पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला आवडलेलं मराठी पुस्तक

मला आवडलेलं मराठी पुस्तक- श्यामची आई


एका साहित्यिकानं असं म्हटलं आहे की, 'तुम्हाला जर वाचनाची आवड नसेल तर तुमच्यापर्यंत वाचनायोग्य पुस्तक अजून भेटलं नाही'. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला इयत्ता पाचवीत असताना अवांतर वाचनाची सवय ज्या पुस्तकाने लावली, ते महान पुस्तक म्हणजे 'श्यामची आई'. या पुस्तकाचे लेखक आहेत साने गुरुजी म्हणजेच पाडुरंग सदाशिव साने. अगदी सुटसुटीत, सोपी, जनसामान्यांना समजेल अशी भाषा साने गुरुजींची असते.हे पुस्तक म्हणजे करुणरस प्रधान असे आहे.

        हे पुस्तक एक सत्यकथा आहे म्हणजेच आदरणीय साने गुरुजींची ती आत्मकथा आहे. नाशिक येथील तुरुंगात असताना ही आत्मकथा गुरुजींनी लिहिली. फक्त 5 दिवसांत त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाची सुरुवात त्यांनी 1 फेब्रुवारी 1933 (गुरुवार) या दिवशी केली आणि शेवट दि. 13 फेब्रुवारी 1933 (सोमवार) पहाटे केली. 'मातेची महानता' हाच या पुस्तकाचा गाभा आहे. रात्र पहिली- सावित्री व्रत ते रात्र बेचाळिसावी- आईचे स्मृतिश्राध्द या शृंखलेत गुरुजींनी हे पुस्तक लिहिले आहे. 

हे पुस्तक वाचत असताना गुरुजींनी बरेच जुने कठिण मराठी शब्द वापरले आहेत आणि ते शब्दश: स्पष्टसुद्धा केले आहेत, याची जाणीव होते. उदा. धापट - तांदूळ सडताना पडलेला बारीक कोंडा, कांडपीण- भात कांडून तांदुळ करणा-या स्त्रिया, ठिकाळे - तीन पानांचे लहान पत्रावळ. 

       ''श्याम ! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून!'' किती सुंदर वाक्य!किती छान संस्कार गुरूजींच्या मातेची त्यांच्यावर लहानपणापासून! श्यामच्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे आवडायचे कारण बायकांना त्रास कमी, भांडे घासायची गरज नाही. 

        साने गुरूजी लिहितात- 'प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन, असे माणसाचे ध्येय असावे.'

 जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते - 1) प्रेम 2) ज्ञान 3 ) शक्ती असेही ते लिहीतात.

        दापोलीला असताना गुरूजींनी आपल्याला भाऊनी म्हणजेच त्यांच्या वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे जमवून, त्या पैशातून आपल्या लहान भावासाठी (पुरुषोतमासाठी) एक कोट शिवून घेतला आणि तो गणपती उत्सवाच्या आदल्या रात्री आपल्या भावाला देऊन आपल्या घरच्यांना तसेच भावाला एक सुखद धक्का दिला. 

     आपल्या आयुष्यातील कटू-गोड आठवणी जसेच्या तसे मांडण्यासाठी खूपच धैर्य लागतं ना! गुरुजींजवळ ते होतं, तेवढा, प्रामाणिकपणा त्यांच्यात ठासून भरला होता, म्हणून 'श्यामची आई' हे करुणरसयुक्त पुस्तक त्यांनी लिहिलं. 

        गुरुजींना खर्वस खूप आवडत असे, म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांजवळ ते आपल्या लाडक्या श्यामसाठी पाठवलं. सहा कोस चालत येऊन ते त्यांनी श्यामजवळ आणलं, श्यामला त्यांचा फाटखा पोशाख पाहून वाईट वाटले आणि ते आपल्या भाऊना म्हटले," मी घराकडे आलो असतो ना!" वडिल म्हटले," तुझ्या आईला राहवलं नाही, म्हणून ती माझ्याकडे पाठवली, तुम्ही सर्व मुलांनी त्याचा फडशा पाडा. " आपल्या कटू वागण्याची लाज श्यामला त्या दिवशी आली. आपल्या बापातला प्रेमळ बाप आणि आईतली प्रेमळ आई त्याला त्या दिवशी कळून आले. 

             गुरुजींना म्हणजेच श्यामला शेवटी आई देवा घरी जाताना भेट घेता आली नाही हेच त्याचं दुदैव! त्यांच्या स्वप्नात ती येत होती, म्हणून गुरुजींनी आपल्या मित्राकडून 10 रु. उसणे घेऊन गावाकडे आले, परंतु त्यांना मावशीने आई गेल्याचं सांगितल्यावर आभाळच कोसळलं. श्यामच्या आईचा श्याम पोरका झाला. घरी गेल्यावर वडिलांनी सांगितले -' दोन दिवस अगोदरच ती गेली, तुला यायला थोडा उशीर झाला.' 

            मोर्या गाईवर तसेच मथी मांजरीवर गुरुजींच्या आईचं खूपच प्रेम होतं, म्हणून मथी आई वारल्यानंतर तीन दिवस काय न खाता तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच जागी तिने प्राण सोडला.

         माझे माजी 'शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूर' या मोठ्या संस्थेचे सचीव आदरणीय कैलासवासी सिद्रामप्पा नागप्पा आलूरे गुरुजी ज्यांना मराठवाड्याचे साने गुरुजी म्हणतात, ते म्हणायचे, " श्यामची आई पुस्तक वाचून जर तुम्हाला रडू येत नसेल तर तुम्ही माणूस आहात का नाहीत हे तपासून बघितलं पाहिजे." खरंंच! साने गुरुजी तुमच्या लेखणीला सलाम !


©®-विश्वेश्वर कबाडे,अणदूर

ता.तुळजापूर

जि.धाराशिव

भ्रमणध्वनी-9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू