पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक प्रवास

 

                  " एक प्रवास "

आमची रिक्षा एक वळण घेऊन रेल्वे स्टेशन ला

पोहोचली तेव्हा पुष्पक एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वर लागलेली होती. आम्हाला स्टेशन वर पोहोचायला थोडा उशीरच झाला होता. कसे बसे आपले सामान सांभाळत आम्ही ट्रेन मध्ये शिरलो. नेहमीप्रमाणे चिकार गर्दी होती

आपला सीट नंबर शोधत आम्ही आपल्या बर्थ पाशी आलो व सुटकेचा एक श्वास घेतला.

कित्येक जण धावत पळत ट्रेन मध्ये शिरत होते, माझे mr बर्थ खाली सामान जमविण्या साठी ओणवे झाले तेवढ्यात बाजुच्या सीट वर बसलेले एक गृहस्थ पुढें आले व त्यांनी ह्यांच्या पाठीवर जोरदार थाप मारली

अनपेक्षित पडलेल्या थापे मुळे हे उभे झाले व त्यांनी त्या गृहस्था कडे बघितले "काय विन्या विसरलास किं काय लेका "असे म्हणत परत थाप दिली.

ह्यांनी गोंधळून त्या माणसाच्या चेहऱ्या कडे बघितले.

"अरे असे काय बघतोयस?? मीं शरद! शाळे मधला शऱ्या!!

मीं ह्यांच्या चेहऱ्या कडे बघितले त्यावरून ह्यांनी

त्या गृहस्थाला ओळखले नसावे हे स्पष्ट दिसत होते.

हे काही बोलणार, त्याच वेळेस माझी नजर "त्या गृहस्थाच्या जवळ बसलेल्या स्त्री वर गेली.

अत्यंत व्याकुळ नजरेने ती माझ्या कडे बघत होती, दोन्ही हात जुळलेले, अगदी हुळुवार पणे ती नकारार्थी मान हलवत होती, जणू काही तिला काहीतरी सांगायचे होते.

मीं हळूच ह्यांचा हात दाबला व ह्यांनी त्या अनोळखी गृहस्थाच्या खांद्यावर थाप मारली 'अरे गंमत करत होतो "असे म्हणत त्याचे दोन्ही हात हातात घेतलें

तुला विसरू शकेन कां शऱ्या ?

ह्याच्या ह्या वाक्याने त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर हसू उमटले."बघ सुमन, तुला सांगत होतो नां, विन्या मला नक्की भेटेलi

ती स्त्री कसंनुस हसली.

ट्रेन ने आता स्पीड पकडली होती एका मागोमाग डबे धावत होते. त्या शरद नावाच्या गृहस्थाच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

"तुला ते चाळीसगाव च्या शाळेतले शिंदे मास्तर आठवतात कारे??

गणित चुकले कि काना खालीच वाजवायचे.

हो,हो आठवतात तर!त्याच्या मुळेच आपले गणित सुधारले नां?"ह्यांनी आपला उजवा कान कुरवाळत म्ह्टले.

"आणि पावसात चिंब भिजल्याने तुझी झालेली "ती "फजिती --"ती गोष्ट आठवून शरद राव? खो खो हसत सुटले. व त्याच बरोबर त्यांच्या हाता वर टाळी देत हे पण हसू लागले.

मला काहीच उमजत नव्हतं, आम्ही कधीच चाळीस गांव ला गेलो नव्हतो , ह्यांचे बालपण, शिक्षण सर्व मुंबईतच झाले होते मग आता चाळीस गांव ची शाळा, मास्तर, मित्र व हा "शरद "नावाचा जिवाभावाचा मित्र.

काही कळायला मार्ग नव्हता.

त्या दोघांच्या गप्पा मात्र रंगात आल्या होत्या.

"गावी कधी गेला होतास?? अजू, सदाशिव, ओंकार सध्या कोठे आहेत? कधी भेट होते कां??

भेट होते नां! ओंकार मुंबईलाच असतो.

मीं आश्चर्याने ह्यांच्या चेहऱ्या कडे बघितले,

"ओंकार "नावाचा ह्याचा कोणताही मित्रच नव्हता. मीं काही बोलणार त्या अगोदरच ह्यांनी

मला नजरेने गप्प केले.

"वडा --गरम गरम वडा "ह्या आवाजाने त्यांना परत काही आठवले असावे त्यांनी ह्यांना अक्षरशः ओढत प्लेटफॉर्म वर उतरवले. मीं बाहेर बघितले. ट्रेन कर्जत स्टेशन वर उभी होती.

"वहीनी, तुमच्या दोघींसाठी पण वडे आणतो हं.

डब्यात आता गर्दी होऊ लागली होती.

तेवढ्यात ती स्त्री(सुमन ) माझ्या जवळ येऊन बसली.

"माफ करा हं, तुम्हा दोघांना खूप त्रास होतोय हे मला कळतंय पण --तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला व डोळे भरून आले.

मला काही समजत नव्हते. बराच वेळाने ती शांत झाली. पदराने नाक व डोळे पुसत तिनें बाहेर बघितले. ते दोघे गरम गरम वड्यावर ताव मारत होते.

पुढें रुळावर काही तरी बिघाड झाल्याने ट्रेन सुटायला अवकाश होता.

मीं मोबाईल बघण्यात व्यस्त होते. तोच "ताई "ह्या आवाजाने मीं वर बघितले "ती बाई " मलाच उद्देशून बोलत होती, मीं मोबाईल बाजुला केला व प्रश्नार्थक नजरेने तिच्या कडे बघितले.

मला माहित आहें कि तुमची आमची काहीच ओळख नाही. पण --ती सांगू लागली.... , ऐव्हाना ट्रेन ने स्पीड घेतली, मीं प्लॅटफॉर्म वर बघितले,ते दोघे ही दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये चढले होते. आता पुढल्या स्टेशन पर्यन्त ते डब्यात येणे शक्य नव्हते.

ट्रेन च्या आवाजात तिनें जे सांगितले ते ऐकून मीं स्तब्धच झाले.

सुमन व शरद मूळचे चाळीस गांव चेच. तेथेच त्याचे बाल पण शिक्षण झाले. घरची परिस्थिती बेताचीच. वडील शेतकरी, घरात 5-6 भावंडे, छोटेसे घर. आई वडील दोघेही दिवस भर कष्ट करतं, तेव्हा रात्रीची भाकरी मिळत असे.

मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेणे शक्यच नव्हते.

मग शरद मेट्रिक झाल्यावर गावाच्या शाळेतच

मास्तर म्हणून रुजू झाला.

बरोबरचे सर्व मित्र पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी गेलें.

काळाच्या ओघात सर्व मित्र दूर झाले. कधी तरी भेटी गाठी घडायच्या पण विनायक मात्र त्याचा जिवाभावाचा मित्र होता. सुरवातीला पत्र व्यवहार. फोन. मग मोबाईल वर त्या दोघांच्या गप्पा खूप रंगायच्या. वर्षातून एकदा तरी भेट व्हायचीच.

विनायक त्याचा सुखं दुःखाचा साथीदार होता.

विनायक देखील बंगलूरू हून गावी आला कि शरद बरोबर वेळ घालवत असे.

काळा बरोबर च सर्वांचे संसार वाढले जबाबदाऱ्या वाढल्या. भेटी गाठी कमी झाल्या.. पण शरद व विनायक ची मैत्री तशीच होती. आठवड्यातून एकदा तरी गप्पा वाहयच्याच.

पण ह्या वेळेस 15दिवस झाले तरी विनायक भाऊजीचा फोन आला नव्हता.. शरद बैचेन होऊन सारखा त्याला फोन लावत होता पण मोबाईल बंदच होता. शेवटी फोन लागला. "विन्या, तुझा फोन नाही, बोलणं नाही, लेका, विसरलास कि काय?? का कुठल्या दुसऱ्या देशात निघून गेलास??

विनायक भाऊजीचे नाव ऐकून सुमन

बाहेर आली ,व शरद च्या चेहऱ्या कडे बघितले तर ह्यांचा चेहरा कसनुसा विचित्र झाला होता,सुमनने शरद च्या हातून फोन घेतला. दुसऱ्या बाजुला विनायक भाऊजींचा मुलगा आर्यन होता ""काकू 15दिवसापूर्वीच massive हार्ट अटेक मुळे बाबा आपल्याला सोडून गेला."

सुमनच्या हातून फोन गळून पडला.तिनें शरद कडे बघितले., (शरद ) डोकं धरून बसले होते. त्यांना कशाशीच शुद्ध नव्हती.

15दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर जणू काही घडलेच नाही असे वागत होते.

सुमन घाबरून गेली होती डॉ ने सांगितले कि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता. विनायक ह्या जगात नाही हे त्याच्या मनाने मान्यच केले नव्हते. व तेव्हा पासूनच विनायक भाऊजीच्या अंग काठी चा माणूस बघताच त्याला विनायक समजतात.

गेले दोन वर्षा पासून असेच चालू आहें. अनेकदा लोक त्यांना झिडकारतात, शिव्या गाळ्या करतात मग शरद आणखीनच agressive होतात.

आता आम्ही त्यांना मुंबईला ट्रीटमेंट साठीच घेऊन जात आहोत. आपण दोघांनी आम्हाला मदत केली त्या बद्दल धन्यवाद.

तिनें परत दोन्ही हात जोडले. ट्रेन ची स्पीड कमी झाली होती, बहुतेक मुंबई स्टेशन आले होते. दुसऱ्या डब्यातून हे व शरद हातात हात घालून हसत येत होते. सुमन ने चटकन आपले डोळे पुसले व सामान उतरवू लागली.

शरद ने ह्यांना (त्याच्या विन्याला )मिठी मारली व परत भेटायचे आश्वासन घेतलें. मीं कितीतरी वेळ दोघ्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत राहीले.

---तर ही ट्रेन कथा इथेच संपत नाहीये.

वर्ष भरानंतर आम्ही काही निमित्याने जळगाव ला चाललो होतो. ट्रेन चाळीसगाव स्टेशन वर थांबली होती. कुठेतरी मनात शरद सुमनचाच विचार चालू होता.. आणि काय --समोरून ते दोघे घाईघाईने ट्रेन मध्ये शिरले बर्थ खाली सामान जमवत असतानाच ह्यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली "काय शऱ्या, विसरलास कि काय? मीं विनायक तुझा विन्या "

शरद ने दोन्ही हात जोडले व म्हणाले मीं आता ठीक झालोय, आपली ओळख??

"मीं अशोक देसाई मुंबई "

सुमन कडूनच समजले कि मागल्या आमच्या भेटी नंतरच ह्याच्या तब्येतीत सुधार जाणवू लागला होता. मुंबईच्या डॉक्टरच्या ट्रीटमेंट मुळे आता ते पूर्ण पणे ठीक झाले आहेत. विनू भाऊजी आता ह्या जगात नाहीत हे त्यांच्या मनाने स्वीकारले आहें.

कितीतरी दिवसापासून आपल्याला भेटायची त्यांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. बोलता बोलता सुमन चे डोळे भरून आले.. मीं त्या दोघांकडे बघितले,

     शरद भाऊजींनी ह्यांचे हात हातात घेतलें ""साहेब आपले आभार कसे मानू?? "शऱ्या लेका,अरे साहेब काय म्हणतोयस?? मीं तुझा विन्या. "असे म्हणत ह्यांनी शरद ला मिठी मारली.

दोघांच्या डोळ्यातुन अश्रू धारा वाहत होत्या. बाहेर आकाश नीरभ्र झाले होते. वर्षा पूर्वी सुमन व शरद भाऊजी च्या जीवनाच्या ट्रेन चे रुळा वरून घसरलेले डबे परत रुळावर आले होते एका मागून एक डबे पुढें जात होते आपल्या गॅन्तव्य स्थानावर ज्यांण्या साठी ट्रेन ने आता स्पीड पकडली होती.

     

      ( समाप्त )       

डॉ विद्या वेल्हाणकर

अंधेरी, मुंबई.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू