पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पॅसेंजर

 

ट्रेनकथा

पॅसेंजर

   “कुरकुरे.., पापडी.., नमकीन.., चनामसाला.... पाणी बॉटल....”

   बऱ्याच वेळापासून ओरडून-ओरडून घशाला कोरड आली होती. आज पॅसेंजरमध्ये गर्दी नसल्याने फारसा धंदाही झाला नव्हता. केव्हा-केव्हा असंच व्हायचं. नुकतेच पावसाचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी कमीच असायची. त्यातल्या त्यात लहान मुलंबाळं असली की आमच्या धंद्याला तेजी असायची.

   ‘गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर प्लॅटफॉर्म नंबर एकवर येत आहे....’

   गाडीचा ब्रेक लागल्याने वेग मंदावला होता. समोरचं स्टेशन आलं होतं. स्टेशन आलं की, या डब्यातून उतरून दुसऱ्या डब्यात पुन्हा चढायचं आणि पुन्हा घशाला कोरड येईपावेतो ओरडायचं.    

   “चणादाळ, बिस्कीट, कुरकुरे, नमकीन....”

   एखाद्या सीटवर मुलंबाळं दिसली की, थोडा वेळ थांबायचं, तिथेच रेंगाळायचं.

   “आई घेऊन देणं गं पॉपकॉर्न....” एखादा मुलगा रडायचा. तेव्हा त्यांचं केविलवाने होणं बघून काही आई-वडिलांना त्यावर माया यायची. तर कधी....

   “ऐ चूप बस.... नाहीतर देईन धपाटा... जेव्हातेव्हा सारखा घेऊन दे, घेऊन दे म्हणून मागे लागतोस...” चारदोन रुपये आगाऊ खर्च होतात म्हणून आईवडिलाकडून त्या मुलांना धपाटा बसायचा.

   मी मात्र असे चित्र रोज बघायचो. त्यात नवल असं नव्हतंच. मात्र येणाऱ्या-जाणाऱ्या दोन पॅसेंजरमधून जवळपास पाच-सहा तास माझा खाऊ विकण्याचा धंदा चालायचा.

   होय, चार वर्षे झाली. मी रोज पॅसेंजरमध्ये खाऊ विकायचा धंदा सुरू केलेला. तसं पाहता सुरुवातीला खूप लाज वाटायची. पण घराजवळच्या एका मित्रामुळेच मी कॅन्टीन मालकाकडे कमिशनवर काम करायला जाऊ लागलो होतो. तसं पाहता माझं बारावीपर्यंतचं शिक्षण कसंबसं झालेलं. पुढं शिकावं असा एकही गुण माझ्यात नव्हता. मी स्वतःलाच ओळखलं होतं. घरची परिस्थिती एकदम तशी हलाखीची. कुठेतरी कामधंदा करावा म्हणून एक-दोन किराणा दुकानातही पुड्या बांधण्याचं काम सुरू केलं. पण मालकाचा तगादा... अगदी कमी रोजंदारीत जास्त काम, दिवसभर त्यात दमून-थकून जायचो. कुठेतरी दिवसभराची शंभर रुपये मजुरी मिळायची. मला ते काम नको असेच वाटायचे. एके दिवशी घराजवळच्या गणेशने, तो रेल्वे कॅन्टीनमध्ये कामाला असल्याने त्यांनीच मला हे काम सुचविले होते.

   पॅसेंजरच्या वेळेत स्टेशनवर जायचं. नागभीड ते चांदाफोर्ट दोन तासाचे अंतर. फक्त दोन फेरी पूर्ण करायच्या. असे एकूण कमी अधिक पाच-सहा तास वेळ घालवीत चांगले दोनतीनशे रुपये कमिशन मिळवायचं. जेवढा जास्त माल विकायचा तेवढे जास्त कमिशन मिळायचे. इतर अवांतर वेळात इतरही काही कामे करायचा.

   सुरुवातीचे चार-सहा महिने सोडले तर आता या धंद्यात माझा छान जम बसला होता. खूप काही नवे अनुभव, रोज नवे-नवे प्रवासी, त्यांचं जगणं, वागणं, बोलणं यात रमल्याने फार आनंद मिळायचा. महिन्याकाठी दहा-पंधरा हजार रुपये नफा मिळणे ही साधी बाब नव्हतीच.

   मी प्रवाशात त्यांच्या स्वभावानुरूप रमून त्यांच्याशी गोड-गोड बोलायचा. त्यांच्यात रमायचा. बऱ्याचशा लोकांशी माझ्या ओळखीपाळखी वाढल्या होत्या. पण हा धंदा कुठवर असाच करायचा? प्रश्न माझ्यासमोर उभा राहायचा. माझ्या वाढत्या वयानुरूप आपण स्थिर धंदा शोधावा. असेही मनात यायचे पण भांडवल आणि एखादी छान जागा मिळाल्याशिवाय का धंदा करता येतो? त्यापेक्षा आपलं हेच रहाटगाडगं बरं म्हणत रोज या पॅसेंजरमध्ये मी असायचा.

   ‘यात्रीगण कृपया ध्यान दे... गोंदिया बल्लारशा जानेवाली ट्रेन थोडेही समय मे छुट रही है...’

   मी डब्यातून आपला खाऊचा थैला घेऊन उतरलो. मी आता मागच्या दुसऱ्या डब्यात शिरलो होतो.

   “चल सरक रे पटकन...! बाजूला हो...” मी डोक्यावरील व हातातील थैला डब्याच्या दरवाजात फेकत डब्यात घाईघाईतच चढलो. पॅसेंजरने हळूहळू वेग पकडला होता.

   “कुरकुरे... पापडी, नमकीन... पॉपकॉर्न...” माझं पुन्हा डब्यात खाऊ विकणं सुरू झालं. आम्ही चार-पाच मुले हा धंदा रोज करायचो. या डब्यातून त्या डब्यात उतरत-चढत खाऊ विकायचा. स्वतःचे कौशल्य आणि गोड बोलण्याने अधिकचा सामान विकणे मला सहज जमायचं.

    समोरच्या बाजूला असलेली ती दहा-बारा वर्षाची मुलगी आणि तिचा भाऊ आपल्या वडीलाकडे “खाऊ घेऊन द्या!” म्हणून मागे लागलेली. ती रडत होती.

   “हं! देऊ काय हे बिस्किट... नमकीन.” मी तिच्याजवळ जाऊन म्हणालो. तिने अलगद हात पुढे केला. तेवढ्यात तिच्या वडिलांनी नकार दिला. “नको... नको.”

   ती मुलगी जास्त जोराने रडायला लागली. मी थोडा वेळ त्यांच्याकडे बघतच राहिलो. कदाचित त्यांच्याकडे पैसे कमी असतील किंवा इतरही काहीतरी कारण असेल म्हणून मी पुढे निघालो. पुन्हा “कुरकुरे... नमकीन...” आवाज देत मी पुढे जाऊ लागलो.

   पाच-सात मिनिट मी डब्यात फिरतच राहिलो. गर्दी नसल्याने चाळीस रुपयाचा खाऊ फक्त विकल्या गेला होता. एवढ्यातच टी.सी. तिकीट चेक तपासत तिथे आलेला. मी पुढील स्टेशन यायला पाच-एक मिनिट वेळ असल्याने दारापाशी थांबून त्या मुलीकडे बघू लागलो. कदाचित आवाज देऊन पुन्हा खाऊ मागवतील ही अपेक्षा. तसं माझं मन मला सहज सुचवत होतं.

   “हं दाखवा तिकीट.” त्या व्यक्तीने तिकीट दाखविलं होतं. टी.सी. त्यांच्याकडे बघतच राहिला.

   “ही तर एकच आहे आणि मुलांचे तिकीट कुठे आहे?”

   “जी नाही.... साहेब. एकाच तिकिटाचे पैसे होते. मुलांची नाही काढली. लहानच आहेत ना ते!”

   “लहान म्हणजे... तेवढी चांगली चौथी-पाचवीतली आहेत ना! त्यांची तिकीट लागेल. कुठून बसले? कुठे चालले?” टी.सी. रागातच बोलला.

   त्या व्यक्तीने हात जोडत विनवणी केली.

   “बरं मग! आता काय? तुमच्यावर चारशे रुपये दंड आकारावे लागेल.”

   “नाही जी साहेब, असं करू नका.... नाहीत आमच्याकडे पैसे... खरं सांगतोय साहेब... कालपासून ही लेकरं उपाशी आहेत. मी चांद्याला काम शोधायला चाललोय. या मुलांची आई लहानपणीच गेली जी. कसंबसं खेड्यात सांभाळ करतोय. घरदार-शेतीवाडी काहीच नसल्याने तिथं पोट भरणे अवघड झाल्याने, एका ओळखीच्या व्यक्तीने चांद्याला कारखान्यात काम करायला बोलावलं. कसंबसं यांचं शिक्षणही होईल. तिथे झोपडपट्टीत राहता येईल असेही म्हणाल्याने मी निघालो साहेब. दया करा माझेवर... तुमचे तिकीटचे पैसे मी आठवणीने आणून देईन... काम भेटल्यावर खरंच परत करेन साहेब... तुम्हाला खरं सांगतो साहेब. शपथ या पोराच्या आईची!”

   खरंतर तो रडकुंडीस येऊन विनवणी करीत होता. मुलंही रडू लागली होती. मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. माझंही मन एवढ्या वर्षात कधीच नरमल नव्हतं ते त्या गोजिरवाण्या बाळांना बघून द्रवलं होतं.

   तिच्या वडिलांच्या अंगावर फाटकी मळकी शर्ट, पॅन्ट आणि मुलगीही तसेच मळलेले कपडे घालून... दोन दिवसापासून त्यांच्या अंगाला आंघोळही नसेल असेच वाटत होते. त्यांनी तर साधं जेवणही केलं नव्हतं. टी.सी.लाही आता काहीएक सुचत नसावं. तसं तर त्यांना अशा घटना नेहमीच बघायला मिळतात.

   “बरं! दोघांचं तेवढं तिकीट तरी बनवून घ्या.. नाहीतर पुढे दुसरे स्कॉटचे साहेब आले तर माझी फजिती व्हायची.”

   “साहेब नाहीत जी पैसे.... बघा ना... हे घर सामानाचं तेवढं गाठोड. यात सामान तेवढं आहे.”

   “विनातिकीट प्रवास गुन्हा आहे. कैद होते माहित आहे ना!”

   “हो जी साहेब... आता कैदेत तरी टाका साहेब... सायंकाळचे जेवण तरी भेटल पोराबारांना.” तो हमसून रडू लागला होता. ती पोरंही रडायला लागली. इतर प्रवासीही त्यांच्याकडे बघतच होती.

   मी त्यांचं बोलणं ऐकतच होतो. माझंही मन त्या लेकरांना बघून गहिवरलं. मी त्यांच्याजवळ गेलो. नुकतेच दुसरे स्टेशन येणार होते.

   “साहेब, जाऊ द्या... हे घ्या चाळीस रुपये, दोघांचे तिकीट, मी देतो आहे. काढून घ्या.”

   “ओळखीचे आहेत का रे तुझ्या?”

   “नाही जी... पण या लेकरांना बघून...”

   त्यांना चाळीस रुपयाचे तिकीट काढून दिले होते. टी.सी. माझ्याकडे एकटक बघू लागला होता. ती मुलगी, भाऊ, तिचे वडील माझ्याकडे बघतच राहिले. त्यांचे थोडे रडण्याचे उसासे कमी झाले होते.

   “प्लॅटफॉर्म नंबर दो पे गाडी....” गाडीचा ब्रेक लागून गाडी थांबत होती. टी.सी. दूरवर... पुढे पुन्हा तिकीट चेक करीत जाऊ लागलेला.

   मी अलगद थैल्यातील बिस्कीट, पाणी बॉटल काढून त्यांना दिली. “घे बेटा! काय नाव तुझं? घे... रडू नकोस... दोघेही भाऊ खा. घे.... आणि हं! असे यापुढे विनातिकीट प्रवास करत जाऊ नका.” मी तिच्या वडिलांना म्हणालो.

   ट्रेन थांबल्याने मी त्यांचा निरोप घेत घाईतच उतरलो. मी पुढल्या डब्यात चढायला सज्ज झालो होतो. जाताना त्या मुलीकडे, तिच्या पप्पाकडे बघत राहिलो. ती गोड हसली. ती मात्र पहिल्यांदाच हसली होती. मी त्यांचा निरोप घेतला.

   पुन्हा दुसऱ्या डब्यात माझे तेच काम सुरू झालेलं. तसा आज धंदाही नव्हता. पण आज जीवनात पहिल्यांदाच मी असे मदतीने वागत स्वतःचं नुकसान करून घेतलं होतं. मला खरंतर पहिल्यांदाच इतकी कणव आली होती. ‘असो! पैसे काय आपण रोजच कमावतो. आपण कोण्यातरी गरीबाला मदत करून कामात तरी आलो.’ मनातच मी विचार करीत स्वतःवर आनंदीत झालो.  

   चांदा फोर्ट यायला पुन्हा तासभर वेळ होता. दोन-तीन स्टेशन असेच डबे चढत-उतरत खाऊ विकत राहिलो. गर्दी नसतानाही दोन-तीनशे रुपये नफा होईल एवढं सामान विकत समाधानी झालो होतो. सगळे डबे फिरून येत पुन्हा मी आता त्याच डब्यात पोहोचलो. मी बराच वेळ त्यांची आठवण व ती गोष्टही विसरलो होतो.

   पुन्हा तिथे ती मुलगी, भाऊ, ते वडील... त्यांना झोप येत असावी. त्यांचा चेहरा निस्तेज दिसत होता. माझं “कुरकुरे.... नमकीन....” आवाज ऐकून ती मुलगी जागी झाली. पूर्वीपेक्षाही ती मुलगी बरीच आनंदी दिसत होती. मी तिच्याकडे बघितले. काही वेळापूर्वी घडलेला सर्व प्रकार पुन्हा मन:पटलावर उभा राहिला. ‘अरे, ही कालपासून उपाशी...’ मला एकाएकी आठवले... मी माझ्या थैल्यातील रोजचा जेवणाचा डबा रोज चंद्रपूरला खायचा तो सहजच काढला.

   “काय नाव तुझं बेटा?”

    “मीनल..”

    “छान नाव आहे तुझं. हा घे जेवणाचा डबा... खाऊन घे. सगळे मिळून घ्या...” त्यांच्याकडे बघत म्हणालो. तिचे वडील माझ्याकडे बघतच राहिले.

   ‘लहानपणापासून आईविना असलेली पोरं, वडिलांनी केलेला सांभाळ... त्यांची होणारी तारांबळ...’ मी सहजच मनात आठवीत राहिलो.

   “कोणत्या वर्गात शिकतेस गं?”

   “चौथीला आहे.”

   “हो काय? फार हुशार दिसतेस. अगं मी बारावी शिकलो आहे. तू छान शिक... खूप मोठी हो...” ते तिघेही माझ्याकडे बघतच राहिले.

   “घ्या... घ्या... डब्बा. तुमच्यासाठीच मी दिला आहे. लाजू नका. खाऊन घ्या. माझ्या घरचा डबा आहे. खास तुमच्यासाठीच आणि हा कुरकुरे पाकीट, पाणी बाटल पण घ्या.”

   “पण माझ्याकडे पैसे नाहीत जी.”

   “तुम्हाला पैसे कोणी मागितले? मला कळते सगळं. घ्या संकोचू नका.” मी त्यांना आग्रहाने जेवणाचा डबा दिला होता.

   पुढचं स्टेशन आल्यावर मी गाडीचा डबा न बदलवितात त्यांच्यासोबत बराच वेळ बोलत राहिलो. तिचे वडील मला त्यांची अगदी दुःखमय जीवन कहाणी सांगून मोकळे झाले होते. किती दुःखद वेदना आणि त्यांचे हलाखीचे जीवन. आपण स्वतःचं जीवन दुःखमय समजत असतो, पण आपल्यापेक्षाही कितीतरी यातना हे लहान मुलं, कितीतरी संसार, कुटुंबे सहन करीत असतात. मला फार-फार प्रगल्भ जाणीव झाली होती. मी तिच्या वडीलापेक्षा वयाने लहान असूनही जणू शहाणा होत त्यांना जणू उपदेश देत होतो. होय, त्यांना सहकार्य, मदत करून जीवनात एखादं चांगलं कार्य करून आनंदीत झालो होतो.

   तिचे वडील एका दूरच्या नातेवाईकाकडे जाऊन कारखान्यात काम करणार होते. तिथे झोपडपट्टीत राहून मुलांना शिकवणार होते. कदाचित पुढे तरी चार घास या लेकरांना सुखाचे देऊ हाच आशावाद त्यांच्या चेहऱ्यावर होता. मी बराच वेळ खाऊ न विकता तिथेच थांबलो. ती दोघेही मुले भुकेमुळे पटापटा जेवण करत राहिली आणि मला समाधान मिळत गेलं. लवकरच चांदा फोर्ट स्टेशन जवळ येत होतं.

   “चला तर... भेटूया!” मी निरोप घेतला.

   “भाऊ, तुमचं लई उपकार... तुमचे पैसे मी कधी इकडे आलो तर नक्कीच देईन.” तिच्या वडिलांनी सहजच रडक्या भावनेने मला म्हटलं.

   तिघेही पोटभर जेवली होती. माझ्या मनाला निश्चितच आनंद झालेला.

   स्टेशन आलं. सगळे प्रवासी उतरले. मी मीनलच्या डोक्यावर हात लावत तिला आशीर्वाद देत म्हटलं, “भेटू मीनल... खूप शिक... मोठी हो... मी नागभीडला असतो. नेहमी या स्टेशनवर.. या गाडीत... भेटू...” ती माझ्याकडे बघतच राहिली. ती वारंवार माझ्याकडे बघत, डब्यातून उतरून ती आता वडिलांसोबत दूरवर जात होती. मी तिच्याकडे कटाक्ष टाकत माझा उरलेला सामान उचलून स्टेशनच्या कॅन्टींगकडे वळलो होतो....

बारा वर्षानंतर

   नागभीडच्या कॅन्टीनचा मी मालक होतो. धंद्यात जम बसून मी स्वतः ठेका घेतला होता. दहा-बारा मुले आता माझ्याकडे काम करायची. या छोट्याशा रोजीरोटीतून मी बराच पैसा कमावला. घरदार, बायको, माझी गोड मुलगी.... तिचंही नाव अनपेक्षितपणे ‘मीनल’ हेच मला त्यावेळेस सुचलं होतं.

   कित्येक वर्ष झाली. आता मी माझ्या कॅन्टीनमध्ये मालक म्हणून पैसे मोजतो आहे. त्या धंद्यातून रग्गड कमाई करीत आहे. ट्रेन आली की कॅन्टीनमध्ये बरेच लोक चहा, नाश्ता, जेवण करायला यायचे. आज कॅन्टीनमध्ये बरीच गर्दी होती.

   एक तरुणी आणि एक तरुण काऊंटरवर आलेली.

   “काय हवे मॅडमजी? बबन... यांना काय हवं ते दे रे!” मी त्यांच्याकडे नजर घालीत म्हणालो. ती एकटक माझ्याकडे बघतच राहिली. कदाचित ती काय खावे हा विचार करीत असेल.

   “अरे बबन! यांना मेनूकार्ड तरी दे. बघा मॅडम, बेंचवर बसा. ऑर्डर करा. असे उभे राहू नका.” मी त्यांना हातवारे करीत म्हटलं.

    मात्र ती माझ्याकडे एकटक बघत मला निरखत राहिली. मी इतर गिऱ्हाईक सांभाळत तिच्याकडे पुन्हा लक्ष दिले. ती खूप सुंदर तरुणी होती. तिच्यासोबत तिच्या वयाचा एक मुलगा होता.

   “मीनल...”

   मीनल नाव घेताच मी तिच्याकडे बघितलं.

   “हो माझ्या मुलीचं नाव मीनल आहे. ओळखतेस काय तू तिला. पण ती लहान आहे अगदी  दहा वर्षाची...”

   “नाही जी. मी मीनल आहे.”

   “तुमचं नाव मीनल काय? पण मी नाही ओळखले तुम्हाला.”

   “मी वडसा जंक्शन रेल्वे हॉस्पिटलमध्ये नुकतीच स्टॉपनर्स म्हणून लागली आहे. हे माझे होणारे पती, सोबत आहेत. माझा भाऊ इंजिनियर झाला आहे जी. बाबा चंद्रपूरला आज छान काम करतात. नवे घरदार सारंकाही आहे.” तिच्या बोलण्याने मी अचंबित झालो होतो.

   “कोण मीनल? काय सांगते ही...” मी मनातून गोंधळलो होतो.

   ती माझ्याकडे एकटक बघत रडते आहे.... ती हळूच काउंटरच्या बाजूने माझ्या खुर्चीजवळ येऊन अगदी पाय पकडून ढसाढसा रडायला लागली. मला घट्ट बिलगली. सर्व कॅन्टीनमधील लोकं बघू लागले. मी गोंधळलो होतो. एकाएकी....

   “काका, मी तुमची मीनल.... बारा वर्षांपूर्वी... तुम्ही मला खाऊ दिलेली... जेवणाचा डबा दिलेली.... टीसीने पकडले असता तिकिटाचे पैसेही तुम्ही दिलेले... चंद्रपूरला जाणारी पॅसेंजर... ती मीच मीनल... तुम्ही विसरलेत वाटते. ‘खूप शिक, खूप मोठी हो! भेटू... ‘असं तुम्हीच म्हणाले होते ना! काका, मी खूप मोठी झाली हो. हा बिस्किटचा पुडा मी सतत पर्समध्ये घेऊन फिरते आहे. तुम्ही कधीतरी भेटाल, तुम्हाला या हाताने भरवेन म्हणून....”

    आज एकाएकी मला तुम्ही या स्टेशनवर कॅन्टीनमध्ये दिसलात. किती वर्ष झाले? तुम्हाला प्रत्येक वेळी पॅसेंजरने जाता-येताना शोधत असते मी. आज भेटाल, उद्या भेटाल म्हणून कित्येक लोकांना विचारलं. पण तुमचं नावही ठाऊक नव्हतं. अद्याप नाही ओळखलंत काय मला?”

    ती माझ्या पायावर डोके ठेवत अश्रू गाळू लागली. तिचे अश्रू माझ्या पायावर पडले. मी तिला कवेत घेत म्हणालो... “हं ओळखलं गं... तू माझीच मीनल....”

 

कथाकार - संजय येरणे.

नागभीड, जिल्हा चंद्रपूर.

मो. ९४०४१२१०९८

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू