पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हमसफर एक्स्प्रेस

हमसफर एक्स्प्रेस 



         " शेखर, ऐक ना! खुप  मोठ्या संकटात  सापडले आहे मी.माझ्या सावत्र आई व दादाने माझं लग्न दुसरीकडे ठरवलंय. पण मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय.”


"  श्रद्धा तुझा माझ्यावर  विश्वास आहे ना! तू उद्या सकाळी  सात वाजता अंबा देवीच्या मंदिरात ये. बाकी मी बघतो. तुझ्या घरच्यांना कळायच्या आत आपण लग्न करून मोकळे होऊ.."


         " कसं शक्य  आहे, दादाने त्याच्या मित्रांना  माझ्यावर सतत पहारा ठेवायला सांगितलयं. मला नाही वाटत  दादा आपलं लग्न होऊ देईल म्हणून. ..

 “तुला माझ्याशी लग्न करायचं नं ? मग काहीतरी ठाम निर्णय घे आणि मी सांगतो‌ तस‌ कर .”


“  शेखर एक आयडिया आलीय माझ्या डोक्यात,आज रात्री माझ नाटक आहे भोपाळ थियेटर मधे. नाटक संपलं की मी रेल्वे स्टेशनवर येते.तु तिथेच  ये.आपण दुसऱ्या गावाला जाऊन लग्न करू"


     “  चांगली संधी चालून आली आहे. नाटक संपलं की तू बाहेर पड.. हॊ पण येताना तुझं एटीएम कार्ड सोबत ठेव.आपण कुठेही गेलो तरी राहायला पैशाची आवश्यकता असणारच आहे… तुला तर माहित आहे सध्या माझ्याकडे नोकरी नाही..


      "  हो रे माहिती आहे मला.आज रात्री ११वाजता भेटु आपण. ए पण तू आधी तिथे हजर राहा हं.मला उगाचच शोधा शोध करायला लावू नको. मी  नाटकातीलच लाला रंगाचा घागरा चोली  घालून  असेल .लग्नाच्या वेळेस तेच कपडे कामी येतील माझ्या."


“  ओके,मी असेनच तिथे, तु काळजी करू नकोस. माझे दोन मित्र ठेवतो सोबत ”

" ओके बाय” म्हणून टेलिफोन बुथवरून फोन करणाऱ्या श्रद्धाने  फोन ठेवला..


भोपाळ मधल्या प्रिन्स टॉवरमध्ये कालपासून मेघनाच्या लग्नाची धामधूम सुरू होती.काल‌ हळदीचा  कार्यक्रम झाला. आज लग्न असल्याने सगळीकडे धावपळ सुरु होती. डेकोरेटरने हॉल सजवायला सुरवात केली होती. कॅटरर्सवाल्याचा मेनुचा सुवास दरवळत होता. मेघनाचे बाबा जातीने सगळीकडे लक्ष देत सर्वांची  विचारपूस करत होते.सगळे जवळचे नातेवाईकही बाहेर  गावाहून लग्नासाठी हजर  झाले होते. गोरज मुहूर्तावर लग्न असल्याने गावातील मंडळी येणं बाकी होतं.आता काही तासच  शिल्लक राहिले होते लग्नाच्या मुहूर्ताला.


मेघना हळदीच्या पिवळ्या साडीत सुंदर दिसत होती.मेकअप करायला ब्युटीशिअन ला बोलावले होते.लग्नात घालावयाचा घागरा चोली सुटकेस मधुन बाहेर काढल्या गेली.

" ए तुझी पसंती सुंदर आहे गं. हा लाल चुटक लेहेंगा, हे डिझायनर ब्लाऊज आणि ओढणीही सुंदर आहे. लग्नाच्यावेळी मस्त  शोभून दिसेल तुझ्या अंगावर एखाद्या राजकुमारी सारखी दिसशील नवरदेव फिदा होईल आमच्या मेघनावर…”

 “ऐ राजी आपण नवरदेवाचे बुट लपवून ठेवूया..”

 धमाल करूया लग्नात..”                       मेघनाच्या मैत्रिणींची  थट्टा मस्करी सुरू होती.


    मोबाईलची रिंगटोन वाजताच मेघनाच्या बाबांनी मोबाईल कानाला लावला. पलीकडून नवरदेवाचे ‌वडील बोलत होते त्यांचे बोलणे ऐकून मेघनाच्या वडीलांच्या कपाळावर धर्मबिंदू जमा झाले. त्यांनी आपल्या धर्म पत्नीला मंगलला फोन लावून बोलवून घेतले. आपल्या नवऱ्याने सांगितले  ते ऐकून मंगलही चिंतित झाली. मंगलला शोधत तिची जीवाभावाची मैत्रीण वासंती तिच्या जवळ पोहोचली आणि मंगल च्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तिने विचारले,


     “ मंगल काय झाले?”

मंगलने वासंतीचा हात धरून कार्यालयातील एका रिकाम्या रूम मध्ये नेले आणि मेघनाच्या बाबांचे व नवरदेवाच्या वडिलांचं काय बोलणं झालं ते सांगितलं.


“वासंती आता काय करायचं गं? पाहुणेमंडळी यायला सुरुवात होईल आता.”


वासंतीने मनाशी काही निर्णय घेतला आणि आपला प्लॅन सांगितला. मंगल ने होकारार्थी मान हलवली आणि मग दोघीजणी मेघनाच्या रूम कडे निघाल्या. 


       “ मेघना  मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे!” दारातून  आत येत  मंगल म्हणाली.                                              ‘काकू तुम्ही बसा आम्ही बघतो सगळं ‘ म्हणून मेघनाच्या मैत्रिणी खोली बाहेर पडल्या.त्या बाहेर पडताच मंगलच्या डोळयांतून आसवांचा बांध फुटला.


  ‘काय झालं  आई ?आई मी येत जाईल नं  भेटीला..पुणे भोपाळ काही जास्त दूर नाही.’


“ हो पण ती का रडते आहे ‌हे माहिती आहे कां तुला?”

 

“ मी दूर जाण्याच्या कल्पनेने तिला रडू येत असेल  हो ना आई? पण माझी वरात निघायला वेळ आहे अजून तु आत्ता कां  रडतेस?


“मेघना तुझी वरातच येणार नाही आहे  फोन आला तसा “ वासंती म्हणाली. 


  “कां?काही झालं कां तिकडे?असं कोड्यात बोलू नकोस मावशी. स्पष्ट काय ते मला सांग. “


“ अगं नवरा मुलगा काल पासून घरातून गायब आहे  म्हणे ‌‌“


मेघना जागेवरून उठली आणि हसायला लागली..


 “ मावशी अगं मुली पळुन  जातात असं ऐकलं होतं.. आणि माझा होणारा नवरा पळाला…”

 तिला हसू आवरेना..

 

 “ मेघू हसतेस काय, बातमी आल्यापासून बाबा कपाळावर हात  मारून बसले आहेत..आता दुपारचे बारा वाजलेत. सायंकाळी सात वाजता लग्न होतं.सगळी जय्यत तयारी झाली आहे पाहुणे येणं सुरु झालंय  आणि तुला गम्मत वाटतेय!”


“मलाही कळतंय आई,  लग्न तुटलं म्हणून माझी व घराण्याची  बदनामी होईल आणि पैशाचा चुराडा झाला तो वेगळा “


“ मेघना हे सर्व  टाळण्यासाठी मी  मुलगा सुचवला तर चालेल तुला ? ” वासंतीने तिला विचारले.


“ माझी  कधीही काही अपेक्षा नव्हती मावशी.. आईबाबांनी पसंत केलं  त्या स्थळाला मी होकार दिला होता “


“  मग आम्ही म्हणू त्या मुलाशी तू लग्न करशील ना ? मंगल ने तिला विचारले.  


    “ऐ आई!कुणालाही आणून माझ्या समोर उभं करू नकोस, तुटलं तर तुटलं लग्न. आता मी माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करेन.       

“ मेघना  वासंती मावशी तुला सासू म्हणून कशी वाटते गं? “

मेघना आश्चर्याने म्हणाली,

“ काय म्हणालीस आई ? “

“तु एकलसं तेच !”

 मेघना उठून वासंतीजवळ गेली. तिचा चेहरा हातात घेउन निरखून बघत म्हणाली.. नॉट बॅड! मावशी तू सासू म्हणून मला पसंत आहे पण माझा होणारा  नवरा आहे कुठे ? “

            तिच्या तशा बोलण्याने मंगल व वासंतीच्या  मनावरचा ताण कमी झाला.वासंती पटकन जागेवरून उठली.मेघनाचा हात हातात घेत म्हणाली,

             “ मेघना तू फक्त हो म्हण बाकी मी बघते! तुझ्यासारखी सुन मिळायला भाग्य लागते. माझाही मुलगा दिसायला सुंदर, स्मार्ट आहे,पुण्यातल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहे.. पण आता पंधरा दिवसापासून इंदोरला आलेला आहे.. “


 “  मावशी तुझ्यासारखी समजुतदार सासू मिळाली तर मी माझं  भाग्य समजेन. पण मावशी  मी तुला ओळखते, तुझ्या मुलाला कुठे पाहिलंय मी आणि असं एनवेळेवर माझ्याशी  लग्नाला तयार होईल कां तो? त्याला कल्पना दिली या गोष्टीची ? “

 “ मेघना माझा मुलगा  माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही,   “


“ मेघना मी तुझ्या बाबांना सांगते तु तयार आहेस  म्हणुन..”


 “आई तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या.. शेवटी  संसार म्हणजे  जुगार आहे असं म्हणतात आणि मी तो डाव खेळायला  तयार आहे.. “


“आणि तू या जुगारात नक्कीच जिंकशील याची खात्री आहे मला!” मेघनाच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.

  मंगल आणि वासंतीने एकमेकींना कडकडून मिठी मारली.

“ ऐनवेळी संकटात धावून येते तीच खरी मैत्री गं वासंती, मी लगेच सांगून येते यांना पण वासंती आम्ही हिंदी सायडर आमच्या समाजात घुंगट पद्धत आहॆ “

“असु दे गं ते सगळं लग्न लागेपर्यंत.एकदा महाराष्ट्रात गेलं की तुझ्या मुलीला घुंगट घ्यायची गरज पडणार नाही.”

आणि तिघीही मनापासून हसल्या. मंगल खोलीच्या बाहेर पडली आणि  वासंतीने अमेयला फोन लावून तातडीने बोलावून घेतलं. पुण्याला आपल्या नवऱ्याला फोन लावला आणि इत:भूत हकीगत सांगत म्हणाली,

       “ अहो मोठ्या सुनबाईला सांगून नव्या सुनबाईच्या स्वागताची सगळी तयारी करून घ्या …”

    दुपारी एक वाजता आईचा फोन येताच अमेयने ऑफिसमधून सुटी घेतली. तसाच  घाईघाईत रेल्वे स्टेशनला आला. इंदोर होऊन भोपाळ मार्गाने जाणारी ट्रेन पकडली.लगेचच  ट्रेन जागची हलली.पाच मिनिटात ट्रेनने वेग घेतला तसं अमेयच विचार चक्रही जोरात फिरू लागलं. त्याची आई आपल्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी भोपाळला आल्याचं त्याला माहीत होतं. ‘पण एवढ्या तातडीने आईने मला तिथे का बोलून घेतलं असावं?’ आईच फोनवरच बोलणं तो पुन्हा आठवू लागला.


  "अमेय..फार महत्त्वाचे काम आहे.ताबडतोब भोपाळ साठी गाडी पकड…


"आई काय झालं सांग ना तुझी तब्येत बरी आहे न?" अमेयने काळजीने विचारलं..


"माझी तब्येत ठीक आहे पण एक महत्त्वाचं काम आहे त्यासाठी ये.. तुझी आवश्यकता आहे मला !”


 अमेय विचार करू लागला, ‘ आधी ठरलं नसताना अचानक आईने आपल्याला तिथे लग्नाला कां बोलावलं असणार  ? नक्कीच आईला एखादी मुलगी सून म्हणून आवडली असेल . पण मी नाही घालणार कुणा एरिगैरीच्या  गालात माळ.. ठामपणे सांगेन मी तिला तुझ्या मुलाने  आधीच तुझ्यासाठी  सून पसंत करून ठेवलीय.’

  आणि त्याला तो दिवस आठवला.पंधरा दिवसांसाठी अमेय इंदोरच्या ब्रँचला आला होता . तो आला त्याच दिवशी तिथे श्वेता नावाची नवीन मुलगी रुजू झाली होती. प्रथमदर्शनीच कोणावरही छाप पडणारे असे तिचे व्यक्तिमत्व. दिसायला सुंदर, स्मार्ट बोलणही इतकं लाघवी की ऐकताना तिचं बोलणं संपूच नये असं वाटायचं. ऑफिस स्टॉपही खुश होता तिच्यावर.. अमेयही अपवाद नव्हता. हळूहळू दोघांची चांगलीच मैत्री जमली होती.आज कॉफीशॉपमधे तो  तिच्यासमोर आपलं मन मोकळ करणार होता.पण आईचा फोन आला आणि मनातलं सांगायचं राहूनच गेलं.श्वेताच्या आठवणीने त्याच्या  चेहऱ्यावर हसू फुललं.

भोपाळला पोहोचायला साधारण पाच तास लागणार होते.पाच वाजता मोबाईलची रिंग वाजली आणि त्याची झोपमोड झाली.


“ हं आई बोल!

 “अमु अरे संध्याकाळी सात वाजता लग्न आहे इथे. स्टेशनवरून डायरेक्ट मार्केटमध्ये जा. लग्नात शोभेल असा छानसा ड्रेस खरेदी कर आणि तयार होऊनच इथे लग्नाला ये.. अरे माझा मुलगा आहेस, सर्वांची ओळख करून देईल तुझ्याशी !”


     “ए आई तुझं लॉजिक मला काही समजतच नाही ग! एवढ्या तातडीने मला बोलवतेस काय आणि.. “

त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच वासंतीने फोन ठेवला. सहा वाजता ट्रेन भोपाळ स्टेशनवर पोहोचली. अमेय टॅक्सी करून मॉलमध्ये गेला आणि तिथूनच तयारी करून डायरेक्ट हॉलवर पोहोचला. मुहूर्ताची वेळ होत आली होती सगळे पाहुणे मंडळी जमली होती.. वासंती ताई हॉलच्या  गेटवरच उभ्या होत्या. अमेय टॅक्सीतून उतरताना दिसताच त्या लगबगीने समोर गेल्या. त्याचा हात धरला आणि गर्दीतून वाट काढत वरच्या मजल्या वर घेऊन गेल्या.गेल्या गेल्या त्यांनी अमेयची दृष्ट काढली.

“ किती राजबिंडा दिसतोय रे तू एखाद्या नवरदेवासारखा..”

  “ए आई तू कशाला बोललास मला सांगशील की नाही आणि दृष्ट काढायला मी काही नवरदेव नाहीये!  “

“नाही आहे पण होणार आहे!” वासंती हसत म्हणाली..


“काय म्हणालीस आई ?”


 आणि वासंतीने त्याला सगळी हकीगत सांगत म्हटलं, “अमेय मी माझ्या मैत्रिणीला शब्द दिलाय आणि तो शब्द पाळण्याचं कामं आता तुझं..”


 “आई अगं पण मला बळीचा बकरा का बनवतेस तू?”

“ अमेय मुलगी चांगली आहॆ. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, मग चल  मुहूर्ताची वेळ होत आली आहे. हॉलमध्ये सगळेजण वाट बघत आहेत..”


 तेवढ्यात मेघनाची आई व बाबा आले.

सगळं इतकं अचानक घडत होतं त्यामुळे अमेय पार गोंधळून गेला होता.

    “मुलीला घेऊन या “ म्हणून भटजीनी सांगितले.. आणि लाल चुटुक घागरा घातलेली. डोक्यावरून ओढणी घेऊन  चेहरा झाकलेली मेघना तिच्या मामांच्या सोबत आली आणि अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूने उभी राहिली. अमेयचं मन आतून रडत होतं..

   ‘आईने हे काय करून ठेवलं. माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा केला.’  मनातून त्याला आईचा राग येत होता  पण आता इलाज नव्हता. मंगलाष्टक झाली आणि दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकली.माळ घालतांना अमेयने मेघनाकडे बघितले सुद्धा नाही आणि बघितले असते तरी घुंगट असल्यामुळे मेघनाच्या चेहरा त्याला दिसला नसता.. सात फेरे घेण्यात आले. जेवणं आटोपली. आणि वरात स्टेशनवर आली. भोपाळ पुणे ही हमसफर एक्सप्रेस लागलेली होती. वासंती ताई व मेघनाला एका डब्यात तर अमेयला बाजूच्या डब्यात सीट मिळाली होती. गाडी सुटण्याची वेळ झाली वासंतीने आपल्या मैत्रिणीला मंगल ला म्हटले.


“ मंगल तू काही काळजी करू नकोस, आता मेघनाची जवाबदारी आमची”


 ट्रेनने वेग घेतला..रात्रीची वेळ असल्याने. सगळेजण झोपेच्या अधीन झाले होते.पण अमेयला मात्र झोप येत नव्हती. सगळं कसं अचानक घडलं होतं.एका अनोळखी मुलीशी  त्याचं लग्न  झालं होतं.मनात सारखा श्वेताचा विचार सुरू होता. प्रेमाचे धागे जुळण्याआधीच तुटले होते.मध्यरात्री केव्हा तरी त्याचा डोळा लागला. ट्रेन वेगाने आपला मार्ग कापत चालली होती.

 

  भोपाळ थियेटर्समधला “दुल्हन एक रातकी”  नाटकाचा अंक संपला. लाल रंगाचा सुंदरसा घागरा, चोली व डोक्यावर ओढणी घेतलेली श्रद्धा अतिशय सुंदर दिसत होती. नाटकात प्रमुख भूमिकेत असलेल्या श्रद्धावर तिने केलेल्या भूमिकेसाठी कौतुकाचा वर्षाव झाला. पण श्रद्धाच  तिकडे लक्ष नव्हतं.ती  लगबगीने मागच्या विंग मध्ये गेली, आपली बॅग उचलली आणि थिएटरच्या  मागच्या दरवाज्याने धावतच बाहेर पडली. टॅक्सीवाल्याला हात केला.आपला घागरा सांभाळत ती टॅक्सीत बसली.

                                                      “ड्रायव्हर लवकर रेल्वे स्टेशनला घेऊन चला..”


आत बसल्यावर श्रद्धा ने टॅक्सीच्या काचा वर सरकवल्या .

अर्ध्या तासातच टॅक्सी  भोपाळ रेल्वे स्टेशनला आली. पर्समधून 200 ची नोट काढून तिने टॅक्सीवाल्याच्या हातात ठेवली आणि उरलेले पैसे न घेताच ती प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावत सुटली. तिची नजर शेखरचा शोध घेत होती.आई, बाबा दादाला आपण नाटकगृहात नसल्याच लक्षात आल्यावर ते आपल्या शोधात इथपर्यंत येतील या भीतीने तिने चेहऱ्यावर ओढणी ओढून घेतली. मोबाईल हातात घेऊन शेखरला फोन करणार तोच  समोरून दादाचे दोन मित्र येत असल्याचे दिसताच  प्लॅटफॉर्मवरून  निघत असलेल्या   हमसफर एक्सप्रेसमधे आपला घागरा सांभाळत कशी बशी ट्रेन मध्ये चढतानाच तिच्या हातातला मोबाईल निसटून ट्रेनच्या खाली पडला.


      “ अरे देवा!”तिच्या तोंडातून                     अभावितपणे निघाले.


‘हा  शेखर कुठे गेला कोण जाणे? त्याला मी दिसणार कशी आता? आणि दादाच्या मित्राने शेखरला पाहिले तर? ‘                                       तिच्या मनात नाना शंका कुशंका येऊ लागल्या..

ती पारदर्शक ओढणीतून प्लॅटफॉर्मवर नजर ठेऊन होती. तिने बाजूच्याला विचारले,


“ कोणती ट्रेन आहे ही?  कुठे जाणार? “


“ हमसफर एक्सप्रेस पुण्यापर्यंत आहे.. “


 दोन मिनिटातच गाडी जागची हलली. समोरच दादाचे मित्र  तिचा शोध घेत होते त्यामुळे तिला ट्रेन मधून उतरताही येत नव्हते.. पुढच्या स्टेशनवर उतरून शेखरला फोन करावा म्हणून ती तिथेच बसली.दिवसभराच्या दगदगीमुळे तिला लगेचच झोप लागली.. शेखर  वेळेवर प्लॅटफॉर्मवर पोहचला होता. पण श्रद्धाचा दादा व त्याचे मित्र बघून तो जरा आडोशाला लपला .  


     खिडकी जवळ लाल ओढणी घेतलेली  तरुणी दिसताच प्लॅटफॉर्मवर घोटाळणारे शेखरचे मित्र अलर्ट झाले. ते दोघेही श्रद्धा असलेल्या ट्रेनमध्ये चढले. त्यांनी शेखरला फोन केला.                                “शेखर तू सांगितल्याप्रमाणे लाल रंगाचा घागरा घातलेली एक तरुणी ट्रेनच्या डब्यामध्ये एका बाईसोबत चढताना आम्ही बघितली. आम्ही त्याच ट्रेन मधे आहोत. “


     “ओके नजर ठेऊन रहा”  शेखर म्हणाला. आणि त्याने लगेचच श्रद्धाला फोन लावला. पण श्रद्धाचा फोन स्विच ऑफ येत होता मुद्दाम  तिने मोबाईल बंद केला असेल असं शेखरला वाटलं.. पण आपण पाठवलेले मित्र तिच्यासोबत आहे त्यामुळे त्याला थोडासा  धीर आला.                                   सुनसान एरियातून ट्रेन वेगाने धावत होती. प्रवासी गाढ झोपेत  होते आणि आणि अचानक गाडीचे चाकं रुळावरून घसरले आणि सगळे डबे उलटले..ट्रेनचा अपघात झाला होता.सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला.  आरोळ्यां किंचाळ्यांनी  वातावरण दणाणून गेलं .काहीजण जागच्या जागीच मृत पावले होते.काही जखमी होऊन जागेवरच विव्हळत होते. जे सही सलामत वाचले होते ते आपल्याबरोबरच्या लोकांचा शोध घेत होते. श्रद्धा जागेवर उठून बसली. भोवतालंच दृश्य बघून काय करावं तिला सुचत नव्हतं. तिच्यातली माणुसकी जागी झाली. तिच्या  बाजूने विव्हळण्याचा आवाज आला.  एक साठीची स्त्री विव्हळत पडली होती. त्या स्त्रीच्या डोक्याला मार लागला होता. श्रद्धाने आवाज दिला.

   “ काकू, काकू तुम्ही बऱ्या आहात ना?कोण आहे तुमच्यासोबत ? “                                पण ती स्त्री उत्तर देत नव्हती. इतक्यात अमेय तिथे पोहोचला.

    “आई आई! त्याने हाक मारली.आईची अवस्था त्याला बघवत नव्हती.तो श्रद्धाला म्हणाला तू इथे आई जवळ  थांब . मी बाबांना फोन करून गाडी मागवतो.

 श्रद्धा इकडेतिकडे बघू लागली.त्या अंधारातही तिला तिचा दादा ओळखू आला. त्याच्यासोबत आणखी एक दोन लोक होते. तिने  आपली ओढणी डोक्यावरून ओढली आणि ती अमेयच्या बाजूला  उभी राहिली. तिच्या दादा जवळ आला आणि त्याने आवाज दिला.

“ श्रद्धा”                                                 पण श्रद्धाने  आपले तोंड दाबून धरले.

 अमेयने विचारले,

 “अहो कोण हवे आपल्याला?”

“माझी बहीण श्रद्धा”

 “ ही माझी बायको आहे”

      अमेयने उत्तर देताच श्रद्धाला हायसे वाटले तिचा दादा आणि त्याचे मित्र तिथून निघून गेलेले तिने पाहिले. पण तिथेच थांबण्या वाचून तिला दुसरा मार्ग दिसत नव्हता. यांच्यासोबत राहिली तर  दादा पासून माझी सुटका होईल एवढाच  विचार तिच्या मनात  होता.अमेयने आपल्या बाबांना फोन करून गाडी पाठविण्यास सांगितले.


   इकडे लाल घागरा घातलेल्या बेशुद्ध असलेल्या मेघनाजवळ  शेखरचे मित्र पोहोचले.

एकाने शेखरला फोन लावला.

      " शेखर अरे  वहिनी इथे बेशुद्ध पडली आहे तू गाडी घेऊन ये तोपर्यंत आम्ही तिच्याकडे लक्ष ठेवतो."


  गाडी आल्यावर श्रद्धा अमेयसोबत पुण्याला पोहोचली . वासंती अजूनही बेशुद्ध होती . डॉक्टरला बोलावले गेले. डॉक्टरने त्यांना इंजेक्शन दिलं.. थोड्यावेळाने त्या शुद्धीवर आल्या पण आजूबाजूला कोण आहे आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.


अमेयने आवाज दिला. 

 "आई तुला बरं वाटत आहे ना आता?"

  पण वासंतीताईच्या डोळ्यात अनोळखी भाव होते.

डॉक्टर म्हणाले,.                                                 " घडलेल्या घटनेमुळे त्या थोड्या शॉक मध्ये आहेत. येईल काही दिवसांनी त्यांची स्मृती परत."


इकडे श्रद्धाही अडचणीत सापडली होती. 'काय करावे या लोकांना आपली खरी ओळख द्यावी का पण मी जर इथून बाहेर पडली तर दादा व त्याचे मित्र मला नक्की शोधून काढतील .' शेवटी तिने अमेयच्या घरातच राहायचे ठरवले.

अमेयची वहिनी आली म्हणाली,. 


   " मेघना फ्रेश होऊन घे थकली असशील."


‘म्हणजे हे सगळे मला या घरची सून मेघना समजत आहे तर’ तिने त्यांचा तो भ्रम तसाच राहू द्यायचा ठरवलं.ती वासंती जवळ बसून राहिली.

दिवसभर गडबडीत गेला सायंकाळी वहिनीने सुंदरशी साडी श्रद्धाला नेसायला दिली. तिची तयारी करून दिली आणि एका सजवलेल्या खोलीत आणले. आता मात्र श्रद्धाच हृदय खरंच धडधडू लागलं.  


     अमेय खोलीत आला आणि तिच्याकडे न बघता तिच्याकडे पाठ करून म्हणाला.


“सॉरी पण माझी मनस्थिती नाहीये मी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपतो.”


"एक मिनिट, एक मिनिट थांब मी ती नाहीये जी तू समजतो आहेस!"


" म्हणजे?" अमेय गर्ककन मागे वळून तिच्याकडे बघत विचारले..


"अरे म्हणजे म्हणजे तुझ्याशी लग्न झालेली तुझी बायको नाही आहे मी"

"मग ती कुठे गेली?"

उत्तरा दाखल श्रद्धा ने आपले खांदे उडवले..म्हणाली,

 " बहुतेक अदलाबदली झाली आहे आमची"


"अरे देवा आता तिला कुठे शोधायचं,तिच्या आई-बाबांना काय उत्तर द्यायचं? आई शिवाय मेघनाला कोणी ओळखतही नाही  मी सुद्धा तिचा चेहरा पाहिला नाहीये आणि  आई सध्या विस्मृतीत गेली आहे "अमेयने कपाळावर हात मारून घेतला.


  विरुद्ध दिशेला तोंड करून झोपले. श्रद्धा शेखरच्या आठवणीत  गुंग झाली.. आणि अमेयच्या डोळ्यासमोर  श्वेताचा चेहरा आला.

 कशी बशी रात्र काढली.


. आणि वासंतीच्या रूममध्ये पोहचली. अंधुक वासंतीने डोळे उघडले.. त्यांना अगदी धुसर धुसर दिसत होते.

समोर पुसटशी आकृती दिसताच त्यांनी विचारले,

“ मेघना बाळा कशी आहेस बेटा?”

 “काकू मी…”

श्रद्धाने पुढे काही बोलायच्या अगोदरच वासंती ताई म्हणाल्या,                                            ” मेघना तू मला मावशी म्हणतेस नां, मग मावशीची काकू कशी झाली? आज पासून मला आई म्हणायचं हं!”

“ म्हणजे तुम्हाला सगळं आठवतंय तर…वहिनी अहो वहिनी… यांना शुद्ध आली आहे बघा जरा..

श्रद्धा ओरडतच घरात गेली..


 आणि अमेयचे बाबा अमय, वहिनी, त्याचा दादा. सगळे धावत येऊन वासंतीताईच्या बेडभोवती जमले.


“ आई, आई.. तू शुद्धीवर आलीस फार छान झालं तू आम्हा सगळ्यांना ओळखतेस ना?


“ होय रे अमेय मला आता सगळं स्पष्ट दिसत आहे.”

 श्रद्धा कडे नजर जाताच त्यांनी विचारलं,         “पण ही कोण हिला ओळखले नाही मी?”


 “वासंती अगं असं काय करतेस? ही अमेयची बायको तू तिला सून करून आणलस ना?”


  “नाही नाही ही मेघना नाही.. अहो ही दुसरीच कोणीतरी आहे  माझी सून मेघना कुठं आहॆ? “


   “आई मी सांगतो काय गोंधळ झाला ते!”

 आणि अमेयने एक्सीडेंट झाल्यापासूनची सर्व घटना घरच्यांना सांगितली..

“ मग हिला ताबडतोब ट्रेनने हिच्या घरी भोपाळला   पोहचून दे !”

   श्रद्धा नकारार्थी मान हलवत म्हणाली  “ नाही! मी नाही जाणार या घरातून..!


“ कां?सगळ्यांनी आश्चर्याने विचारलं..


 “म्हणजे मी बाहेर पडली तर माझा सावत्र भाऊ मला घेऊन जाईल आणि माझी आई लग्न पैशासाठी कोणाशी तरी लावून देईल “


“ पण मग आम्ही तुला या घरात ठेवू शकत नाही. वासंती ताई ठामपणे म्हणाल्या..


 “आई एक्सीडेंट झाल्यापासून हिनेच तुझी काळजी घेतलेली आहे.. जरा विचार करू दे तिला कुठे जायचं ते!”

“ मला मोबाईल देता कां मी शेखरला फोन करून बघते..”

 तिने शेखरला फोन लावला पण शेखर चा फोन स्विच ऑफ येत होता.

 “आई  राहू दे हिला इथेच, आधी मेघनाचा  शोध घ्यायला हवा.. “ म्हणून अमेय घराबाहेर पडला.


  इकडे त्या रात्री शेखरच्या मित्रांनी  मेघनाला गाडीत टाकलं आणि गाडी पुन्हा भोपाळला गेली. मेघनाला पाहताच शेखर ओरडला… "अरे कुणाला उचलून आणलस तू, श्रद्धा कुठे आहे?"


“ बॉस काय म्हणता?ही वैनी नाई?


“अबे तुही गफलत झालीच कशी? तू  बरोबर पाहिलं नाई कां ?


"म्हणजे ही वैनी नाही आहे ?तूच तर सांगितलं   वैनी लाल घागरा ओढनी घालून आहे म्हणून.."दुसरा म्हणाला. 

त्यांच्या ओरडण्याने मेघना शुद्धीवर आली.

  "ए तुम्ही कोण आहात आणि वासंती मावशी कुठे आहे?मला इथे पळून आणलेला आहे कां? पण सांगून ठेवते मला चुपचाप माझ्या घरी सोडून द्या नाहीतर मी पोलिसांना फोन करेल."


"ए बाई जरा गप्प बसतेस का?"शेखरच  त्रासुन म्हणाला.

"मला माझ्या सासरी पोहोचवा"

"कुठे आहे तुझं सासर नाव काय त्यांचं?"

"माहित नाही"

"माहित नाही म्हणजे नवऱ्याचं माहित नाही कोणत्या गावाला जायचं ते माहित नाही.?


आता मात्र मेघनाला ही टेंशन आलं ती म्हणाली, "काल माझं लग्न झालं पण त्याच नाव काय तो कसा दिसतो हे सुद्धा पाहिलं नाही मी."


“असं कसं लग्न ?”

“ऐनवेळी नवरा मुलगा आला नाही म्हणून दुसऱ्या बरोबर लग्न झालं” 


"शेखर पोलिसात नेऊन दे हीला सरळ सरळ.."


"हो म्हणजे ‘आ बैल मुझे मार होईल’.. अक्कल तरी आहे का तुला  गधड्या ! आपण आपोआपच पोलिसांच्या तावडीत सापडू मुलीला पळवण्याच्या  गुन्ह्यात. श्रद्धाचा भाऊ पाळत ठेवून असेल आपल्यावर."


“  मला माझ्या नवऱ्याकडे पोहोचून द्या तुम्ही काही करत बसा!"


“ तुला पोहोचून द्यायला आमच्याजवळ तिकिटाला पैसे नाही.. विनातिकीट आणि गर्दी किती असते माहित आहे न तुला ट्रेनमध्ये.. “


श्रद्धाच्या पोटात कावळे ओरडत होते 

“ मला भूक लागली..  खायला द्या काहीतरी चांगल मागवा नवीन नवरी आहे मी”“


“माझं डोकं खा आता.. “शेखर ओरडला.


 मेघनाला भीती वाटायला लागली ‘हे गुंड प्रवृत्तीचे लोक पैशासाठी आपल्या काहीही करू शकेल.. श्रद्धाच्या पोटात कावळे ओरडत होते ’


 " शिकली सवरली दिसतेस तू असं नाव गाव माहित नसणाऱ्या मुलाशी लग्न करते का कोणी?


“ पण माझं झालंय माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाशी!”

 “ गप्प बसतेस का जरा विचार तर करू दे!"

 " ऐ पोरी तुझे आई बाबा कुठे राहते त्यांना फोन कर आणि विचार तुझ्या नवऱ्याचा पत्ता विचार .."

शेखरने तिच्या जवळ फोन दिला..


"हॅलो आई !आई ऐक ना मी गुंडांच्या तावडीत सापडली आहे मला सोडव!"


शेखरने तिच्या हातातला फोन हिसकावून घेतला. आणि त्याने आपली कहाणी सांगितली. श्रद्धा व  मेघनाने घातलेल्या लाल घागऱ्यामुळे कशी गफलत झाली हेही त्यांना सांगितले.


       “येताना थोडे पैसे घेऊन या आमच्या जवळ पैसे नाहीत. “


“ अरे  पण कुठे आहात तुम्ही? पुण्याला की भोपळला?

 “आम्ही मध्येच आहो, कळवतो तुम्हाला ऍड्रेस”


“आम्ही येतो पण मेघनाच्या सासरी पुण्याला तुला आमच्यासोबत यावं लागेल.काय घडलं ते सांगायला.. आमच्या पोरीची बदनामी नको.. “ 

 

 या सगळ्या घडामोडीत रात्र झाली.. मेघनाचे आई-बाबा हमसफर  एक्सप्रेस मध्ये बसले आणि पुण्याकडे निघाले.. मधला स्टेशनवर शेखर व मेघना डब्यात बसले.


 मेघना येत असल्याची बातमी ऐकून अमेयच्या वहिनींनी  तिच्या  स्वागताची तयारी केली.. उंबरठ्यावर माप ठेवलं…

 उंबरठ्याचं माप ओलांडून  मेघना आत आली.. वासंती ताई समोर झाल्या.. 

 “अमेय ही तुझी बायको, माझी सून मेघना.. आता तरी नीट पाहून घे “ 

 

 आणि सुंदर,गोड लाघवी अशा मेघनाला बघून अमेयच्या चेहऱ्यावर हसू फुलले. समोर होत त्याने मेघनाचा हात हाती घेतला.. दोघांनी एकमेकांकडे डोळे भरून पाहिले.

  गडबड ऐकून श्रद्धा ही बाहेर आली  आणि त्यांच्यासोबत शेखरला बघून ती अत्यानंदाने ओरडली, “ शेखर ssss”


 शेखरलाही आश्चर्य वाटले, “तू इथे कशी श्रद्धा?

  सगळा गोंधळ झालायं गं “


 वासंती ताई म्हणाल्या” हो पण या सगळ्या गोंधळात आमची सून आम्हाला सुखरूप परत मिळाली.. धन्यवाद शेखर बेटा  “


 “अमेय दादाला त्याची नवरी मिळाली पण माझी नवरी मला केव्हा मिळणार?


    “अरे मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी!आम्ही आहोत तुझ्या पाठीशी… लगेच भटजी बोलून तुमच्याही लग्नाचा बार उडवून देऊ.

 अमेयने त्याच्या पाठीवर हा थाप देत म्हटलं..


 डोक्यावर वाढलेले केस, रंग सावळा, थोडा टपोरी दिसणाऱ्या शेखरला बघून अमेयची वहिनीने श्रद्धाला हसतच विचारले , “ ए पण श्रद्धा काय गं, तू एवढी देखणी, सुंदर  याच्यावर कशी काय भाळलीस?


 “अगं वहिनी दिसायला असा असला तरी मनाने फार छान आहे, शिकलेला आहे पण सध्या बेरोजगार आहे.. आणि मुख्य म्हणजे माझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्याचं “


   अमेयची वहिनी म्हणाली ..”एवढा गोंधळ झाला पण शेवट गोड झाला..सगळे एकसुरात म्हणाले,


 “नवरी मिळे नवऱ्याला "



 सौ.ज्योति अलोणे





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू