पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अहो आई! अगं आई!



तिचं मुळुमुळु रडणं चालू होतं. नाकातून येणारं पाणी ती  रुमालाने सतत पुसत होती. मधूनच डोळे पुसण्याचे काम साडीचा पदर करत होता. समोर राजेश मख्खासारखा उभा होता. तिने रागातच त्याच्याकडे बघितलं आणि पुटपुटली,


“आता तोंडातून एक शब्द निघणार नाही.” राजेश खाली मान घालून उभा होता तो जरासा पाय हलवून,मोकळा करून परत उभा राहिला. 


“ आता उभं राहून काय होणार? अडवायच्या वेळेस ही असाच उभा राहिला होता म्हणून ती निघून गेली.”


“ मग मी काय करायला हवं होतं” आता हळू आवाजात राजेश बोलला.

आता मात्र ती हुंदके देऊन रडू लागली. 


“ खरंच मी तिला समजूनच घेतलं नाही. किती गोड पोरगी होती पण मी तिचा चांगला पक्ष न बघता उगाच लहान सहान गोष्टींवर तिला बोलत राहिले आणि तरीही ती माझ्या गळ्यात पडायची. ती गेली तेव्हा दोन दिवस मला बरं वाटलं रे! पण आता तिचं सतत चिवचिवणं. मला आई! आई! आई! म्हणत गळ्यात पडून, खांदे धरून गोल फिरवणं मिस करते आहे रे!” परत तिने डोळ्याला पदर लावला‌.


राजेश आता तिच्या जवळ जाऊन बसला आणि बोलू लागला,


“ आई! आठवतोय ना? गृहप्रवेशचा तो क्षण जेव्हा तू म्हणाली होती

इला तू माझ्या मुली सारखी आहे आणि हे घर तुझंच आहे. त्यावर इला म्हणाली होती,

मुली सारखी कशाला? मुलगीच म्हणा ना? 

आणि बस तेच तिचं बोलणं तुला टोचलं होतं, 

हो बाई! मी विसरलेच की तू लेखिका आहेस. आता शब्द जपूनच वापरायला हवेत.

सगळे आजूबाजूला होते त्यामुळे ती गोष्ट तिथेच संपवली होती. 

लग्नाचे पाहुणे गेल्यानंतर इलाने तुला म्हटलं होतं की,

मी तुम्हाला अहो आई! पेक्षा अगं आई म्हटलं तर चालेल का? पण तू स्पष्ट नकार दिला. आणि दोघांत एक भिंत उभी राहिली.”

आता तिला आठवू लागले..

राजेशचं लग्न इलाबरोबर झालं हेच तिला आवडलं नव्हतं. कारण इला परजातीची तर होतीच पण अवखळ ही होती. जोरात हसणं, सगळ्यांशी मोकळेपणी बोलणं, घरात लगेच कामाला लागणं हे सगळं तिला आगाऊपणाचं वाटत होतं. त्यात इलाचं “ मुली सारखी कशाला मुलगीच म्हणा ना” हे वाक्य तिच्या न आवडण्यात भर घालून गेलं. 


त्यानंतरही इला सतत हसतमुखाने घरात वावरायची. राजेशच्या वडिलांशी म्हणजे वसंतरावांशी मोकळेपणी बोलायची, दोघं एकमेकांना टाळ्या मारुन हसायचे, गंमत करायचे. इला ऐसपैस बसायची. अनेकदा वसंतरावांच्या अगदी जवळ. 

तिला हे सगळं पटत नव्हतं आणि वसंतराव तिच्या ह्या म्हणण्याकडे लक्ष देत नव्हते. इला तिच्या बरोबर ही बोलायचा प्रयत्न करायची आणि ती प्रत्येक वेळेस,

मी काही राजेशचे वडील नाही, म्हणत तिला दूर लोटायची,

तरी ही इला तिच्या अवतीभवती घुटमळायची. भाजी मस्त झाली आहे म्हणत तिचे गालगुच्चे घ्यायची, तर आज सिनेमाला जाऊया म्हणत तिला गोल गोल फिरवायची. 


पण सगळं सगळं फुकट‌. तिचा राग संपण्याचं किंवा कमी होण्याचं नांव घेत नव्हता.


आणि चार दिवसांपूर्वी ती करत असलेल्या नोकरीत इलाची दुसऱ्या गावाला बदली झाली म्हणून ती निघून गेली होती.

तिला आज इलाची आठवण येत होती आणि न राहवून तिला रडू फुटलं होतं.


दारावर बेल वाजली वसंतरावांनी दार उघडलं आणि इलाने आई! आई! आई! म्हणत तिला मिठी मारली.ती आश्चर्याने इलाकडे बघत होती.

अगं आई! सॉरी अहो आई मी लहानपणापासून आईच्या सुखाला पारखी होते. माझ्या दोन लहान बहिणीसाठी मी आई झाले पण माझी आई तुमच्या रुपात मिळाली म्हणून मला अगं आई आणि तू असं म्हणावसं वाटलं होतं “


ती इलाला आपल्या कुशीत घेत डोक्यावरून हात फिरवित म्हणाली,

“अरे लबाड! म्हणजे तुझी काही बदली  झाली नव्हती तर हा तुमच्या तिघांचा प्लान होता होय.?”


“अहो आई! “ इलाच्या तोंडावर हात ठेवत ती म्हणाली,

अगं आई!...... इला पुन्हा तिच्या कुशीत शिरली होती.


राधा गर्दे

कोल्हापूर 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू