पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माय मराठी

माय मराठी (अष्टाक्षरी )

 

ज्ञानदेव देती ग्वाही
अमृताच्या हो पैजेची
म्हणे आहे लडिवाळ
माय माझी कौतुकाची

ओवी आणि अभंगात
संत संस्कारांची लेणी
देती आदर्श जगाला
अध्यात्माची रत्न खाणी

लावणीच्या ठसक्यात
मारी मुरका शृंगार
काळजात धडधड
नजरेचा करी तीर

शाहीराचा पोवाडा तो
रक्त उसळून येई
स्वाभिमान मराठीचा
बाणेदार पहा होई

मा‍झ्या भाव गीता मध्ये
भाषा नाजूक हळवी
बंध रेशमी कळण्या
माय मराठीच हवी

चंद्र खेळे लपंडाव
बालगीत अंगाईत
वृत्त छंद अलंकार
शोभा देती मराठीत

बीज पेरू कसदार
ओल्या मातीच्या कुशीत
फळ मिळेल चांगले
मग राहूया खुशीत


जयश्री देशकुलकर्णी
कोथरूड पुणे -३८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू