पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ओझं

'६.४७, दिनांक १२ डिसेंबर, १९९०.' मस्टरवर सही करून अनिल लगबगीने स्टेशनकडे निघाला. ६.५० ची मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस गेली की एकदम ७.४५ ला पुण्याची गाडी येई. त्यामुळे धामणगाववरून अमरावतीला जायला अनिलला एक तास उशीर होई. एरवी तो ६.५० पर्यंत धामणगाव रेल्वे स्टेशनला पोहोचून जाई. पण कधीकधी काम असे तर उशीर होई. आज त्यातलाच एक दिवस. कॅश रजिस्टर बॅलन्स करण्याचे काम असल्याने उशीर झाला. बँक ते स्टेशन अंतर ५-७ मिनिटांचे होते. लहानश्या गावात ऑटो-रिक्षा मिळणे कठीणच. लोकांकडे दुचाक्या वगरे सुद्धा कमी. त्यामुळे हा आपला पायी-पायीच स्टेशनपर्यंत जाई. आज मात्र लगबगीने तो जात होता. ट्रेन पाच मिनिट तरी उशिरा यावी असे त्याला मनापासून वाटत होते.

अनिल स्टेशनजवळ पोहोचला तेव्हा ६.५५ झाले होते. प्लॅटफॉर्म दोन वर ट्रेन दिसत नव्हती. याचा अर्थ एक तर ट्रेन येऊन गेली, किंवा यायची होती. तो लगबगीने पूल चढला आणि खाली आला. समोर टी.सी. फॉर्म घेऊन उभा होता. तो अनिलकडे पाहून म्हणाला,

'काय हो बँकमास्तर, आज उशीर झाला. आत्ताच विदर्भ गेली बघा. आता एक तास आहे, चला चहा घेऊ तोवर.'

हताश होऊन अनिल टी.सी. सोबत चहावाल्याकडे आला. टी.सी. चहावाल्याला म्हणाला,

'दोन चहा आणि दोन गरम वडे दे रे.'

दोघांनी चहाचा कप हातात घेतला आणि चहावाला दोन वडे काढत होता. अनिल म्हणाला,

'आज विदर्भ नेमकी वेळेवर आली. आणि पुण्याची गाडी तेवढी वेळेवर येत नाही. आज बडनेराला पण मी सायकलने नाही, तर बसने आलो. रात्रीची बस सुद्धा कमी. ऑटो किंवा रिक्षा बघावी लागणार. नस्ता भुर्दंड बघा.'

'अहो बँकमास्तर, काम म्हटलं का चालायचंच. आता आमचं बघा. काही वेळ काळ नसते. बायकोला पण सांगतो, जेवायला नको थांबत जाऊ. पुण्याची गाडी गेल्याशिवाय मी घरी येऊ शकत नसतो. पण ऐकत नाही. मलाच बरं वाटत नाही बघा. पण इलाज आहे का?'

तेवढ्यात चहावाल्यानी दोन वडे दिले. दोघांनी एक-एक वडा उचलला. अनिल बोलत होता,

'आमच्या आईचं पण तसंच. मी घरी पोचल्याशिवाय ती अन्नाचा घास घ्यायची नाही. आज तर नऊ-साडे नऊ व्हायचे. त्यात आज तिला शेजारच्या गल्लीत एकाकडे जायचे आहे. जेवून गेली तर बरं. तिकडे..'

अनिलचे बोलणे पूर्ण व्हायच्या आताच तिथे जिना उतरून स्टेशनमास्तर एका म्हातारीला घेऊन आला आणि बोलू लागला,

'बरं सापडला बँकमास्तर. ह्या आजीबाईंना उमरावतीले जायचंय. तुम्ही तेवढी सोबत कराल का?'

'हो नक्कीच. कुठे जायचंय तुम्हाला आजी?'

'ते राजापेठपाशी दंडे प्लॉट हाय ना, तिथे.'

'अरे, मी सुद्धा त्याच भागात राहतो. मी घेऊन चलतो तुम्हाला.'

'गजानन महाराजाची कृपा!'

'चहा घेता? थंडी आहे सध्या, घ्या आमच्यासोबत.'

'ठीक आहे. पण पैका म्या देईन.'

ते ऐकून सगळेच हसले. अनिल म्हणाला,

'अहो आजी, ते बघून घेऊ. आधी चहा घ्या.'

चहावाल्यानी म्हातारीला एक चहा दिला. तिनी आपल्या हातात असलेलं गाठोडं खाली ठेवलं आणि चहा घेतला. स्टेशन मास्तर, टी.सी. आणि अनिल बँक, रेल्वे आणि इकडल्या तिकडल्या गप्पा करत होते. म्हातारी बाजूला बसून गप सगळं ऐकत होती.

 

वेळ गेला. पावणे आठ झाले. पुण्याची गाडी यायची वेळ झाली. अनिल म्हणाला,

'आजी, तयार राहा हं. आता गाडी येईल.'

म्हातारी उठून उभी झाली. चहावाल्याकडे जाऊन विचारले,

'साऱ्यांच्या चहाचे किती झाले?'

अनिलने त्याला खुणावले. तो म्हणाला,

'आजी, असू द्या. यांचा माझ्याकडे महिन्याचा हिशोब राहतो. मी बघून घेईन.'

'अरे असं कसं?'

'आजी, आता गाडी येईल, मी नंतर अमरावतीला घेऊन घेईल तुमच्याकडून पैसे.', अनिल मधेच म्हणाला.

'बरं. पन नक्की घेजो.'

अनिल नुसता हसला.

 

नागपूरच्या बाजूने पुण्याकडे जाणारी गाडी आली आणि थांबली. अनिलने म्हातारीचे पण गाठोडे उचलले आणि तिला समोर उभे केले. म्हातारी म्हणाली,

'अरे राजा, काऊन माझं ओझं तू घेतो?'

'काही होत नाही आजी. गाडी थांबली की लवकर चढा बघू.'

गाडी येऊन थांबली आणि म्हातारी अनिलसोबत आत चढली. अनिल स्टेशनमास्तर आणि टी.सी.ला म्हणाला,

'अच्छा, भेटू उद्या.', आणि आत गेला. दोघांनाही बसायला सुद्धा जागा मिळाली. आजींना बसवून त्यांचे गाठोडे खाली ठेऊन अनिल त्यांच्यासमोर बसला. आजी म्हणाल्या,

'बाबा, ओझं उचलायची सवय हाय मले. काऊन माझी सवय मोडतो. म्या अशी ही एकटी. मले रोज थोडीच तुह्यासारखी पोट्टी येऊन मदत करणार.'

'अहो पण आज मी आहे ना. मग असूदेत की.'

आजी ते ऐकून हसल्या. त्या आता अनिल सोबत बोलू लागल्या,

'का रे बाबा, तू रोज येणं जाणं करतो काय?'

'हो. मी अमरावतीला राहतो. सहा महिन्यांपूर्वी बँकेत नोकरी लागली आणि बँकेनी इकडे पाठवलं. धामणगाव जवळ, म्हणून रोज येणं जाणं करतो. घरून सायकलने बडनेरा आणि तिथून ट्रेन. आज बाबांना काही कामानी सायकल हवी होती म्हणून बसने स्टेशनपर्यंत आलो. आता बघा टी.सी. आणि स्टेशन मास्तर सुद्धा ओळखीचे झाले.'

'बरं बरं. मेहनती आहेस तर. घरी कोण कोण?'

'आई बाबा आणि मी. ताईचं लग्न झालं, ती आता नागपूरला असते.'

'अरे वाह, नागपूरले. छानच!'

'हो, तुम्ही अमरावतीला कुठे?'

'माह्या नातवाकडे. तिथे दंडे प्लॉटले तो राहतो. त्यालेच भेटायले म्या चाल्लो.'

'अच्छा. मुलीचा मुलगा वाटतं. मुलीकडे चाललात तर.'

'नाही नाही, मुलाचा.'

'मुलाचा? मग तुम्ही इकडे धामणगावात कोणासोबत राहता?'

'म्या एकटीच.'

अनिलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. म्हातारी ते बघून बोलू लागली,

'लेकरा, तुले काय सांगू माह्या जिंदगीचं ओझं. पाट मांडल्यापासून मायी सारी जिंदगी धामणगावात गुजरली. माह्या दादला लय दारू ढोशी. दारू पेऊन पेऊन जिंदगीचं वाटोळं केलं न मेला. मागे मी न माझा पोरगा राहिलो. माझा पोरगा मात्र गुणाचा. लय कष्ट करून, मेहनत करून त्यानं मला न स्वतःला सावरलं. घर पुन्हा बसवलं. त्याचा पाट मांडला. माझी सोन्यासारखी सून घरी आली. एक नातू पन झाला. एक दिवस माह्या मुलाले जोराचा ताप आला आणि बस! त्यानी अंथरून धरलं, ते सोडलंच न्हाई! माझा गुणाचा लेकरू गेला! सून न नातू तेवढे माघारी रहाले. सून न मी घर घर जाऊन धुनी भांडी करून, मिळेल ते काम करून पोट भरू लागलो. पुढे मला मात्र काई एवढ्या तरुण सुनेनी असं राहनं पटलं न्हाई. तिले म्हटलं 'अशी किती दिस रंडकी रायशील!' एक अमरावतीचा सालस पोरगा भेटला न लावून दिला तिचा पाट पुन्यांदा. ती आता नवीन दादल्यासोबत अमरावतीले राहते. माझा सोनू पन तिथेच रायते. पन तिची माया आटली न्हाई. मले नेहेमी भेटायला येते. पैसे देते. तिचा दादला पन देवमाणूस. सोनू सुट्ट्यांमध्ये माह्याकडे राहाले येतो. जीव लावतो. म्या लोकाकडे धुनी भांडी करतो, ते त्याले आवडत न्हाई. त्याची माय माह्यासाठी पैशे पाठवते, म्हणते काम करू नका. पन मले सांग असं काम न करता फुकट खात बसलो तर चैन कशी पडेन? हाडाला काम असलं तर जीतं राहायला बरं वाटतं. सोनूचं समद होईपर्यंत म्या जीता राहिलो, की माह्या पोरासाठी काई केलं असं वाटेन मले. एकदा का सोनूचं सर्व मार्गाले लागलं, की म्या गजानन महाराजाच्या पायापाशी जाऊन मराले मोकळी!'

अनिलचा जीव ते ऐकून कासावीस होत होता. म्हातारी सांगत होती,

'सोनूच्या आईचा निरोप आला. त्याले ताप भरलाय म्हने. पन कालपासून काई निरोप-गिरोप काई न्हाई. म्हटलं, जाऊनच बघतो. तिले बी काई मदत-खिदत लागेन तर करेन.'

अनिल अस्वस्थ झाला होता. म्हातारीला ते जाणवलं. तिने विचारले,

'काय रे बाळा, काय होत आहे तुले?'

त्याने थोडे पाणी घेतले. म्हातारीला पण विचारले. तिनी नकारार्थी मान डोलावली. अनिलने तिला विचारले,

'आजी, सोनू म्हणजे सोनू पगारे? रामजी आणि शांता वहिनींचा मुलगा?'

'हाओ, त्योच माझा नातू. तू त्याले ओळखतो?'

अनिलने आवंढा गिळला. त्याला घाम फुटला. त्याने स्वेटर काढले आणि रुमालाने घाम पुसला. बळेच हसून तो म्हणाला,

'अहो, आजच सकाळी भेटला. खेळत होता. बरा आहे आता तो. शांता वहिनी निरोप पाठवायला विसरल्या असतील. डॉक्टर वगरे येणं-जाणं सुरु आहे न. त्यात राहिलं असेल.'

'खरं? माह्या सोनू ठीक आहे? गजानन महाराजाची कृपा! सुट्टीच्या दिवशी आता त्याले घेऊन शेगावले जाते बघ!'

अनिल अस्वस्थच होता. म्हातारी बोलतच होती,

'आता पोचल्या पोचल्या मस्त तव्यावरचं पिठलं न भाकरी थापून खाऊ घालतो सोनूले. त्याले लय आवडतं. बापासारखं मस्त तेज तिखट खायले आवडतं त्याले. आपला वऱ्हाडी ठसका पुरा. बुक्कीनी कांदा फोडून खाते आता तो. मिरची पन लागते. एकदा तर माह्यासाठी अमरावतीहुन बटाटेवडा रस्सा घेऊन आला. म्हने, 'आजी, हे खाऊन दाखव. पुरा झर-झर तिखट रस्सा हाय.' चांगला होता, पन त्याले म्हटलं, माझ्या हातची पाटोडीची भाजी खाय. तुले सांगतो मग तिखट काय राहते. थोडं बेतानेच म्या तिखट घातलं, तर पोट्ट्यानी मिरची सोबत भाजी भाकरी खाल्ली. म्हटलं झाला आपला पोट्टा तय्यार! हुशार बी हाय. चांगले मार्क आनतो म्हने शाळेत. चांगलं हाय. शिकेन, सवरेन, वर माह्या पोराले लय आनंद होईन. माह्या पोराले लय शिकायचं होतं. पन परिस्थितीपायी शिकू शकला न्हाई. पुढे सोनू झाला तेव्हा म्हने, याले शिकवेल. डॉक्टर-बिक्टर बनवेन. धामणगावात छान दवाखाना खोलेन. बिचारा लवकर गेला. पन आता सोनूले म्या शिकवीन. त्याची माय पन चांगलं शिकवते. ती छानच आहे.'

म्हातारीचे बोलणे अनिल आता फक्त ऐकत होता. काही बोलत नव्हता.

 

तासभर गेला. सुमार नऊ वाजता नंतर बडनेरा आले. अनिल आजीचे गाठोडे घेऊन उतरला. मागोमाग आजी पण उतरली. बडनेरा स्टेशनच्या पुलावर ऑटोवाले विचारायला आले. अनिलने तातडीने एका ऑटोवाल्याला पकडले. म्हातारी म्हणाली,

'बाबू, कायले ऑटो करते. आपण बसची वाट पाहू.'

'नको आजी, फार उशीर झाला आहे. आपण लवकर पोहोचू तर बरं.'

म्हातारी काही म्हणाली नाही. दोघेही ऑटोमध्ये बसले. म्हातारी बोलतच होती,

'पाय दुखून राहिले आता. घरी गेलो की सोनू दाबून देईन बघ. म्हणेल, आजी तू मले एवढी भेटायले आली. आता तुझे पाय दाबून देतो. तुझी काळजी घेतो!'

अनिल मात्र दुसरीकडे बघत बसला होता. म्हातारी बोलतच होती.

अनिलचे घर आले. त्याने ऑटोवाल्याला थांबवले. तो उतरला आणि पैसे देऊन म्हणाला,

'आजींना पुढच्या गल्लीत तिसऱ्या घरी सोडून दे.' पुढे म्हातारीला म्हणाला, 'आजी, पैसे दिले आहेत. तुम्ही घरी जा, हा सोडून देईल.'

'लेकरा, एवढं माझं ओझं उचललं, चल घरी मस्त जेवाले. पिठलं चारतो तुले.'

'नंतर कधी येईल आजी, आज नको. जरा घाईत आहे, उशीर झाला.'

'हाओ तुझी माय बी वाट बघत असेन. जाय तू, म्या हाय आता काही दिवस. भेटेन तुले.'

'अच्छा.', म्हणून अनिल लगबगीने आपल्या घराच्या फाटकातून अंगणात आला. तो कोपऱ्यात गेला. त्याचा उर दाटून आला होता. अचानक त्याला उलटी झाली. वमन वेग संपल्यावर तो तसाच उभा होता. काही वेळ तो तसाच उभा राहिला. शांतता होती. अचानक त्याला म्हातारीचा आक्रोश ऐकू आला. म्हातारी ओरडत होती, 'सोनू!! माह्या सोनू!!! असा कसा गेला!!!!!!'

ते आक्रोश ऐकून त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याचे आई वडील दोघेही तिकडेच गेले होते. कुलुपाची चावी त्याच्याकडे होती. त्याने मोठ्या कष्टाने कुलूप उघडले. दोन्ही हातांनी कान घट्ट बंद करून तो आत जाऊन ढसाढसा रडू लागला. त्याचे उद्गार निघाले,

'तुमच्या गाठोड्याचं ओझं मी वाहिलं आजी, पण नातवंड जाण्याच्या दुःखाचं ओझं वाहण्याची ताकद माझ्याकडे नव्हती. या शल्याचं ओझं मात्र आयुष्यभर बाळगावं लागणार आहे, माझं मलाच!!'

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू