पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कविता - आनंदाची चावी. - चन्द्रहास सोनपेठकर

कविता - आनंदाची चावी.

- चन्द्रहास सोनपेठकर

 

सुखाची बासरी कविता व्हावी

दुःखावरची फुंकर ही ती व्हावी.

हिन्दोळ्याची गीतिका तिने गावी

उत्कटतेची साथ तिला लाभावी.

 

वर्षेतली मुग्ध श्रावणसर ती व्हावी

शरदातली गुलाबी झालर ती व्हावी.

तिला वाचताना पापणी ओली व्हावी

त्या आसवातून वेदना विरून जावी.

 

'ती' कवितेची मधुर वाणी व्हावी

आपण तिचा संवादी सूर व्हावे.

सर एक चित्तनभातून प्रकटावी

अन् तिने अक्षरांचे साज लेवावे.

 

पानाफुलातून वसंत पाझरताना

ग्रीष्माची तमा तुला कशाला हवी?

आरोहाची मंद मंद आलापी गाताना

अवरोहाची सय सांग कशाला हवी?

 

लिहित जावे लिहित जावे खुशाल

मनात भ्रमरांची गुंजगुंजारवी हवी.

वेलीने पदविन्यास करोत खुशाल

समेवरची थाप कधी न विसरावी.

 

शारदेचे कृपापुष्प हे प्रातिभ स्वप्न

अशी आठवण सदैव हृदयी व्हावी.

लोक विचारिती जरी अनेक प्रश्न

कविताच आहे आनंदाची चावी.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू