पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भावनाविष्कार

कवी ग्रेस यांच्या पुढील चार काव्यपंक्तींना माझ्या शब्दात पुढे नेण्याचा उत्कृष्ट ठरलेला प्रयत्न


ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही

रडलो

त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

________________________


       भावनाविष्कार


ती गेली तेव्हा पाऊस, मम लोचनात झिरपत होता

गुंता मनांगणातील, सोडविण्याचा हट्ट होता

समवयस्क जरी ती होती, मैत्रीण नव्हे, मम माऊली

नात्याचा नाजूक बंध, दारातच अडवित होता 


तिज प्रकट पुसावे कैसे, शब्दही पंगु झाले 

मौनातच झाकोळलेला, मूक संवाद मनाशी होता


ते गूढ तियेचे वर्तन, मज कधीच उमगले नाही 

जननिंदेचा धुराळा, थोपविण्याचा प्रयत्न होता


मी पुन:श्च पोरका झालो, आणिक अकाली प्रौढ 

एकाकीपणाचा लेख, मम भाळी कोरला होता


मोहाचा भुलभुलैय्या, कटाक्षाने ठेवला दूर

पावित्र्य नात्यांमधील, जपण्याचा यत्न होता


स्वीकारीन जीवन रूक्ष, लाभणार नच ओलावा

जैसा माळावरील वृक्षास, जगण्याचा भरोसा होता 


हा भावनाविष्कार जनांस, वाटेल क्लिष्ट, दूर्बोध

लावण्या ठाव मनाचा, हा पामर दुबळा होता


विशेष टीप…


@कवी ग्रेस यांच्या सख्ख्या आईचे निधन झाल्यानंतर दु:खावेगात लिहिलेली ही कविता आहे ह्या रूढ आणि प्रचलित समजाला छेद देणाऱ्या…


महाजालावरील संजय क्षिरसागर यांच्या जनातलं, मनातलं या पेजवरच्या रसग्रहणावर…कवीच्या पाच आयांपैकी एक सावत्र आई (कदाचित पाचवी म्हणून समवयस्क असेल) आपल्या प्रियकराकडे निघून जाते त्यावेळेस त्यांना सुचलेली ही कविता असा त्यात उल्लेख आहे. 


त्या रसग्रहणावर आधारित ही स्वरचित कविता लिहिली आहे. 



@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

३०-३-२४


©®ह्या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत आपल्याला कविता आवडल्यास नक्की लाईक करा आणि नावासह शेअर करा.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू