पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संयोग

       "यात्रीजन कृपया लक्ष द्या, पुणे येथून हावडा पर्यंत जाणारी आजाद हिंद एक्सप्रेस प्लेटफार्म क्रमांक ४ वरून ६ वाजून ३५ मिनिटांनी रवाना होईल".

"बघा, उशीर झालाच आपल्याला!", साधना काळे आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या, "म्हणून मी तुम्हाला लवकर निघूया असं सांगत होते".

श्री दामोदर काळे म्हणाले, "वाह! अगं तूच उशीर केलास, आणि आता मलाच असं म्हणतेस? अगं, हे आपलं दुर्ग शहर नाही; पुणं आहे पुणं! इथला ट्राफिक पाहिलास ना? इथे ट्रेनच्या वेळेच्या किमान दीड तास आधी घरातून निघणं शहाणपणाचं आहे!"

साधनाने जड सुटकेस हातात घेऊन हळू-हळू चालत असलेल्या आपल्या नवऱ्याला पुन्हा सांगितले, "आता तरी लवकर चाला, ट्रेन सुटेल ना आपली!" तिच्या स्वतःच्या हातात एक मोठी एअर-बॅग आणि तिची पर्स होती. त्यांची अठरा वर्षांची मुलगी नेहा देखील खांद्यावर दोन बॅग्ज लटकावून स्टेशनच्या गर्दीतून वाट काढत आई-वडिलांच्या पुढे वेगाने चालत होती.

 थ्री टायर एसी बोगी क्रमांक बी-१ मध्ये ह्या कुटुंबाच्या सीट्स होत्या. ट्रेन सुटायला थोडाच अवधी बाकी होता, त्यामुळे 'बी-१' डब्याची पाटी दिसताच, काळे कुटुंब पहिल्याच प्रवेशद्वारातून ट्रेनमध्ये चढले. त्या अरुंद पॅसेज मधून आणि आधी चढलेल्या प्रवाशांच्या सामानातून वाट काढत ते आपल्या सीट्स शोधायला लागले.

"नेहा, काय सीट नंबर आहेत बघ एकदा”, साधना म्हणाली. "आई, नऊ, दहा, अकरा नंबर आहेत. अजून पुढे जावं लागेल”, नेहा पुढे जात बोलली.

पण सुदैवाने योग्य वेळात काळे कुटुंब ट्रेनमध्ये चढले तरी होते. कसेबसे आपल्या सीट्स पर्यंत पोहचून त्यांनी श्वास घेतला. पण बघतात तर काय! समोरच्या सीट्स बारा, तेरा, चौदावर आधीच एक कुटुंब आपलं सामान सर्वत्र पसरून, ऐसपैस बसलेलं होतं; सीटच्या खाली, मधल्या जेवायच्या टेबलवर, आणि दोन्ही बाजूच्या छोट्या पिशव्या लटकवायच्या हँगर्सवरही आधीच कब्जा झाला होता.

साधना जरा कमी शिकलेली असली, तरी ती निर्भीड आणि व्यवहारी होती. काळे कुटुंब आपापल्या जागेवर बसत असतानाच ती समोरच्या लोकांना म्हणाली, "अहो, आमच्या बाजूचा हँगर रिकामा करा! आणि हे काय? आमच्या सीटखाली तुम्ही तुमची सुटकेस कशी ठेवलीत? ती पण काढा! आम्हालाही आमचं सामान ठेवायचं आहे", साधना ठणकावून बोलली. पण तेवढ्यातच दामोदरराव आपल्या सर्व सुटकेसेस व इतर बॅगा उरलेल्या जागेत नीट मांडून मोकळेही झाले होते!

समोरच्या कुटुंबातील स्त्री, कविताने लगेच उत्तर दिले, "इतकंस तर सामान आहे तुमचं; जेवढा वेळ बोलण्यात घालवलात, तेवढ्यात लावूनही झालं! आता अजून जागेचं काय कराल? बसा आता शांतपणे!".

पण तरीही साधना आपल्या सीटच्या खालची आपली हक्काची जागा सोडायला तयार नव्हती, "नाही नाही ताई, असं थोडंच असतं? आम्हीही तुमच्या बरोबरीच्या किंमतीची तिकिटं काढली आहेत; आमचाही तेवढाच हक्क आहे त्या जागेवर!"

कविताने जोशात प्रत्युत्तर द्यायला तोंड उघडताच, तिचे पती श्रीधर प्रधान प्रकरण पुढे वाढू नये म्हणून तिची समजूत काढत म्हणाले, "ठीक आहे, आता राहू दे. एवढ्या लांबच्या प्रवासात भांडत-भांडत कशाला जायचं? सोड आता!"

नवऱ्याचे म्हणणे न पटल्याने कविता फणकाऱ्याने “हुं” म्हणत, तोंड फिरवून खिडकीबाहेर पाहू लागली. कविता आणि श्रीधर प्रधान ह्यांची मुलगी जान्हवी विंडो-सीटवर बसली होती. नेहा सुद्धा आपल्या बाजूच्या विंडो-सीटवर जाऊन बसली. दोन्ही मुली जवळपास एकाच वयाच्या होत्या. वाद वाढवायचा नाही म्हणून कविता आणि साधना गप्प झाल्या असल्या, तरी अजूनही एकमेकींकडे बोचक कटाक्ष टाकत होत्या. आयांच्या आधीच्या वागणुकीमुळे मुलीही कानकोंड्या झाल्या होत्या, एकमेकींच्या डोळ्यात बघायला कचरत होत्या.

   ट्रेन क्रमांक १२१२९ पुणे-हावडा आजाद हिंद एक्स्प्रेस पुणे जंक्शनहून पुढच्या दहा मिनिटांत सुटली आणि मध्य महाराष्ट्रातून छत्तीसगढ, झारखंड आणि नंतर पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनकडे प्रवासाला निघाली. दोन्ही कुटुंबांसाठी हा एक लांबलचक ट्रेन प्रवास होता आणि छोट्याशा वादातून निर्माण झालेल्या ह्या प्रवासाची सुरुवात सर्वांसाठी थोडीशी कडवटच झालेली होती.

 पुणे जंक्शन स्टेशनच्या बाहेर ट्रेन हळू-हळू पडत असताना, साधना आणि कविता ह्या दोघींनी योगायोगाने एकाच वेळेला हात जोडून देवाला नमस्कार केला आणि प्रवास सुखरूप पार पडूदे म्हणून प्रार्थना केली. साधना तिचे पती दामोदर रावांना म्हणाली, “अहो, नितूला सांगा ट्रेन वेळेवर सुटली, आपण निघालो आहोत”. “हो हो”, त्यांनी मोबाईलचे सिग्नल चेक करत म्हटले आणि मेसेज करायला सुरुवात केली.

पुढची पंधरा मिनिटे सहा लोकांपैकी कोणातही काहीच संभाषण झाले नाही. सगळेच आपापल्या फोनमध्ये व्यस्त झाले होते, पण नेटवर्क जाताच सर्वांच्या माना वर झाल्या. पुढचा वेळ कसा घालवायचा ते कोणालाही सुचेना. बाजूच्या पंधरा, सोळा क्रमांकांच्या साईड बर्थवर एक तरुण बंगाली जोडपे बसले होते पण ते आपल्याच खाजगी संभाषणात मग्न होते.

दामोदरराव काळे खूपच मोकळ्या स्वभावाचे असल्याने त्यांना हा अबोला सहन होईना. ते समोरच बसलेल्या श्रीधर रावांकडे बघत म्हणाले, “किमान आज हवामान तरी चांगलं आहे”. श्रीधरनेही हसून उत्तर दिले, “हो, संध्याकाळपर्यंत पुणे खरोखरच सुखावह होते". 

प्रवाश्यांच्या आवडीच्या आणि जगातील सर्वात सामान्य विषयावर केलेल्या एका अनौपचारिक टिप्पणीने तिथे पसरलेल्या शांततेचा भंग केला. दामोदरने पुढे बोलायची हिंमत एकवटली. तोपर्यंत, साधना आणि कविता सुद्धा थोड्या थंडावलेल्या दिसत होत्या. दोघींना ही कल्पना होतीच की हेच चेहरे पाहून पुढे रात्रभरचा प्रवास करायचा आहे, आता त्याला काही गत्यंतर नाही! लांबचा रेल्वे प्रवास म्हटलं की अनोळखी सहप्रवाशांपासून सुटका नाही!

दामोदर काळे एक साधे-भोळे, बोलके गृहस्थ होते. ते खूप लवकर आपल्या गप्पाटप्पांनी लोकांना आपलेसे करायचे. परके लोक ही सहज त्यांचे मित्र बनायचे. त्यांनी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला; विचारले "तुम्ही सगळे कुठे चालला आहात?". अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक तपशील सांगणे आपली पत्नी कविता हिला आवडत नाही हे जाणून श्रीधरने तिच्याकडे एक नजर टाकली; नंतरच उत्तर दिले, “नागपूर! आम्ही नागपूरला राहतो. तुम्ही?". “आम्ही दुर्गचे निवासी, तिथेच असतो. ते नागपूरपेक्षा चार तास पुढे आहे”, दामोदरने सांगितले. नुकत्याच भेटलेल्या अनोळखी लोकांना जास्त तपशील देऊ नये म्हणून दोघांनी सहज स्मित केले आणि त्यांचे संभाषण तात्पुरते थांबवले. दोघेही तरुण मुलींसोबत प्रवास करत असल्याने, त्यांना समोरच्याच्या हेतूंची खात्री करत, चाचपत बोलणे गरजेचे वाटले.

“चाय, चाय”- एक चहा विकणारा डब्यात शिरला. श्रीधरने त्याला खुणेनेच दोन कप चहा द्यायला सांगितले. विक्रेत्याने त्यांचा चहा ओतताच श्रीधरने दामोदरना विचारले, "तुम्ही घेणार का?" दामोदर रावांनी लगेच उत्तर दिले, “नाही सर. मी स्वतः विकत घेईन” आणि स्वतःसाठी आणि साधनासाठीही दोन कप सांगितले. सर्वांनी आपापले कप घेताच श्रीधरने त्वरीत शंभर रुपयांची नोट वॉलेट मधून काढून चहावाल्यासमोर धरली, पण त्याने शंभरचे सुट्टे नसल्याचे सांगून नोट घेतली नाही. तेवढ्यात दामोदरने पटकन खिशातून चारही कपांसाठी चाळीस रुपये सुट्टे काढून चहावाल्याला दिले. आपली किटली घेऊन तो लगेच निघून गेला.

श्रीधरना आता जरा संकोच वाटू लागला. अगदी अनोळखी व्यक्तीला त्यांच्या चहासाठी पैसे द्यावे लागले ह्याबद्दल कविता आपल्या नवऱ्याच्या कानात कुरकुर करत होती, "तुम्ही जरा लवकर काढायचे ना सुट्टे!". पण दामोदरने पटकन परिस्थिती सांभाळून घेत, शांत स्वरात कविताला म्हटले, “काही हरकत नाही ताई! अहो, आपल्या सर्वांच्या पुढच्या चहाचे पैसे सर देतील. उद्यापर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनी एकत्रच करायचा आहे ना! मग काय काळजी!", दामोदर हसत-हसत म्हणाले आणि कवितानेही हसत मान डोलावली, तसा दोनही कुटुंबांतील प्रारंभिक तणाव जरा कमी झाला.

आता दोन्ही मुली, नेहा आणि जान्हवीही एकमेकींकडे बघून हसल्या. नेहाने जान्हवीने घातलेल्या टॉपचे कौतुक केले. जान्हवी म्हणाली, "कालच पुण्याला विकत घेतलाय! ‘कॅम्प’मध्ये गेलो होतो शॉपिंगला! खूप शॉपिंग केलं तिथून". तीन दिवसांच्या छोट्या ट्रिपसाठी ते पुण्याला आले असल्याचे जान्हवीने सांगितले. नेहा लगेच उद्गारली, "अय्या, आमच्या सारखंच! आम्हीही गेले दोन दिवस इथेच होतो आणि भरपूर फिरलो पुण्यामध्ये!"

शॉपिंग हे मुलींमध्ये संभाषण सुरू व्हायला निमित्त घडले. त्यानंतर दोन्ही मुलींची चर्चा मस्तच रंगली. दोघींनी पुण्यातल्या फेमस शॉपिंग-मॉल्स पासून तुळशीबागेतल्या रस्त्यावरच्या खरेदीपर्यंत, आणि मंडईतल्या भाजी खरेदीपर्यंत चर्चा सुरू केली आणि दोघींनी खरेदी केलेल्या सर्वच वस्तूंबद्दल भरपूर बोलल्या. बोलता-बोलता संभाषण पुढे गेले तसे सर्वांनाच कळले की जान्हवी अकरावी मध्ये आहे, तर नेहा यंदा बारावीची बोर्डाची परीक्षा देणार आहे. दोघीही विज्ञान शिकत होत्या. त्यांनी त्यांचे कॉलेज, त्यांचे प्रोफेसर्स, त्यांचे अभ्यासक्रम, एवढेच नाही, तर पुढच्या करिअर विषयीच्या आकांक्षा आणि त्यांच्या मित्र-मैत्रीणींबद्दल सुद्धा भरपूर गप्पा मारल्या. आता त्यांच्यामध्येही एक मैत्रीचा दुवा जुळत होता. मुलींनी वरच्या एका बर्थवर एकत्र चढून बसण्याचा निर्णय घेतला. आपले छंद, आवडीनिवडी, भोवतालच्या गंमतीजंमती ह्यांच्याविषयी बोलताना त्या एकमेकींमध्ये इतक्या रंगून गेल्या, जणू काही लहानपणापासूनच्या जिवलग सख्याच ट्रेनमध्ये अचानक भेटल्या आहेत.

इकडे दामोदर आणि श्रीधर सुद्धा मुलींच्या गप्पा रंगलेल्या पाहून थोडे मोकळे झाले होते. आता त्यांच्यातील संकोच जाऊन दोघे देशातील चालू घडामोडी आणि राजकारण ह्यावर चर्चा करत होते. सुदैवाने, दोघेही एकाच राजकीय पक्षाचे समर्थक असल्याने दोघांचे बऱ्याच बाबतीत एकमत होत होते आणि चर्चेला भरपूर साहित्य मिळत होते. दोघांची अजून एक समान आवड म्हणजे क्रिकेट! दोघे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत व ऑस्ट्रेलियाच्या मॅचविषयी बोलण्यात रंगले. दोघांनी भारताच्या पराभवाचीच शक्यता जास्त असल्याबद्दल चिंता व्यक्त केली, तरीही मॅच खूपच रंगणार ह्याची त्यांना खात्री होतीच! ही ट्रेन वेळेवर पोहोचावी आणि घरी जाऊन पुढची मॅच पाहायला मिळावी, अशी इच्छा दोघांनी व्यक्त केली.

दोन्ही कुटुंबांतील झालेले इतके मित्रत्व लक्षात घेत, आता साधना आणि कविता ही ह्यापुढे स्वतःला गप्पांपासून अडवू शकल्या नाहीत. सुरुवात हलक्याशा स्मित-हास्याने करत दोघी सहज बोलू लागल्या.

"तुम्ही दूर्गला कधीपासून राहता? मूळच्या कुठल्या आहात?" कविताने सहज प्रश्न केला आणि उत्तर देतादेता साधना सुद्धा गप्पांत कधी गुंतली, तिलाही समजले नाही. मग काळे घराण्याचा इतिहास सांगत-सांगत ती आत्ताच्या तिच्या परिवाराविषयी रंगवून सांगू लागली. साधना म्हणाली, "आमचे हे भिलई प्लॅन्ट मध्ये साधे कारकूनच आहेत, पण लोक त्यांना भरपूर मान देतात. ते सुद्धा अडल्यानडल्याच्या मदतीसाठी सारखे धावतच असतात".

कवितानेही आपले पती श्रीधर ह्यांच्या स्वतंत्र व्यवसायाबद्दल सांगतानाच, ती स्वतः माध्यमिक शाळेची शिक्षिका असल्याचा उल्लेख केला. नोकरी सांभाळून ती आपल्या पतीला त्यांच्या व्यवसायातही मदत करते, हे ती अभिमानाने सांगत होती. आपण एका आत्मविश्वासू, स्वतंत्र कमावत्या महिलेबरोबर संवाद करतोय, हे लक्षात येताच साधना थोडी नरमलीच! साधना फक्त बारावी पास होती, एक साधी गृहिणी होती. तिने कधीही नोकरी केली नव्हती. पण कविताने तिचे एक गृहिणी म्हणून कौतुक केले; स्वत:बद्दल आत्मविश्वास बाळगण्यास तिला प्रोत्साहित केले आणि तिच्या सक्षमतेचे कौतुकही केले. हळूहळू दोघी गप्पांमध्ये इतक्या रमल्या की सुरवातीचे मतभेद पार विसरूनच गेल्या. जणू काही ते एक चहाच्या कपातील वादळ होते, आणि चहाच्या कपाबरोबरच विरून गेले .

आता दोघींनाही आपापल्या घरच्या वातावरणाची, आर्थिक परिस्थितीची माहिती एकमेकींना देताना संकोच वाटत नव्हता. साधना सांगत होती, "आम्ही खूप काटकसरीने संसार करून दोन्ही मुलांना वाढवलंय, त्यांच्या शिक्षणावरच भर दिलाय! थोरला आता इंजिनिअर होऊन पुण्याला नोकरीला लागलाय. मला त्याच्या कामगिरीचा खूप अभिमान आहे", ती अभिमानाने म्हणाली, "आम्ही नेहमी स्लीपर-क्लासनेच प्रवास करायचो, पण अलीकडेच मुलाला प्रमोशन आणि पगारवाढ मिळाली. त्याने ह्यावेळी आमचे तिघांचेही एसी कोचचे रिझर्वेशन करून तिकिटे पाठवली. त्याचा आग्रह म्हणून आत्ता पुण्याची ट्रीप केली. आता नेहमीच एसी कोच मधूनच जाणे-येणे करायचे, असं तो म्हणतोय", साधना थोड्या भिजल्या डोळ्याने कौतुकाने सांगत होती. आई-वडील आणि लहान बहिणीची एवढी काळजी घेणाऱ्या त्यांच्या मुलाचे कवितालाही खरंच कौतुक वाटले.

आता कवितानेही आपले पती श्रीधर ह्यांच्या व्यवसायाबद्दल आणि त्या दोघांच्या सुशिक्षित आणि कष्टाळू मुलींबद्दल सविस्तर माहिती दिली. ती म्हणाली, "मी नेहमीच मुलींना स्वतंत्र आणि सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन देत असते; जान्हवीचेच पाहा ना, ती सुद्धा आत्ताच मोठ्या बहिणीसारखी बाहेरच्या दुनियेत वावरायला तयार आहे". साधनानेही त्यावर सहमती दर्शवली आणि जान्हवीच्या स्मार्टनेसचे कौतुक केले.

तेवढ्यात जेवणाची ऑर्डर घ्यायला अटेंडंट आल्याने गप्पांमध्ये थोडा खंड पडला. दोघांनीही आपापल्या कुटुंबाबरोबर चर्चा करून जेवणाची ऑर्डर नोंदवली. इथे हे ही दिसून आले की दोनही कुटुंबांना नॉनव्हेज जेवणाची विशेष आवड होती.   

अटेंडंट जेवणाची ऑर्डर घेऊन गेला आणि पुन्हा गप्पा रंगल्या.

आज ट्रेनमधले एरवी बेचव वाटणारे जेवणही एकमेकांच्या सहवासात रुचकर वाटले. चवीला गप्पांची साथ होतीच! मुलींनी आपापल्या प्लेट्स वरच्या बर्थवर नेल्या आणि दोन्ही जोडपी खाली जेवताना एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत होती. काळे आणि प्रधान ह्यांनी एकमेकांना दुर्ग आणि नागपूर शहरांबद्दल आणि आपापल्या शहरातील जीवनशैलीबद्दल सांगितले. प्रधानांनी छत्तीसगढमध्ये राहूनही उत्तम मराठी बोलता येतं म्हणून काळे कुटुंबियांचे कौतुक केले.

ह्या दोन्ही शहरांपेक्षा पुण्यात असलेल्या नोकरीच्या चांगल्या संधींबद्दल बोलताना दोघांनाही जाणवले की दोन्ही कुटुंबातील मोठी दोन मुले काही वर्षांपासून पुण्यात नोकरी करत आहेत. श्रीधर आणि कविता ह्यांची मोठी मुलगी वैभवी चोवीस वर्षांची, तर दामोदर आणि साधना ह्यांचा मोठा मुलगा नितेश जवळपास सहव्वीस वर्षांचा! दोघेही इंजिनियर असून आता काही वर्षांपासून नोकरी करत आहेत आणि आता लग्नाच्या वयाचे आहेत. वैभवीने नागपूरमधूनच इंजिनीरिंग पूर्ण करून आता ती कोथरूड येथील पीजीमध्ये राहते, तर नितेश भोपाळला शिकला असून आता बाणेर येथे सहकाऱ्यांसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतोय. साधनाने लगेच दामोदरच्या फोनवरून नितेशचा फोटो काढला आणि कविताला दाखवला. कविताने ही उत्साहाने तसेच केले. नितेश आणि वैभवीचे फोटो पाहताच काळे आणि प्रधान दोन्ही जोडप्यांच्या मनात मुलांच्या विवाहाविषयी स्वप्न फुलायला लागली. आता गप्पांचा ओघ लग्नाच्या विषयाकडे वळला. मुलं-मुलींची लग्न जुळवण्यात येणाऱ्या आधुनिक समस्यांविषयी दोनही जोडपे मनमोकळेपणाने बोलली. त्यांनी ह्या संदर्भात एकमेकांच्या अपेक्षांवर चर्चा करायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळेच सांकेतिक बोलत होते, पण सर्वांनाच एकमेकांचा कल समजत होता आणि चेहऱ्यावरचा आनंद लपवणे शक्य होत नव्हते.

“आम्ही वैभवीसाठी आधुनिक, सुशिक्षित मुलगा शोधत आहोत, आणि अर्थातच, त्याचं कुटुंबही सुशिक्षित आणि सुस्थितीतलं असायला हवं”, कविताने आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. हे ऐकून साधना क्षणभर निराश झाली, पण कविता पुढे म्हणाली, "साधनाताई, तुमचं कुटुंब आम्हाला खूपच आवडलंय! थोड्याच वेळात अगदी आपलेपणा निर्माण झालाय!"

दामोदरनेही आपले मत मांडले, “आमचीही तशीच इच्छा आहे ताई! आमचा मुलगा पुण्यात स्थायिक होणार आहे. आम्हालाही हुशार, शिकलेली, नोकरी करणारी स्वावलंबी सून हवी आहे. सुनेने आमच्यासोबत राहून आमची सेवा करावी अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. आम्ही पण रूढीवादी विचारांचे नाही हो, खूप पुढारलेले आहोत. आमच्या नेहालाच बघा ना; तीही लवकरच पुण्यात ग्रॅजुएशनला ऍडमिशन घेणार आहे. आणि शिवाय, आम्हाला मुलींविषयी खूप माया वाटते. आपल्या ह्या दोन कुटुंबांमध्ये काही चांगले घडलेच, तर तुमची वैभवी आमच्या घरात लेकीसारखीच आनंदात नांदेल, आम्ही तुम्हाला खात्री देतो."

तेवढ्यात साधना उद्गारली, “पण जातीचं काय? कविता ताई, तुम्हाला परजातीची काही अडचण नाही ना?", साधनाचा चेहरा फिका पडला होता कारण नितेशला ह्या क्षुल्लक कारणावरून, एका चांगल्या कुटुंबाकडून नकार मिळू नये असे तिला मनापासून वाटत होते. पण कविताने तिला धीर दिला, “साधना ताई, गेले ते दिवस. आपण ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन आपल्या मुलांसाठी उत्तम आणि योग्य जोडीदार शोधला पाहिजे. साधनाला कविताच्या पुरोगामी विचारांचे खूपच कौतुक वाटले, “आम्हाला नितेशचा फोटो आवडला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला तुमचं कुटुंब आवडलं. तीन-चार तासांच्या प्रवासात तुम्ही आम्हाला खूप आपलंसं केलंत!", कविता म्हणाली.

दामोदर आणि साधनाही आनंदून गेले होते. त्यांनाही वैभवी सर्वच बाबतीत आवडली होती.

ह्या सर्व गप्पा नेहा आणि जान्हवी लक्ष देऊन ऐकत होत्याच! जान्हवी मध्येच म्हणाली, "आई, तू ताईला विचारलं आहेस का? ती हे सर्व मान्य करून लगेच लग्नाला तयार होईल, असं वाटतंय तुला?" नेहा पण उद्गारली, "तुम्ही आई-वडील स्वतःच सर्व काही ठरवत आहात. आधी त्यांचे मत विचारा ना!" धाकट्या बहिणींचे म्हणणे योग्यच होते. दोघी आपापल्या मोठ्या भावंडांना चांगल्याच ओळखत होत्या. त्यांच्या ह्या बोलण्याने सर्वच पालक विचारात पडले.

कविता म्हणाली, “त्यांचे म्हणणे बरोबर आहे. आमची वैभवी, मी तिला पाठवलेली सर्व स्थळं केवळ फोटो पाहूनच नाकारते. ती म्हणते की तिला इतक्या लवकर लग्नच करायचं नाही. ती पुण्यात तिची नोकरी आणि आयुष्य खूप एन्जॉय करत आहे”, कविता थोडी उदास दिसत होती. साधनालाही तिचे म्हणणे पटले. ती म्हणाली, “नितेशचेही असेच मत आहे. मी त्याला पाठवलेला बायोडेटा तो स्पष्टपणे नाकारतो आणि लग्नाचा विषयच टाळतो. आता काय करायचं?".

पण कविता पुन्हा म्हणाली, “आपण पटवून देऊया त्यांना! काहीही झालं तरी एवढं चांगलं स्थळ मी आता हातचं घालवणार नाही. मी वैभवीला आता पटवून देईन. आपण हे घडवून आणलंच पाहिजे”. साधनाने होकारार्थी मान हलवली.

कुटुंबातील पुरुषांनीही ह्यात पुढाकार घेतला. आपण त्यांच्याशी योग्य रीतीने बोललो आणि त्यांना एकमेकांच्या कुटुंबांबद्दल सर्व चांगले मुद्दे पटवून दिले, तर मुले या संबंधाला नक्कीच सहमत होतील, ह्या सकारात्मक विचारावर पुरुषांनीही दुजोरा दिला.

रात्र फार झाल्याने दोन्ही कुटुंबीयांनी गप्पा आवरत्या घेतल्या आणि झोपण्याच्या तयारीला लागले. उशी, ब्लॅन्केट आणि स्वच्छ पांढऱ्या चादरी मिळाल्याने काळे कुटुंब खूपच आनंदून गेले होते. रेल्वेच्या एसी डब्यातून काळे कुटुंबाचा हा पहिलाच प्रवास होता. लाडक्या लेकाविषयी अभिमान आणि त्याला भविष्यात वैभवी सारखी सुंदर, सुयोग्य साथीदार मिळण्याची आशा त्यांच्या डोळ्यांमध्ये चमकत होती. हा जणू काही परमेश्वराचाच आशीर्वाद मानून, ते मनोमन देवाला धन्यवाद देत झोपायला गेले. प्रधान कुटुंबीय सुद्धा लाडक्या वैभवीच्या लग्नाची स्वप्ने पाहात त्या धडधड धावत्या ट्रेनमध्येही आनंदाने झोपले. मनातला उत्साह आणि आकांक्षांची भरारी त्यांना उगवत्या सूर्याची ओढ लावत होते, कारण आता प्रवास संपवून घरी पोहोचताच मुलांना लग्नासाठी तयार करण्याचे कठीण काम त्यांच्यासमोर होते.

************

 काळे आणि प्रधान कुटुंबीयांनी सकाळचा चहा आणि नाश्ता करतानाच पुन्हा एकदा आपले भविष्यातील नाते दृढ केले, आणि आपापले पत्ते आणि फोन नंबरची देवाणघेवाण करत एकमेकांना आनंदाने मिठी मारली. दोन्ही माता घरी पोहोचताच आपापल्या मुलांशी कसे बोलायचे, ह्याची मनात उजळणी करत होत्या. नेहा आणि जान्हवी आधीच, पुढच्या वेळी मोठ्या भावंडांच्या साखरपुड्यानिमित्त भेटण्याची योजना करत होत्या.

“पुण्याहून येणारी आजाद हिंद एक्सप्रेस नागपूर जंक्शनला पोहोचली आहे”, प्लॅटफॉर्मवर घोषणा ऐकू येऊ लागल्या आणि पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासन देत, प्रधान कुटुंबाने काळे कुटुंबाचा निरोप घेतला. ट्रेन छत्तीसगढच्या दिशेने पुढे निघाली. ट्रेनचा प्रवास काळे मंडळींना एवढा सुखद कधीच वाटला नव्हता.

कविता घरी पोहोचली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. तिने एक मिनिटही वाया न घालवता वैभवीला तिच्या ऑफिसमध्ये फोन लावला. वैभवी म्हणाली, "आई, मी एका अर्जंट मीटिंगमध्ये आहे. तुम्ही सुखरूप पोहोचलात ना? ठीक आहे. मी नंतर सावकाश फोन करते". आत्ता अधिक ताणले, तर वैभवी नेहमी सारखाच हा प्रस्ताव धुडकावून लावेल, हे जाणून कविताने तात्पुरती आपली आतुरता लपवली.

साधनाही आतून अस्वस्थता अनुभवत होती. उरलेल्या प्रवासात दामोदर आणि नेहा बरोबर लग्नाबद्दलची स्वप्ने रंगवत असली, तरी तिला नितेशचा स्वभावही माहीत होताच! तो काही मिनिटांमध्ये सहमत होणारा मुलगा नाही. त्यालाही पटवायला काही दिवस जातील. विचार विनिमय करतच त्यांचा दुर्गपर्यंतचा प्रवास आटोपला. ट्रेनने साथ दिली आणि विचारांची साखळी खेचत, काळे कुटुंब दुपारी दोन वाजता दुर्ग जंक्शनवर उतरले.

दुपारी चारच्या सुमारास नितेश कॉफी ब्रेकसाठी कॅन्टीनमध्ये जातो, तेव्हाच त्याला गाठायचे ठरवून साधनाने त्याला कॉल केला, “हॅलो नितू, आम्ही सुखरूप घरी पोहोचलो”, ती म्हणाली. रेल्वेच्या लांबच्या प्रवासानंतर आईचा आवाज ऐकून नितेशला आनंद झाला. “कसा होता एसी मधला प्रवास? तुम्हाला मजा आली का?", त्याने विचारले. “बाळा, आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त छान झाला प्रवास”, साधना म्हणाली. मग साधनाने सविस्तर त्याला ट्रेनमध्ये अचानक भेटलेल्या ह्या प्रेमळ कुटुंबाबद्दल, त्यांची मुलगी वैभवीबद्दल आणि त्या दोघांच्या संभाव्य लग्न-संबंधाबद्दल सांगण्याचे धैर्य एकवटले. नितेश चिडलाच, "अगं आई, मी तुमच्या एसी कोचच्या अनुभवाबद्दल विचारतोय, आणि तुम्ही माझ्यासाठी लग्नाचे प्रस्ताव काय आणताय? मी इतक्या प्रेमाने तुम्हाला एसी मधून प्रवासाला पाठवलं; त्याविषयी बोल ना. लग्नाचा विषय आत्ता काढायची काय गरज आहे? पण ह्यावेळेस साधनाने नमते घेतले नाही. मुलीशी बोलून मगच निर्णय घ्यावा ह्यासाठी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. ती म्हणाली, "तुम्ही दोघेही पुण्यात असल्याने, एकमेकांना वीकएंडला भेटू शकता आणि मग ठरवू शकता. प्रत्यक्ष भेटून, बोलून, नाही आवडली मुलगी, तर तुझ्यावर कोणताही दबाव आम्ही पाडणार नाही. भेटून तर बघ!"

नितेशच्या बाबांनी मोबाईल मागून घेतला आणि ते प्रथमच त्याच्याशी ह्या विषयावर सविस्तर बोलले. प्रधान कुटुंब आणि वैभवीबद्दल खूप सकारात्मक माहिती दिली. “ती तुझ्यासारखीच आहे नितेश; हुशार, आत्मविश्वासू, स्वतंत्र, तरीही आपल्या पालकांवर खूप प्रेम करणारी व त्यांची काळजी घेणारी! तुम्ही दोघं एकमेकांसारखेच आहात, छान जुळेल तुमचं!" नितेशकडून एकदातरी वैभवीशी बोलण्याचे वचन घेऊनच त्यांनी फोन ठेवला.

इकडे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सहाच्या सुमारास पुन्हा वैभवीचा फोन वाजला. "बोल आई", ती म्हणाली.

कविताचे शब्द साधनापेक्षा वेगळे नव्हते आणि वैभवीही कविताला अपेक्षित असलेलाच स्वर लावत होती. “आई प्लीज, सतत तेच नको ना! तीन दिवस तू माझ्यासोबत राहिलीस, पण बहुतेक सगळा वेळ फक्त माझ्या लग्नाबद्दल बोलत होतीस. मी तुला समजावून थकले! आणि आता तू माझ्यासाठी ट्रेनमध्येच स्थळ शोधलस?" वैभवी म्हणाली. पण कविताने ह्या वेळेस माघार घेतली नाही. "एकदा, आणि फक्त एकदाच, आमच्या इच्छेखातर ह्या मुलाला भेटून बघ; नाही पटलं, तर पुन्हा तू हो म्हणेपर्यंत आग्रह करणार नाही". कविताने आधीच नितेशचा बायोडेटा आणि फोटो वैभवीच्या व्हॉट्सॲपवर पाठवले होते आणि वैभवी तिच्या स्क्रीनवरच्या फोटोकडे शांतपणे पाहात म्हणाली, “ठीक आहे आई, ह्यावेळी तुमच्या म्हणण्याला मान देऊन, मी ह्या मुलाचा विचार करीन! आता ठीक आहे? नाही नाकारत मी हा प्रस्ताव! मी बोलेन त्या मुलाशी आणि सांगेन तुम्हाला. पक्कं आई; लव्ह यू!”, वैभवीने फोन ठेवला.

कविताला कल्पनाही नव्हती, वैभवी ह्यावेळेस तिच्या बॉयफ्रेंडसोबत आयटी पार्कच्या कॉफी शॉपमध्ये बसून रोजच्याप्रमाणे संध्याकाळची कॉफी घेत होती.

"अरे व्वा, कोण आहे हा रुबाबदार तरुण?", वैभवीच्या बॉयफ्रेंडने तिच्या फोनवरचा फोटो पाहून विचारले.

"आहे कोणीतरी! माझ्या आईची इच्छा आहे की मी ह्या तरुण, देखण्या मुलाशी लग्न करावं. ट्रेनमध्ये ती त्याच्या कुटुंबाला भेटली आणि त्याच्या फोटोवर खूप प्रभावित झाली. ती म्हणतेय की दोन्ही कुटुंबे एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहेत आणि मी ह्या फोटोतल्या नितेश काळे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर, पुण्याच्या ह्याच आयटी पार्कमधील टेक्नोव्हिजन कंपनीत काम करणाऱ्या आणि आठ लाख रुपयांचे पॅकेज असलेल्या मुलाशी लग्न करावं.……. जो आत्ता माझ्या शेजारीच बसलेला आहे”, वैभवी नितेशकडे बघत हसत बोलली.

"ओह माय गॉड! खरंच?" तिच्या आईचे मेसेज वाचण्यासाठी वैभवीच्या हातातून फोन घेत नितेशने विचारले.

"हो नं, केवळ एका रेल्वे प्रवासात आपली कुटुंबे एकमेकांच्या प्रेमात पडली आणि आता आपण लग्न करावं अशी त्यांची इच्छा आहे! काय संयोग आहे ना!!” दोघांना हसू आवरेना.

"म्हणजे शेवटी आपला प्लॅन यशस्वी झालाच!” ते एकमेकांना टाळी देत मोठ्याने हसले.

"बघ, माझं प्लॅनिंग किती जबरदस्त झालं”, नितेश उद्गारला. वैभवीने नितेशचे आभार मानले, "खरंच रे, तुझी धावपळ कामास आली. आपण सर्व सहा तिकिटे एकत्र बुक केली आणि बोगीमध्ये एकाच सहा सीटरमध्ये त्यांना शेजारच्याच जागा मिळतील ह्याची खात्री केली. थॅन्क्यू नितेश, तू चार महिन्यांपूर्वी बुकिंग विंडो उघडण्याच्या तारखेलाच सकाळी स्टेशनवर जाऊन हे सर्व घडवून आणलंस!"

ती पुढे म्हणाली, "मी माझ्या आई-बाबांना चांगली ओळखते. त्यांनी प्रेमविवाहाला मान्यता दिलीच नसती. माझी आई तर मागच्या काही महिन्यांत मला सारखी स्थळं दाखवत होती".

नितेशनेही सहमती दर्शवली, “मला माहिती होते, आपली कुटुंबे एकमेकांसाठी योग्यच आहेत, पण प्रेमविवाहाच्या नावाखाली प्रत्येकाची प्रतिक्रिया कशी असेल ह्याची मलाही कल्पना नव्हती. आपण दोघेही मागची तीन वर्षे एकत्र आहोत, पण आपल्या आई-वडिलांना हे सांगायची हिंमत आपण कधीच केली नाही; अगदी आपल्या बहिणींना सुध्दा. दोघांचे आई-बाबा इतकी स्थळं सुचवताहेत, पण "तुमच्या मनात कोणी आहे का", हे विचारायचे त्यांना सुचलेही नाही. आपण सुचवलं आणि त्यांची प्रतिक्रिया उलटी झाली, तर सगळेच बिनसेल ही भीती! बऱ्याच वेळा आईवडील लव्ह मॅरेजचे नाव ऐकूनच बिथरतात, दुसऱ्याच टोकाचे निर्णय घेतात; त्यांच्या मुलांच्या निवडींमध्ये दोष शोधतात! मला आपल्या प्रेमात कोणतेही विघ्न येऊ द्यायचे नव्हते! म्हणूनच मी ही योजना आखली!"

"आणि ती शंभर टक्के यशस्वी झाली!", वैभवी नितेशकडे कौतुकाने पाहात बोलली.

"अगं, ट्रेनमध्ये वेळ घालवण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारायला लोकांकडे भरपूर वेळ असतो, त्यामुळे कोणत्याही विषयावर गप्पा रंगतात, मैत्री जुळते. तिथे समोरच्या लोकांचे खरे स्वभाव समजतात; प्रत्यक्ष त्या माणसांच वागणं-बोलणं दिसतं. एकमेकांची पदवी, शिक्षण, पॅकेज, चेहऱ्याचे सौंदर्य ह्यांचा विचार न करता माणसे एकमेकांना समजून घेतात, एकमेकांशी चटकन धागे जुळतात. मला खात्री आहे की आपल्या जातीभेदांची पर्वा न करता, आपल्या आई-वडिलांना एकमेकांच्या स्वभावांची ओळख पटली असेल; परिस्थितीत अंतर असले तरी, एकमेकांशी जुळवून घ्यायला आवडले त्यांना! हेच स्थळ मुलांनी सुचवले, तर त्यात दोष काढतील, भेटायला तयारही होणार नाहीत; पण ट्रेनच्या प्रवासात न ठरवून घडलेल्या भेटीत एकमेकांची मने सहज जुळून आली, नाही का!”.

"हा आपल्या लव्हस्टोरीचा विजय आहे नितेश…“, वैभवी हळूच नितेशकडे प्रेमाने पाहात म्हणाली. दोघांनी ठरवले की वीकएंडला भेटल्याचे सांगून दोघेही आपापल्या आई-वडिलांना आपला होकार कळवतील आणि पुढे जाण्याची मंजुरी देतील.

“नितेश, मग आपण त्यांना खरं कधी सांगायचं, की हे सर्व प्लॅन करून जुळवलं होतं, योगायोग नव्हताच?”

नितेशने त्याच्या भावी पत्नी, वैभवीचा हात प्रेमाने हातात घेत उत्तर दिले, “कधीच नाही!! ह्या गोष्टीकडे आपणही एक गोड संयोग म्हणूनच पाहू! आपल्या आई-वडिलांनाही ह्या रेल्वे प्रवासातली अकल्पित भेट एक संयोग म्हणूनच आठवत राहू देत! शेवटी, आपलीही पहिली भेट अशीच तीन वर्षांपूर्वी ह्याच आजाद हिंद ट्रेन मध्ये घरी परत जाताना झाली होती, आठवतंय ना! आपली ओळख होणे, आपले प्रेम जुळणे, आपल्याला ही युक्ती सुचणे आणि आपल्या आई-वडिलांनी आपले लग्न ट्रेन मध्येच जुळवणे, हा सुध्दा देवाने घडवून आणलेला संयोगच आहे ना?".

वैभवीने प्रेमाने नितेशकडे पाहात होकार दिला आणि दोघेही आनंदाने आपापल्या घरी परतले.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू