पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझे आवडते पुस्तक: महोत्सव

  “माझे आवडते मराठी पुस्तक” या विषयावर विचार व्यक्त करायचे म्हणजे, विचार करायलाच दोन दिवसाचा वेळ घ्यावा लागला. कारण मराठी साहित्य खूप समृद्ध आहे आणि त्याचे लेखक तर विचारूच नका. साने गुरुजी,आचार्य अत्रे,वि. वा.शिरवाडकर,ना. सी. फडके,वि. स. खांडेकर,पु. ल. देशपांडे,राम गणेश गडकरी, चिं. त्र्य.खानोलकर,शांत शेळके, व. पु. काळे,असे अनेक दिग्गज लेखक आहेत. याशिवाय आणखीही कितीतरी लेखकांचे सुंदर साहित्य मराठीत उपलब्ध आहे. त्यातून एका लेखकाचे एक पुस्तक निवडून ते का आवडले लिहायचे,म्हणजे एक पर्वणीच,खूपच चांगला मौका,अवसर. 

           त्यातून मी व. पु. काळे ह्यांच्या पुस्तकाची निवड केली. त्यांची सर्वच पुस्तके अतिशय सुंदर,त्यातल्या एकाची निवड करायची म्हणजे कठीण काम होते. तरीही मला सर्वात आवडलेले त्यांचे पुस्तक म्हणजे ‘महोत्सव’. अहाहा!!! जितक्या वेळा वाचाल आपली उत्सुकता वाढवते आणि आपले विचारचक्र सुरु होते. इतकी संवेदनशील लेखन शैली की,वाचताना आपण भारावून जातो. हसता हसता डोळ्याला पाणी आणणारे व गहन विचार करायला लावणारे लेखन असते. जगणे ही एक कला आहे आणि ती प्रत्येकाने अवगत करायलाच हवी,असा संदेश अगदी सहजपणे ते आपल्या लेखनात देऊन जातात. 

           ‘महोत्सव’ या कथा संग्रहातील कथाही काहीशा अश्याच आहेत. त्यांचे लेखन सामान्य माणसाच्या अवती भवतीच असते. सामान्यांच्या जीवनाला भिडणाऱ्या,समृद्ध करणाऱ्या कथा आहेत. आपल्या लिखाणातून जगण्याचे तत्वज्ञान सोप्या पण रंजक पद्धतीने अगदी सहजपणे सांगणारे साहित्यिक म्हणजे व.पु. होय. लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे,कथा संपताना अचानक येणारे कथेचे वळण. त्यांच्या कथा माणसांच्या नातेसंबंधाच्या, माणसाच्या मनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या,मनाचे मृदू,व काटेरी कंगोरे दाखवणाऱ्या. त्यांचे लेखन इतके जिवंत आहे की,कथा प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभ्या राहतात. कथेच्या पात्रांबरोबर आम्ही देखील मिसळून जातो. त्यांच्या सुखाशी,दुःखाशी आम्हीही समरस होऊन जातो. कथा वाचल्या नंतर एक एक प्रसंग मनात रेंगाळत राहतात आणि एखाद्या प्रत्यक्ष पात्रांसारखे डोळ्यां समोर तरळून जातात. 

           कथेतील प्रत्येक विचार खरंच खोलवर विचार करायला बाध्य करतात. आयुष्यातील अडचणींचे समाधान देणारे विचार आहेत. असे म्हणतात की,प्रत्येक पुरुषात एक स्त्री मन असते व प्रत्येक स्त्री मध्ये एक पुरुष व्यक्तिमत्व असते आणि ते अगदी खरे आहे. अर्ध नारी नटेश्वरा सारखे. वपुंनी स्त्री मनाला इतके खोलवर जाणून घेतले आहे की,त्यांच्यातले स्त्री मन त्यांच्या ह्या कथा वाचताना ओळखू येते.किती संवेदनशील आणि स्त्री मनाला समजून घेणारा लेखक आहे !!!त्यांच्या कथांमधील ‘ कोटेशन’ सुद्धा हृदयाला जाऊन भिडणारे,विचार करायला लावणारे. कधी कधी तर मन सुन्न करणारे. त्यांचे कथेतील उतारे वाचल्यावर आपल्यामध्ये एक उमेद येते,धाडस येते आणि हीच त्यांच्या लेखनाची ताकद आहे. 

           त्यांच्या मते “एका क्षणात दृष्टीकोण बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या आवडली नाही तर फेकून देता येते,पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे. स्वतःचे मालकीचे चोरले न जाणारे असे खूप क्षण असतात पण दुसऱ्याकडे एखादा क्षण मागितला की,आपण भिकारी झालो,स्वतःचं सम्राटपण विसरलो असं समजायचं”. 

           महोत्सव या पुस्तकातील कथा जास्त करून स्त्री पात्रांच्या आजूबाजूला लिहिल्या गेल्या आहेत. स्त्रीचे मन,तिची परिस्थिती हाताळण्याची ताकत,त्या बद्दल तिचे विचार आणि अगदी सहजपणे त्यावर मात कशी करावी

हे कौशल्य कथांमध्ये दाखवले आहे. संसारात समोर आलेल्या समस्यांना स्वीकार कसे करायचे व त्यांना अंगी बाळगण्याचं सामर्थ्य स्त्री मध्येच असते,फक्त तीच करू शकते. 

           ह्यातली ‘बांधावरचा’ ही कथा तर अप्रतिम,माझी सर्वात आवडती कथा. वाचताना अंगावर काटा येतो. ही एका मतिमंद मुलाची व त्याच्या आईची गोष्ट आहे. संपूर्ण गोष्ट वाचताना आपण आईचे विचार व तिचे आयुष्यातले समायोजन वाचून भाराऊन जातो. तिच्या मतिमंद मुलाचा सांभाळ करताना तिला आलेल्या अनुभवातून ती खूप काही शिकते. त्या मुलातच तिला तिचा गुरु भेटतो. ती म्हणते “गुरु तुम्हाला काहीच देत नाही,तुम्ही काय घेता ह्यावरच सारं निर्भर आहे. गुरूकडून समजून जे हवे ते घेतल्यास तुम्हाला पिसासारखं हलकं व्हायला होईल. कदाचित हीच मुक्ती असावी”. वर्तमान पत्राच्या एका तुकड्यात तिला एक मजकुर सापडतो,”निसर्ग प्रत्येक कलाकृती संपूर्ण घडऊनच पाठवतो. कोणतीही व्यक्ती अपूर्ण नसते. पुर्णत्वातून पूर्णत्वच निर्माण होतं आणि तरीही मागे पूर्णत्वच उरतं. अपूर्ण व्यक्तीही अपूर्ण म्हणून पूर्णत्वालाच पोचलेली असते” ह्या उताऱ्याने तिचं आयुष्यच बदलून जाते. हे विचार तिच्या अनुभवातून आलेले असतात. ह्या सगळ्या संघर्षात ती एकटी वाटचाल करीत असते. नवऱ्याची काहीच मदत नसते. म्हणतात नं,”माणसाला दुःख आणि दुखणं प्रयत्न पूर्वक हटवावी लागतात. 

           ‘जलधार’आणि ‘दान’ह्या दोन्ही गोष्टी देखील स्त्रियांच्या मानसिक अवस्थेवरच लिहिलेल्या. संसारात अथाह पैसे,पण बाकी काहीच सुख नाही. तेव्हा त्या पैश्याचे महत्व काहीच राहात नाही. स्त्रीला संसारात पैसे नाही तर तुमचा वेळ,प्रेम,सहवास हवा असतो. ते जर मिळाले नाही तर ती बदलून जाते. ती तसाच संसार स्वीकार करते व फक्त ऍडजेस्ट करत राहते आणि दुसऱ्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. इतर कोणाही कडून ती काहीच अपेक्षा ठेवत नाही,कारण तिच्या मते “कुणी कुणाला घडवू शकत नाही. आजूबाजूला असंख्य संसार पाहिले म्हणजे आपण आपला संसार कसा करायचा हे ज्याचं त्यानं शिकायचं असतं”. 

           स्त्री प्रमाणे पुरुषाचे व्यक्तिमत्वही त्यांनी उत्तम साकारले आहे. दीक्षित,बाकरे,गुरु व मणी ही चारही पात्रे वपुंनी गजबची रेखाटली आहेत. आपापल्या परीने सर्वांची कहाणी निराळीच. ‘ट्रस्टी’नावाची गोष्ट समजायलाच थोडा वेळ लागतो. कोणी इतकेही कसे संसारातील समस्यांना समजून लगेच सावरू शकतं,आश्चर्यच वाटते. वपु. म्हणतात “संसारात पडलं की,तोल सावरायचा कसा,एवढंच माहित करून घ्यायचं. सर्व गोष्टींचा स्वीकार करून जगा समोर वेगळेच रूप घेऊन,कोणालाही काहीही कळू न देता,चेहेऱ्यावर कोणतेही भाव येऊ न देता जगत राहायचे. जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे. संसाराचा भार घ्यावा,तो पालखी सारखा,पालखी मधल्या आराध्य दैवताचे नाव असावं “समर्पण”. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की,संसाराचं झंझट आलंच. नियतीने तुम्हाला जीवनरथ जन्मापासून बहाल केलाय. आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे. कोणत्याही माणसात बदल होईल ही अपेक्षाच नको. तेंव्हाच आयुष्याचा प्रवास ही एक आनंदयात्रा ठरेल”. 

          “ खरं तर संसारात सगळंच रुटीन असतं पण त्या रुटीनला जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की,रुटीनचं प्रोटीन होतं. संसारात ज्या व्यक्तीवर आपलं तुफान प्रेम असतं, त्या व्यक्तीला मुक्त करावं,जखडून ठेऊ नाही. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये हा निसर्गदत्त गुणधर्म असतो,पुरुष संकल्प करू शकतो आणि स्त्री समर्पण”.म्हणूनच स्त्री पुरुष एकमेकांचे पूरक आहेत. संसाराच्या रथाचे दोन चाके आहेत. दोन्ही चाके जोडून ठेवण्याची जिम्मेदारी दोघांवर असते. दोघे एकमेकांना जितकं जास्त समजून वागतील तेवढे संसार सुरळीत चालतील. 

           वपुंचे लेखन कौशल्य अप्रतिम आहे. विनोद करता करता हृदयाला जाऊन भिडते, व कधी टचकन डोळ्यात पाणी येते लक्षातंच येत नाही वाचन झाल्यावर बराच वेळ विचारचक्र चालूच राहते. त्यांनी आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्वज्ञान सोप्या पद्धतीने शिकवले आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाने मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. मराठी साहित्य आणखीनच समृद्ध झाले आहे. 

           खरे पहिले तर वपु हे एक वास्तुविशारद. पण आपल्या लेखणीतून त्यांनी शब्दांचे महाल बांधून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले,स्थापित केले. त्यांच्या मते,”आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं,आयुष्याचा महोत्सव करायचा असतो”. 

 

 

 

अंजली राम मोघे   

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू