पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला आवडलेले मराठी पुस्तक - शेकरा

शेकरा. रणजित देसाई यांनी लिहिलेली ही शेवटची कादंबरी. आपल्या कादंबऱ्यांतून ग्रामीण, दलित, ऐतिहासिक, पौराणिक आणि नगर जीवन मूल्यप्रेरणेने रणजित देसाईंनी हाताळले. 'शेकरा' कादंबरीने वन्य-जीवनाचे एक आगळे अनुभवविश्व साकारले आहे. हे प्रामुख्याने प्राणिजीवन असते. प्राणी आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जंगलात जगतात. कादंबरीतील प्राण्यांचे जंगल जीवन बघितल्यावर जगाच्या पाठीवरील आदिम जीवनाचे उग्रभीषण स्वरूप आपल्याला विकसित मानवी जीवनाच्या विरोधात प्रभावीपणे जाणवते. 'शेकरा' वाचल्यानंतर मानवाने पशुत्व ते मानवत्व गाठलेला दीर्घ पल्ला जाणवतो. या प्रवासाचा आरंभबिंदू म्हणजे 'शेकरा' असे मानता येईल, इतके प्रभावी या कादंबरीचे लिखाण आहे.
'शेकरा' म्हणजे खारीसारखा दिसणारा, पण तिच्याहून मोठा असा शाकाहारी प्राणी. हा दिवसभर जंगलात भटकतो. झाडांवरची रसाळ मधुर फळे खातो. याच्या प्रकृतीत भटकेपणा आहे. म्हणजे हा 'आवारा' आहे. इतर प्राणी-पक्ष्यांचे जीवन तो आपल्या जिज्ञासू मोठ्या डोळ्यांनी दुरून बघत असतो. यामुळे आपल्याला हुप्पे, माकडं, वाघ, हरीण, सांबर, भेकरं, अस्वल, रान-डुकरं, गवे, घारी-गिधाडे, ससाणे, खोकड, मोर व इतर पक्षी, वनस्पती, पाऊस, पाणी, कडे, पहाड, डोंगर, पाण्याचे विविध प्रवाह हे सर्व अतिशय नाट्यपूर्णतेने आणि जिवंतपणे, त्यांच्या अनेक जिज्ञासावर्धक हालचालींसह आपल्या समोर फिरताना दिसतात. हळूहळू यांचे दैनंदिन जीवन आपल्यासमोर उलगडते. त्यांचे बारकावे पाहून थक्क व्हायला होते. या सर्वांचे भक्ष्य-भक्षक संबंध, त्यातील क्रौर्य, रौद्र रूप, निष्पाप निरागसता आपल्याला खिळवून ठेवते. नीतिनियम, कायदे, परंपरा, पापपुण्यं, उचितानुचित, सद्सद्विवेकबुद्धी, रूढी, संस्कृती यांनी बंदिस्त असलेला आपला मानवी समाज बारा आणि सुसह्य आहे, ही कल्पना आपल्याला सुरक्षित करते.
या कादंबरीत कुठेही मानवी जीवन किंवा वन्य जीवनावर थेट भाष्य नसून सुद्धा कादंबरी प्रतीकरूप झाली आहे. मानवी मूल्ये कशीही असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक जण हिंस्र पशू असतात आणि दुबळे त्यांचे भक्ष्य होतात. निसर्गातील हे क्रौर्यनाट्य वन्य काय अथवा मानवी काय, जीवनात सतत सुरूच असते. हे स्थायी सत्य सूचित करणारी अशी ही 'शेकरा' नावाची अत्यंत आगळीवेगळी कलाकृती आहे. ही दुर्मिळ कथा असून प्रत्येकानी वाचावी अशी आहे. अत्यंत प्रतिभाशाली असे 'रणजित देसाई' होऊन गेले, ज्यांच्या लेखनाच्या सुवर्णमुकुटात ही कादंबरी पाचूसारखी केंद्रस्थानी शोभावी अशी आहे..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू