पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझे आवडते पुस्तक :- बटाट्याची चाळ

 माझे आवडते पुस्तक :- बटाट्याची चाळ

पुस्तक हा तसा आयुष्यातला सर्वात चांगला मित्र असतो. असे असले तरी लहानपणापासूनच मला या मित्राची सोबत तशी कमीच मिळाली !!!!!

शालेय पुस्तकांशी (नाईलाजाने केलेल्या) मैत्रीमुळे आवांतर वाचनाच्या पुस्तकांसोबतची मैत्री तशी मर्यादितच होती. परंतु तरीही इसापनीतीच्या ५३० गोष्टी असोत किंवा लहानपणी प्रचलित असणार गोटया ह्या पुस्तकाची शृंखला असोत, काही अशी पुस्तकं माझ्या कडे आई वडिलांनी भेट रुपात दिल्यामुळे होती.

माझ्या बालपणीच्या आठवणी जपणारी ही पुस्तकं आज देखील मी सांभाळून ठेवली आहेत. 


सन १९९० मध्ये, मी पाहिली इयत्तेत असताना, " चिरंजीव अमेय यास पहिली इयत्तेत 90% गुण मिळाल्या प्रित्यर्थ आई-बाबांकडून सप्रेम भेट " अशा आशयाचा मजकूर बाबांनी त्यांच्या वळणदार अक्षरात गोटया ह्या पुस्तक शृंखलेच्या पहिल्या पानावर लिहिला होता  

माझे बाबा आता ह्या जगात नाहीत, त्यांना देवाने आपल्या घरी बोलावून साधारण २२ वर्ष झाली आहेत, परंतु आजही ही पुस्तकं आणि त्यांचे वळणदार अक्षरात लिहून ठेवलेले हे शब्द मला ही पुस्तकं उघडताच जणू मोगऱ्याचा सुगंध देतात.

ही पुस्तके त्या दोऱ्या सारखी आहेत, ज्यात माझ्या बालपणीच्या आणि आदरणीय तिर्थारुपांच्या आठवणींचे मोती ओवलेले आहेत.

हे सर्व सत्य असले तरीही, लहानपणापासूनच या पुस्तकां व्यतिरिक्त एक लेखक (जे माझे लेखनातले दैवत देखील आहेत) ते म्हणजे श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच आदरणीय श्री पु ल देशपांडे यांचे लिहिलेले आणि अतिशय प्रचलित असणारे " बटाट्याची चाळ " हे पुस्तक मला आजही फार जवळचे वाटते. आज ह्या लेखात मी हेच पुस्तक मला का आवडते हे सांगणार आहे.

आमचं कुटुंब तसं मध्य प्रदेशातील इंदुरचं.

मध्य प्रदेशातील महांकाळेश्वराची नगरी उज्जैन  येथे माझा जन्म झाला आणि जन्मानंतर काही महिन्यातच मी मुंबईत आलो.

मुंबईत माझं बालपण हे चाळीतल्या घरातच गेलं. साधारण २२ वर्ष आम्ही चाळीत राहिलो. 

चाळ म्हणजे जणू एक वाचाळवस्ती (पूर्वी ह्या आशयाची एक मालिका दूरदर्शन वर देखील यायची).

पुस्तकात वर्णलेली चाळ आणि मी राहत होतो ती चाळ काही खूप वेगळी नव्हती. चाळीत जणू भांड्याला भांडं लागलं की पण शेजारी घराच्या खिडकीपाशी उभे राहत, " काय हो काय झालं ? सर्व ठीक आहे ना ? अशी खोचकपणे आपुलकी दाखवणारी विचारपूस करत.

बटाट्याच्या चाळीतली चाळ ही गिरगावातली होती आणि मी अनुभवलेली चाळ ही उत्तर मुंबईतली होती.

बरेच लोक हे दिवाळीत घेतलेल्या कपड्यांची पण बरोबरी करत असत. " तुमचं बरं आहे हो पण आमच्या ह्यांना विशेष काही बोनस मिळत नाही ", असं म्हणत आपल्या नवऱ्याला मिळालेला बोनस हा इतर लोकांपेक्षा कसा कमी आहे हे दाखवण्याचा अट्टाहास काही गृहिणी करत असत.

चाळीतील आयुष्य हे कधी कधी जणू ह्याच विचारांच्या अवतीभोवती फिरत असे. बटाट्याच्या चाळीतले वर्णलेले काही क्षण देखील मला असेच वाटतात.

चाळीत राहत असताना जर चाळीत कोणाकडे लग्न समारंभ असेल तर बटाट्याच्या चाळीत असणारी बरीच पात्रे आमच्या चाळीत देखील असायचचे.
त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय एखाद्या समारंभात पान देखील हलणार नाही.
लग्नाची लगबग त्यांना एवढी असे की जणू लग्न ह्यांच्याच घरात आहे. लग्नकार्यात चाळीतल्या लोकांना व्यवस्थित लग्नाच्या हॉल पर्यंत नेण्याच्या बसमध्ये बसवणं, त्यांना लग्न स्थळी नेणं, बस मधून त्यांना परत नीट घरी आणणं हे व्यक्ती स्वयंघोषित जबाबदारीने करत.

चाळीत लग्न जर मुलाकडे असेल तर वरातीत नाचणे आवर्जून वरिष्ठांना नाचवणे हे सर्व ते करत , याउलट लग्न जर मुलीकडं असेल तर त्या नवऱ्या मुलीच्या भावाच्या डोळ्यात येणार नाही एवढे यांच्या डोळ्यात पाणी यायचं.

मुलीच्या विदाईच्या वेळी आई वडिलांची देखील समजूत काढत त्यांचे सांत्वन करत. ही आपुलकी चाळीतच पाहायला मिळते.

बटाट्याच्या चाळीत खाण्याच्या सवई आणि वजन या संदर्भात देखील एक उल्लेख आहे.

काय खाल्लं म्हणजे वजन वाढतं आणि काय कमी खाल्लं म्हणजे वजन आटोक्यात राहतं हे सर्व अनाहूतपणे लोक सांगत असत.
कोणाच्या घरी जर भजी होत असतील तर आमच्या नाकपुड्यात तो वास आधीच शिरत असे, मग त्यांच्या घरी काहीतरी घ्यायला जायचं आणीं घरात बनलेल खाऊन यायचं असं आमचं प्लॅनिंग असे.

त्यात जर पावसाळा असेल तर भजी आणि इतर तळकट पदार्थ खाण्याचा जरा जास्तच सपाटा असे. मग बऱ्याचदा पोट सुटलेले आणि डोक्यावर मोजकेच केस असणारे काही मान्यवर व्यायामाचे महत्त्व समजावत.

तळकट खाऊन पण व्यायामाने वजन कसं कस मर्यादित ठेवता येतं हे लोकांना सांगत. हे सर्व सांगताना त्यांची शरीरयष्टी आणि वक्तव्यांमध्ये असणारी तफावत मला फार कमालीची वाटे.

बटाट्याच्या चाळीतला वजना संदर्भातला धडा मराठीच्या पाठ्यपुस्तकात देखील होता त्यामुळे आज हे लिहीत असताना शाळेतला हा धडा शिकत असताना वर्गात झालेल्या गमतीजमती मला आठवत आहेत.

बटाट्याच्या चाळीत एक प्रसंग असाही आहे ज्यामध्ये सर्व चाळकरी सहली करता जाण्यास बोरीबंदर येथे निघतात.

बोरीबंदर ला जाताना सोबत रस्सेदार जेवणही घेऊन जातात. हे जेवण घेऊन (त्यावेळी मुंबईत उपलब्ध असणारे) टांगे घेतात आणि मग स्टेशनवर जातात. स्टेशनहून ट्रेन पकडताना होणारी तारांबळ पु लं नी इतकी सुंदर वर्णली आहे की एक आनंददायी व गमतीदार प्रवासासारखे ते वाटते. 

रस्त्यात तिखट रस्सा एकाच्या धोतरावर सांडतो आणि पुढे होणाऱ्या जळजळीत गोष्टी गमतीदार किस्स्यांमध्ये त्यांनी रंगवल्या आहेत. 

मी चाळीत राहत असताना सर्वांची आर्थिक परिस्थिती मोजकीच असल्याने, आमची सहलही परिस्थितीला साजेल अशीच असे.

अगदी बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात जाणार असो किंवा इतर कुठे, बायकांची लगबग आणि उत्सुकता ही वेगळीच असे.

अहो मुळातच कधीतरीच कुठे फिरायला जायला मिळालं तर उत्सुकता ही वेगळीच असणार नाहीं का ?

आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसल्यामुळे लोकं घरूनच सर्व खाद्य पदार्थ घेऊन जात.

घरी केलेली भेळ, इडली, तळलेल्या पुऱ्या, मांसाहारी जेवणारे माशांचे कालवण असे बरेच पदार्थ घेऊन तर आम्ही मुले क्रिकेटच्या बॅट बॉल , फुटबॉल तर लहान मुली दोरीवरच्या उड्या मारण्याच्या दोऱ्या घेऊन जात असत. वडीलधारी पुरुष मंडळी सोबत थंड पेय घेत असत.

सहलीला जायचे ठरले की कोणीतरी पुढाकार घेऊन सहलीची बस बुक करत. बस येण्याची वेळ किती वाजता ठेवायची हा प्रश्न इतका जागतिक होई की त्यावर शिक्कामोर्तब होण्यास 2-3 दिवस लागत. 

शेवटी ठरलेल्या वेळी, जेंव्हा बस चाळीत येई तेंव्हा काही बायका पहिली सीट पकडाय साठी धावत तर काहीजण सामान ठेवाय साठी. सर्व प्रवासी बसल्यानंतर एकदा लोक मोजणी होत असे आणि मग श्री गणेशाचे नाव घेऊन बस पुढे निघत.

थोडा रस्ता पार झाला की कोणालातरी मळमळू लागे प्लास्टिकच्या पिशव्या ते बाहेर काढत किंवा खिडकीपाशी जाऊन तोंड.

मला उलटी होत आहे ह्याचे वर्णन काही न बोलता त्यांच्या चेहऱ्यावर दिसे आणि आम्ही आधीच त्यांच्या पासून लांब जाऊन बसत. एकदा का त्यांना वांती झाली की आम्हाला शांती वाटे. 

त्यांच्या केलेल्या कार्यक्रमाच्या वासामुळे आम्ही तोंड वाकड करून नाकाला रुमाल लावून बसत असू.

बटाट्याच्या चाळीत प्रवासात डब्ब्यात आणलेला रस्सा सांडला परंतु आमच्या चाळीतल्या प्रवासात खाल्लेला रस्सा पोटातून बाहेर आला होता.  .

चाळीतली कुठली तरी बाई, आपल्या लेकरांना सांभाळत गुजराती लईत मराठी बोलत असे.

एखाद्याला उलटी होते हे माहीत असताना त्याने काही खाल्लेच का ? असा प्रश्न ते आपसात विचारत. त्यांच्या उलटी करण्याने आपल्याला किती त्रास होत आहे हे ते गुजराती लईच मराठी बोलत दाखवून देत.

हे सारं सुरू असताना त्या बाई चा नवरा, तिला तर कधी त्यांच्यासोबतचे " रेहवा दे ने हवे, जे थयु ए थयु " असं गुजरातीत म्हणत फावडा जलेबी नाष्ट्या साठी काढत आणि इतरांना देखील खायला देत. 
लोकांमधील प्रेमाची आणि जिव्हाळ्याची ही गोष्ट काही कमालीचीच होती.


जसे याआधी देखील मी लेखात नमूद केले की माझ्या बालपणापासून ते उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे साधारण 22 वर्ष मी चाळीत काढले.

खूप सारे प्रेम , आपुलकी , भांडण वेळप्रसंगी शिव्या-गाळ्या, स्थानिक समारंभ, वार्षिक सण, एखाद्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सुरू असणारे जादूचे खेळ, एखाद्याच्या लग्नात मंडप बांधण्यापासूनची मेहनत.
बारशाचा कार्यक्रम असला की " हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा " अशी लहान मुलांना गमतीशीर वाटणारी पण समारंभाला साजेशी अशी गाणी लावणे.
भवरे फिरवणे, गोटया खेळणे, पतंग उडवणे असं बरंच काही अनुभवलं देखील.

बटाट्याच्या चाळीत पु लं नी वर्णन केलेले बरेचसे प्रसंग मला माझ्या चाळीतल्या जीवनाशी देखील निगडित वाटतात म्हणूनच इतर काही पुस्तक माझ्या आवडीची असताना देखील आज ह्या मी बटाट्याच्या चाळीचच वर्णन केलं आहे.

आशा करतो की माझ्या आणि आपणापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्याशी सारधम्य असणारा हा लेख आपणास आवडला असेल.

आदरणीय श्री कुसुमाग्रजांना वंदन करत आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या अनंत शुभेच्छा देत आपली ह्या लेखातून रजा घेतो.

नमस्कार.







पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू