पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक अविस्मणीय रेल प्रवास

एक अविस्मणीय रेल प्रवास


आयुष्यातला प्रवास आनंदाने अनुभवणारा एक आनंद यात्री अशी स्वतःचीच ओळख स्वतःच्या मनाला करून देताना एक वेगळाच आनंद वाटतो.

ह्या वाक्याला नीट निरखून पाहिले की " प्रवास " आणि " यात्री " हे दोन्ही आपसात संबंध असणारे शब्द दिसून येतात.

प्रवास ज्याला हिंदीत " सफर " असे ही म्हटले जाते, असा हा शब्द हिंदी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत आपल्याला आढळतो आणि मजा म्हणजे दोघांचा अर्थ अगदी वेगळा आहे.

आयुष्यातले काही प्रवास असे असतात की ज्यात " सफर " ह्या शब्दाचा हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतला आभास होतो. 

" आयुष्यास कलाटणी देणारा रेल्वेचा प्रवास " ह्या शीर्षकाखाली आज मी अश्याच एका " सफर " ची गोष्ट  करणार आहे.

सुरुवाती पासूनच पर्यटनाची मला प्रचंड आवड आहे आणि भगवंता कृपेने पर्यटन मला खूपदा शक्य देखील होते.

उन्हाळी महिने सोडल्यास प्रत्येक महिन्यात मी सकुटुंब कुठे ना कुठे फिरायला जात असतो. कुठेच नाहीं गेलो तर माझ्या मूळ गावी , इंदूर (म.प्र.) येथे तर जाणे होतेच.

प्रत्येक प्रवासात ट्रेन मध्ये किमान एक रात्र जाताना आणि तशीच येताना आमचा रेल्वे प्रवास असतोच. आज ह्या लेखात माझ्या आयुष्याच्या पुस्तकात २०११ मध्ये केलेल्या प्रवासाची लिहिलेली काही पाने उघडून मी आपणा सर्वांसमोर वाचणार आहे.

२०१० - २०११ मध्ये मी तामिनाडूमधील चेन्नई येथे कार्यरत होतो.

नुकतच लग्न झालेलं, माझे वडील माझ्या लग्नाच्या ७ वर्षांपूर्वीच देवाघरी गेल्याने,  3 जणांचा (आई, मी आणि पत्नी असा) असाच आमचा छोटासा परिवार. 

तेथे राहून , माझ्या मोटारसायकल वर ट्रिपल सीट बसून आम्ही हिंडत असत. जीवनाचा तो आनंद देखील काही वेगळाच होता

तेथे राहत असताना असेच एके दिवशी , आई आणि पत्नीस घेऊन मदुरै व रामेश्वरम् येथे जावेसे वाटले.

चेन्नई ते मदुरै हा ४९३ किमी चा पल्ला ट्रेन ने गाठावा आणि मदुरै ला मीनाक्षी देवी आई चे दर्शन करून, आणि मदुरै चे सुप्रसिद्ध खादीचे कपडे घेऊन मग रामेश्वरम् ला जायचे आणि रामेश्वरम् येथे दर्शनपर्यटन करून , रामेश्वरम् हून सेतू एक्स्प्रेस ने परत चेन्नई ला कार्यस्थळी यायचे असे नियोजन केले.

त्याप्रमाणे रेल्वे बुकिंग देखील केले. फक्त एकच गोष्ट चुकली (कदाचित त्याचं चुकी मुळे हा लेख लिहिता येत आहे), आणि ती म्हणजे जाण्याचे तिकीट काढतानाच्या निर्णयात केलेली दिरंगाई !!!!!!!

ह्या लेखात मी २०११ मध्ये केलेल्या एका प्रवासाचा उल्लेख करत आहे , ज्यामुळे मी फिरायचे नियोजन, तिकीट काढताना घ्यावी लागणारी काळजी आणि रेल्वे तिकीटाचे नियोजन ह्या सर्वांचे महत्त्व शिकलो.

प्रवासाच्या साधारण २१ दिवसा आधी मी 3 टायर एसी चे तिकीट काढले. तिकीट काढल्यावर मला १,२ व ३ असे वेटलिस्टेड तिकीट मिळाले.

मला वाटले अजून २१ दिवस आहेत ना मग झालं होईल कन्फर्म... माझा हाच अतिविश्वास काही अंशी मला त्रास देऊन गेला. प्रवासाची तारीख हळू हळू जवळ येऊ लागली तरी तिकीटाच्या वेटींग चा आकडा काही पुढे सरकेना !!!!!! 

जायचा दिवस आला तरी तिकीट जैसत्तथेच, माझा सकारात्मकपणा मला चार्ट बनला की " होईल रे तिकीट कन्फर्म " असे सांगत होता.

पण वास्तविकता काही वेगळीच होती. शेवटी चार्ट बनल्यावर देखील आमचे तिकीट १,२ व ३ असे वेटलिस्टेडच राहिले.

आता सीट नसताना जायचे की नाही अशी पाल मनात चुकचुकली, पण डर के आगे जीत है असे म्हणत आम्ही सामान घेऊन घरून निघालो. 

चेन्नईत गिंडी ह्या लोकल च्या स्थानका जवळच आम्ही राहत होतो. येथे येऊन आम्ही चेन्नई एगमोर येथे जाणारी लोकल घेतली.

चेन्नई एगमोर येथून रात्री ८:४० वाजता सुटणारी चेन्नई एगमोर- सेंगोट्टाई, पोधिगाई एक्स्प्रेस आम्ही घेतली .

वेळ झाली आणि गाडी मार्गस्थ झाली ती सेंगोट्टाई च्या दिशेने, आणि ४९३ किमी ची आमची मदुराई पर्यंतची यात्रा सुरू झाली.

मनात फिरायचा आनंद, खिशात तिकीट असून तिकीट नसल्याचा भाव अश्या संमिश्र भावनेने आम्ही प्रवास करत होतो. 

स्वप्न होतं की जागा मिळावी आणि सत्य होतं ते खिशातले वेटींग चे तिकीट.

थोड्याच वेळात आम्हाला सत्य आणि स्वप्न ह्यातला फरक अगदी छान पणें जाणवून दिला तो तिकीट पर्यवेक्षकाने.

त्याने आमच्या चेहऱ्यावरचा भाव पहिला आणि त्याला भलताच " भाव " चढला.

तिकीट वेटलिस्टेड आहे हे पाहिल्यावर इंग्रजीत आम्हाला रागावू लागला, म्हणे " वेटींग तिकीट इस नॉट अलाउड इन एसी कोच, प्लिज गेट डाऊन फ्रॉम द ट्रेन ऑन द नेक्स्ट स्टेशन ऑर गो टू स्लीपर कोच  !!!!! ".

फर्मान इंग्रजीत ऐकवून रावसाहेब मोकळे झाले खरे पण अस्पष्ट दिसणाऱ्या प्रवासात (आई आणि पत्नीस गैरसोय न होता ) जायचे कसे हा प्रश्न मला पडला !!!!!!

रेल्वेला आरक्षणाचे रुपये १६५०/- देऊन तिकीट काढून सुध्धा हे रावसाहेब आपल्याला " घरचा आहेर " देत आहेत हेच मुळात माझ्या गळी उतरत नव्हते.

अहो " घरचा आहेर " हा शब्द रेल्वेच्या कर्मचाऱ्याने रेल्वतच दिलेला आहेर ह्या अर्थाने लिहिला आहे बरं मी !!!!!

शेवटी हिरमुसलेल्या चेहऱ्याने, चेंगल्पेट जंक्शन हे चेन्नई जवळील स्टेशन येण्याआधीच आम्ही स्लीपर च्या डब्या कडे मार्गस्थ झालो आणि घरच्या आहेराचा उर्वरित " कोटा ", पूर्ण करण्यासाठी सज्ज झालो.

यमसदनी जाताना, यमसदनाच्या दारात स्वागतासाठी साक्षात यमच उभा असावा, तसा तो स्लीपर कोच मधील तिकीट पर्यवेक्षक आमच्या स्वागताला स्लीपर कोच च्या दारात उभा होता

आम्हाला पाहून आम्ही स्थानिक नसल्याचे त्याला लगेच लक्षात आले आणि आश्चर्यकारक पणे त्याने आमच्याशी हिंदीत संवाद साधला. तामिळनाडूत आणि मुख्यतः चेन्नई येथे हिंदी बोलणारा सापडणे म्हणजे साध्या दिसणाऱ्या शिंपल्यात मोतीं सापडण्या इतकं दुर्मिळ होतं.

त्याने अगदी शांत पणे विचारले , " क्या हुआ? आपका टिकट कन्फर्म नहीं हुआ क्या ?" , मी मनात म्हटलं की        " रावसाहेब , जर तुम्ही इतकेच अंतर्यामी आहात तर आम्हाला सीट हवी आहे ती पण द्या की !!!!! " .

शेवटी गोड बोलून त्याला मी आम्हाला सीट देण्यास तयार केले. वाटाघाटी झाल्या आणि रेल्वे ची अधिकृत पावती बनवून घेऊन मी त्याच्या कडून तिरूचिरापल्ली पर्यंत सीट घेतल्या. शेवटी रात्री २ वाजे पर्यंत का असेना , आम्हाला झोपायला मिळाले !!!!

ही गाडी ज्या मार्गे जाते त्या प्रमाणे, तिरूचिरापल्ली हून दिंडिगल मार्गे मदुरै फक्त २ तासात येते.

मी म्हटले की रात्री २ वाजता जरी तिरूचिरापल्ली ला उठावे लागले तर फक्त २ तासाचाच प्रवास बाकी राहील शेवटी मिळालेल्या बर्थ वर मस्त गाढ झोपलो होतो. 
हिंदीत घोडे बेच कर सो गए हो अगदी तसेच !!!!!

पण कहानी मे ट्विस्ट अभी बाकी था !!!!

रात्री वाजता तिरूचिरापल्ली कधी आल ते कळलेच नाही, आणि ज्यांचे आरक्षण होते ते आल्यावर त्यांनी आम्हाला एखाद्या मागणाऱ्यास आपण जसे हुस्कावतो तसे हुस्कवले.

क्षणार्धात दिवे सुरू झाले आणि (न कळणाऱ्या) तमिळ भाषेत कोणी तर आम्हास काही सांगू लागले. त्यांचे हावभाव पाहता हिच मंडळी ह्या रात्री पुरते ह्या सीट चे मालक आहेत हे आम्हाला लक्षात आले.

शेवटी घर के ना घाट के, असे स्वतःस म्हणत,  सोबत आणलेली पथारी कोचच्या जमिनीवर टाकली.

आई व पत्नी,  दोन बर्थ च्या मधील जागेत जमिनीवर तर मी मधल्या पॅसेजमधील जमिनीवर झोपलो.

ट्रेन मध्ये फिरणारे " निशाचर " आणि उंदीर ह्यांनी जणू उरलेल्या तासात माझ्याशी मैत्रीच केली.

थोड्यावेळात दिंडीगल स्टेशन गेले आणि आम्हाला वेध लागले मदुरै चे.

शेवटी अगदी वेळेवर (पहाटे ४:०० वाजता), आमची ट्रेन मदुरै ला पोहोचली आणि हा रात्री ८:४० वाजता सुरू झालेला धास्ती आणि मस्ती नी भरलेला प्रवास पूर्ण झाला.

मदुरै स्टेशन वर (अर्धवट झोपेमुळे ) सुजलेल्या लाल डोळ्यांनी आम्ही उतरलो आणि उतरून एकमेकांकडे हसून  असे पाहिले जसे एव्हरेस्ट शिखर सर केले असावे !!!!!!

ह्या प्रवासामुळे मला खूप काही शिकता आले.

मुख्यतः नियोजन (मग ते रेल्वे चे असो की आयुष्याचे) फार गरजेचे आहे.

जो पर्यंत तुमच्या कडे स्थैर्य आहे (उदाहरणार्थ रेल्वे चे कन्फर्म तिकीट) , तो पर्यंत लोक तुमचा आदर करतात, अन्यथा कोणीही (अगदी ट्रेन मध्ये चहा देणारा पण) तुमचा आदर करत नाही. 

अजून एक गोष्ट जाणवली ती अशी की पैसा खर्च करूनच समाधान मिळवता येते हा माझा गैर समज होता.

पैसे असून किंवा ते खर्च करूनही तुमच्यात स्थर्य नसेल तर त्या खर्चाचा काही उपयोग होत नाही. 

एक अजून सकारात्मक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे ह्या स्थितीत सुध्धा माझ्या आईने आणि काहीच महिन्यांपूर्वी आमच्या घरी लग्न होऊन आलेल्या माझ्या पत्नी ने दाखवलेली कमालीची तडजोड. 

ज्या मुलीशी मी काहीच महिन्यांपूर्वी लग्न केले होते आणि जिने विशेष कधीच (तिचे वडील रेल्वेत मोठ्या पदावर असल्याने) , वेटींग च्या तिकीटावर प्रवास केला नव्हता ती देखील माझ्याच सारखी (नाईलाजास्तव) रेल्वे डब्याच्या जमिनीवर पहुडून , मी असेल त्या स्थितीत तुमच्या सोबत समरुप होऊ शकते हे मला जाणवून देत होती.

आज ह्या स्पर्धेच्या निमित्ताने, साधारण १२ वर्षां पूर्वी केलेल्या रोचक प्रवासाची आठवण कागदावर उतरवता आली आणि अर्थातच " त्या " प्रवासाची आठवण आपणा समोर ठेवता आली. 

सर्वांना माझ्या कडून (तुम्ही भविष्यात करणाऱ्या) रेल्वेच्या आणि अर्थात आयुष्याच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद, नमस्कार.
 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू