पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रोखठोक

 साप्ता. ब्रम्हपुरी ब्लास्ट "रोखठोक" दिवाळी अंक म्हणजे मानवतेचा जागर होय- संजय येरणे.

   नेताजी मेश्राम यांचे साप्ताहिक ब्रम्हपुरी ब्लास्टचा दिवाळी अंक "रोखठोक" याचे स्वागत करताना दरवर्षीप्रमाणे मनाला फुलवणारे तेवढेच विचारप्रवर्तक म्हणून झुलवणारे, झोंबणारे साहित्य या अंकात समाविष्ट असून प्रसिद्ध ते नवोदित साहित्यिकांच्या विचारांचा जागर महापुरुषाच्या नजरेतून, दृष्टिकोनातून बघण्याचे व सुयोग्य आचरणाचे धडे देत माणुसकी विचारार्थं कल्याणार्थ झटणारे हे या परिसरातील एकमेव वैचारिक साप्ताहिक व परिवर्तनासाठी कटीबद्ध दिवाळी अंक होय.

   “नथुराम गोडसे द्वेषाचा प्रचारक” धीरेंद्र के झा यांचा मूळ दीर्घ लेख अमित इंदुरकर भिवापूर यांनी अनुवादित करून खरंतर ऐतिहासिक कागदपत्रातील खरे संशोधन दाखवीत गोडसे आणि आर.एस.एस यांच्यावरील संबंध काय? कसे होते? याची मनाला जाणीव देत मेंदुला झिंणझिण्या आणणारी मांडणी यातून दर्शविली आहे.

   आज समाजात जाती-धर्म विषयक भेदाभेद भाष्य वाढीस लागलेला दिसून येतो आहे. याचे खरेतर पडसाद राजकीय द्वंदातून अनुभवयास मिळते आहे. भारतीय घटना आणि धर्मनिरपेक्षता यातील सर्व मूल्य बघू जाता, आता मनात विचाराची क्रांती होणे गरजेचे आहे. यातीलच एक घटना बघू जाता, ‘अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांचा काही मराठी तरुणांनी निर्घुण खून केला याचं तात्कालीन कारण की अक्षयने गावात आंबेडकर जयंती साजरी केली होती.’ खरेतर ही घटना कमाल लज्जास्पद गोष्ट आहे. श्याम रामटेके यांनी या घटनेचा आधार घेऊन "मराठे आणि महार हे भाऊ भाऊ" हा उत्तम लेख लिहिला आहे. यातून एक वैचारिक क्रांती, विचारांचे प्रस्थ देत समता प्रस्थापित करण्याचं कार्य झालेलं दिसून येते.

   शत्रुघ्न लोणारे यांच्या "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे तीन गुरु" हा लेख तर नवख्या रसिकांना उपदेशात्मक विचारप्रवण करावयास लावणारा प्रेरणा देणारा असाच आहे. बाबासाहेब तथागताकडे वळण्याची कारणे, संत कबीर यांच्या विचारातून स्वसामर्थ्याकडे समाजप्रवण करीत जगणे, या जगण्याला क्रांतीची फुले देत महात्मा फुलेचे सत्यशोधकीय विचार यांची सांगड म्हणजेच बाबासाहेबाचे विश्व कल्याणमय कार्य होय. अगदी मार्मिक विवेचन या लेखातून समंजसपणा देऊन जातो आहे.

   आंतरराष्ट्रीय दर्जाचा खास लेख म्हणून "पॅलेस्टिनी नेते यासर अराफत कोण होते? ते पंतप्रधान इंदिरा गांधींना कायम माय सिस्टर म्हणून हाक मारायचे. त्यांच्या कार्याविषयी नवीन माहिती, ज्ञान व नवी ओळख होण्यास मदत झाली आहे

   “आजची पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रियांचे समाजातील स्थान” यावरील डॉ. सुकेशनी बोरकर यांचा लेख भारतीय स्त्रियांचे वास्तव वर्तमान जीवनावर भाष्य करीत सावित्रीमाईच्या कार्यातून स्त्रियांना सन्मान मिळवणे गरजेचे आहे असे प्रेरित करीत स्त्री कर्तृत्व, त्याग, नेतृत्व या बाबीला अधोरेखित करीत जाणीव प्रदान करणारा सुंदर लेख आहे

   “पळपुट्या पुरुषांचे आश्रयस्थान ब्रिटन” हा अभिनंदन मिश्रा पत्रकार यांचा आंतरराष्ट्रीय हितसंबंधावर प्रहार करणारा लेख बघता भारताच्या विजय मल्ल्या, रविशंकर, संजय भंडारी, निरव मोदी, ललित मोदी अशा अनेक व्यक्तींनी ब्रिटनमध्ये आश्रय मिळवीले आहे या व्यक्तीची भारतातील कुकार्यवृत्ती व इथून झालेले पलायन यातील बाबीवर चिंतन करावयास लावणारा हा लेख होय. फार उत्तम इत्यंभूत माहिती या लेखातून मिळालेली आहे.

   “मोबाईलमध्ये अडकलेली तरुणाई” युसूफभाई शेख सिंदेवाही यांचा लेख आजच्या वर्तमान मोबाईल संस्कृततिचे फायदे-तोटे दर्शवीत पुढील भविष्यातील दिवसांत जागरूकता निर्माण करीत तरुणाईला संदेश देणारा उत्तम लेख होय. आज स्वभाव, आचरण, दुर्गुण, एकलकोंडेपणा, विचारात होणारे बदल, श्रमवृत्तीचा होणारा नायनाट यावर परखड विश्लेषण त्यांनी केलेले आहे.

   सुदर्शन चखाले यांचा “...आणि संघाला रामराम ठोकला.” हा लेख म्हणजे त्यांनी भोगलेली स्वअनुभूती व वास्तववादी भूमिका यावर चिंतन करायला लावणारी आहे. धर्म, जात, वर्णभेद यातील भारतीय संस्कृतीचे विश्लेषण हिंदुत्व आणि राजकीय भूमिका याबाबत भाष्य करीत असताना ते म्हणतात... “मी कट्टर हिंदुत्ववादी राहिलो असतो तर कायमच इतर धर्माचा द्वेष करत राहिलो असतो. आता मी खऱ्या अर्थाने माणूस झालो आहे.” असे जेव्हा लेखक स्वअनुभव लिहितात तेव्हा खरंतर वाचक विचारशून्य होऊन अंतर्मुख होतो. या जगातील घडणाऱ्या घडामोडीवर चिंतन करायला लावतो आहे.

   खरेतर नेताजी मेश्राम संपादक यांनी उपदेशात्मक लेख निवड करून अंकात पेरणी करताना सामाजिक जाणिवेला किती महत्त्व देतात हे दिसून येते. या अंकातील अनेक लेख हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्न, समस्या यांची उकल सोडवीत माणुसकीचे अधिष्ठान प्रस्थापित करीत संत विचार व थोर महापुरुषांच्या विचारांची बैठक रुजवत आहेत.

   यंदाच्या दिवाळी अंकात संपादकानी फक्त सुंदर वैचारिक लेखांना स्थान दिले असून यात फक्त संजय येरणे यांची “विश्वासघात” ही एकमेव कथा या संग्रहाला कलाटणी देणारी तेवढीच रोचकता, रंजकता निर्माण करते. आज तरुणीवर होणारे अन्याय, अत्याचारास तिच्या कुटुंबियाकडून, नातेवाईकाकडूनच ती किती असुरक्षित आहे याची वास्तवभान देणारी एक सत्यकथा मानवी मनाला अंतर्मुख करून जाते आहे. रसिक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी तेवढेच समाज मूल्याचे भान देणारी ही कथा होय.

   पुन्हा काही लेखांचा विचार केल्यास “हिंदी एक विनोदी भाषा” भालचंद्र देशपांडे यांचा भाषिक लेख खुमासदार आहे. खरंतर हा लेख वाचल्यावर अत्यंत मार्मिक विनोद व भाषेचे महत्त्व यातून संदर्भित होतात.

   सुनील खोब्रागडे यांचा “हुकूमशाही विरुद्धच्या लढ्याची दिशा” हा लेख भारतीय लोकशाहीवर मार्मिक विवेचन करीत घटनात्मक मूल्याची जाणीव प्रदान करून जातो आहे. खरेतर पंतप्रधान मोदीची राजकीय भूमिका व त्यांच्याच कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून जाणारा हा लेख होय.

   इतिहास संशोधक प्रा. मोहन पवार यांचा लेख “शिवरायांचा खून..” इतिहासातील घटनात चिंतन करावयास लावणारा व सत्य इतिहासाचे कांगोरे दर्शविणारा, संदर्भ देणारा असाच आहे.

   “अन्यथा मरण अटळ आहे” सत्यवादी यांचा लेख बाबासाहेबांच्या विचाराची ज्योत प्रज्वलित करून भारतीय आरक्षण या बाबीवर संदर्भ देत वैचारिकता देणारा सुंदर लेख होय. मानवी मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य याची जाणीव देत शेतकरी, श्रमिक, सामान्य बहुजन यांच्या जीवनावर भाष्य करीत गरीब-श्रीमंत ही रूढ होणारी नवीन भेदाभेद दरी या पद्धतीवर मार्मिक भाष्य करून जातो आहे.

   आचार्य टी.टी. जुलमे यांचा “चंद्रपूरचा प्राचीन इतिहास” हा लेख जिल्ह्याचे इतिहासातील स्थान दर्शवीत प्राचीन संदर्भांवर सखोल माहिती देणारा सुंदर लेख होय.

   डॉ. धनराज खानोरकर यांनी “गाय शिवाय गोठा नाही अन् झडत्या शिवाय पोळा नाही” या लेखात पोळा या शेतकरी सणातील झडत्या यावर मार्मिक भाष्य करीत आपल्या श्रमिक संस्कृतीला उजागर केले आहे. झडत्यातून समाज प्रबोधन व समाज दिशा यावर परखड विश्लेषण झडत्या द्वारा झालेले आहे. एकंदरीत विनोदी शैलीने येणारा हा लेख अंकाचे साहित्यमूल्य वाढवून जातो आहे.

   अनिल भुसारी यांचा “भगतसिंग एक महान समाजवादी क्रांतीकारक साहित्यिक” हा वैचारिक लेख भारतीय स्वातंत्र्य कहाणीचा व त्यावेळेसच्या वेळेस सामाजिक क्रांतीवरील साहित्याची ओळख करून देत भारतीय भूमिकेचे विश्लेषण करतो आहे. आजच्या साहित्यिकांना वर्तमान वास्तव परिस्थितीचे, राजकीय भूमिकेचे चिंतन करावयाला लावून नव्याने लेखनस्थ होत प्रहार करावयास हाक देणारा असा हा फार सुंदर लेख होय. भगतसिंगाच्या साहित्यातील जाणीव मार्मिकत्व पेरणारा हा लेख होय.

   सुभाष मेश्राम यांनी “आदिवासी लोककला यातून वाड.मयीन भाष्य करीत त्याचे स्वरूप वैशिष्ट्ये व विवेचन, महत्त्व, निर्मिती, विकास, मूळ घटक व लोककलेचे वर्गीकरण यातून आदिवासी साहित्यातील जाणीवांची वाचकांसमोर मुद्देसूद माहिती मांडलेली आहे.

   अंकातील अगदी समारोपीय लेख म्हणजे “राजगृह विकत घ्यावे लागले त्याची गोष्ट” प्रकाश आंबेडकर यांच्या विचारातून मांडीत बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करणारा व वैचारिक बांधिलकी व बहुजनवादी विचारांची नाळ दाखवणारा हा लेख होय. खरेतर संपादक हे बुद्ध विचाराचे पाईक आहेत यामुळेच मनोरंजन हेतू न बाळगता फक्त विचारांची पेरणी करण्याचे कार्य संपादकांनी केलेले आहे. म्हणूनच सामाजिक वारसा म्हणून या लेखाचे महत्व अधोरेखित करीत त्यांचे अभिनंदन करायला हवे.

   “एक बिजा केला नाश, मग भोगीले कणस.” संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणी प्रमाणे संपादक महोदय विचाराची मांडणी करीत पुढील पिढीला वैचारिक जागृती देत आहेत. पुढे स्वातंत्र्याची खरी पहाट येईल, “सर्व सुखी नि संतू. सर्व सुखी निरामय” जगत होऊन जेव्हा भारत बुद्धविचार, संत विचाराला कवटाळेल तेव्हा इथले प्रश्न, समस्या वैयक्तिक व सामाजिक पातळीवर व राजकीय पातळीवर संपलेले असतील हा आशावाद घेऊन या संपादकीय कार्याला समोर जात आहेत. म्हणून महाराष्ट्रभर निर्माण होणाऱ्या अनेक दिवाळी अंकाला बघू जाता “रोखठोक” दिवाळी वैचारिक अंक हा निराळा, इतर अंकापेक्षा वेगळा आहे याची विशेषत्वाने नोंद घ्यावी लागते.

   याव्यतिरिक्त अंकात जाहिरात फार कमी आहेत. यामुळे सदर अंकातील विचार प्रस्थापित होऊ शकतात हे निर्विवाद सत्य आहे. विनोद, विडंबन, सुविचार, व्यंगचित्रे यांचे मनोरंजनात्मक श्रमिक, मार्मिक उपदेश तर पुन्हा वाचकाला वैचारिक दिशेकडे घेऊन जाणारे आहेत. घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषा व्यंगचित्र व मार्मिक संवाद अंकभर विडंबन दाखवीत मार्मिक उपदेश देतात.

   कविता विभागात प्रसिद्ध कवी, नवोदित कवींच्या समिश्र वैचारिक कवितांची मेजवानी आहे. यात हेमंत मुसरीफ यांनी धनतेरस, वसुबारस, लक्ष्मीपूजा, भाऊराया, पाडवा, डिलिव्हरी या सहा कवितांचा समावेश केला आहे. फार सुंदर वैचारिकता यात आहे. संगीता धोटे यांची सजा, ज्ञानेश वाकुडकर यांची तू पुन्हा येऊ नको, सुभाष मेश्राम यांची तोटा, शरण, हो आतातरी, मरगळ तर मिलिंद जीवने यांची महायुद्ध, आर. के. बिनधास यांची अभंगधारा, राजकीय क्रिकेट मॅच, अस्मिता माटे यांची माझी आई, उत्तम खोब्रागडे यांची मृत्यू, ‘चला धाब्यावर जाऊ’ ही कविता हेरंब कुलकर्णी यांची फार सुंदर कविता व राजकीय विडंबनात्मक विश्लेषण होय. माझी माय डॉ. मंजुषा साखरकर, छाया जांभुळे यांची तथागताची वाणी, विद्रोह होणारच बुद्धराज गवळी यांची कविता, रामकृष्ण जुनघरे यांनी रानपाखरू व आमची रीत न्यारी ही कविता, डॉ. धनराज खानोरकर वाट शिक्षणाची धरू, कल्पना सूर्यवंशी यांची काळोख गीत, प्रशांत खैरे फवारणी, दिवंगत कवी गुरुदत्त जनबंधू आपण कुठे जात आहोत व इतरही कविता इथे आहेत. अशाप्रकारे अनेक जाणत्या आणि नवोदित कवींच्या सुरेख कवितांची मेजवानी खरेतर या अंकात आपल्याला बघावयास मिळते. या अंकाचे समीक्षण व विश्लेषण करून म्हटले तर एखादा प्रबंध निर्माण करता येईल एवढा महत्त्वाचा ‘रोखठोक’ दिवाळी अंक म्हणून याकडे बघावे लागेल. मात्र शब्द मर्यादा याचा विचार करून जाता फक्त या अंकाची मांडणी व तोंड ओळख काय? हेच आपण दर्शवीत आपण अंकातील गांभिर्यता सांगू शकत आहोत.

यातील लेखक, कवी व त्यांचे वैचारिक साहित्य, जाणीव, मांडणी ही सामाजिक वैचारिक वारसा जपणारी असल्याने त्यांचेही आभार व्यक्त करीत ब्रम्हपुरी ब्लास्टचा “रोखठोक” हा दिवाळी अंक खरेतर या आजच्या कुप्रवृत्तीवर ब्लास्ट करीत प्रेरणा देणारा अंक होय. याचमुळे नेताजी मेश्राम संपादक महोदयाचे अभिनंदन करीत त्यांच्या विचारसरणीला व त्यांच्या बहुजनवादी नेतृत्व कृतीशीलतेला जयभीम करीत आम्ही पुढे वर्षभर चिंतन मनन करीत नव्या वर्षात नव्या अंकाची वाट बघत राहणार आहोत. धन्यवाद!

संजय येरणे साहित्यिक नागभीड, ९४०४१२१०९८

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू