पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवणीतील एक प्रवास

शाॅपिज़न ट्रेन कथास्पर्धा


आठवणीतील एक प्रवास


     डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील सकाळी सव्वा दहाची वेळ होती. पुणे स्टेशनच्या फलाट क्रमांक एकवर सुजय व सुयश हे दोघे मित्र हाथिया एक्सप्रेसची वाट बघत उभे होते. सुट्टी संपवून दोघेजण कॉलेजमध्ये दाखल होण्यासाठी भिलाईला निघाले होते. रेल्वे पुण्याहूनच निघणार असल्यामुळे रेल्वे कधी फलाट क्रमांक एकवर लागेल याची दोघांना प्रतिक्षा होती. तेवढ्यात हाथिया एक्सप्रेस फलाट क्रमांक एकवर येत असल्याची घोषणा झाली. दोघांचे आरक्षण असल्यामुळे चिंतेचे कारण नव्हते. यथावकाश रेल्वे फलाट क्रमांक एकवर येऊन थांबली. सुजय आणि सुयश आपल्या सामानासह आरक्षित डब्यात चढले. आपल्या आरक्षित जागेवर येताच सामान सीटखाली ठेवून दोघे स्थानापन्न झाले. साडेदहा वाजले होते. रेल्वे निघायला अजून पंधरा मिनिटांचा अवकाश होता. दोघे मित्र मोबाईलमध्ये गुंग झाले. तेवढ्यात साधारणपणे साठ-पासष्टीच्या घरातले एक गृहस्थ सुजय आणि सुयशच्या  समोरील खिडकीजवळच्या जागेवर येऊन बसले. गौरवर्ण, धारदार नाक व घारे डोळे असे प्रथमदर्शनी मनावर छाप सोडणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. हे गृहस्थही त्यांचे सामान सीटखाली ठेवून स्थानापन्न झाले. सुजय आणि सुयश यांच्याकडे पाहून त्यांनी स्मितहास्य केले. दोघा मित्रांनी हसून त्यांना आदरपूर्वक प्रतिसाद दिला. तेवढ्यात हाथिया एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेवर सुटत असल्याची घोषणा झाली आणि बरोबर पावणेअकराच्या सुमारास रेल्वेने फलाट सोडला. गाडीने हळूहळू वेग पकडला.

      सुजय आणि सुयश दोघेही या गृहस्थांच्या तेजःपुंज व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याकडे आकर्षित झालेले होते आणि कुतूहलापोटी अधून मधून त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकत होते. त्या गृहस्थांनी आपल्या जवळील पाण्याची बाटली उघडली आणि दोन घोट पाणी पिऊन ते डोळे मिटून शांत बसले. पाच मिनिटांनी त्यांनी आपल्या छोट्या हॅन्डबॅगमधून एक संत्रे बाहेर काढले आणि संत्र्याच्या फोडींचा मनापासून आस्वाद घेतला. संत्र्याची साले त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या कागदाच्या पिशवीत ठेवली आणि ती पिशवी त्यांनी आपल्या हॅन्डबॅगेत ठेवून दिली. नंतर त्यांनी त्याच बॅगेतून एक पुस्तक बाहेर काढले आणि चष्मा डोळ्यावर चढवून ते पुस्तक वाचण्यात गढून गेले. सुजयने ते वाचत असलेल्या पुस्तकावरील नाव वाचले. ‘आर्यभट्ट नॅशनल मॅथस् कॉम्पिटिशन’ असे काहीसे त्या पुस्तकावर लिहिलेले होते. पुस्तकाचे नाव वाचून सुजय सुयशच्या कानात कुजबुजला,

“ हे गृहस्थ नक्कीच गणिताचे प्रोफेसर असावेत.”

सुयशने त्याला दुजोरा दिला आणि म्हणाला,

“ ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल स्किल डेव्हलपमेंट आणि आयआयटी बॉम्बे माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेतली जाते. चौथी ते बारावी पर्यंत कोणताही विद्यार्थी, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यापासून ते अठ्ठावीस वर्षे वयापर्यंतची कोणतीही प्रोफेशनल व्यक्ति या स्पर्धेत सहभागी होऊ शकते.”

सुजय म्हणाला,” हो मला माहीत आहे आणि या स्पर्धा परीक्षेत पात्र ठरणाऱ्यांना अनेक आकर्षक बक्षिसे, राष्ट्रीय शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र आणि बरेच काही मिळते.” सुजय आणि सुयश यांच्या हळू आवाजात एकमेकांशी यासंदर्भात गप्पा सुरू होत्या. पण समोरील गृहस्थ पुस्तक वाचण्यात इतके गढून गेले होते की त्यांना आजूबाजूला काय घडत आहे याचा थांगपत्ता नव्हता. सुयश आणि सुजय यांची उत्सुकता आता आणखीनच वाढली होती. त्यांच्याशी संभाषण करण्यासाठी दोघे खूप उत्सुक होते. पण संवाद कसा सुरु करावा हे काही केल्या त्यांना समजत नव्हते. त्यामुळे थोडा वेळ असाच शांततेत गेला आणि दोघेही मित्र पुन्हा मोबाईलमध्ये रमले.

     साधारण तासाभरानंतर रेल्वे पुढच्या स्टेशनवर थांबली. स्टेशनवर गाडी थांबताच कोलाहल वाढला, प्रवाशांची वर्दळ वाढली आणि इतका वेळ पुस्तक वाचनात गढून गेलेले ते गृहस्थ भानावर आले. त्यांनी खिडकीतून बाहेर नजर टाकली आणि सुजयकडे पाहून विचारले,” दौंड आले का?” सुजय म्हणाला, “ होय काका.” 

हाच धागा पकडून सुजयने विचारले,“काका, तुम्ही गणिताचे प्राध्यापक आहात का?”

आपल्या चष्म्यातून सुजयकडे पाहून त्यांनी मंद स्मित केले आणि म्हणाले,” तुझा अंदाज अगदी बरोबर आहे.” 

लगेच सुयशने विचारले,” काका, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकवता?”

दोन्ही मुले गप्पा करण्यास उत्सुक आहेत हे बघून त्यांनी आपले पुस्तक बॅगेत ठेवले आणि म्हणाले,” मी सुधाकर साठे. मी मूळचा नाशिकचा. नाशिक येथील सुप्रसिद्ध माध्यमिक विद्यालयाचा मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. ‘गणित’ हा माझा शिकवण्याचा विषय आहे.”

सुजयने लगेच पुढील प्रश्न विचारला,” काका, तुमच्या हातात मगाशी जे पुस्तक होते त्यावर ‘आर्यभट्ट नॅशनल मॅथस् कॉम्पिटिशन’ असे लिहिलेले वाचले. त्याविषयी जरा सांगाल का?”

सुजय आणि सुयशचा उत्साह पाहून साठे पुढे म्हणाले,” गणित हा माझा आवडता विषय आहे. गेली पस्तीस वर्षे मी गणिताचे अध्यापन करीत आहे. गणित विषयाची मुलांच्या मनात असलेली भीती कमी करून गणित विषयाचे प्रेम त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी मी सेवानिवृत्तीनंतरही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी कार्यरत आहे. तुम्हाला तर माहितच आहे की आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजीवर म्हणजेच तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तंत्रज्ञान हे गणितावर अवलंबून आहे. त्यामुळे मशीनपासून ते मेडिसिनपर्यंतची प्रत्येक नाविन्यपूर्ण गोष्ट ही शेवटी गणितावरच अवलंबून असते. प्रत्येक गोष्टीसाठी पर्यायाने गणित हाच मूलभूत पाया असतो. गणित विषयाच्या शालेय मुलांसाठी ज्या स्पर्धा परीक्षा असतात, त्या सर्व परीक्षांसाठी मी मुलांना मार्गदर्शन करतो. तुम्ही मगाशी माझ्या हातात जे पुस्तक पाहिले त्या स्पर्धा परीक्षेसाठीही मी चौथी ते दहावीपर्यंतच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. बाय द वे तुम्ही दोघे उत्सुकतेने सर्व माहिती विचारत आहात तर तुम्ही दोघे काय करता?”

सुयश म्हणाला,” आम्ही दोघे इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहोत.” 

     साठे काकांनी पुढे काही विचारायच्या आतच सुयशने पुन्हा विचारले,” काका, तुम्ही मूळचे नाशिकचे तर आता पुण्यात स्थायिक झालात का?”

साठे म्हणाले,” नाही. मी नाशिकलाच राहतो. पुण्यात महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाची सभा होती. त्या सभेस उपस्थित राहण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. या महामंडळाच्या सल्लागार समितीवर माझी नियुक्ती झालेली आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित प्राविण्य आणि प्रज्ञा परीक्षा घेतल्या जातात. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित पारंगत परीक्षा घेतली जाते. या सर्व परीक्षांचे नियोजन, गणित शिक्षकांचे शंका निरसन व त्यांना मार्गदर्शन असेच बरेच उपक्रम या महामंडळाकडून राबवले जातात. त्यात माझा सक्रिय सहभाग असतो. तसेच गणित विषयाचा अभ्यासक्रम ठरविणे, पाठ्यपुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेतही माझा सहभाग असतो.” सुजय आणि सुयश साठे काका सांगत असलेली माहिती अगदी मनःपूर्वक ऐकत होते. दोघांमध्ये त्यांना विविध प्रश्न विचारायची चुरसच लागलेली होती. 

सुजयने विचारले,” काका, तुम्ही आता कुठे निघाला आहात?”

साठे म्हणाले,” मी अकोल्याला निघालो आहे. अकोल्यातील दोन-तीन माध्यमिक विद्यालयात मी विद्यार्थ्यांना गणित स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणार आहे. तिथून मी नागपूरला जाणार आहे. नागपुरातही माझी चार-पाच ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केलेली आहेत.” आगगाडीच्या डब्यांसारखी एकामागून एक याप्रमाणे साठे काकांविषयीची माहिती गप्पांमधून सुजय आणि सुयश यांना मिळत होती.

    गप्पांच्या ओघात पुढील दोन तास कसे निघून गेले हे कळले देखील नाही. दौंड नंतर अहमदनगर रेल्वे स्थानकावर आगगाडी जेव्हा थांबली तेव्हा गप्पांच्या ओघात खंड पडला. साठे यांनी घड्याळात बघितले आणि उद्गारले, “अरे बापरे! दोन वाजले. गप्पांमध्ये कळले देखील नाही. दुपारचे जेवण केले पाहिजे. तुम्ही दोघेपण जेवणार असाल ना?” साठे काकांनी सोबत आणलेली पोळी-भाजी एका पेपर प्लेटमध्ये वाढून घेतली. सुजय आणि सुयश यांनी आपले डबे उघडले आणि सहभोजनात तिघेही दंग झाले. रेल्वे अहमदनगर स्टेशनवर अंमळ जास्तच थांबली. त्यामुळे हसत खेळत दुपारचे जेवण पार पडले. जेवणानंतर साठे काकांनी त्यांची पेपर प्लेट पुन्हा मघाच्या कागदाच्या पिशवीत ठेवली. सुजय आणि सुयश दोघांनी हे बघितले आणि न राहवून सुयशने विचारले,” काका, मघाशी तुम्ही संत्र्याची साले कागदाच्या पिशवीत टाकलीत आणि आताही जेवणाची प्लेट त्याच पिशवीत टाकलीत. “ यावर साठे काका हसले आणि म्हणाले, “ मी प्रवासात नेहमीच एक कागदाची मोठी पिशवी सोबत ठेवतो. त्यात प्रवासातील असा कचरा साठवतो आणि प्रवास संपला की पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकतो. आपला परिसर, आपलं गाव, आपलं शहर पर्यायाने आपला देश स्वच्छ ठेवणे हे आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यात माझा हा खारीचा वाटा. आपल्या कृतीतून सामाजिक जबाबदारीची जाणीव इतरांना झाली तर यासारखी समाधानाची गोष्ट नाही.”

सुयश म्हणाला,” अगदी बरोबर.” 

सुजय, सुयश आणि इतर सहप्रवाश्यांना साठे काकांनी आपल्या कृतीतून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.

    तेवढ्यात आगगाडीची शिट्टी वाजली आणि अहमदनगर स्थानक हळूहळू मागे पडले. गाडीने पुन्हा वेग पकडला आणि गाडीच्या वेगाबरोबर गप्पांनाही वेग चढला.

साठे काका म्हणाले,” अरे मुलांनो, तुम्ही एकामागून एक प्रश्न विचारून माझ्या कामाचा परिचय करून घेतलात पण तुमच्याविषयी आता सांगा. बाय द वे तुम्ही अगदी जीवश्च कंठश्च मित्र दिसताय.”

साठे काकांच्या या शेऱ्यावर दोघे अगदी मनापासून हसले. सुजय स्वतःची ओळख करून देत म्हणाला,” मी सुजय आणि हा माझा मित्र सुयश. आम्ही दोघेही आयआयटी भिलाई येथे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहोत. पहिल्या सत्रानंतर आम्हाला तीन आठवडे सुट्टी होती. परवापासून आमचे नवीन सत्र सुरू होणार आहे. त्यामुळे आम्ही महाविद्यालयात जाण्यासाठी निघालो आहोत. आमचा कायमस्वरूपी नवीन कॅम्पस भिलाईला जूनमध्ये स्थलांतरित झालेला आहे. त्यामुळे आम्ही उद्या भिलाईला उतरू.”

साठे काका हसून म्हणाले,” खूपच छान! म्हणजे तुम्ही आयआयटीचे विद्यार्थी आहात तर. पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार आहात? तुमच्या भविष्यातील योजनांविषयी जाणून घ्यायला मला आवडेल.” सुयश आणि सुजय आपल्या योजनांविषयी सांगण्यास पुढे सरसावले.

     सुयश उत्साहाने सांगू लागला, “ सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी जगभरात अनेक संस्था स्थापित झालेल्या आहेत. आमच्या संस्थेतही तिसऱ्या व चौथ्या वर्षाला हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत. सध्या या तंत्रज्ञानाला बाजारपेठेत बरीच मागणी आहे आणि या प्रकारच्या नोकऱ्यांमध्येही बरीच वाढ झालेली आहे. त्यामुळे मी पदवी प्राप्त केल्यानंतर या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीत नोकरी करून प्रथमतः अनुभव घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा विचार करत आहे.”

साठे काका हसून म्हणाले,”उत्तम कल्पना आहे.”

 सुयश पाठोपाठ सुजयही उत्साहाने सांगू लागला,” सुयशने सांगितल्याप्रमाणे मलाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये रुची आहे. संशोधनाकडे माझा कल आहे. त्यामुळे या विषयांमधील रिसर्चसाठी परदेशात जाण्याची माझी इच्छा आहे. आमच्या संस्थेत संशोधनाकडे कल असणारे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थी संस्थेतील प्रोफेसर वर्गाला रिसर्च सहाय्यक म्हणून मदत करतात. मलाही रिसर्च सहाय्यक म्हणून अनुभव घ्यावयाचा आहे. आमच्या संस्थेत पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपची पण सुविधा आहे. ती मिळविण्याची माझी इच्छा आहे. मला शिकवायला आवडते. त्यामुळे परदेशात जाऊन शिकून व थोडा अनुभव घेऊन आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिकवायला मला मनापासून आवडेल.” सुजयचा मनोदय ऐकून साठे काका खुश झाले आणि म्हणाले, “ तू ही विद्यादान करू इच्छितोस, हे ऐकून मला खूप आनंद वाटला आणि समाधान वाटले. मुख्य म्हणजे तुमच्या दोघांच्या बोलण्यात परदेशी स्थायिक होण्यासंदर्भात काही भाष्य नव्हते हे ऐकून खूप छान वाटले.”

    सुयश लगेच म्हणाला,” काका, जागतिकीकरणामुळे आता परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. परदेशाप्रमाणे नोकरीच्या, पगाराच्या उत्तम संधी आपल्या देशातही आता उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे परदेशात शिकून, नोकरी करून तिथे स्थायिक होण्याचा कल हळूहळू कमी होऊ लागला आहे. ग्रीन कार्ड, वर्क परमिटचा प्रश्न पण दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यामुळे सर्वांगाने विचार करता आपल्या देशात राहून देशाच्या विकासात हातभार लावणे अधिक उत्तम आहे, असे आम्हा दोघांना वाटते.” सुयशचे उत्तर ऐकून साठे काका खूप खुश झाले. ते त्यांच्या डोळ्यात दिसत होते. ते म्हणाले,” आपल्या करिअरसंबंधी बराच बारकाईने विचार केला आहे तुम्ही दोघांनी.”

यावर सुजय म्हणाला,” हो काका, आम्हा मित्रांचा समूह नेहमीच एकत्रितपणे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. त्यातून माहितीची देवाणघेवाण होत राहते. त्यातून निर्णय घ्यायला मदत होते.”

साठे काका म्हणाले,” फारच छान.” त्यांनी पुढे विचारले,” अभ्यासाव्यतिरिक्त तुम्हा दोघांना अजून काय काय करायला आवडते?”

सुयश म्हणाला,” काका, आम्हा दोघांना फुटबॉल खेळायला खूप आवडतो. शाळेत असताना आम्ही विविध फूटबॉल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मागील वर्षी आम्ही आयआयटी भिलाईच्या फुटबॉल टीम मध्ये निवडलो गेलो होतो आणि स्पोर्ट्स मीटसाठी आयआयटी रूड़की येथे गेलो होतो. खूप छान अनुभव होता तो!”

सुयशचे बोलणे ऐकून साठे काका प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले,” तुम्हा दोघांची छान जोडगोळी आहे. तुम्हा दोघांवरून मला माझा मित्र सुभाष देसाई याची आठवण झाली. आमच्या दोघांची अशीच जोडगोळी होती. अगदी एम एस्सी पर्यंत. पुढे तो पुण्यातील नामांकित कॉलेजात नोकरी करू लागला. त्याने डॉक्टरेट मिळवली आणि त्याच कॉलेजचा प्राचार्य म्हणून चार-पाच वर्षांपूर्वी तो निवृत्त झाला. मी नंतर बी. एड, एम एड. करून शिक्षकाच्या नोकरीत रमलो.”

    सुयशने विचारले,” काका, तुम्ही का नाही गणित विषयाचे प्रोफेसर झालात?”

साठे काका म्हणाले,” मी पहिल्यापासूनच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करायचे ठरवले होते. माझे वडीलही शिक्षक होते. त्यामुळे त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. शालेय वयातील मुले संस्कारक्षम असतात. शालेय जीवनापासूनच जर त्यांच्यावर गणिताचे संस्कार केले तर या विषयाची रुची त्यांच्यात उत्पन्न होते ही माझी पक्की धारणा आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी कायम गणिताचे अध्यापन करत आलो आणि आजही करत आहे. मनोरंजनात्मक, सुबोध शैलीतून जर गणित विषय शिकवला तर पाया भक्कम होतो आणि या भक्कम पायावर उभी राहिलेली इमारत डगमगत नाही.”

सुजय म्हणाला,” काका, तुम्ही म्हणालात त्यात शंभर टक्के तथ्य आहे. शालेय जीवनापासूनच जर गणिताची गोडी निर्माण झाली तर पुढे अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध होतात.” सुजय, सुयश आणि साठे काका यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की आगगाडी मनमाड रेल्वे स्थानकात कधी आली हे कळले देखील नाही. दुपारचे साडेपाच वाजून गेले होते. सुजयने तिघांसाठी चहा मागवला. आल्याच्या गरमागरम चहाचा तिघांनी आस्वाद घेतला. रेल्वेने मनमाड स्टेशन सोडले आणि रेल्वेच्या धावत्या डब्यांसोबत गप्पाही पुढे सरकू लागल्या.

    साठे काकांविषयी अधिकाधिक जाणून घेताना सुयश आणि सुजय यांना त्यांच्या परिवाराविषयी, त्यांच्या नाशिक येथील दिनक्रमाविषयी बरीच माहिती मिळाली. दोघांना साठे काकांच्या व्यक्तिमत्वाविषयी बरेच पैलू समजत होते. 

सुयश म्हणाला,” काका, तुमची गणित विषय शिकवण्यासाठी असलेली तळमळ, समर्पित व निरपेक्ष वृत्ती, विषयाचा व्यासंग, कार्यमग्नता यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. तुम्ही जे अविरत शैक्षणिक कार्य करत आहात ते थक्क करणारे आहे. तुम्हाला तुमच्या या बहुमोल कार्यासाठी नक्कीच अनेक पुरस्कार मिळाले असले पाहिजेत अशी आमची खात्री आहे.”

यावर साठे काका मिश्किलपणे हसले आणि म्हणाले,” मोठा चतुर आहेस तू! माझ्या पस्तीस वर्षाच्या नोकरीच्या काळात मी गणित विषयाच्या मार्गदर्शनासाठी जवळपास महाराष्ट्रभर विविध शाळांमध्ये गेलो. अगदी छोट्या छोट्या गावात, आदिवासी पाड्यांमध्येही मार्गदर्शनासाठी गेलो. असंख्य विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी जोडला गेलो. माझ्या या कार्यासाठी मला महाराष्ट्र राज्याचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. लायन्स क्लब, रोटरी क्लब यासारख्या अनेक संस्थांनी माझ्या कार्याचा गौरव केला आहे. गणित प्रसाराच्या निमित्ताने मला खूप प्रवास करायला मिळाला आणि या प्रवासातही तुमच्यासारखे अनेक सुहृद जोडले गेले. “

    यावर सुजय म्हणाला,” काका, खरंच तुमचं काम खूप प्रेरणादायी आहे. तुमच्यासारख्या ध्येयासक्त व्यक्तिमत्वाशी आज आम्हाला मनसोक्त गप्पा करता आल्या हे आमचे महाभाग्यच आहे.” 

साठे काका मनापासून हसले आणि त्यांनी घड्याळाकडे एक नजर टाकली आणि म्हणाले,” अरे बापरे! रात्रीचे साडेआठ वाजत आले. भुसावळ कधी मागे पडले ते कळले देखील नाही. मुलांनो,मला अकोल्याला उतरायचे आहे. लक्षात ठेवले पाहिजे. नाहीतर गप्पांच्या नादात विसर पडायचा मला.” यावर सुजय आणि सुयश मनापासून हसले.

    सुयश म्हणाला,” काका, आज तुमच्यासोबत बोलून अनेक गोष्टी आम्ही शिकलो. त्या आत्मसात करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. तरी पण आमच्यासारख्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल?” साठे काकांनी आपल्या चष्म्यातून एक नजर दोघांवर टाकली आणि म्हणाले,” चांगला प्रश्न विचारलास. मुलांनो, मगाशी तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनेविषयी सांगितलेत. तुम्ही स्वीकारलेल्या क्षेत्रातील काम आवडीने करा. प्रामाणिकपणे करा. आज तुमच्या क्षेत्रात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे तुम्ही सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवा. आपले ज्ञान अपडेट करत रहा. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी पण झाला पाहिजे, हे उद्दिष्ट नेहमी डोळ्यासमोर ठेवा. आपल्या विकासासोबत बाकीच्यांचा विकास झाला तर पर्यायने राष्ट्राचा विकास होईल. हे सर्व साध्य करताना निसर्गाला अजिबात विसरू नका. नैसर्गिक पर्यावरणाचे जेणेकरून संरक्षण होईल असे राहणीमान ठेवा. निसर्ग संरक्षण व संवर्धन यासंबंधी शालेय विद्यार्थ्यांनाही मी नेहमी गणित विषयाच्या अध्यापनाच्या जोडीने मार्गदर्शन करत असतो. तसे आज तुम्हाला पण आग्रहाने सांगत आहे. कामासोबत आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

‘ वसुधैव कुटुंबकम ’ या भावनेने सर्वांशी वागा. बाकी तुम्ही दोघे सूज्ञ आहातच.”

     साठे काकांच्या मौलिक मार्गदर्शनासाठी दोघांनी त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांना वाकून नमस्कार केला. साठे काका भारावून गेले. त्यांनी दोघांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले,” शुभास्ते पंथांनः संतु. माझ्यामुळे तुमचे रात्रीचे जेवण लांबले.”

सुयश म्हणाला,” काका, आज तुमच्यासोबत जो वार्तालाप झाला त्याच्या समाधानानेच आमचे पोट भरले आहे.” पंधरा-वीस मिनिटातच आगगाडी अकोला स्थानकात आली. सुजय आणि सुयश, साठे काकांना सोडायला दरवाजापर्यंत गेले. स्थानकावर साठे काकांचे स्नेही त्यांना घेण्यासाठी आले होते. साठे काका रेल्वेतून उतरले. त्यांनी हात हलवून सुजय आणि सुयश यांना टाटा केला. दोघांनी त्यांना प्रेमभराने निरोप दिला. तेवढ्यात हथिया एक्सप्रेस जागेवरून हलली आणि पुढे निघाली.

    सुजय आणि सुयश आपल्या जागेवर येऊन बसले.  दोघांच्याही मनात साठे काकांनी कायमचे घर केले होते. दोघांच्याही मनात ध्येयाचे स्फुल्लिंग पेटले होते आणि ते साध्य करण्यासाठी त्यांचा भिलाईच्या दिशेने पुढील प्रवास सुरू झाला होता.


●●●●●


लेखिका :- ऋजुता देशमुख 

पुणे १६


   

    




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू