होता…


 *राधिका भांडारकर*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू