पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रिनोवेशन



आजकाल स्वयंपाक घराच्या कट्यावर हात ठेवला की हात थरथरायचा. पण कोणी समजूनच घेत नव्हतं. मग एक दिवस माझा हात कट्याच्या जोडात सोलटला. तरी ही कोणी ऐकेना. 

“ तुला ना दिवसा ढवळ्या भास होतात.”

मी  गप्प. 


पण हे भास मला अलीकडे सतत होऊ लागले पण कोण लक्ष देतं. 


हो का? हो का? म्हणत गालातल्या गालात हसत पलायन हे ठरलेलं.


आणि एक दिवस हसणाऱ्यांनी कट्यावर हात ठेवला आणि कट्टा  एकीकडे कलू  लागला. आता ओरडणं सुरू.

जागेवर कट्टा बसल्यावर आता कोणातरी किचन स्पेशलिस्टला  दाखवणं गरजीचं झालं. 


एक दोन स्पेशलिस्ट आले आणि सगळा कट्टा बदलावा लागेल हा निष्कर्ष काढला गेला. पहिला कट्टा बाद केला गेला. म्हणजे रिपलेसमेंट.(मला नी रिपलेसमेंट आठवलं.)

मग ट्राली ही नीट नसल्याचे कळले ( ऑपरेशन पूर्व रिपोर्ट गडबड) मग ट्राॅली मागची भिंत खराब झाल्याचं समजलं. ((ई.सी.जी.व्यवस्थित नाही) मग सिंकची भांडी चांगली नाही हे कळलं ( पहिली औषधं बेकार आता महागड्या गोळ्या घ्याव्या लागतील)

आता स्पेशालिस्टच्या हातात केस मग काय?

सारं स्वयंपाकघर रिकामं झालं. आज ते खूपच मोठं वाटलं होतं. 

 एकीकडे  किती लाख मोजावे लागतील हा विचार बैचेन करत होता तर आता नाश्ता आणि जेवणाचा डबा मागवावा लागेल आणि मला फक्त आयतं खायला मिळेल म्हणून मजा‌ही वाटतं होती.

 स्वयंपाक घराने घुसपैठ सुरु केली होती. कोणत्याही खोलीत त्याला त्याचे सैन्य पसरता येत होतं आणि मी हतबल होते. 

सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलं होतं आणि सैन्य नि:चेष्ट बसून होतं.

कशीबशी थोडी जागा जेवणा खाण्यापुरती केली गेली.  सकाळी नाश्त्याला काय येणार ह्यात  भुलाबाईचा फील यायला लागला. आणि रोज मस्त आणि चविष्ट खाद्यपदार्थ जास्त खायला प्रेरित करून लागले. आता वाढलेलं वजन जास्त वाढणार ही काळजी दूर भिरकावली गेली आणि नाश्त्यावर ताव मारणं सुरू झालं. 


पण जेवणाचा डबा( तो दुसरीकडून यायचा.) हाय रे देवा!

इतकुशी आमटी, दोन छोटे चमचे भाजी, दोन चपात्या आणि गोळा लिबलिबीत भात.दोन फोडी लोणचं.

ते ही इतकं तिखट की नाका डोळ्यातून पाणी येऊ लागलं. 

मग डब्या बाबतीत सुधारणा करायला आणि कमीत कमी एक माणसाला पुरेल इतकं जेवण तर पाठवा असं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी जर्राशी सुधारणा. पण डबा पहिल्या दिवशी दीड वाजता, दुपारी दुसऱ्या दिवशी पावणे दोन आणि नंतर दोन ते सव्वा दोनच्या मधे येऊ लागला.


आयतं जेवायचा आनंद हरपला होता. कसं तरी दोन घास पोटात ढकलणं सुरू झालं. आणि “उदरभरण नोहे जाणिचे यज्ञकर्म” ह्याचे प्रात्यक्षिक सुरू झालं.


स्वयंपाकघराचे बांधकाम “ संथ वाहते कृष्णामाई”


 स्पेशालिस्ट अधूनमधून येऊन,

“ आपण हे करूया,ते करुया म्हणजे स्वयंपाकघराला एकदम फर्स्ट क्लास लुक येईल हे सांगत होते‌.


आठ दिवसाने, काट्याचा ग्रेनाईट निवडायला बोलावलं. आम्ही बघायला गेलो तेव्हा स्पेशालिस्ट नव्हते. तरी ग्रेनाईट स्पेशालिस्टच्या सल्ल्याने एकाची निवड केली.

दोन दिवसाने किचन स्पेशलिस्टच्या एका असिस्टंटने फोन करून सांगितलं,

“ तुम्ही निवडलेला ग्रेनाईट दुय्यम दर्ज्याचा आहे. तुम्ही दुसरा महाग बघितला होता तो घेऊ या.”

मान हलवून होकार कळवला.

मग एक दिवस कामगार आले.ट्रालीच्या रिकाम्या भिंतींवर टाईल्स बसवल्या. नंतर भिंत घासून त्यात कडप्पा,मग मसाला आणि त्यावर ग्रेनाईट बसवलं गेलं. स्वयंपाकघराच्या ह्या रुपड्याने मला मोहित केलं. पण ट्राली? त्या अजून फॅक्टरीत ( ब्यूटी पार्लर मध्ये) होत्या. 

आता मी नाश्ता आणि स्वयंपाक करते आहे आणि ट्रालींची वाट बघते आहे. ( सून कधी येते ब्यूटी पार्लर मधून) स्वयंपाक घरातील सारे सिपहसालार जिथे तिथे आरामात टेकून बसले आहेत. 

आता बघू माझं स्वयंपाकघर कधी एकदाचं व्यवस्थितपणे माझ्या हातात येतं. ही सुवार्ता मी तुमच्या पर्यंत पोहोचवणार हो.


राधा गर्दे

कोल्हापूर 










पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू