पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुखाचे स्टेशन

*सुखाचे स्टेशन*...!

 

      हातात कपड्याची बॅग ,पाठीवर लॅपटॉपची बँग ,पायातील उंच टाचेची चप्पल आणि डोक्यावरील गॉगल यांचा ताळमेळ मोठ्या कष्टाने जुळवत निशा धावत पळत जवळपास सुटणाऱ्या ट्रेनच्या मिळेल त्या डब्यात चढली .तो डब्बा जनरलचा होता. निशाच्या चेहऱ्यावर वर नाराजी पसरली .तिला स्वतःचा आणि ऐन वेळेस फोन करून मीटिंगसाठीची नवीन कागदपत्रे आणण्यास सांगणाऱ्या तिच्या बॉसचा दोघांचाही राग आला. तिने फर्स्ट एसी चे बुकिंग अगोदरच केले होते. कंपनीच्या मिटींग ची तारीख कळली की चार दिवस आधीच ती बुकिंग न विसरता करीत असे .याही वेळेस तिने चार दिवस आधीच बुकिंग केलेले होते पण मीटिंगच्या सगळ्या मुद्द्यांची परत एकदा तयारी ,घरचे आवरणे ,बॅग भरणे ही सर्व कामे करताना यावेळेस तिचे वेळेचे गणित जरा चुकले त्यात निघायला अर्धा तास बाकी असताना बॉसचा फोन आला आणि मीटिंगसाठी आणखी काही आवश्यक कागदपत्रे त्यांनी घेऊन येण्यास सांगितले त्यात आणखीनच उशीर झाला त्यामुळेच या जनरलच्या डब्यात चढावे लागले .आता पुढचे स्टेशन येईपर्यंत म्हणजे निदान एक ते दीड तास तिला याच डब्यात थांबावे लागणार होते. 

 

        निशाने एकदा सभोवार नजर टाकली. डबा अगदी खचाखच भरलेला होता. दाटीवाटीने माणसे मिळेल त्या ठिकाणी उभी वा बसलेली होती. त्यात फेरीवाले ,भिकारी यांची ये-जा चालू होती. निशा काहीशा नाराजीनेच पुढे गेली. मुख्य दरवाजाच्या शेजारच्या डब्यात तिने डोकावले. तिचा अक्षरश:जीव गुदमरला. बापरे.!   दीड तास मी कसा घालवणार इथे ? आत जाणे अवघडच दिसते यापेक्षा मी इथेच बरी. राहीन कोपऱ्यात उभी कुठेतरी. असा विचार करून ती तिथेच उभी राहिली. तेवढ्यात तिच्या शेजारी येऊन उभ्या राहिलेल्या माणसाच्या तोंडाचा येणारा दारूचा वास तिला असहय करून गेला . तोंडाला रुमाल बांधून ती थोड्यावेळ उभी राहिली पण वातावरणातील  उकाडा व त्यात तो वास. तिला मळमळायला लागले. 

 

       नाईलाजाने गर्दीतून कशीबशी वाट काढत ती आत डब्यात शिरून कुठे जागा मिळते का हे शोधण्याचा विफल प्रयत्न करू लागली. समोर दाटीवाटीने बसलेल्या माणसांपैकी एकाला बहुदा तिची दया आलेली असावी. त्यांने उठून तिला आपल्या जागेवर बसण्यास सांगितले. बाकीच्या माणसाना थोडे बाजूला सरकण्याची विनंती करत खिडकीपाशी बसलेल्या एका मध्यमवयीन काकू शेजारी  ती जाऊन बसली. खिडकीतून आलेल्या थंड हवेच्या झुळकेने तिला जरा बरे वाटले .तिने शेजारच्या काकुकडे नजर टाकली .पुस्तक वाचण्यात त्या गुंग झाल्या  होत्या .कॉटनची साडी, डोळ्याला चष्मा, अर्धवट पांढऱ्या केसांचा अंबाडा. त्यांच्या एकूण राहणीमानावरून त्या मध्यमवर्गीय घरातील वाटत होत्या. या काकूंना एक तर मोबाईल नीट  वापरता येत नसावा किंवा त्यांचा मोबाईल साधा असावा म्हणूनच मोबाईल पाहायचे सोडून त्या पुस्तक डोळ्यासमोर ठेवून बसल्या आहेत. डोक्यातील विचारांनी चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याच्या लकीरीला तसेच झोपवून धरीत तिने पर्स मधून तिचा ॲपल चा मोबाईल मोठ्या ऐटीत काढला. एव्हाना समोरच्या सीटवरील दोघा चौघांनी पत्त्याचा डाव मांडला होता. मोठ्या आवाजातील त्यांचे बोलणे ऐकणे म्हणजे मोठी शिक्षा वाटत होती निशाला.ती माणसे मात्र मस्त रमली होती खेळण्यात. एकानंतर एक असे त्यांचे डाव सुरूच होते. डाव जिंकणारा राज्य जिंकण्याच्या आविर्भावात शेजारील मित्राच्या हाताला टाळी  देत होता. आणि नुकताच डाव हरलेला मित्र आता पुढचा डाव माझाच या विश्वासाने पत्ते पिसण्यास घेत होता. यांना काही टेन्शन वैगरे नाहीये वाटत जीवनात. किती मस्त टाईम पास करत आहेत.इथे आपल्याला मिटींगचे किती टेन्शन आले आहे. थोडा वेळ गाणे ऐकुयात म्हणजे थोडे टेन्शन कमी होईल  या विचाराने ती  कानात कॉड घालून ती मोबाईल वरील गाणी ऐकत बाहेर पाहत बसली .

 

        तेवढ्यात एक भिकारी कर्णकर्कश्य आवाजात गाणे म्हणत तिथे आला .हातातील भांडे प्रत्येकाच्या समोर धरून तो गाणे म्हणत होता. काही जण त्याच्या भांड्यात चिल्लर टाकून त्याला मदत करीत होते .निशासमोरही त्याने भांडे धरले .निशाने डोळे बंद करून घेत तिचे लक्ष नाही असे दाखवले. तो वापस जायला लागला तोच शेजारच्या काकूंनी त्याला बोलवून पर्समधून चिल्लर काढून त्याच्या भांड्यात टाकली. त्यांची वाचनाची तंद्री बहुदा मोडली असावी .पुस्तक बाजूला ठेवून देत निशाकडे पाहून त्या हसल्या तशी निशा ही हसली. " कुठे जायचं आहे तुला ?" काकूंनी असं विचारल्यावर काहीशा नाराजीने निशा म्हणाली, "मला मुंबईला जायचे आहे कंपनीच्या मिटींगला. खरं म्हणजे मी फर्स्ट एसी चे तिकीट बुक केले होते .ऐन वेळेस जरा उशीर झाला घरातून निघण्यास. ट्रेन निघाली होती ती सुटू नये म्हणून या डब्यात शिरले. आता कधी पुढचे स्टेशन येते असे झाले आहे मला ."असे म्हणत निशाने चेहरा अधिकच कसानुसा केला. काकू फक्त गालातल्या गालात हसल्या. निशा पुन्हा मोबाईल मध्ये गाणे ऐकत बसली.  त्या गाण्यापेक्षाही मोठ्या आवाजात गाणे कोणीतरी पलीकडे म्हणत होते.  निशाने वैतागून तिकडे पाहिले तर आठ दहा जण मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या खेळण्यात रंगले होते. कानाला हात वैगरे लावून वेगवेगळे राग आळवत होते. आजूबाजूचे रसिक श्रोते देखील त्यांना टाळ्या वाजवत प्रतिसाद देत होते.कधी कधी आवडीचे गाणे म्हणण्याची फर्माईश  करत होते.  स्वतःला किशोर रफी लता यांच्या  रांगेतले समजून आपल्या बेसूर आवाजाला सूर लावण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला पाहून ईशाने डोक्याला हात लावला. त्यांच्याच बाजूला बसलेल्या एका घोळक्यामध्ये  आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या नकला, नाट्यअभिनय या गोष्टी चालू होत्या.  हा डबा आहे का फिरता रंगमंच ? निशाला प्रश्न पडत होता. बर प्रेक्षकाच्या भूमिकेतील लोक देखील तितक्याच रसिकतेने दाद देत होते. त्यातील एका दाढीवाल्या काकांचे तर निशाला हसूच आले.  ते काका प्रत्येक चहा वाल्याला चहात साखर जास्त तर नाहीये ना ? असा प्रश्न विचारून चवीसाठी थोडा चहा पिऊन बघायचे. आणि यात साखर जास्त आहे असे म्हणून त्याला नको म्हणायचे. असे किमान पाच - सहा चहावाल्यांकडून घोट घोट चहा पिऊन आपली चहाची तलफ त्यांनी भागवली होती. चहा पिता पिता एकीकडे वाह..वाह.. अशी दाद देखील ते मोठ्या उत्साहात देत होते. ह्या सगळ्या प्रकाराने निशा वैतागली होती. मिटिंगचे मुद्दे तिला परत एकदा पाहायचे होते. ते सध्यातरी शक्य नाही हे तिच्या लक्षात आले. 

 

     जरा वेळाने अधिकच दाटीवाटीने बसलेल्या त्या सगळ्यांना बसण्यास जागा देण्याची विनंती करत एक थोड्याशा वयस्कर बाई निशाच्या शेजारी येऊन बसल्या. बर आल्या तर गप्प बसाव ना. पण नाही.. तु कोणत्या गावची?  कुठून आली?  कुठे जायचे? सध्या काय करते? तुझ लग्न झालं का?  असे अनेक प्रश्न विचारून त्यांनी तिला हैराण करून सोडले .निशाने तिच्या काही प्रश्नांची उत्तर देणे टाळत मोजक्या प्रश्नांची जुजबी उत्तरे दिली. नंतर मात्र डोके दुखत असल्याचे कारण सांगून ती डोळे बंद करून बसली. मग त्या का बाईंनी तिच्या शेजारच्या काकूंकडे मोर्चा वळवला.तेव्हा निशाने  काकूंना तिला खिडकी शेजारी बसण्याची विनंती करून ती उठून खिडकी शेजारी जाऊन बसली. त्या बाई मात्र काकुंसोबत अखंड बडबड करत होत्या. काकूंच्या कुटुंबाची माहिती विचारता विचारता त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची सारी कुंडलीच काकू पुढे मांडली आणि सुनेचे यथेच्छ गाऱ्हाणे करण्यास सुरुवात केली. माझ्या मुलाला ताब्यात घेतले, माझ्यापासून तोडले, तिची आई तशीच आहे ,फुस लावून देते वगैरे वगैरे... आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत ,आजूबाजूला माणसे बसलेली आहेत ती सारे हे ऐकत आहे त्याचे त्यांना जराही भांन नव्हते. मोठ्या आवाजात त्यांची बडबड चालू होती. विशेष म्हणजे काकू देखील न कंटाळता त्यांची बडबड ऐकून घेत होत्या .निशाला तर डोकेदुखीची गोळीच घ्यावी लागणार होती.  काय काय नमुने असतात इथे ती मनातल्या मनात हसली. 

 

        थोड्या वेळाने तिचा डोळा लागल्यासारखा झाला .  काहीसा गोंधळ कानी आल्याने तिची झोपमोड झाली . "आता काय झाले'?  असे म्हणत तिने डोळे उघडले. समोर दोन-चार बायकांनी एका माणसाला पकडले होते. तो माणूस म्हणे त्यांच्यापैकी एकीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करत होता. त्या चार-पाच जणी एकाच वेळेस त्या माणसाला जोरजोरात बोलत होत्या. त्यातील एकीने त्याची गचांडी धरत त्याच्या दोन थोबाडीत ठेवून दिल्या .एव्हाना बरेच लोक तेथे जमले होते .कोणीतरी म्हणाले साखळी ओढा याला पोलिसांच्या ताब्यात देऊ,  कोणी म्हणत होते अजून मरेस्तोवर मारा याला ,चांगली अद्दल घडली पाहिजे .कोणी म्हणत होते टी सी ला बोलवा.सगळा एकच गलका उडाला होता .शेवटी एकदाचा टीसी आला आणि त्या माणसाला पुढील स्टेशनवर पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आश्वासन साऱ्यांना देत त्याला घेऊन तो तिथून निघून गेला . "बापरे..! हा काय प्रकार आहे? खूपच भयानक..! " निशा काकूला म्हणाली. "चालायचं ..व्यक्ति तितक्या प्रकृती" काकू असे म्हणताच निशा म्हणाली, "नाही ,पण मी हे सगळं नाहीच सहन करू शकत .किती विचित्र माणसे आहेत ही. वागण्या बोलण्याची जराही पद्धत नाही."  असे म्हणत परत एकदा घडाल्याकडे  नजर टाकत निशा वाकडे तोंड करून बसली. इतका वेळ त्या माणसाला बोलून थकलेल्या त्या चार-पाच बायकांनी आता चक्क खालीच ठाण मांडले. त्यांच्या आजूबाजूला उभी असलेली मंडळी थोडी थोडी बाजूला सरकली. नंतर त्या बायकांनी मध्ये पेपर अंथरला. त्यावर फडके टाकले. तेथेच त्या मस्त गप्पा मारत जेवायला लागल्या. गाठोड्यात बांधून आणलेली भाकरी ,ठेचा, चटणी याचा वास संपूर्ण डबाभर पसरला. आपल्या आजूबाजूला एवढे जण उभे आहेत याची त्यांना जराही परवा नव्हती. मस्त गप्पा मारत त्या जेऊ लागल्या .निशाला त्या वासाने अधिकच मळमळायला लागले. उलटी येते की काय असे वाटल्याने ती बाथरूम कडे जाऊ लागली. गर्दीला बाजूला करत कशी बशी तिथ पर्यंत पोहोचली तेथील वाईट अवस्था पाहून तिला अधिकच पोटात भडभडले. तोंडात बॅगमधील  लवंग टाकून ती तशीच पुन्हा जागेवर येऊन बसली. "काय ग कुठे जाऊन आलीस? अर्ध्या तासात येईलच पुढच स्टेशन " काकू असे म्हणतात निशा म्हणाली , "काकू कसे प्रवास करतात हे लोक जनरल डब्यातून ? मी तरी यापुढे अशी वेळ आली तर ट्रेन सोडून देईन पण जनरल डब्यातून पुन्हा प्रवास करणार नाही. काय एकेक अनुभव येतात इथे?" " "तसं काही नाही ग. उलट असा अनुभव घेत आपले स्टेशन कधी येतं कळत नाही .प्रवास चांगला होतो." "कशाचं काय काकू? आता ज्यांच्याजवळ फर्स्ट एसी ने प्रवास करण्यासाठी पैसे नाहीत ते असं म्हणू शकतात पण माझ्या आई-वडिलां जवळ भरपूर पैसे आहेत आणि मी पण आता नोकरी करते त्यामुळे जनरल डब्यातील हा माझा पहिला व शेवटचा प्रवास असेल "

 

      निशा असे म्हणताच काकू हसून म्हणाल्या , "निशा मला माझे स्तुती करायची नाही पण तुझ्या माहितीस्तव सांगते की, आमच्या स्वतःच्या मालकीच्या दोन मोठ्या कंपन्या आहेत. मी विमानाने देखील अगदी सहज प्रवास करू शकते एवढा पैसा आहे आमच्याकडे . तरी देखील मी या जनरलच्या डब्यातून प्रवास करते. कारण हा डब्बा म्हणजे अनुभवाची खाण आहे. खूप वेगवेगळे अनुभव मिळतात इथे " काकूंचे बोलणे ऐकून अवाक झालेली निशा म्हणाली ,"काकू आहो पण ही माणसे,  यांना जराही शिष्टाचार नाही .कसे वागतात ही?" "नसतील त्यांना शिष्टाचार वागण्याची पद्धत, पण मनाने मोकळी असतात ही सारी. तुला एवढ्या गर्दीत त्या माणसाने स्वतः उठून जागा दिली ही माणुसकी नाहीतर काय आहे? आणि केवळ त्यांच्याकडे पैसे नाहीत ,त्यांची परिस्थिती, राहणीमान उच्च दर्जाचे नाही म्हणून त्यांना कमी लेखणे योग्य नाही. शेवटी सगळेच काही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येत नाहीत .गरिबीतूनच श्रीमंत होण्याचा प्रवास करावा लागत असतो. आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणून आपण सुखी श्रीमंत असे होत नाही. खरे मनाने श्रीमंत आणि सुखी हीच माणसे असतात .आपल्या परिस्थितीचा फारसा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीत सुखाने राहतात. जीवनाचा खरा आनंद हीच माणसे घेतात. मागील एक तासापासून तुझ्या कपाळावरील आठी गेली नाही .या माणसांचे चेहरे बघ कसे प्रफुल्लित आहेत. ज्या गर्दीचा आपल्याला त्रास वाटतो त्याच गर्दीत कोणाचे पत्त्याचे डाव रंगले आहेत कोणाच्या गाण्याच्या भेंड्या, कोणाचे नाट्यअभिनय, तर कुणाचे गप्पाचे फड.. गाठोड्यात बांधून आणलेल्या साध्या ठेचा भाकरीनेच त्यांना तृप्तीचा ढेकर येतो तर समाधानाची गाढ झोप याच गर्दीत त्यांना येते. कोणत्याही परिस्थितीशी आनंदाने हात मिळवणी करण्याचे खरे कसंब त्यांच्याकडे असते म्हणून आलेल्या  संकटांना न घाबरता हसतमुखाने सामोरे जातात. तू अर्ध्या-एक तासात ज्या प्रवासाला कंटाळलीस तोच प्रवास  ही सारी माणसे किती आनंदाने करत आहेत. थोडाही तक्रारीचा सूर कुठे नाही . त्यांची ऐपत नाही म्हणून ते सहन करत आहेत असेही नाही .वाटायला आलेली परिस्थिती त्यांनी आनंदाने स्वीकारली आहे .कदाचित त्यांच्यापैकी अनेक जण शेतीवाडीवाले श्रीमंतही असतील. अनेकांना पैशाच्या श्रीमंती पेक्षा कमावलेल्या माणसांची श्रीमंती अधिक महत्वाची वाटते .त्या लोकांना अशा गर्दीतच आवडते. ए.सी.त त्यांचा जीव गुदमरतो. माणसाला सगळ्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेता आले पाहिजे. पैसा चंचल असतो तो आज आहे उद्या नाही . त्याचा गर्व न करता आपले पाय जमिनीवर ठेवून जगता आले पाहिजे .केवळ याच कारणामुळे मी स्वतःच्या जीवाचे फार लाड न करता आणि पैशाची घमेंड न करता विमानात जायची ऐपत असूनही परिस्थितीने सामान्य परंतु विचाराने, वागणुकीने असामान्य असलेल्या या लोकांसमवेत प्रवास करते."  निशा शांतपणे काकूंचे बोलणे ऐकत होती. एवढ्यात पुढचे स्टेशन आले गाडी थांबली. तसे काकू म्हणाल्या," खरं म्हणजे मला काही अधिकार नाही तुला एवढे सांगण्याचा पण राहवले नाही गेले म्हणून बोलले. पुढचे स्टेशन आले बघ. जा आता तू फर्स्ट एसी च्या डब्यात .जरा निवांत होईल तुझा प्रवास."  निशा मात्र तिथेच बसून राहिली .गाडी पुन्हा सुरू झाली. निघाली. काकू म्हणाल्या, "  निशा जा ना लवकर. पुन्हा पुढचे स्टेशन यायला बराच वेळ लागेल".  " नाही काकू.. तुम्ही माझे डोळे उघडले. थोड्याशा जास्तीच्या पैशाची धुंदी उतरवली. जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवला.  बरे झाले मी या डब्यात आले आणि तुम्ही भेटल्या . नाही तर खऱ्या सुखाचे स्टेशन माझ्या आयुष्यात यायला वेळच लागला असता.किंवा कदाचित ते आलेच नसते."  असे म्हणत निशाने देखील तिच्या बॅग मधील आणलेला डब्बा उघडून काकूच्या पुढे केला. दोघींनी हसत तो खाण्यास सुरुवात केली . निशाला आज या अन्नाची चव अमृतासमान भासत होती.

 

✍????. सौ.दीप्ती समीर कुलकर्णी...

      छत्रपती संभाजी नगर.

      9403538051

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू