पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझे आवडते मराठी पुस्तक : चौथा अंक

समीक्षा :- चौथा अंक 

लेखिका :- माधवी रवींद्र महाजनी 

शब्दांकन :- माधुरी तळवलकर 



मागचे काही दिवस मी एक विचित्र पेचात अडकले होते, “माझे आवडते पुस्तक” या विषयावर येऊन माझी गाडी पंचर झाली होती, पुढे वाढेच ना... 

 मला पुस्तक वाचनाची आवड लहानपणापासून होती, 

लहान म्हणजे अगदी लहान बरं का!   

आईच्या मांडीत बसून ती वाचत असलेल्या पुस्तकांमध्ये डोकावून पहायचे, काही काळाने ती वाचत असलेल्या पोथ्या वाचण्याचा प्रयत्न करायचे आणि त्या नंतर शाळेची पुस्तकं टीचर ने सांगायचा आधीच वाचून पूर्ण करायचे. असा मला वाचनाचा छंद नाही नादच होता, एकदा पुस्तक वाचत असतांना माझ्या डाव्या हातावर एक पालीचं पिल्लू येऊन बसलं पण मी वाचण्यात इतकी गुंग कि मला कळलच नाही, माझी ताई खोलीत आल्याबरोबर किंचाळली तेव्हा मला दिसलं कि हातावर पाल आहे...असं होतं माझं वाचन वेड

अश्या व्यक्तिला जर तुम्ही सांगितलं कि बाई तुला एका पुस्तकाची निवड करून समीक्षा करायची आहे तर हा कित्ती मोठ्ठा प्रश्न आहे हे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल... 

मग मी ठरवलं कि माझे आवडते पुस्तक या विषयावर ना लिहून “मला सध्या आवडलेले पुस्तक” असा विषय घेतला पाहिजे कारण जर असं नाही केलं तर मी या पेचातून बाहेर येणं अशक्य आहे.  

म्हणून मी मागच्या आठवड्यात वाचलेलं माधवी महाजनी यांचं “चौथा अंक” या पुस्तकाची निवड केली. 

हे पुस्तक एका प्रेमात आकंठ बुडालेल्या स्त्रीचं आत्मचरित्र आहे, माधवी महाजनी ने या आत्मचरित्रात आपल्या जीवनाचा खडतर प्रवास वाचकांसमोर मांडला आहे, प्रेम हे आंधळ असतं पण ते मुकं आणि बहिरं असतं हे या पुस्तकातून आपल्याला दिसतं...

एक तरुण मुलगी जेंव्हा प्रेमात पडते तेंव्हा तिला त्या प्रेमाशिवाय काहीच दिसत नाही, तिचं ते प्रेम मग एका अत्यंत चुकीचा माणसावर आहे हे तिला कळत असतांना पण ती या नात्याला सामोरी जाते, कारण प्रेम हे शेवटी प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं.... परंतु या पुस्तकात आपल्याला एक अत्यंत वेगळ प्रेम दिसतं जे बिलकुल सेम नाहीये. वरवर पाहता ही एका स्त्री ची शोकांतिका आहे पण तिच्या या कथेत जर अविरल वाहणारा तिच्या प्रेमाचा झरा आपण पाहू शकलो नाही तर ह्या पुस्तकावर तो अन्याय म्हणवेल. 

अगदी सुरूवातीला माधवीचं बालपण, कुटुंब, नातेवाईक ह्या सगळ्यांबद्दल वाचतांना ही एक सामान्य कथा वाटते, एका संभ्रांत मराठी कुटुंबात जन्मलेली मधु इतर मुलींसारखीच आपल्या आई-वडिलांवर प्रेम करत असते, इतर कुटुंबांसारखच तिच्या घरात पण चढउतार, अस्थिरता अश्या अनेक गोष्टी तिने पाहिलेल्या असतात, श्रीमंती आणि गरीबी या दोन्ही अवस्था तिने सुरुवातीच्या काळात अनुभवलेल्या असतात. असं साधारण जीवन जगत असतांना तिच्या तरुणावस्थेत कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यावर एका वावटळाशी तिचा सामना होतो....ते वावटळ म्हणजेच 

“रविंद्र महाजनी”

रवी अत्यंत देखणा, रुबाबदार, आणि मित्रांमध्ये लोकप्रिय होता, त्याला अभ्यास करून नोकरी करण्याऐवजी अभिनय क्षेत्रात जाऊन हीरो बनायची हौस होती...कॉलेज मध्ये सगळे त्याला हीरो म्हणूनच हाक मारायचे, एका कुलीन कुटुंबातील अत्यंत सुंदर आणि हीरो सारखी स्टाइल असणारा रवी कधी मधुच्या हृदयात घर करून गेला तिला कळलच नाही, अत्यंत कोवळ्या वयातली ही तरुणी मनाने फार प्रेमळ होती, जसे आपण आहोत हे जग तितकच खरं आणि चांगल्या लोकांनी भरलेलं आहे असा त्या मुलीला विश्वास होता. 

असं म्हणतात कि तुम्ही चुकीच्या मार्गावर जात असले तर तुमचा देव तुम्हाला वेळोवेळी संकेत देत असतो, तुम्ही तो मार्ग सोडून दूसरा मार्ग निवडा असं कोणत्या न कोणत्या रूपात तो तुम्हाला सांगत असतो, मधुला पण अनेक लोकांनी सांगितलं कि हा मुलगा योग्य नाही याचा सवयी चांगल्या नाही, स्वता रवीचा आई-वडिलांनी पण समझावले कि आमचा मुलगा लग्नाची जवाबदारी घेण्यायोग्य नाही, पण असं आहे ना कि प्रेमात गुण-अवगुण काहीही बघितले जात नाही, आजच्या काळात तरी सोशल मीडिया, फेसबुक, व्हाटसप्प असे अनेक माध्यम आहेत पण त्या काळात काहीच साधन नव्हतं, लग्नाआधी एकमेकांबद्दल जास्ती माहीती मिळत नव्हती आणि कुणी सांगितलं तरी त्यावर मधुचा विश्वास बसत नव्हता, रवीचं रूप तिच्या मनात इतकं भरून गेलं होतं कि तिला दुसरं काही दिसत नव्हतं, शेवटी तिने सगळ्यांचं म्हणणं डावलून त्याचाशी लग्न केलं. 

खरी उलथापालथ लग्नानंतर तिच्या आयुष्यात सुरू झाली. तिचं हे ठाम मत होतं कि प्रेम आणि जिव्हाळ्याने आपण एखाद्या माणसाला बदलू शकतो पण नियती ने आपल्या भाग्यात काय लिहिलं आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि नियतीपेक्षाही ही अडचण तर तिने स्वता आपल्या अंगावर ओढवून घेतलेली असते. लग्नानंतरचे काही दिवस चांगले जातात आणि मग सुरू होतो एका स्त्रीच्या सहनशक्तीचा अखंड प्रवास....

रविंद्र हा अत्यंत शंकेखोर, लहरी आणि व्यसनी माणूस असतो, दारू आणि जुगाराच्या व्यसनात तो इतका बुडालेला असतो कि त्याला घर-दार बायको मुलं काहीच लक्षात राहत नाही, माधवी अनेकदा त्याला समझवते पण कुणाचाही बोलण्याचा त्याचावर काहीच असर होत नाही....हळू-हळू तो या नादात पैसे-दागिने, संपत्ति सगळच गमावून बसतो. पण माधवीचं प्रेम त्याचावर अजूनही कायम असतं, तिच्या संपूर्ण आयुष्यात एकही क्षण असा आलेला दिसत नाही जेंव्हा तिने आपल्या नवर्‍याची साथ सोडली, तिचं प्रेम अखंड असतं. 

माधवी ने आपल्या आयुष्यातल्या दोन पुरुषांबद्दल या पुस्तकात सांगितलं आहे आणि गम्मत अशी कि ते दोघे ही अगदी विपरीत स्वभाव आणि प्रकृतीचे आहे.... एक रवी जो महाशंकेखोर, व्यसनी आणि वाईट माणूस आहे आणि दूसरा रवीचा मुलगा गश्मीर जो अत्यंत प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ, आणि चांगला माणूस आहे. 

चौथा अंक या पुस्तकाला पूर्णपणे नकारात्मक किंवा शोकांतिका म्हणता येणार नाही कारण त्यात अनेक चांगल्या लोकांबद्दल पण वर्णन केलेलं आहे, माधवीच्या या खडतर प्रवासात तिची साथ देणारे तिचे मित्र-मैत्रिणी,सासर-माहेरचे संबंधी तिची मुलगी रश्मि व मुलगा गश्मीर या सगळ्यांमुळे तिला या आयुष्यारूपी झंझावाताला सामोरी जाता आलं, जीवनात अनेकदा तिच्यावर आत्महत्या करायची वेळ आली पण तिच्या भोवताली राहणार्‍या या चांगल्या माणसांनी तिला आधार दिला, रवीचं अत्यंत वाईट वागणं मारहाण, चरित्रावर संशय या सगळ्या गोष्टी दिवसांदिवस वाढत चालल्या होत्या. पैसे आले रे आले कि बायकामुलांना अगदी विदेशात फिरायला घेऊन जायचं, सोन्याचे-हिर्‍याचे दागिने घेऊन द्यायचे आणि लगेच काही दिवसांनी ते सर्व दागिने आणि पैसे जुगारात उडवून टाकायचे. अश्या वेळी माधवी ची आई,तिच्या सासूबाई, तसेच तिच्या मैत्रिणी तिला गरजेच्या वस्तु पुरवायचे आणि मुलांना सांभाळायचे. अभिनयाच्या क्षेत्रात रवी ने फार उंच कडा गाठला होता, त्याचे अनेक सिनिमे प्रचंड गाजले होते, त्या नंतर तो व्यवसायात उतरला, या ही क्षेत्रात त्याला यश मिळालं पण एक माणूस आणि नवरा म्हणून तो नेहमीच अपयशी ठरला होता. इतका सुंदर, देखणा, रूपवान, कुलीन माणूस पण स्वभावाने तितकाच वाईट हा विरोधाभासच माधवीचं दैवत होतं. 

या पुस्तकातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, जीवनात काय करावं आणि कुठे थांबून जावं ही शिकवण निश्चितच आपण घेऊ शकतो, एका  प्रेमात आंधळ्या झालेल्या स्त्रीची निष्ठा तिचं समर्पण आपल्याला यातून दिसतं, पण जरा विचार केला तर कळतं कि जरी तिचं प्रेम खरं होतं तरी सुद्धा नवर्‍याच्या गैर वर्तनाला थांबवण पण तिचीच जवाबदारी होती, ती ते करू शकली नाही कारण जरी ती उच्च शिक्षित व नोकरी करणारी होती तरी ती फार सोशिक होती, ज्या माणसावर तिने प्रेम केलं त्याला दुखावणं हे तिच्या तत्वात बसत नव्हतं, तिने आपल्या मुलांनाही कधी वडिलांचा अपमान करू दिला नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे कि आपण समोरच्या व्यक्तिला काय समझतो या पेक्षाही तो आपल्याला काय समझतो हे महत्वाचं असतं कारण आपण प्राण पणाला लाऊन त्याचावर प्रेम करत असतो पण त्याला या प्रेमाची काहीच किम्मत नसते. असचं काही माधवी सोबत घडलेलं आहे. 

या पुस्तकातला एक सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे लेखिकेचे अत्यंत सकारात्मक विचार...

आपल्या सोबत इतका अन्याय होतो आहे याचा कांगावा तिने केलेला दिसत नाही, रडत बसणे हा तिचा स्वभाव नाही, आपल्या आयुष्यातल्या इतक्या अंतरंग गोष्टी चार चौघांसमोर उघडपणे सांगणे यासाठी फार धाडस लागतं, एका चुकीच्या निर्णयामुळे तिला जे काही सोसावं लागलं ते तिने लोकांसमोर आणून एक धडा देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो, History repeats itself असं म्हणतात ना पण जर इतिहासात घडलेल्या चुकीच्या गोष्टींचा नीट अभ्यास करून त्या सुधारण्याचा प्रयत्न केला न तर तश्या चुका पुन्हा होणारच नाही असं तिचं ठाम मत आहे. हेच वळण तिने आपल्या मुलांना विशेष म्हणजे गश्मीर ला दिलेलं दिसतं. 

पूर्ण पुस्तक अत्यंत सरल आणि सुवाच्य भाषेत आहे त्यामुळे वाचायला अत्यंत सोपं आहे, माधुरी तळवलकरांचे शब्दांकन ही उत्तम आहे, गश्मीर महाजनी याने मांडलेले विचार खरोखरच हृदयाला भिडणारे आहेत, विभक्त कुटुंब किंवा आई-वडिलांच्या अश्या विचित्र नात्यामुळे मुलांना काय सोसावं लागतं हे अत्यंत मोचक्या पण समर्पक शब्दात त्याने सांगितलं आहे. माझ्या मते हे पुस्तक एकदा वाचलं पाहिजे कारण माणसाने काय करू नये ते यातून नक्कीच शिकायला मिळेल.                          

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू