पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सोबत



"लवकर परत ये गं."

घरातून निघताना नेहमीप्रमाणे आई म्हणाली.


" काय गं रोज रोज तेच तेच सांगते. काम झालं की परत येणारच ना? तिथे काय मी मजा मारत बसणार नाही." चिडतच नीला म्हणाली.


ऑफिस मध्ये दिवसभर खूप काम होतं. फक्त लंच टाईम मध्ये डबा खायला ती उठली तितकंच. संध्याकाळ झाली होती. ऑफिस बॉयने लाईट्स लावल्या. जवळपास सगळेच निघून गेले होते. आणि तितक्यात बॉसने बोलवल्याचा निरोप घेऊन ऑफिस बाॅय आला. 


नीला घाबरली. तिने अनेकांच्या तोंडून बॉसच्या रंगेल स्वभावा बद्दल ऐकलं होतं.आजता गायत तिला तो अनुभव आला नव्हता. खरं तर ती इतक्या उशीरा पर्यंत कधी थांबलीच नव्हती. आज तिला काम संपवताना काळवेळ कळलीच  नाही.


तिने घाबरतच, आशेने ऑफिस बाॅयकडे पाहिलं. तो गालातल्या गालात हसतो आहे असं तिला वाटलं. ती बॉसच्या केबिनमध्ये शिरता शिरता

" मे आया कमी इन सर" म्हणाली.

बॉसने हसून 

"यस यस" म्हटलं आणि ती दार ढकलून आत शिरली.

" काय मिस नीला ? तुम्ही आमच्या ऑफिस मध्ये गेल्या वर्ष भरा पासून काम करत आहात? काही अडचण किंवा एनी प्राब्लेम? "

" नाही सर. काहीच तक्रार नाही." नीला हळूच म्हणाली.

आता बाॅस आपल्या खुर्चीवरून उठून हळूहळू तिच्या दिशेने येऊ लागले. नीला पुढे काय होणार हा विचार करत आतून गोठल्या सारखी झाली. तिचं सारं अंग थंड पडतंय असं तिला वाटतं होतं.

'देवा धाव रे मदतीला.' ती देवाचा धावा करत होती. बॉसच्या हात तिच्या खांद्याला स्पर्श करणार इतक्यात दार उघडून कोणीतरी आत आलं 

" तू?" बाॅसने विचारताच नीला गरर्कन् वळली. बघितलं तर एक सुंदरशी बाई आत येत होती.बॉसचा चेहरा कसानुसा झाला होता. ते आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. सारखा घाम टिपत होते‌. जवळपास पांढरे फटक पडले होते.

"माझी ओळख नाही करून देणार?" त्या बाईने विचारलं. बॉस अजून ही घाबरलेले होते. 

"हो ! हो. ही माझी बायको मिसेस शामला दिवेकर." 

नीलाने त्यांना नमस्कार केला. शामला म्हणाली 

" तुम्ही आज उशीरा येणार का? बरं ! नीला तुझं काम झालं असेल तर चल मी तुला सोडते."

नीला लगेच उभी राहिली.

"हो ! चला. सर मी निघते." बाॅसकडे बघत ती म्हणाली.

त्या दोघी केबिन मधून बाहेर आल्या.


बाहेर, शामलाने गाडीचं दार उघडत तिला बसायला सांगितलं. नीला लगेच आत बसली. तिच्या छातीचे ठोके अजून ही तिला ऐकू येत होते.

" नीला घाबरू नकोस. मी वेळेवर येऊन तुला बाहेर काढलं ना?" शामलाचे हे वाक्य ऐकताच नीलाने चमकून तिच्याकडे बघितलं.

" अगं अशी दचकू नको. मला माझा नवरा काय आहे ते माहीत आहे. त्याचे वाईट ही वाटते पण .." शामला म्हणाली.

" पण मॅडम ! तुम्ही अगदी वेळेवर आलात नाहीतर.." नीला चे उत्तर ऐकताच शामला परत उद्गारली.

" तसं मी होऊच दिलं नसतं."

" पण तुम्हाला हे कसं कळलं?" नीला ने शंका विचारली.

" त्या ऑफिस बाॅयने मला फोन केला होता." शामलाचे उत्तर ऐकून क्षणभर नीला गप्प बसली आणि तिच्या मनात आलं 'मग  असंच आणखी मुलींना कां नाही वाचवलंत?'

शामला गाडी चालवत चालवत हसत म्हणाली

" मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. मी इतरांना कां नाही वाचवलं हेच तुझ्या मनात येतं आहे ना? तर सांगते. त्या सगळ्या स्व खुशीने, प्रमोशन मिळेल म्हणून जायच्या.मग त्यांना अडवण्यात काय अर्थ होता? बरोबर ना? तुझं तसं नव्हतं तू खूप निरागस आणि मेहनती आहेस. तुला प्रमोशन हवं पण स्वतःच्या बळावर. हो की नाही? म्हणूनच तुझ्या मदतीला मी आले."

नीला आता शांत झाली होती. आणि तिचं घर ही आलं होतं. तिने शामलाला घरात येण्याची विनंती केली,पण पुन्हा कधीतरी म्हणत ती गाडी फिरवून निघून गेली. नीला ने डोअर बेल वाजवतात आईने दार उघडलं

" किती गं उशीर केलास? मला काळजी लागून होती."

आईचं वाक्य ऐकून नीला हसत म्हणाली

" अगं आई! आज मला आमच्या बॉसच्या बायकोनं आपल्या गाडीनं घर पर्यंत सोडलं . तिची मस्त सोबत होती मला."

"हो का? पण मला गाडीचा आवाज कसा ऐकू आला नाही?"

आईचा प्रश्न ऐकून नीला तिचे खांदे धरून हसत  म्हणाली 

" कारण तुझं लक्ष फक्त डोअरबेलच्या आवाजाकडे होतं."


दुसऱ्या दिवशी नीला ऑफिस मध्ये पोहोचली आणि ऑफिस बॉय दिसताच त्याला 

"थॅंक्स दादा " म्हणाली त्याने

"कशा बद्दल? विचारताच नीला फक्त हसली.

लंच टाईमला तिने कालचा प्रकार मैत्रिणीला सांगितला हे सगळं ऐकताच मैत्रिण किंचाळलीच 

"काय बॉसची बायको?  तिने तुला घरा पर्यंत पोहोचतं केलं? तिची सोबत तुला भारी वाटली? अगं ती ह्या जगात नाही. तू इथे येण्याच्या महिनाभर अगोदरच ती जग सोडून गेली आहे."


राधा गर्दे

कोल्हापूर






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू