पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ऋतू प्रेमाचा


तू जवळ असलास नं

की मी सारे ऋतू अनुभवते..

हो अगदी सारे...!


तुझ्या स्पर्शाने अंगावर

हिवाळ्याची शिरशिरी उठते

काटा उभा राहतो अंगावर

मी रोमांचित होते, 

गहिवरते...


तुझा आवाज ऐकला 

की मनात वसंत फुलतो

आशेची रंगीबेरंगी फुले उमलतात

स्वप्नांची फुलपाखरं बागडतात

अन् श्वासात एक

वेगळाच सुवास दरवळत राहतो

तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतो...


अन् तू जरा दूर झाला 

की मनाचं वातावरण उष्ण होतं 

उन्हाच्या झळा लागतात 

तहानलेला जीव घाबरतो

कासावीस होतो...


तुझ्या प्रेमाच्या वर्षावात

मी न्हाऊन निघते, ओलीचिंब होते

डोळ्यात इंद्रधनु सामावतो

आणि श्वासात ओल्या मातीचा

सुगंध दरवळतो...


तुझा हात हातात घेतला

की मंद वारा वाहू लागतो

नभात पांढरंशुभ्र चांदणं पडतं

शरदेचा चंद्र डोळ्यात उतरतो

अमृताचा वर्षाव होतो...


तुझ्याशी बोलता बोलता

नैराश्याची पिवळी पाने 

गळून पडतात, 

शिशिराचे आगमन होते

मनाचे अरण्य पर्णविहीन होते

नव्या पालवीच्या स्वागतासाठी ...


सांग नं रे

असा कसा तू

एकाच वेळी कवेत 

सारे ऋतू सामावून घेतो?


© ऋचा दीपक कर्पे 






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू