पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्या आयुष्यातील स्त्रीचे स्थान

माझ्या आयुष्यातील स्त्रीचे स्थान

 

          आज दि.८ मार्च २०२४ ! " जागतिक महिला दिना " च्या सर्व महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा !

 

          आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या आयुष्यातील स्त्रीचे स्थान याबाबत लिहीत असताना मला माझ्या आयुष्यातील वेगवेगळे कालावधी आठवतात जसे की मी माझ्या आजीच्या सानिध्यात घालविलेला माझ्या बालपणीचा आजोळचा कालावधी. त्यानंतर पुन्हा सोलापुरात आल्यानंतर आई व बहिणीसोबतचा घालवलेला कालावधी व  त्यास जोडूनच पुढे माझे लग्न झाल्यानंतर माझ्या स्व.पत्नीचा कालावधी. त्यानंतरचा कालावधी हा माझ्या दोन्ही कन्या व मुलाच्या लग्नानंतर आमच्या घरात आलेल्या सुनबाई यांचा. अशा पद्ध्तीने आमच्या घरातील महिला-विश्व मी पाहिले, अनुभवले. आमच्या घरातील या महिलांनी माझ्या मनावर त्या त्या काळात व आज मितीस देखील अधिराज्य गाजविले व खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचे मोठेपण सिद्धही केले.

 

           मी इ.२ री ते ४ थी पर्यंत शिक्षणासाठी मी पंढरपूर येथे आजोळी होतो. या काळात मला फारशी समज ही नव्हती मात्र मात्र माझे आजोबा व आजी दोघेही कर्मठ असल्यामुळे कोणत्याही कुटुंबामध्ये ज्या पारंपरिक नीतिमत्तेच्या गोष्टी शिकविल्या जात, त्या मी तेथे आत्मसात केल्या. त्यात सायंकाळी देवापुढे रामरक्षा, गणेशस्तोत्र, हनुमान स्तोत्र, म्हटले जाई, याशिवाय पाढे पाठ करण्यासाठी परवचा म्हटला जाई. तो काळ आजच्या इतका सुधारीत नव्हता मात्र माझ्या आजीचे माझ्यावर कडक नियंत्रण असे. हॉटेल, सिनेमा, बेकरी, अशा बाह्य वातावरणात जाणे शक्यही नसे व तो आमचा प्रांतही नसे. अशा बाळबोध व संस्कारी वातावरणात माझे बालपण पुढे पुढे सरकत गेले व त्यास कारणीभूत होती ती माझी आजी श्रीमती विठाबाई.

 

         इ.५ वीत असताना मला वडिलांनी सोलापुरात आणले. जशी पंढरपूरला आजीची शिस्त असे, तशीच ती सोलापुरात माझ्या आईने लावली.  सोलापुरात जरी मी आलो तरी आमची सांपत्तिक परिस्थिती तितकीशी बरी नव्हती त्यामुळे आम्हा सर्व भावंडांवर आमच्या आईचा सतत संस्कारी स्वरूपाचा अंकुश असे. कोणत्याही परिस्थितीत आपली मुले गैर मार्गास जाणार नाहीत ना, याची माझी आई सतत काळजी घेई. याच पद्धतीने माझे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण सोलापुरात झाले. भावंडांमध्ये मीच मोठा असल्यामुळे लहान भावंडे आपोआपच माझ्याप्रमाणे वागत. माझ्या आयुष्याला योग्य गती दिली ती माझ्या स्व.आई श्रीमती सिंधूताई हिने.

 

         जेव्हा मला न्याय खात्यात नोकरी लागली त्यावेळेस माझ्या लग्नासाठी व आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मी नोकरी करणाऱ्या मुलीचा विचार केला व सन डिसेंबर १९७७ मध्ये मी विवाहबध्द झालो.  माझी पत्नी स्व.सुप्रिया सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवेस होती. तिची ३७ वर्षे सेवा झाली. आमच्या वैवाहिक आयुष्यात माझ्या पत्नीमुळे आर्थिक सुबत्ता आली. माझा मुलगा व दोन्ही मुली उच्चशिक्षित झाले व योग्य वेळी ती विवाहबद्ध झाली. माझे आयुष्य माझ्या पत्नीने पालटविले. माझ्या दोन्ही विवाहित मुली सौ. सुचेता व सौ.श्रुती ह्या सासरी आनंदात आहेत व त्या माझी काळजी घेतात, वारंवार फोन करून खुशाली विचारतात. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली ती केवळ माझ्या स्व.पत्नी सौ.सुप्रियामुळे.

 

         फेब्रुवारी २००६ मध्ये माझा मुलगा चि. सुशांत याचा विवाह झाला तो सौ.अमृता हिचेबरोबर. एक सुसंस्कारीत, सुशिक्षित व अनुरूप अशी सुनबाई मला लाभली. एक कर्तव्यतत्पर अशी सून मला मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला मुलाची व मुलींची अशी एकूण ५ नातवंडे आहेत व मी आजोबा या नात्याने तृप्त आहे. 

 

         जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने थोडे अधिक मी लिहू इच्छितो. आज महिला पुरुषांच्या तुलनेत बिलकुल मागे नाहीत. त्या शिक्षक, साहित्यिक, कवयित्री, न्यायाधीश, एडव्होकेट, इंजिनिअर, प्राध्यापक, डॉक्टर, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, वैमानिक, अंतराळवीर आहेत. मुलांच्या तुलनेत त्या अभ्यासात अधिक हुशार आहेत. त्यांना पुरुषवर्गाने प्रत्येक बाबतीत प्रोत्साहन दिले पाहिजे असे मला वाटते. मला असेही वाटते की नोकरी करणारी महिला असो की, गृहिणी वा सामाजिक कार्यकर्ती, तिची तुलना न करता तिच्या श्रमात पुरुषाने बरोबरीने भागीदार व्हावे, तिला थोडीशी उसंत द्यावी, स्पेस द्यावा, तिच्या भावना जाणून घ्याव्या, करिअरसाठी तिला प्रोत्साहित करावे, मुलांच्या संगोपनात व  घरकामात तिला मदत करावी, तिच्या आवडीनिवडी जोपासाव्यात व ती आनंदी कशी राहील असा प्रयत्न करावा असे मला वाटते व या सदिच्छेसह माझ्या लेखणीला मी विराम देतो.



दि.८ मार्च २०२४.             सुधीर नारायण इनामदार...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू