पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठीचा व्हॅलेंटाईन डे

 फेब्रुवारी महिना उजडलारे उजाडला किंबहुना त्याही आधीपासून " व्हॅलेंटाइन डे" चे वारे वहायला सुरुवात होते...

 

       जणूकाही या दिवशी प्रेम व्यक्त केले नाही तर, इतर दिवशी केलेल्या प्रेमाला अर्थच राहणार नाही. सगळं संपलं, अशा पद्धतीने धावपळ चालू असते..आणि दुसऱ्या दिवसापासून परत नेहमीचेच...वादविवाद भांडण संशय...पण या भानगडीत बिचारे गुलाबाचे फुल मात्र मातीमोल होते..प्रेमापेक्षा त्याला आपले काटेच बरे असे वाटत असेल...

 

      त्यानंतर सुरू होतो तो मराठीचा अभिमान...मराठीचे स्फुरण चढते...ते पण फक्त २७ फेब्रुवारी पर्यंत... फारफार तर अठ्ठावीस तारखे पर्यंत..त्यानंतर ३६४/३६५ दिवस तिची अवस्था गुलाबाच्या फुला सारखीच असते..

फरक इतकाच की इतर भाष्यांचे काटेरी कुंपण तिला घातले जाते..

काट्यातील गुलाब तोडायला काटे

टोचायची भीती असते..आणि मराठी भाषा सोडून इतर भाषा बोलताना मनाला त्याची बोचणीही नसते...

 

      २७ फेब्रुवारी हा मराठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक, श्री.वि वा शिरवाडकर,

उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस.

तो दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो...

दुर्दैवाने तो गौरव त्या दिवसापर्यंतच राहतो.. (कुसुमाग्रज हे नाव त्यांची लहान बहिण कुसुम हिच्या नावावरून होते)..

 

      एरवी आपण दिवसातून किती तरी वेळा आई आई म्हणत असतो...काही लागलं, दुखलं खुपल की आपोआप तोंडातून आई ग निघते..आईला रोज मान देतो ना मग माय मराठीला का फक्त एकच दिवस द्यायचा. एकच दिवस तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा...

 

      आपला वाढदिवस तरी कुठे आपण मराठी महिन्या प्रमाणे करतो ..तो इंग्रजी महिन्या प्रमाणेच करतो. शिवाय तो आपला वाढदिवस नसतो...तो बर्थ डे असतो...एकवेळ औक्षण नाही केले तरी चालते, पण तोंडाला क्रीम केक मात्र फसफसा फासल्या जातो...

 

       हो पण जर वाद घालायचे असतील, दंगे करायचे असतील तर मात्र मोठ्या पुरुषांचे वाढदिवस 

हे तिथी प्रमाणे की इंग्रजी महिन्या प्रमाणे करायचे हे वर्षानुवर्षे चालू राहते...

 

       आपल्या लहानपणी परीक्षेला जाताना... वेंधळेपणा करू नको घाई करू नको, चांगला पेपर लिहीरे बाळा असे आई वडील, घरातील मंडळी सांगायची.

       आता All the best, best of luck म्हंटल्या शिवाय आपण कुणाचे शुभ चिंततो हे सिद्धच होत नाही असे वाटते...

 

      तीच गोष्ट एखाद्याच्या निधनाची असते...मनापासून शोक झाला हे सुद्धा Heartfelt condolance या शब्दानेच करतात..मग त्या घरातील वृद्ध व्यक्तींना त्याचा अर्थ कळो वा ना कळो...

 

       एखाद्याचं कौतुक Hats off नेच होते...सलाम शब्द येतच नाही तोंडातून...

 

      उस्फूर्तपणे येणारे रोजचे शब्द म्हणजे sorry, thanks, oh god,....चुकलो, माफ कर, अरे देवा म्हणायला आपल्याला लाज वाटते...कित्ती छान म्हणणार नाही पण awesome लगेच उच्चारल जाते.

 

     किती गोड ! यातील गोडवा मला तरी so cute मध्ये सापडत नाही...

 

     किती सुंदर किती भव्य हे सोप्या भाषेत सांगण्या पेक्षा  

"Gorgeous" म्हणताना एका क्षणात आपल्याला त्याचे स्पेलिंग तरी आठवते काहो? मला तरी नाही...stunning हा सुद्धा त्याच प्रकारातला शब्द...

 

       आजकाल तर संडास, मोरी, (न्हाणीघर), शब्द बोलणारा अति मागास समजल्या जातो...टॉयलेट बाथरूम म्हंटले की कसे posh posh वाटायला लागते...शब्द कोणताही वापरा रे, तिथे करतो ती घाणच असते...

 

     अगदी शाळेत जाऊ लागलेल

 शेंबड पोरगं बाकी काही नाही पण May I go to toilet teacher..

हे मात्र शिकतो...सू सू ला जावू किंवा करंगळी दाखवून गुपचूप वर्गाबाहेर जायचे दिवस आता संपले. इंग्रजी माध्यमातील 

एटीकेट्स आणि मॅनर्स पाळताना निरागसपणाही संपला..

 

      Smile Please...म्हणून फोटोग्राफर आपल्याला स्मितहास्य 

करण्यासाठी जणू अलर्ट करत असतो.....नाहीतर फोटो रडवेला येईल ना !!...

 

      वेदना झाल्यातर कळवळून उच्चारला जाणाऱ्या आई ग ची जागा आता Ouch (आऊच) ने घेतली...फिल्मी सिताऱ्यांचा पगडा बसलाय, दुसरे काय...

 

      मराठी मालिकेतील एका गाण्यातील माझ्या लक्षात राहिलेल्या दोन ओळी सांगते...

 

       क का कि की कु कू के कै कै

माझी मराठी गोड लै लै लै...

 

      आपल्या लहानपणी पाहुणे आले की लहानमूल...."नाचरे मोरा, आंब्याच्या वनात, किंवा लहान माझी बाहुली मोठी तिची सावली" म्हणताना आपल्याच तालात मग्न असायची. आता त्याची जागा "ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार" ने घेतली, पोर मात्र एकदा आई बाबांकडे तर एकदा पाहुण्यांकडे भांभावल्या नजरेने बघत आणि आवंढा गिळत गिळत नाच पूर्ण करतो..

 

      आजच्या पिढीला नाव ठेवताना साठ सत्तर वर्षांपूर्वी नोकरीला लागलेले लोक सुध्दा पगार, निवृत्ती वेतन, वेतनसुधारणा

 या ऐवजी सॅलरी, पेन्शन, वेज रिविजन शब्द वापरतात.. त्याचे काय? 

 

       माय बापांची वडिलोपार्जित संपत्ती वारसा हक्काने वाटणी करून पुढच्या पिढीला दिली जाते तशीच, आपल्या पूर्वजांकडून मिळालेला मराठी भाषेचा खजिना का नाही पुढच्या पिढीला देत आपण? ..तो आपण आपल्या पुरता ठेवला...आणि आपण आपल्या मुलांना जे दिलेच नाही ते

पुढच्या पिढीत त्यांच्या मुलांकडे कसे देणार? 

 

       अगदी मारामारी करून दुकानदारांना मराठी पाट्या लावायला लावल्या, तरी पुढच्या पिढीत ते वाचणार तरी कोण?... सगळी इंग्रजाळलेली मुल असतील ना ती!! मग परत काय होणार की वाचता येत नाही, समजत नाही म्हणून ती पाटी परत इंग्रजीत लिहिली जाईल...

 

      व्हॉट्स ॲप चे तर काही विचारू नका...न चुकता Good mornig, good night, (त्यातही काटकसर GM, GN) Msg टाकणारे अचानक मराठी भाषेवर लेक्चर द्यायला लागतात..निदान त्या दिवशी तरी सुप्रभात, शुभ सकाळ, शुभ रात्र, शुभ रजनी बोलावे याचे भान नसते...कीव येते अक्षरशः...

 

       दुसऱ्या दिवशी परत आपले Hi, Hellow, How are you, sweet dream, take care(tc)

 Have a nice day...सुरू होते.. 

 

      रडणाऱ्या लहानग्याला Baby Don't Cry म्हंटल्यावर तो अजून भोकांड पसरेल, की बाळा रडू नको म्हटलं की ते शांत बसेल? 

 

       चुकी इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांची नाही, आपण त्यांना शाळेत घातले....आणि नाही म्हंटले तरी ती आजच्या कालची गरज आहे हे नाकारून चालणार नाही..वेगवेगळ्या भाषा आल्या पाहिजेच, पण मराठी भाषा न विसरता..

 

      संत ज्ञानेश्वरांनी ..

   "माझा मराठीची बोलू कौतुके,

परि अमृतातेही पैजा जिंके,"

अशी मराठीची महती सांगितली, प्रेम आणि अभिमान व्यक्त केला..

 

      अमृताशी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल..कारण अमृता पेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा आणि माधुर्य जास्त आहे..

 

       शिक्षणासाठी, स्त्री शिक्षणासाठी झटणारे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई कोण होते? शिवाजी संभाजी कोण होते?

मराठीच ना! 

       मराठीचा अभेद्य किल्ला असणाऱ्या महाराष्ट्राला, त्याच्या राजधानीलाच मराठी भाषा उद्ध्वस्त करणारा सुरुंग आपल्या मराठी भाषिकांनी लावलाय, तिथे परकियांना शिव्या देण्यात, दोषी ठरविण्यात काय अर्थ? आपलेच नाणे खोटे असेच म्हणावे लागेल ..त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभर

मोठमोठ्या आवाजात मराठी गाणी

 वाजवून मराठी लिहिता वाचता येणार नाही..ती शिकाविच लागेल.

 

          शिवाय आजकाल शाळांचा परिसर म्हणजे Ambience बघून

( परिसर शब्द समजला नाही तर? म्हणून लिहिलंय) प्रवेश घेतला जातो...तर मग मुलांना मजा वाटेल, प्रसन्न वाटेल असे प्रयत्न करायला काय हरकत आहे.

     

      अजिंठा वेरुळ लेण्या, शनिवार वाडा बघताना त्याचा इतिहास मुलांना माहीत नसतो.. ती एक ट्रीप, आणि फोटो काढण्या इतपत मुल मजा घेतात...कारण मराठी इतके दुसऱ्या भाषेत याचे रसभरीत वर्णन वाचायला मिळतच नाही ..

 

      राम लक्ष्मण आता रामा, लक्ष्मणा, क्रिष्ना कधी झाले ते कळलेच नाही ..कारण इंग्रजी स्पेलिंग..

 

       एवढेच काय मराठी घरातील मुलांना साधे अंक सुद्धा माहीत नसतात...म्हणजे किती? हा प्रश्न लगेच विचारला जातो...मग आपल्यालाच त्यांना इंग्रजीत तो अंक सांगावा लागतो..अरे बाबा (उदा.८९) एकोण नव्वद म्हणजे एटीनाईन....

 

       शिवाय सामाजिक भान ठेवणेही गरजेचे आहे ..मराठी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका यांची नावे मराठीतच ठेवा ...आणि मराठी पुरस्कार सोहळ्यात मराठी गाणी वाजवा...त्यात हिंदी का? मराठी गीते, लावणी, पोवाडे म्हणणारे कलाकार काय कमी नाहीत आपल्याकडे.

 

       आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकल्या सारखे मराठीमाय कडे पाठ फिरवली आहे...त्या आईला घरी आणा... बाल मंदिर, विद्यामंदिर उभारा, शाळा हेच विद्यादेवता सरस्वतीचे मंदिर आहे....तिला पूजा...देवी प्रसन्न होईल...

 

      मोर्चे काढण्यापेक्षा मराठी शाळांची मोर्चे बांधणी करूयात..

 

       मराठी दिनाच्या दिवशी नारे लावण्यापेक्षा मराठी शाळेच्या, मराठी भाषेच्या प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलूया..

 

       आता तरी मराठी भाषा ऑक्झिजनवर आहे...व्हेंटिलेटरची

वेळ येऊ नये इतकेच सांगावेसे वाटते..

 

       चांगल्या कामाची सुरुवात स्वतःच्या घरातून करावी म्हणतात.

 

       चलातर मग लहानग्यांना

" मम्मा डॅडा" ऐवजी "आई बाबा"

म्हणायला शिकवूया...हेच मराठी भाषा पुढे नेण्यातील पाहिले पाऊल असेल...

 

        आणि अजून एक सांगायचे..

 व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा तर खुशाल करा...पण याच तारखेला.. १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा हल्ल्यात ४० जवानांचा (CRPF)

मृत्यू झाला होता ते विसरू नका..

 

      ते जवान सुद्धा कुणाचे तरी प्रेमी, पती, मित्र. होतेच की हो!

 

   सौ.सरोजिनी बागडे.

दि. २८.२.२०२४

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू