पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला आवडलेले पुस्तक: उद्या

“उद्या” लेखक - नंदा खरे, मला आवडलेले पुस्तक. 

(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होऊन लेखकाने आनंदाने नकार दिलेले पुस्तक) 

   खरंतर साहित्यिक, वाचक, रसिक म्हणून मी खूपसारे आवडीने वाचले आहे. एक विशिष्ट कथानक, एखादंच पुस्तक खूप आवडतं असं कोणीही म्हणू शकत नाही. लेखकाचा दृष्टिकोन हा प्रत्येक साहित्यकृतीतून वेगवेगळा असतो. त्यातील समाजानुभूती ही मात्र महत्त्वाची असते. याप्रमाणेच आवडती कादंबरी म्हणून ‘उद्या’ लेखक नंदा घरे याकडे मी बघतो आहे.

   अनंत यशवंत खरे हे नाव अगदी मराठी वाचकांना २०२० पासून चर्चेत आलेलं. तेवढंच त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीची चर्चा जनसामान्यात पोहोचली’ त्याला कारण २०२० चा सदर कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे. नंदा खरे या टोपण नावाने लेखन कार्य त्यांनी केले असून ते नागपूर स्थित होते. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचं लगेच निधनही झालं

   “आजवर मला समाजाने भरपूर दिले. त्यामुळे मी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचा अभंग आनंद व्यक्त करीत तसे विनम्रतेने पुरस्कार नाकारतो आहे.” असे नंदा खरे माध्यमातून बोलून गेले, तेव्हा खरंतर या कादंबरीला वाचण्याची उत्सुकता वाढीस लागली आणि खरंतर ती तेवढ्याच तीव्रतेने अंत:करणात भरल्या गेली आहे.

   ‘उद्या’ ही कादंबरी नागपूर वैदर्भीय प्रांतातील कथानक, अस्सल बोलीतील शिव्याही यात आल्या आहेत. आधुनिक जगात जगणाऱ्या लोकांपासून अगदी तळागाळात पिचलेल्या आदिवासी समाजापर्यंतचा वेध घेणारी ही एक महत्त्वपूर्ण कादंबरी होय.

   खरंतर साहित्यिकांच्या लेखनातून भावी पिढीची यात्रा सुखकर होण्यास जागर व्हायला हवा. याकरिता ऐतिहासिक व वर्तमान परिस्थितीचा यातून प्रसंगात्मक वापर करीत पुढल्या दिशा मिळायला हव्यात. मात्र आजचे साहित्य बहुतांशी मनोरंजन हेतूने निर्माण होत आहे. हे खेदाने म्हणावे लागेल. आजच्या साहित्यिकांनी खरंतर रसिकांनी नंदा खरेचे निर्माण साहित्य वाचून अवलोकन केले तर! नंदा खरेच्या साहित्यातून मनोरंजन, स्वप्नरंजन, स्मृतिरंजन असा प्रकार आढळून येत नाही.

   नंदा खरे यांनी ‘बखर अंतकाळाची, संप्रति, अंताजीची बखर, जिवोत्पत्ती आणि नंतर, नांगरल्याविन भुई, दगडावर दगड विटेवर वीट, विस्टोपत्रास, बखर अनंतकाळाची, वाचताना पाहताना जगताना, ज्ञाताच्या कुंपणावरून, कहाणी मानवप्राण्याची.’ अशा अनेक पुस्तकातून उद्याच्या पिढीला नव्या आशा दिल्या आहेत. याच मालिकेत ‘उद्या’ ही कादंबरी ही डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा वाचण्याचा विषय होणे हे महत्त्वाचे ठरले आहे. यात नंदा खरे यांनी इतिहासकालीन प्रसंगांना खुबीने वापर करून आपल्यापुढे बरेचसे विचारमंथन ठेवलेले आहे.

   ‘उद्या’ ही कादंबरी तशी चाकोरीबद्ध नाही. यात मुख्य कथानक, कथासूत्र, उपकथन व उद्याचा विचार याचे सूत्रसांगड घालून कथानक पुढे सरकतो तेव्हा कादंबरीचा आवाका लक्षात येतो. कथेचा भाग आणि त्यानुरूप आलेले संदर्भ, विवेचन, चिंतन व स्पष्टीकरण अशा नवीन पद्धतीने गुंफलेली ही नाविन्यपूर्ण, कल्पनात्मक, प्रयोगात्मक कादंबरी होय.

   कथानकाचा विचार केल्यास गडचिरोली ते मुंबई, दिल्ली अशी महानगरीय ते देश-विदेश पसरणारा हा विचारप्रवाह आहे. जंगलात जगणारे चार आदिवासी, त्यांना सहकार्य करणारे महानगरातील उच्चशिक्षित यात एक निवेदक सुदीप जोशी आहे. चेहरे वाचून तंत्रज्ञानाद्वारे समोरचा माणूस काय विचार करतो, याचा नेमका अंदाज आराखडा शोधताना अरून सन्मार्ग व बायको त्यांच्या मनातील भावभावनांची उकल करणारी ही कादंबरी होय. प्रत्यक्षात कादंबरीचा कथानकाचा पट इतका मोठा आहे की चार शब्दात कथानकावर लिहिणे हे अशक्यच.

   कादंबरीतील पात्रात आज व पुढील काळात जे कार्पोरेट जग आहे त्या जगाचा विचार देणारं मध्यवर्ती केंद्रबिंदू इथलं कथानक होते. आज आधुनिक तंत्रज्ञान, सुखसोयी, सॉफ्टवेअरच्या काळात स्वतःच्या आधारकार्डाला अस्तित्वकार्ड दर्शविणारा हे युग पुढे कसे असेल? काय होईल? या प्रश्नचिन्हावर लेखकाचे रेंगाळणारे मन आणि चिंता व चिंतनाचा विषय तेवढाच या गर्दीत जगण्याच्या आलेखाची तीव्रता दर्शवणारी ही वेधक कादंबरी होय.

   जीवनात आलेला संकुचितपणा आज बोलावयासही ‘ब्र’ नाही. सदोदित भीती, दहशत की हुकूमशाही वृत्तीने येऊ पाहणारे आक्रमण. काय? काय? विचार येतात. सध्या परिस्थितीत एक दहशत... श्रीमंताचं जग, जगणं, कॅमेरालेन्स, इंटरनेट, मायाजाळ, दैनंदिन जीवनातील बदलत चाललेली सवय व ती साधने.... यातून मिळवायचं साध्य किती? किती वर्णने ‘उद्या’ कादंबरीत बघावी.

   नागरीकरण, बहुराष्ट्रीय कंपन्या अनिर्बंध सत्ता, खाजगीपणाचे आक्रमण, असमानता व संघर्ष, तुडविल्या जाणारी संवेदनशीलता, आर्थिक वृद्धीकडे जाऊ बघणारा मानवसमाज आणि अशा जगण्यातून मनावर येणारा ताण, प्रलोभनातून होणारे संपत्ती व अधिकाऱ्याचे केंद्रीकरण, यातून बोथट झालेला सामान्य माणूस यांचे ‘उद्या’ काय?

   आपण आपले जगणे दृष्टीआड करतो आहोत काय? आज होणारा बदल ‘उद्या’ आपल्याला तारेल, मारेल... यातूनच पुढे... उद्या....

   लेखकाचे मन कादंबरीच्या पात्रात इतके सखोल गुंतले की निसर्ग व प्राणी प्रतिकात्मक उदाहरणाद्वारा आपलं अस्तित्व दर्शवितो आहे. हत्ती, सर्वेलन्स, तंबूतील उंट, लोगो आन् पेन, लक्ष्मीची पाऊले, जंगलातील शेत, सुस्वरूप कन्या, बच के कहा जाओगे, ज्याची त्याची श्रद्धा, मूळ पारंब्या, सरडे, लांडगेतोड, तीन कुत्रे अशा उपकथात्मक सूत्रात झालेली साचेबंद कथानकाची दीर्घ मालिका यात ‘उद्या’ खरी उतरली आहे. यामुळेच ती पुरस्कार प्राप्त तेवढीच पात्र आहे. मात्र या संवेदनशील काळात आज घडणाऱ्या घटना प्रसंगातून चिंतामय मन कुठेतरी ते पुरस्कार नाकारतेय यात फार मोठे जीवनाचे गणित दडलेलं दिसून येते. वाचक म्हणून ती उत्तरे सहजच कादंबरीत सापडतील. ही कादंबरी एकदा वाचून मनाला उथळही वाटेल. पण अंतरंगात धुमसत, मुरत जाणारी, मनाची कवाडे बेभानपणे खोलत मुक्त जगण्याचा श्वास होणारी, ही शैली बघून या कादंबरीला आवडत्या स्थानावर दिशादर्शक म्हणून ठेवणे क्रमप्राप्त यामुळेच ठरले आहे.

   “आजची स्थिती बिघडत जाते आहे. असं जे अमूर्त वाटणं ते एका गोष्टीच्या वेणीसारखं होणं, जे घडणार ते नेमके केव्हा? हे माहीत नसतानाही... आज जे दिसत आहे ते उद्याही... हा उद्या नेमका केव्हा?” नंदा खरे किती सखोल चिंतन करायला लावतात.

   एकंदरीत भविष्यकाळाच्या गंभीर विषयाला हात घालत जागतिक पातळीवर सामाजिक, आर्थिक, तांत्रिक पातळीवर होणाऱ्या महाकाय बदलाची नोंद घेत व्यवस्थेवर प्रहार करणारी टीकात्मक कादंबरी होय.  

   “जवाईबी तय्यार, अशी पोरगी माही!” पुसलं कोन तं म्हणे. “तुहा पोरगा, चाल सालं त्यालाच करून घेतो.” “हसत राहिलो आपण तं साली किस्मतबी हसवत जाते.”

   अगदी वेधक तेवढेच बोलीभाषेतील संवाद, सोबतच प्रमाणभाषा, तंत्रज्ञानातील अनेक शब्द, इंग्रजी भाषेतील प्रतिमा व संदर्भीय उदाहरणे यात लेखक अगदी चपखलपणे आपली मार्मिक शैली वापरून वाचकाला बेधुंद करून जातात.

   सी. एल. इ. ओ. म्हणजे सायबर लॉ इनफॉरसिमेंट ऑर्गनायझेशन. ग्रीक भाषेत इतिहासाच्या दैवताचं नाव. अशा प्रकारे अनेक नव्या शब्दांची भर आपल्याला प्रत्येक प्रकरणात जाणवते. इंग्रजी, विज्ञान, हिंदी यातील अनन्यसाधारण शब्द या कादंबरीतून येताना बरीचसी ज्ञानात भर पडते. सोबतच लेखकाची लेखनशैली ही भुरळ पाडताना काही हिंदी मार्मिक वाक्यप्रचार तथा प्रसिद्ध गाण्याचाही संदर्भ देत वाचनाच्या गोडीला समोर नेतो तेव्हा कादंबरीतील रस अधिकच वाढत जातो. कादंबरीतील निवेदन आणि येणाऱ्या पात्रांचे संवाद अगदी मनाला वेधून घेतात आणि आपण स्वतःला भविष्यकाळातील उद्याच्या प्रश्नात गुंतवून घेत, चिंतनशील होऊन विचारमंथन करीत राहतो.

   भृणहत्या, गर्भजल परीक्षा, भारतीयांना अपत्य म्हणून मुली नको ही भेदक समस्या, यावर भावी चिंतन जेव्हा ‘सरडे’ या उपकथानकातून लेखक समोर आणतात तेव्हा आपलं मन समाजशास्त्रीय, धर्मशास्त्रीय आणि नीतीशास्त्रीय विचार करून जीवशास्त्रातील संशोधनवाटा शोधण्यास कटिबद्ध होतो. प्रस्तुत कादंबरीत खूप नवीन काही वाचावयास मिळते. तिथे आलेले विज्ञान विषयक शब्द त्यातील संदर्भ प्रत्येक प्रकरणात समोर येताना एक वाचकाला नवा आनंद देतात. वाचन पातळीवर वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी ही कादंबरी आहे.

   दुःख आणि अन्याय अशा डिस्टोपियन प्रकारातील ही कादंबरी, प्रलयकथा, काल्पनिक घडामोडीची स्थिती असलेली युटोपिया या आधी प्रकारात मोडणारी, राज्य आणि कार्पोरेशन यातील दरी, संरक्षण व्यवस्था आणि सर्वेलन्स अंतर, स्त्री पातळीवरील हंटिंग असे विभिन्न भेदक प्रश्न, विदर्भातील भाकरे गुरुजी मानसिक आधार देणारे पात्र, सानिका धूरु धाडसी पत्रकार, नितीन भक्ते अशी पात्रे उपकथनकाद्वारे धागे एकत्र करून उत्कंठावर्धक शैलीत रसिकांना घेऊन जाणारी. खरेच या कादंबरी बद्दल लिहिणं तसं कठीणच...! पण वाचावी अशी गंभीर, चिंतनीय व उद्यासाठी महत्त्वाची तेवढीच...

‘उद्या....’ 

मनोविकास प्रकाशन, पुणे.

लेखक

संजय येरणे,

नागभीड. 

मो. ९४०४१२१०९८

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू