पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अविस्मरणीय प्रवास

  फाल्गुनाचे दिवस होते, बसमधून जाताना लालबुंद पळस सगळ्या विश्वाचं चैतन्य त्याच्यातच सामावल्याच्या भासातच,मिरवत होता.एकेक कळी खुदुखुदू हसतानाच उमलतेय की काय असलाच भास,बघणाराही भान हरपून कळी कळी निरखत होता आणि निसर्गाच्या कुशीत किती काय काय जादुई असतं ना, ह्या विचारातच गर्क होत होता.चला चला के.टी.पी. एस....म्हणून कंडक्टर ने म्हणताच मी भानावर येत,जागेवरून उठले.पर्स डबा बाटली सांभाळत खाली उतरले.

            रोजच्याच सवयीने कार्यालयात गेले.हजेरी रजिस्ट्ररवर सही करून जागेवर जाऊन बसणारच होते की, चपराशी सांगत आला मॅडम तुम्हाला सरांनी बोलावलं आहे.हो आलेच म्हणत केबिनमध्ये गेले.सर म्हणाले, "मॅडम नाशिक प्रशिक्षण ला जाता का?" मी म्हणाले "नाही,सर माझा मुलगा फक्त दीड वर्षाचा आहे, एवढ्या लहान वयात तो माझ्याशिवाय राहणार नाही." "सर म्हणाले ठीक आहे बघतो कुणी आणखी जातो का?" कामाकामात दिवस सरला.संध्याकाळ पर्यंत प्रशिक्षणासाठी कुणीही तयार झालेलं नव्हतं. तो दिवस गुरूवार होता. शुक्रवारी मुलाला बरं नाही म्हणून मी सुट्टीवर होते.शनीवारी दुस-या शनिवारची सुट्टी होती आणि रविवारी तर सुट्टीच असते . सोमवारपासून प्रशिक्षण सुरू होणार होते.चला अनायासे प्रशिक्षणापासून  सुटका झाली या आनंदी विचारातच  मी वावरत होते.शनिवारी सायंकाळी माझ्या घरी कार्यालयाचा चपराशी, प्रशिक्षणासाठी कार्य मुक्तीचा आदेश आणि आगाऊ रक्कम घेऊन हजर, मग  काय सही करून आदेश आणि पैसे घेतले.

          एवढ्या लहान बाळाला घरी ठेवायचं ,म्हणून घरात सगळ्यांचे चेहरे काळजी ग्रस्त. आई म्हणाल्या रोज तू कार्यालयात जातेस तेव्हा मीच सांभाळते ना, घेईन मी सांभाळून. सोबत येण्याला कुणालाच फुरसत नव्हती, प्रत्येकाला आपापली कामे होती.अण्णा म्हणाले चल मी तुला अकोल्यापर्यत सोबत करतो. कपडे वगैरे सर्व सुटकेस मधे भरून,रविवारी दुपारी नागपूरहून अकोल्यासाठी निघालो.त्यावेळी नाशिक जाणारी रेल्वे अकोल्याहून रात्री अकरा वाजता सुटणार होती. जेवणं वगैरे करून आम्ही प्लॅटफॉर्मवर येवून बसलो.थोड्याच अवधीत रेल्वेगाडी आली.ही रेल्वेगाडी नवीनच सुरू झाल्याने कांहीच गर्दी नव्हती आणि त्या वेळी मोबाईल किंवा दूरदर्शन वगैरे नसल्याने ही वार्ता फारशी पसरलेली नव्हती.एका एका बोगीत एक किंवा दोनच व्यक्ती दिसत होत्या.मला जरासं घाबरायला झालं,पण आपण घाबरलो आहोत हे अण्णांना दिसू द्यायचं नव्हतं,नाहीतर अण्णा म्हणाले असते ,ठेव बाजुला ती नोकरी आणि ते प्रशिक्षण अन् चल घरी.चेह-यावर उसनं हसू आणून मी गाडीत येऊन बसले.समोरच्या बाकावर एक बाई गाठोडे उशाला घेऊन तोंडावर पांघरूण घेऊन झोपली होती.त्या बाईची सोबत होईल म्हणून मी, समोरच्या बाकावर बसले.

      माणसाचं मनही कसं असतं ना,आपला परिवार आपल्या सोबत असेल तेव्हा आपण कधीही रेल्वेत आणखी प्रवासी यावेत,अशी वाट पहात नाही,पण त्यादिवशी मात्र मला सोबत हवी असल्याने,मी खूप आतुर होवून आणखी प्रवासी येतील म्हणून वाट पहात होते,पण माझी प्रतीक्षा व्यर्थ गेली . शेवटी रेल्वे सुटण्याची शिट्टी झाली.नीट जा बरं का.अण्णा म्हणाले आणि रेल्वेगाडी निघाली सुद्धा.रेल्वेगाडी थोडीशीच पुढे गेल्यावर चालत्या गाडीत दोन १०/१२वर्षाची दोन  मुले चढली.आणि मोठमोठ्या आवाजात बोलू लागली."अरे आज मी सातशे रूपये कमावले".दुसरा म्हणाला "इतके जास्त  कसे मिळाले? दुसरा म्हणाला "अरे एका बाईने मला पाचशेची नोट दिली, आणि मी वापस करीतच होतो,तर गाडी सुरू झाली". अरेच्या हे तर प्लॅटफॉर्मवर चणे किंवा शेंगदाणे विकणारे मुलं दिसताहेत,असा मी मनाशीच विचार करून जरा स्वस्थ बसले..थोड्या वेळाने ती मुलं गाडीत कुणीही नाही असं पाहून जोराजोराने ओरडायची, गाणी म्हणायची. .गाडीचा खडखडाट त्यात त्या मुलांचं ओरडणं ऐकून मला सिनेमातील एक दृष्य आठवलं,त्यात नायिका रात्रीच्या लोकलने एकटीच प्रवास करीत असते आणि दोन टारगट मुलं तिला खूप त्रास देतात, आणि मागे मागे सरकत ती रेल्वेडब्यातून चक्क बाहेर पडते.ह्या आठवणीतल्या प्रसंगांतून, भानावर येत मी स्वतःला सावरलं कारण ह्या मुलांच तर माझ्याकडे लक्षही नव्हतं आणि मी नको इतका विचार करत होते.

       पुढच्याच थांब्यावर ती मुलं उतरली.चला आता शांतता अनुभवायला मिळेल या विचारात असतानाच,एक साधारण पन्नाशी च्या असाव्यात अशा बाई जवळ येऊन बसल्या,रडत रडत म्हणाल्या आई वारली हो म्हणून रात्रीचा प्रवास करावा लागतो आहे.पुढचे दोन थांबे गेल्यावर त्या पण उतरल्या.पुढे पुन्हा मी एकटी आणि ती गाठोडेवाली बाई.ती काही उठायचं नाव घेत नव्हती आणि मला झोपच येत नव्हती.पुस्तक वाचावे म्हटले तर त्यातही लक्ष लागेना.मनातल्या मनात माझ्या बाळाची आठवण काढून थोडी सुखावली पण त्याने जर आईच्या आठवणीने घर डोक्यावर घेतले तर कल्पनेने पुन्हा दुखावले.रिकामटेकड्या डोक्यात नाना शंका आशंका उगाचच घर करीत होत्या.

         रेल्वे थांबली, ए कचोरी, शेगाव कचोरी ह्या आवाजाने दचकले .अरेच्चा शेगाव म्हणजे संत गजानन महाराजांच  वास्तव्य असलेलं ठिकाण..मनोमन संत गजानन महाराजांच  स्मरण करून म्हणाले हा एक भयंकर प्रवास जो माझ्या वाट्याला आलाय त्यात यशस्वी होऊ द्या देवा.विचारा विचारातच माझ्या एका दीड शहाणेपणाचा प्रसंग आठवला.एकदा बी एस सी विज्ञान तिसऱ्या वर्षांची परीक्षा झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी शेगावला जायचं ठरवलं.मंदिरात नेहमी महाप्रसाद मिळतो म्हणून मी म्हणाले आपण सगळ्यांनी घरून कांहीच न खाता जायचे .ठरले सगळ्यांची तयारी होता होता अकरा वाजता निघालो.मंदीरात जाऊन दर्शन घेतले एव्हाना दुपारचा दीड वाजला होता.येथून पुढे महाप्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे होतो ,तोच एक महिला साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद घेऊन येताना आम्हाला दिसली.आम्ही तेथील सेवाधारी बांधवास विचारले की आज पोळी भाजी मिळणार नाही का? त्यावर ते म्हणाले की आज एकादशी व्रत आहे आणि एकादशीला मंदिरात साबुदाणा खिचडीच प्रसाद म्हणून देण्यात येते.आम्ही सगळ्या त्यांच्या उत्तराने अवाक् झालो.दुपारचे अडीच वाजलेले आमच्या सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होते.साबुदाणा खिचडीत तर आमचे पोट भरणार नव्हतेच.मी माझ्यावरच संतापले कारण महाप्रसाद घेण्याचा माझाच मानस होता ना. मग बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो, आणि जेवणाचा सगळा भुर्दंड मी भरला.आहे ना माझा दीड शहाणेपणाचा प्रसंग.

                बराच वेळ तो रेल्वेचा खडखडाट आणि मी ,एकमेकांचे साथीदार झालो होतो,त्याची लय जरा कमी जास्त झाली की मी नविन थांबा येणार या अपेक्षेने बघायची पण सिग्नल हिरवा झाला की ती पुन्हा त्याच लयीत चालू लागायची.एकवेळ खूप शिट्ट्या वाजवत वाजवत रेल्वे हळुहळू थांबली मी बाहेर डोकावून पाहिले तर ,मला पारस ही गावाची पाटी दिसली आणि माझ्या मनात कुठेतरी जपून असलेल्या आठवणी जाग्या झाल्या.माझे बाबा रेल्वेत स्टेशन मास्तर होते आणि मी अगदी लहान असताना माझे बाबा पारस या गावी बदलीवर आलेले होते आणि नोकरीत रुजू झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच बदली होती.आजी आजोबा आणि आत्या काका एकूण ११ लोकांच्या कुटुंबात आई बाबा राहातं होते.तत्कालीन परिस्थितीत घरातल्या सुनबाई ला सगळ्यांचा स्वयंपाक,धुणी भांडी करावी लागत असे.बाबांची बदली झाल्यामुळे आई अनायासेच आता या कष्टातून सुटणार होती.माझ्या जन्मानंतर लगेच बाबांची बदली झाल्यामुळे, आईसाठी मी नशीबवान ठरले होते.पण आत्या वगैरे लोकांना माझा राग असायचा, कारण त्यांना हक्काची मिळालेली कामवाली आता बाबांसोबत निघून जाणार होती.बदली रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण ती रद्द झाली नाही, आणि मग आई बाबा आणि मी येथे पारसला आलो होतो.मोठ्या ताईला आजीने ठेवून घेतले होते.त्यावेळी आमच्या घरात आजी म्हणेल ते प्रमाण असायचं.हे सगळं आईने सांगितलेले.

            मला समजायला लागल्यापासून मला जे आठवत होते ते स्टेशनवरील आमचं , निवासस्थान त्याचं ते दगडी बांधकाम अजूनही तसंच होतं.बाजुचं हॉटेल आता रात्र असल्याने बंद होतं.त्या हॉटेलचा मालक मन्ना गोड काही बनवलं की मला , चांगल्या तुपाची ताजी जिलेबी ,शिरा असं काही काही आणून देत असे. आई म्हणायची अरे मन्ना लहानपणी कशाला लाड करतोस तीचे मला खूप जड जाईल बरं,पण तो म्हणायचा बाईजी छोट्या बेबीला दिल्याने मला काही कमी पडत नाही.स्टेशनवर अनेक सुधारणा झाल्या होत्या.मी शाळेत सातवी आठवीत असताना , उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबांना जेव्हा छोट्या गावाच्या स्टेशनवर पंधरा दिवसांसाठी कामावर जावे लागायचे ,तेव्हा आई कणिक डाळ तांदूळ आणि आवश्यक तेवढी भांडी घेऊन ,आम्ही मस्त खेडेगावी राहायला जायचो.बाबांसाठी असलेल्या निवासस्थानी राहायचे.सकाळी सकाळी आमराईत फिरायला जायचे.तेथील शुद्ध  हवा आणि निसर्गाच्या सान्नीध्यातलं जीवन खूप आनंदीत करत असे.येताना ते शेताचे मालक  कच्च्या  कै-या  द्यायचे.जेवणासोबत कच्च्या कै-या खाण्याची मजा काही औरच होती.

              रेल्वे धावत होती आणि माझ्या आठवणीही मनातल्या मनात धावत होत्या. गाडीमध्ये सोबत कुणीही नसलं तरी आठवणी मात्र माझी चांगली सोबत करीत होत्या.मधेच मलकापूर स्टेशन दिसलं आणि आजी आजोबांच घर आठवलं,लागलीच आजीचा सुंदर चेहरा ,लांबलचक केसांचा जुडा आणि त्यावरील शेवंतीची वेणी असा चेहरा डोळ्यापुढून सरकला.दिसायला खूप सुंदर होती आजी,आम्हा नातवंडा साठी प्रेमळ होती,पण सुनेला मात्र जबरदस्त धाक असायचा. इतक्यात रेल्वे नदीच्या लोखंडी पुलावरून धावायला लागली,अरे हो येथली नळगंगा नदी असेल म्हणत मी अंधारातच बाहेर बघू लागले.मलकापूर गावात तेव्हा पाण्याची फार टंचाई असे.जास्तीचे कपडे धुवायला मी ताईसोबत नदीवर गेल्याचेही आठवले.एकदा तर वाहत्या पाण्यात आमची चादरच वाहून गेली होती,घरी आल्यावर आजीचा ओरडा खाल्ला होता.

    हळुहळू पुर्वेची आभा प्रसन्नतेची जाणीव घेऊन आली. केव्हापासून काळी दिसणारी झाडं आता हिरवी दिसू लागली होती.सूर्यप्रकाशाने  त्या तिमिराला घालवून,तेजोमय विश्व दर्शन द्यायला सुरू केले होते.शेतावर पाण्यावर सगळीकडे ,सूर्याची  तेजोमय लाली पसरली होती.दिवस उजाडला  की माणसाच्या मनातली भीती कशी काय संपते कोण जाणे पण संपते हे नक्की, मी अनुभवलंय. मग मी मनाशीच म्हणाले चला आज आपण एक भला मोठा पराक्रम केला या विचारात मी खूप आनंदले.पुढे भुसावळ जंक्शन आलं. स्टेशन ला गाडी खूप  वेळ थांबली . गळ्यात एक बॅग घेऊन जाणारे रेल्वेने ये-जा करणारे अनेक लोकांचे समूह  भराभर  चढले.सगळे आपापली जागा घेऊन बसले.आता माझ्या मनाला खूप बरं वाटलं होतं,पण तसं कुणाला सांगता येत पण नव्हतं.आता सगळ्यांच्या बोलण्याचे अनेक आवाज ,त्यात त्या चहावाला कचोरी वाल्यांचे आवाज ,मघांची शांतता कुठल्याकुठे पळाली होती.थोड्याच वेळात एक तिकीट तपासणीस आले.सगळ्यांनी आपापली तिकीटे,पासेस दाखवले.मी पण तिकीट दाखविलं,मग ते समोरच्या बाकावर झोपलेल्या गाठोडे वाल्या बाईला तिकीट विचारू लागले,ती हुं नाही की चुं नाही. त्यांनी तिच्या हाताला धरून हलवले तर तिचा हात बाकावरून खाली कोसळला. अरे हे काय मी भयाने विस्मयचकितच झाले होते.उरात धस्स झालं, हातपाय थरथरत होते, म्हणजे मी रात्रभर जी व्यक्ती माझी सोबत समजत होते ते एक प्रेत होतं.मी एका प्रेतासोबत प्रवास केला तर!!! तर .मनात प्रचंड अशांती उसळली, ओठ कोरडे पडू लागले.मी ती जागा सोडून,लांब दुसरीकडे जाऊन बसले. थोडंसं पाणी प्यायले,चहा घेतला.जरा बरं वाटलं.तेथील लोकांच्या आपसातील बोलण्यावरून कळलं की, रेल्वे पोलीस ते शव घेऊन गेले.

        त्यानंतर रेल्वेगाडी नाशिक ला गेली मी आपल्या प्रशिक्षणात रूजू झाले प्रशिक्षण यशस्वीरित्या आटोपून परत घरी आले.  त्यानंतर मात्र मी एकटीने प्रवास करताना हा प्रसंग आठवल्याशिवाय राहात नाही.घरी माझे दीर आणि त्यांचे मित्र,मात्र मला सगळे’बोल्ड वहिनी’ म्हणून चिडवू लागले.


     ©स्वाती संजय देशपांडे . नागपूर.

     ८३८०८३५४०३.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू